डॉ. अमोल कोल्हेंचा ‘नथुराम’ : मते -मतांतरे

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार व छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमुळे जनमानसात लोकप्रिय झालेले डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘ Why I Killed Gandhi’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे . महात्मा गांधींचा खूनी नथुराम गोडसेला नायक म्हणून प्रेझेंट करणाऱ्या या चित्रपटात अमोल कोल्हे यांनी नथूरामची भूमिका केल्यामुळे वादळ निर्माण झाले आहे .या विषयात संजय आवटे, सुनील तांबे , तुषार गांधी, संजय सोनवणी, कलीम अजीज, विश्वंभर चौधरी, बालाजी सुतार, श्रीरंजन आवटे, सतीश तांबे, असीम सरोदे, मुग्धा कर्णिक , गिरीश लता पंढरीनाथ हे महाराष्ट्रातील नामवंत अभ्यासक , पत्रकार , लेखक , कलावंत , सामजिक कार्यकते काय म्हणताहेत हे समजून घेऊया. सोबत चित्रपटाचा ट्रेलरही आहे , त्यातून चित्रपट कुठल्या प्रकारचा आहे, हे नक्की कळतं.

……………………………………………….

संजय आवटे, राज्य संपादक , दैनिक , ‘दिव्य मराठी’

डॉ. अमोल कोल्हे यांनी ज्या सिनेमामध्ये नथुराम गोडसेची भूमिका केली आहे, त्या सिनेमाचे नाव आहे – व्हाय आय किल्ड गांधी? क्रूरकर्मा नथुराम गोडसेच्या आत्मचरित्राचेच हे नाव आहे. हा सिनेमा अवघ्या पंचेचाळीस मिनिटांचा आहे. त्याचे अडीच मिनिटांचे ट्रेलर प्रसारित झाले आहे आणि गांधींच्या पुण्यतिथीला म्हणजे येत्या ३० जानेवारीला संपूर्ण सिनेमा ‘लाइमलाइट’ नावाच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणार आहे.

या सिनेमाचे जे ट्रेलर यूट्यूबवर आहे, त्यावरच्या प्रतिक्रिया पाहिल्या म्हणजे मी दोन दिवसांपासून का संतप्त आणि अस्वस्थ आहे, याचा अंदाज येईल. प्रचंड धार्मिक उन्माद आणि विखार निर्माण करणारा, ‘आयडिया ऑफ इंडिया’ पायदळी तुडवत गांधींना खलनायक करणारा असा हा भयंकर ‘प्रभावी’ सिनेमा असणार आहे.

मी यापूर्वी म्हटल्याप्रमाणे हा कपोलकल्पित सिनेमा नाही. वस्तुनिष्ठ माहिती आणि पुराव्यांवर तो आधारित असल्याचा दावा दिग्दर्शक अशोक त्यागी यांचाच आहे. डॉ. अमोल यांना ते माहीत आहे. नथुराम हा नायकच होता आणि गांधी खलनायक होता, हे सिद्ध करण्यासाठी हा सिनेमा काढला आहे, असे दिग्दर्शकच सांगतात. आजवर गांधींना विरोध झाला आहे, पण नथुरामला कोणी देशभक्त, विचारवंत, तारणहार वा महानायक वगैरे मानत नव्हते. हा सिनेमा ते करतो. ठरवून करतो. नथुरामला मुख्य प्रवाहाची ‘लेजिटेमसी’, मान्यता देऊ पाहातो.

उत्तर प्रदेश निवडणुकीच्या तोंडावर, मुद्दाम ओटीटीवर, मुद्दाम हिंदीमध्ये, अत्यंत बटबटीत असलेला असा हा सिनेमा येणे हा योगायोग नाही. मी म्हणतो त्याप्रमाणे, हे पूर्वनियोजित कारस्थान आहे. गांधीहत्येइतकाच अत्यंत भयंकर कट आहे.

शरद पवारांना या विषयाचे गांभीर्य अद्याप समजले नसावे. अन्यथा त्यांनी इतकी ‘कॅज्युअल कमेंट’ केली नसती. गांधींना नायक मानणा-या सिनेमात कोणीतरी नथुरामचा रोल करणे आणि नथुरामला नायक करण्यासाठी विपर्यस्तपणे इतिहास रंगवून निर्माण केलेल्या कारस्थानाचा वाहक होणे यात फरक आहे. ओटीटीवर तरूणाई मोठ्या संख्येने आहे. तिला चुकीचा इतिहास सांगून, सांस्कृतिक राष्ट्रवादाला मुख्य प्रवाह करण्याचा हा विखारी आणि आत्यंतिक ‘प्रभावी’ असा प्रयत्न आहे. गांधींविषयीचा द्वेष सर्वदूर पसरवण्याचा डाव आहे. सध्याच्या भवतालात तर हा प्रयत्न म्हणजे आगीत तेल टाकून देशभर दंगली भडकवण्याचे क्रूर कारस्थान आहे. यात कसलीही कला नाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. हा गुन्हा आहे.

म्हणून, मी काल म्हटल्याप्रमाणे सन्मित्र डॉ. अमोल कोल्हे यांनी बिनशर्त माफी मागायला हवी. समर्थन न करता, चूक झाल्याची कबुली द्यायला हवी. मराठी मालिकेतील एका भूमिकेच्या जोरावर खासदार झालेल्या अभिनेत्याला तर हे नीटपणे समजायला हवे. डॉ. अमोल हे मित्र आहेत आणि त्यांनी आजवर खूप चांगली कामेही केली आहेत. ठोस भूमिका घेतली आहे. ते संवादी आहेत. समंजस आहेत. विवेकी आहेत. पण, या मोठ्या कारस्थानाचे आपण वाहक झाल्याचे त्यांनी जाहीरपणे मान्य केले पाहिजे. समर्थन करत बसू नये. त्यांना एक संधी द्यायला हवी, असे मी म्हटले होते. ही अखेरची संधी आहे.

महात्मा गांधींच्या पुण्यतिथीपूर्वी डॉ. अमोल कोल्हे यांनी ही जाहीर कबुली द्यायला हवी.

तरच, गांधीमार्गाने त्यांना माफ करता येणे शक्य आहे. अन्यथा, शरद पवार तुम्हाला भलेही माफ करतील. महाराष्ट्र करणार नाही.

डॉ. अमोल, एक लक्षात घ्या. काही झाले, कोणी काही केले, तरी तो महाचिवट गांधी काही मरणार नाही. गांधी आडवा येत राहणारच आहे. पण, उद्याच्या पिढ्या मात्र तुम्हाला आरोपीच्या पिंज-यात उभ्या करणार आहेत!

(जिज्ञासूंनी यापूर्वीचे माझे व्हिडिओ निवेदनही https://www.facebook.com/sunjay.awate11/videos/644499643548546 पूर्ण पाहावे. ऐकावे. ते माझ्या फेसबुक वॉलवर आहे.)

……………………………………………………………………..

सुनील तांबे, नामवंत पत्रकार , अभ्यासक

२०१७ साली “व्हाय आय कील्ड गांधी” या चित्रपटाचं चित्रीकरण झालं.

या चित्रपटात नथूराम गोडसेची भूमिका करणारे अमोल कोल्हे त्यावेळी अराजकीय होते (या काळात ते कुणाला मतदान करत होते ह्याची माहिती नाही कारण मतदान गुप्त असतं. परंतु त्यांचा कोणत्याही राजकीय पक्षाशी वा राजकीय भूमिकेशी संबंध नव्हता).

२०१९ साली ते राष्ट्रवादी झाले. त्याचा संबंध त्यांच्या अभिनयाशी वा त्यांनी साकार केलेल्या भूमिकेशी नसावा. तो निखळ विचार परिवर्तनाचा मुद्दा असावा.

अमोल कोल्हे यांच्या विचार परिवर्तनाचं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने करायला हवं.

त्यांचे मतदार आणि प्रेक्षकही त्यांच्या विचारस्वातंत्र्याचं, अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचं स्वागत करतील.

……………….

निळू फुले यांनी खलनायकाच्या भूमिका केल्या.

व्हाय आय कील्ड गांधी या चित्रपटात नथूराम गोडसे नायक आहे, गांधीजी खलनायक आहेत.

अमोल कोल्हे नायकाची भूमिका करत आहेत.

ही भूमिका त्यांनी विचारपूर्वक स्वीकारलेली आहे.

……………………

अमोल कोल्हेंनी औरंगजेबाची भूमिका केली असती तर ते निवडून आले असते का?

नथूरामची भूमिका केल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस नाही तर भाजपच्या तिकीटावर निवडून येऊ शकतात.

…..

खोट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे की अमोल कोल्हेंमध्ये?

…………………

एम. जी. रामचंद्रन हे तमिळ सिनेमाचे सुपरस्टार होते. १९३६ ते १९८७ एवढा प्रदीर्घकाळ ते सिनेमात काम करत होते. या काळातच ते तमिळनाडूतील आत्मसन्मान चळवळीत (तिथली ब्राह्मणेतर चळवळ) सक्रीय होते.

१९७२ साली त्यांनी अण्णा द्रविड मुनेत्र कळहम हा राजकीय पक्ष काढला. त्यांनी शेकडो भूमिका पडद्यावर साकारल्या. मात्र आपल्या वैचारिक भूमिकेशी प्रतारणा करणारी एकही भूमिका त्यांनी साकारलेली नाही.

त्यांचे प्रतिस्पर्धी एम. करुणानिधी यांनी कांदबरी, नाटक, पटकथा लिहिल्या. तेही सिनेमा उद्योगात होते. परंतु त्यांचा एकही संवाद वा पटकथा त्यांच्या वैचारिक भूमिकेशी प्रतारणा करणारी नव्हती.

रजनीकांत १९७५ पासून सिनेमांमध्ये काम करतो आहे. तोही आत्मसन्मान चळवळीशी जोडला गेला. त्यानेही आत्मसन्मान चळवळीला छेद देणारी एकही भूमिका आजवर केलेली नाही.

राजकारणात करिअर करण्याबाबत अमोल कोल्हे गंभीर नाहीत (उथळ आहेत) वा संधीसाधू आहेत. निवड त्यांची.

………………….

स्वातंत्र्य आंदोलनातील मूल्यांवर दोन्ही काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विश्वास उरलेला नाही.

भारत नावाच्या राष्ट्र-राज्याची जडण-घडण गांधी, नेहरू, आंबेडकर इत्यादिंनी केली आहे. आपण आता फक्त सत्ता मिळवायची वा चालवायची आहे.

अयोध्येतील मंदिरांचं स्वागत करू, नथूराम गोडसेची भूमिका साकारण्याचं स्वातंत्र्य आपल्या पक्षाच्या खासदाराला देऊ, पण आमच्या हाती सत्ता द्या, असा त्यांचा व्यवहार आहे.

………………

गांधीजी हा पहिला राष्ट्रीय पातळीवरील अब्राह्मण नेता.

शरद पोंक्षे ब्राह्मण आहेत.

अमोल कोल्हे अब्राह्मण आहेत.

शरद पवारही अब्राह्मण आहेत.

एकविसाव्या शतकात गांधी द्वेष अब्राह्मणांमध्ये पोचला आहे.

अमोल कोल्हे प्रकरणात मी मांडलेली भूमिका अवश्य ऐका https://fb.watch/aHoL7YHAcj/

-सुनील तांबे

…………………………..

तुषार गांधी , महात्मा गांधींचे पणतू , ‘लेट्स किल गांधी’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक

“अमोल कोल्हे यांनी जी भूमिका केली ती अभिनेता म्हणून केलीय. त्यांना त्याचं स्वातंत्र्य आहे. मी तर असं म्हणेन की त्यांना नथुराम आवडत असेल, त्यांचा आदर्श असेल तर तेही त्यांना स्वातंत्र्य आहे. जसं मला बापूंना मानायचं, भक्ती करायचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे कलावंत म्हणून अमोल कोल्हे यांनी जी भूमिका केली त्याला माझा कोणताही आक्षेप नाही. मात्र, एका खुन्याचं उदात्तीकरण करण्याचा जो काही प्रयत्न आहे त्याचा निषेध करायला हवा. तो आमचा अधिकार आहे.”

…………………………………………………………..

संजय सोनवणी , नामवंत लेखक , अभ्यासक

खुन्याचे “उदात्तीकरण” करणारी भूमिका “आव्हानदायक” वाटणे हीच एक विकृती आहे.
हे प्रगल्भ अभिनेत्याचे लक्षण नाही.

……………….

हिटलरने ज्यूंचा केलेला नरसंहार आणि त्याचा वंशवाद योग्यच होता असे दर्शवत हिटलरचे उदातीकरण करण्यासाठी चित्रपट काढण्याचे कोणी ठरवले तर हिटलरची भूमिका करायला जगातील एकही नट पुढे येणार नाही. प्रश्न कोणाची भूमिका करण्याचा नाही….आपण कोणाचे उदात्तीकरण करत आहोत याचा असतो. आपण कोणता संदेश देत आहोत याचा विचार करण्याची किमान (सुमार असली तरी) बुद्धी असावी लागते. ही बुद्धी गमावून बसलेल्यां अशा लोकांचे लक्षण आहे कि जे विकृत विचारधारेच्या अधीन होत खुन्याचे उदात्तीकरण करनारी भूमिका स्वीकारतात. आत्मा विकलेल्या लोकांकडून दुसरे काय अपेक्षिता येते?

हिंसा की अहिंसा हाच शाश्वत संघर्ष राहिला आहे आणि अहिंसेचे पारडे नेहमीच वरचढ राहिलेले आहे. कोत्या बुद्धीचे लोक हिंसेचे समर्थक असतात. हिंसा हा प्रगल्भांचा मार्ग नव्हे. आणि खुन्यांचे उदात्तीकरण करणा-यांस समर्थन देणारे तर मानव म्हणवण्यासही योग्य नाहीत.

…………………………….

कलीम अजीम, प्रबंध संपादक , डेक्कन क्वेस्ट

सिलेक्टिव अभिव्यक्ती !

अमोल कोल्हे लोकसभेला मी राहात असलेल्या पुण्यातील कोंढवा भागातील उमेदवार होते. कोंढव्यातील अनेक दाढ़ीवाले मुस्लिम मित्र आणि राजकीय हौशी डॉ. कोल्हेच्या प्रचारार्थ रात्रंदिन एक करत होते.

एका अनौपचारिक बैठकीत काही संपर्कातील लोकांना मी म्हटले, कोल्हे कोण हे तुम्हास माहीत आहेत का? उपस्थितापैकी बरेच जण अनभिज्ञ होते. तर उर्वरित लोकांना ते कोण, कुठले, काय करतात, याच्याशी काही देणं-घेणं नव्हतं. ते फक्त पार्टीच्या प्रचारार्थ जुंपले होते.

ओळखीच्या जवळच्या मित्रांना म्हणालो, हे ग्रहस्थ कालपर्यंत मुस्लिमविरोधात गरळ ओकत होते. मुसलमानाबद्दल हिंसक, एकेरी, गलिच्छ व द्वेशी टिप्पणी करीत होते. हेटाळणी करीत होते. आज पक्षांतर केलं म्हणून तुम्हाला ते पवित्र वाटतात का?

काहीजण गप्प झाले; बाकीचे उठून गेले. कुठलाही राजकीय नेता असो तो मुस्लिमांच्या बाबतीत कालांतराने बदलेल असं सांगता येत नाही.

मुसलमानांच्या बाबतीत असलेला पूर्वग्रह हा राजकीय तर आहेत. पण तो अधिक मानसिक आहे. त्यामुळे मुस्लिम म्हणून विचार करताना मला अनेक कथित सेक्युलर विचारांचे नेते जात्यंध व धर्मांध तसेच मुस्लिद्वेशी वाटतात.

**

मुद्द्याचं असं की, त्यांनी नथुरामची भूमिका ही ठरवून व उमजून केलेली आहे. ते आधीच्या पक्षात जर असते तर त्यांनी आतापर्यंत सगळा मीडिया अंगावर घेऊन थयथय नाचलं असतं. उघड-उघड गांधीहत्येचं उदात्तीकरण केलं असतं.

पक्षांतर केलं म्हणून त्यांनी दडून राहण्यासाठी (व्यावसायिक)अभिव्यक्तीचा आडोसा घेतला आहे. गैरहिंदुत्व पक्षात आहेत, म्हणून समर्थकांच्या झुंडी बाहेर पडत आहेत, जे कदापि मान्य नाही.

अभिव्यक्ती कशी सिलेक्टिव असू शकते याची अलीकडची काही नमूने….

रेनसां घेऊन कुबेर आले की जाणून-बुजून केलेल्या चुकीला माफी नाही, असा एक गट म्हणतो. हिंसेला उत्तेजन देतो.

तर समर्थक म्हणतात, अभिव्यक्ती असू नये का? तोच गट भीमा कोरेगाव शौर्य कसं खोटं प्रकरण आहे, सांगताना अभिव्यक्तीच्या कुबड्या घेतो. व लेखकाची अभिव्यक्ती मान्य करा, अशी विनंती करतो.

पंजाबमध्ये Blasphemyवरून एकाचा निर्घुण खून केला जातो. हिसेंला लेजिटिमाइज करत समर्थकांचे लोंढे वाहतात. असहिष्णुतेविरोधात गळे काढणारे गैरसोय म्हणून लपून बसतात.

पण हजारों मैल लांब फ्रान्समध्ये इस्लामविरोधात नियोजितपणे केलेल्या कुरघोडीला भारतात अभिव्यक्ती म्हणून इस्लाम+मुस्लिमफोबिया वाढवला जातो. तमाम मुस्लिमांचं राक्षसी चित्र उभं केलं जातं आणि भारतीय मुसलमानांना बदडलं जातं.

धर्मसंसदेत उघडपणे मुस्लिमांचं शिरकाण करण्याची धमकी दिली जाते, त्यावेळी

साधू-सन्यास्यांच्या असंविधानिक व अमानवीय वर्तनाला अभिव्यक्ती मानली जाते.

एखादा संपादक देशातील मुस्लिमांना संपवण्याची शपथ लहान मुलांना देतो, त्याहीवेळी संपादकाची अभिव्यक्ती म्हणत सर्वजण गप्प राहतात.

मग कोणीतरी माथेफिरु उठतो आणि गांधींबद्दल अवमानकारक शब्द वापरतो, त्यावेळी सर्वजण चवताळून उठून उभे राहतात. कोणी म्हणतो, FIR दाखल करा, खटले मी लढतो. इथं गांधी महत्वाचं ठरतात तर शेजारी राहत असलेल्या मुस्लिमांचा जीव निर्रथक!

एखादा अभिव्यक्तीच्या नावाने नेहरू, गांधींच्या प्रामाणिकतेला हादरे देतो, गांधीहत्येचंं समर्थन करू लागतो, गोडसेचं उदात्तीकरण करू लागतो; त्यावेळी पुरोगामी त्या प्रतिगाम्याला शाब्दिक बदडतात.

पण पुरोगामित्वाची झुल पांघरलेला एखादा जेव्हा गांधी हत्येचं समर्थन करतो, त्यावेळी पुरोगामीच त्याची तळी उचलून धरतात. त्यावेळी अभिव्यक्तीच्या नावाने पुरोगाम्यात समर्थक आणि विरोधकांचे गट पडतात.

हीच तर आहे सिलेक्टिव अभिव्यक्ती!

२० जानेवारी २०२२

………………………………………………..

विश्वंभर चौधरी , सामाजिक कार्यकर्ते

पोंक्षे यांनी ‘ती’ भूमिका करण्याला विरोध नव्हता. दोन गोष्टींना विरोध होता. एकतर नाटकात असत्य आणि तिरस्कार ठासून भरला होता, इतिहासात जे घडलं नाही ते ही दाखवलं होतं. (वाचा: नथुरामायण- लेखक य.दि.फडके).

दुसरं म्हणजे नाटकातली भूमिका प्रत्यक्ष आयुष्यात थोडी अधिकच भडकपणे पोंक्षे वठवत होते, नव्हे आजही वठवतात. अन्यत्र त्यांनी केलेली विधानं तपासा. आयपीसीखाली ती ‘चिथावणी’च्या गुन्ह्यात मोडणारी आहेत. कलाकार म्हणून कला दाखवा हो, पण मग नागरिक म्हणून चांगलं नागरिकत्वही दाखवा.

पोंक्षे हिंदुत्ववादी म्हणून विरोध होता हा आक्षेपही खरा नाही. नथुरामाच्या बाबतीत नट तर सोडा, राजकारणीही उदात्तीकरण करून बोललेले आहेत. (ऐका: शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात नव्वदीच्या दशकात बाळासाहेबांनी केलेली भाषणं).

नथुरामाचे पुतळे उभारले पाहिजेत असं प्रत्यक्ष आजचे बिनीचे फुशाआवादी छगन भुजबळ म्हणाले होते. तात्पर्य काय तर नथ्थूचं उदात्तीकरण ही महाराष्ट्रात रुटीन बाब आहे.

तेव्हा नथुरामची समजा नुसतीच नाटकात भूमिका करून पोंक्षे बाजूला झाले असते तर टीका झालीही नसती. राष्ट्रपिता मानत नसाल तरी आयपीसीखाली एक खुनाचा गुन्हा घडला आहे आणि तुम्ही प्रत्यक्ष जीवनात त्याचं समर्थन करता म्हणजे गुन्हा घडल्यानंतरही तुम्ही त्या गुन्ह्याला मदत करत असता आणि असे गुन्हे घडवण्याला प्रोत्साहन देत असता. आक्षेप त्यासाठी होता.

कोल्हेंनी नथुरामाची भूमिका करणं हा त्यांच्या व्यक्तीगत म्हणजेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. पण नथुरामाचा राज्यघटनेवर विश्वास नव्हता, मग इकडे नथुरामाची भूमिका जगायची आणि तिकडे त्याला मान्य नसलेल्या राज्यघटनेप्रमाणे खासदार रहायचं हा संघर्ष मनातल्या मनात होऊ नये म्हणून खासदारकीचा राजीनामा देणं योग्य ठरेल. मला खात्रीच आहे की ही नैतिक द्विधा त्यांना मनातून त्रास देत राहील.

अर्थात कोल्हेंचा पक्ष हा मानांकित पुरोगामी आणि त्यातही खराखुरा गांधीवादी पक्ष असल्यानं काहीतरी मार्ग निघेलच. म्हणजे एक मार्ग असाही असू शकतो की प्रत्येक प्रयोगानंतर कोल्हेंनी पत्रकार परिषद घेऊन मी कालच्या भूमिकेशी तत्त्वतः आणि पक्षतः सहमत नाही असा खुलासा करावा. किंवा सबटायटलमध्ये ‘कोल्हे यांचा राष्ट्रवादीशी फक्त राजकीय संबंध असून वैचारिक संबंध नाही’ अशी तळटीप सतत दाखवावी.

…………

उशीर होतोय. साहेबांनी कोल्हेंची पाठराखण केली. आता लवकर लवकर कोल्हे कसे बरोबर त्याच्या पोस्ट्स टाका. पुरोगामी महाराष्ट्राची तीच सध्याच्या घडीची गरज आहे. Hurry hurry!

………………..

कोल्हे यांच्या समर्थनार्थ कालपासून (पुरोगामित्वाचे हक्क आणि शिक्के सर्वस्वी आपल्याच स्वाधीन आहेत असा समज करून घेतलेले) बरेच पत्रकार कोलांटउड्या मारत आहेत. खास करून साहेबांनी क्लीन चिट दिल्यानंतर तर संभ्रम फारच वाढला आहे.

But its OK!

……………………….

बालाजी सुतार , नामवंत कथाकार , कवी

एखाद्या वास्तवातल्या खल-व्यक्तिरेखेचं जाणीवपूर्वक उदात्तीकरण करणारी, जाणीवपूर्वक लिहिली गेलेली भूमिका स्वीकारताना कलावंतांनी दहादा विचार करावा, असं मला वाटतं.

यातला ‘जाणीवपूर्वक’ हा शब्द महत्वाचा आहे. गांधींवर चित्रपट करताना कुणीतरी गोडसेही रंगवणं अपरिहार्य आहेच, अर्थात. तो कसा रंगवला जातो आहे, या गोष्टीकडे कलावंताने सारासार विचारबुद्धीने पाहायला हवे.

खल-पात्र वास्तवातलं नसतं, काल्पनिक असतं, तेव्हा निळू फुलेंसारख्या अंतर्बाह्य सज्जन नटानेही ते करायला एरवी कुणाची हरकत नसतेच.

……………..

खुद्द पवारसाहेबांनी सर्टिफिकेट दिल्यावरही काहीलोक कोल्हेसाहेबांना पवित्र करून घेत नाहीयत, हे खेदकारक आहे.

आपल्या ज्वलंत पुरोगामी महाराष्ट्रात असं व्हायला नाय पायजेल, याठिकाणी.

………………………………

श्रीरंजन आवटे , लेखक , अभ्यासक

डॉ कोल्हे, तुम्ही घोडचूक केली आहे.

कबूल करून सुधारणा करणं हाच गांधीमार्ग तुमच्यापाशी आहे !

—————————————————————–

Why I killed Gandhi या आगामी माहितीपटात डॉ. अमोल कोल्हे यांनी नथुरामाची भूमिका केल्यामुळे वाद निर्माण झालेला आहे. डॉ.कोल्हे यांचं म्हणणं आहे की आपण नथुरामचं समर्थन करत नसून केवळ कलाकार म्हणून हे आव्हानात्मक काम आपण स्वीकारलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही या भूमिकेची पाठराखण केलेली आहे.

१. अशोक त्यागी दिग्दर्शित हा माहितीपट आहे. आपण केलेले चित्रण हे अस्सल (authentic) आहे आणि न्यायालयीन खटल्यावर आधारित हा माहितीपट आहे, असे त्यागी यांचे निवेदन आहे.

२. या ४५ मिनिटांच्या माहितीपटाचा उद्देश युट्युबवरील ट्रेलरच्या description मध्ये दिसून येतो:

A perception has been created that Nathuram Godse was a terrorist or a mentally disbalanced Hindu extremist. However when you read his statement you realise that he was a freedom fighter and social activist from Pune and edited a newspaper named AGRANI from there.

नथुराम माथेफिरू आतंकवादी होता अशी प्रतिमा निर्माण केली गेली आहे. प्रत्यक्षात त्याला गांधींचा खून का करावा लागला, हे समजून घेतलं पाहिजे. नथुरामचं न्यायालयातील स्टेटमेंट वाचल्यावर तो ‘अग्रणी’ दैनिक चालवणारा पुण्यातला स्वातंत्र्यसेनानी आणि समाजसेवक होता, हे लक्षात येईल, अशी दिग्दर्शकाची भूमिका आहे.

या सगळ्यावरुन हे सुस्पष्ट होतं की नथुरामची बाजू मांडत त्याचं उदात्तीकरण करणं हा डाव आहे.

३. डॉ कोल्हे यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यपर युक्तिवादाच्या मुळाशी मी केवळ कलाकार आहे, अशी भूमिका आहे. सिनेमा/माहितीपट हे मुख्यतः दिग्दर्शकाचं माध्यम असतं, हे खरं आहे पण कलाकार/अभिनेता दिग्दर्शकाचा म्हणणं वाहणारा अबोल वाहक नसतो. तो कुणी मूक प्यादं नसतं, नसावं. ही माझी मूल्यात्मक भूमिका आहे.

त्यामुळे डॉ कोल्हे यांनी केलेली ही घोडचूक आहे आणि पवारांनी त्याचं समर्थन करणं अतिशय आक्षेपार्ह, निंदनीय आहे.

लाईमलाईट हा नवाकोरा OTT लक्षात घेता फिल्मशी संबंधित मंडळींना ही controversy हवी होती, असं वाटायला वाव आहे. हा माझा हेत्वारोप आहे.

धर्मसंसद आयोजित करून नरसंहाराच्या रौरवी घोषणा दिल्या जात असताना नथुरामाच्या उदात्तीकरणाच्या प्रकल्पात दूरान्वयानेही सामील असणं हे एखाद्या गुन्ह्याहून कमी नाही !

कोल्हे, यांनी आपली घोडचूक मान्य करत माफी मागायला हवी.

ते खरोखरच गांधी विचारांचे समर्थक असतील तर चूक कबूल करुन सुधारणं हाही गांधीमार्ग आहे, हे त्यांना उमजेल.

………………………….

-सतीश तांबे, लेखक

२०-२२ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे . काल आठवली.

परळच्या एका बारमध्ये मित्राबरोबर बसलो होतो.

रात्र बरीच झाली होती . निघण्याच्या बेतात होतो.

एवढ्यात एक जुना नट मित्र तिथे अवतरला.

गडी आधीच प्यायलेला आहे , हे कळत होतं.

गळाभेट वगैरे सोपस्कार झाले.

बसल्यावर मित्र म्हणाला ” बरा भेटलास यार . आज मी अपसेट आहे.”

साहजिकच मी ” का रे काय झालं ? ” म्हणून विचारलं

तर तो एका दिग्दर्शकाचं नाव घेऊन म्हणाला की

” तो मादरचोत मला त्याच्या नवीन नाटकात नथूरामचं काम करशील का ?

असं विचारत होता ! ”

मित्र एका पिढीजाद काँग्रेसी खानदानातून आला होता

हे मला ठाऊक असल्यामुळे मी त्याची समजूत काढायला म्हटलं

” तुला त्याचा प्रस्ताव मान्य नसला तर फेटाळून लावायचा.

आणि नटाला काही वेळा न पटणारी / नावडती भूमिका करावी लागतेच.

तिथेच अभिनयगुणांचा कस लागतो ” वगैरे .

तर तो माझ्यावरच भडकला.

तो म्हणाला ” ए भाडखाऊ हे मलाही कळतं. मी रामन राघवनची भूमिकाही केली असती . पण त्या नथ्थूची … ?

ज्याने त्या म्हाताऱ्याला गोळ्या घातल्या ! ”

त्याचा सात्विक संताप मला कळत होता. तरी मी रेटून म्हटलं की

”त्याला तुझ्यात काहीतरी दिसलं असेल नथुरामसारखं ! ”

ह्यावर तो आणखीनच भडकला , म्हणाला ” कुठे तो टीचभर नथुराम ,आणि कुठे मी उंचापुरा , तगडा देह . तो स्साला माझ्या पर्सनॅलिटीचा फायदा घेऊन नथुरामला उजळवायला पाहत होता गांडू !”

मग पेग येतच गेले . शिव्या सुरूच होत्या . शेवटची ट्रेन जाऊन आता मित्राबरोबरच रहायचं हे ही ठरलं होतं.

तो मित्र मात्र आता सटकलाच होता .

म्हणून मी त्याला म्हटलं की ” त्याला जसा विचारायचा हक्क आहे ,तसा तुला नाकारायचा हक्क आहे . तर तू त्याला नकार दे !”

ह्यावर तो म्हणाला ” ते तू नको सांगायला , ते मी तात्काळ केलंच रे ! मला राग आहे की तो मला असं विचारू शकतोच कसा ? ”

मग बराच वेळ तो ” तो मला असं विचारू शकतोच कसा ? ” हे पालुपद आळवत होता !

त्याची तिडीक मला कळत होती . त्याच्या म्हणण्यात तथ्य होतंच!

………………..

असीम सरोदे, नामवंत विधिज्ञ

डॉ अमोल कोल्हे यांनी नथुरामची भूमिका केली हा त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. एक कलाकार म्हणून कोणती भूमिका करायची किंवा नाकारायची हे ठरविण्याचा अधिकार हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अविभाज्य घटक आहे. मी त्यामुळेच अमोल कोल्हे यांच्या “व्हाय आय किल्ड गांधी” या सिनेमामध्ये नथुरामची भूमिका करण्याचे समर्थन करतो.

खासदार अमोल कोल्हे यांनी नथुरामची भूमिका करणे टाळणे सहज शक्य होते, तसे त्यांनी केले नाही. त्यामुळेच त्यांचे मुळातील विचार किंवा त्यांच्या विचारांचे आधार काय हे तपासणे, त्यांच्या यापूर्वीच्या वागणुकीचे, बोलण्याचे विश्लेषण करण्यातून महत्वाचे निष्कर्ष निघू शकतात.

एक कलाकार नथुराम ची भूमिका करून विषारी झाला आहेच. त्याला नथुराम म्हणून बघायला आता कुणी येणार नाही म्हणून मग एक वेगळा नथुराम तयार करायची आयडिया बरीच विचारांती घेतलेली राजकीय खेळी वाटावी अशी आहे. पोंक्षेचा नथुराम बघणारे विशिष्ट विद्वेषी विचारांचे वाहक होतेच व ते अनेकजण विशिष्ट पक्षाचे पक्के मतदार सुद्धा आहेत. पण आता नवीन प्रवर्गातील काही प्रेक्षक डॉ कोल्हेंचा नथुराम बघायला येतील व महात्मा गांधींच्या बद्दल गैरसमज पारविण्याच्या मोहिमेच्या जाळ्यात आणखी काही नवीन लोक अडकतील असे गणित यामागे असेल.असो!

……………………

-मुग्धा कर्णिक

२०१७मधे आपण हा चित्रपट केलाय हे कोल्हेंनी तिकिट मिळताना सांगितलं होतं का पवारसाहेब किंवा पक्षाला?

काळं धन लपवल्यासारखंच आहे हे.

अगदी स्पष्ट आहे की ते सांगायला हवं होतं.

चार वर्षांनंतर तोंड फुटेल एवढं समजत नव्हतं?

आता काहीजण पाघळ काढत आहेत की ते आधीचं होतं- ते व्यक्तिगत होतं.

कोल्हेही म्हणतात भूमिका केली म्हणजे राजकीय भूमिका पटली असं नाही. बरोबर. भूमिका करणं आणि भूमिका घेणं फार वेगळ्या गोष्टी आहेत.

………………………………………………………………….

कलाकारांनी बेजबाबदारपणे वागणे हा काळाचाच महिमा! आणि आपण अपेक्षा करतो कठीण वेळी त्यांच्या योगदानाची

……….

कुंपणावर बसणारे कुणीही असोत-
थोरथोर वा पोरपोर!
काटे ढुंगणात शिरणारच!

……………………

गिरीश लता पंढरीनाथ , मुक्त पत्रकार

माझा मुद्दा वेगळा आहे.

कुणी कोणती भूमिका करावी, अथवा करु नये हा ज्याचा त्याचा मुद्दा…

अरविंद त्रिवेदी यांनी रावणाची भूमिका साकारली.

गोगा कपूर यांनी कंसाची भूमिका साकारली.

गांधी या सिनेमात नथूराम गोडसेची भूमिका हर्ष नय्यर यांनी साकारली.

नीतीश भारद्वाज यांनी श्रीकृष्णाची भूमिका साकारली.

अरुण गोविल यांनी रामाची भूमिका साकारली.

माझा एक मुद्दा असाही आहे की, कलाकार म्हणून एखादा एखादी भूमिका साकारत असेल तर त्याचा त्याच्या व्यक्तिमत्वावर किती प्रभाव पडू शकतो ?

इश्वराला रिटायर करा म्हणणारे डॉ श्रीराम लागू यांनी एका चित्रपटाच्या शेवटी देवळात जाऊन देवाच्या मुर्तीपुढे नतमस्तक होताना अनेक चित्रपटांत दिसले आहेत. आता नेमका चित्रपट कोणता तो आठवत नाही.

सकाळी सकाळी ज्येष्ठ पत्रकार समर खडस सरांची पोस्ट पाहिली. त्यामध्ये शेवटी ते म्हणतात की,

“अमोल कोल्हेंनी केलेल्या नथुरामाच्या भूमिकेबाबत कलावादी भूमिका घेणाऱ्या तमाम मित्रांना गोरख पाण्डेयंची ही कविता समर्पित. कोल्हेंनी नथुरामाची भूमिका केली त्यात चूक काहीच नाही. कोल्हे नथुरामाची वैचारिक भूमिका मान्य करतात किंवा कसे ते त्यांनी स्पष्ट केल्यास वादाचं काही कारण उरणार नाही. तितकं ते लवकर करतील ही अपेक्षा!!”

मला ही भूमिका पटतेय कारण अरविंद त्रिवेदींनी रावणाची भूमिका केली म्हणून त्यांनी कुठल्या सीतेचं अपहरण केलं नाही, ना गोगा कपूर यांनी आपल्या भाच्याची हत्या करण्यासाठी कुणाला सुपारी दिली. हर्ष नय्यर यांच्याबद्दलही काही कुठे ऐकायला-वाचायला मिळालं नाही.

याच्या उलट आता बघूयात श्रीकृष्णाची भूमिका करणाऱ्या नीतीश भारद्वाज यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यात एक हजार लग्ने केली नाहीत. ना रामाची भूमिका करणाऱ्या अरुण गोविल यांनी कुठल्या शंबुकाची हत्या केली.

लोक शरद पोंक्षे आणि डॉ. अमोल कोल्हे यांची तुलना करतात ती मला गैरवाजवी वाटते ती यासाठी की, शरद पोंक्षे हे सातत्याने नथुरामाचे उदात्तीकरण आणि गांधीहत्येचे समर्थन करण्यासाठी ओळखले जातात. पोंक्षेंच्या लेखी गांधींची हत्या ही हत्या नाहीच तर तो वध आहे. अशा प्रकारच्या विचार करणाऱ्यांचा शंभर टक्के विरोधच करायला हवा.

डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या पोस्टच्या सुरुवातीलाच सदर भूमिका ही आपल्या विचारसरणीच्या विरोधात असल्याचे नमूद केले आहे. परंतु तरीही त्यांना एक सल्ला आवर्जून द्यावा वाटतो तो म्हणजे, या देशातील जनता कलाकारांच्या बाबतीत प्रचंड पझेसिव्ह असते. एका ठराविक साच्याच्या बाहेर ती कलाकारांना पाहूच शकत नाही. ती कलाकारांवर प्रचंड प्रेम करते, तेवढाच तिरस्कारही करु शकते. तुम्ही त्यांचं प्रेम मिळवा, तिरस्कार मिळविण्याच्या भानगडीत पडू नका. तुम्ही अतिशय स्पष्टपणे आपली भूमिका लोकांपुढे मांडायला हवी. जर ही भूमिका करुन चूक झाली असं वाटत असेल तर प्रसंगी अतिशय निर्मळपणाने लोकांची माफी देखील मागावी. शेवटी तुमचे दर्शक, चाहते हे तुमचे मायबाप आहेत. ते तुम्हाला समजून घेतली.

बाय द वे,

पीपल्स हो, तुम्ही माझ्यावरही टिकाटिपण्णी आणि वेगवेगळी लेबलं लावायला स्वतंत्र आहात.

जय माहिष्मती

……………………..

डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेल्या Why I Killed Gandhi या चित्रपटाचा हा Trailer

WHY I KILLED GANDHI – Official Trailer

https://www.youtube.com/watch?v=-kMdNHC5NFM

Previous articleबोलती हुई औरतें…
Next articleवाईन न ‘घेता’ केलेला नाहक हंगामा !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.