राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत जे भाषण केलं आणि त्यात महाराष्ट्राच्या संदर्भात कांही बेताल वक्तव्य केली . त्याबद्दल खरं तर , नरेंद्र मोदी यांना खोटारडा म्हणण्याची इच्छा मी कटाक्षानं आवरली आहे . याची कारणं दोन-प्रदीर्घ काळ विधिमंडळ आणि संसदेच्या कामाचं वृत्तसंकलन केल्यानं खोटं/खोटारडा/चूक हे शब्द संसदीय नाहीत हे मला ठाऊक आहे . शिवाय आपल्या देशाच्या एवढ्या महत्त्वाच्या पदावर विराजमान असलेल्या व्यक्तीचा संसदेत केलेल्या भाषणबद्दल खोटारडा म्हणून अवमान करण्याचा संस्कार माझ्यावर नाही . कोरोनाच्या अनुषंगानं महाराष्ट्राच्या संदर्भात कॉँग्रेसच्या नावाखाली जी काही विधानं नरेंद्र मोदी यांनी केली आहेत , ती पूर्ण निराधार आहेत ; माणुसकीचा धर्म पाळत स्थलांतर करणाऱ्या कष्टकऱ्यांना मदत करणाऱ्या महाराष्ट्राची बदनामी करणारी आहेत , त्यांच्या मनात महाराष्ट्राबद्दल द्वेष आहे की काय अशी शंका निर्माण करणारी आहेत . त्याबद्दल त्यांचा करावा तेवढा निषेध कमीच आहे . नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढवलेल्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून ४१ उमेदवार ( भाजपचे २३ आणि शिवसेनेचे १८ ) विजयी झालेले आहेत . महाराष्ट्राशी रक्ताची नाळ असणाऱ्या मतदारांनी , या बदनामीबद्दल येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत , या सर्व उमेदवारांचा पराभव करुन त्यांना धडा शिकवायला हवा .
लोकसभेत कोणतंही भाषणं नाट्यमय अविर्भावी ढंगात आणि राजकीय वळणानं करण्याची नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान म्हणून सवय आहे , हे २०१४ नंतर अनेकदा सिद्ध झालेलं आहे . यावेळच्या भाषणाचा दुसरा एक अर्थ असा की , काँग्रेसचा एवढा संकोच होऊनही नरेंद्र मोदी यांना काँग्रेस हाच आपला प्रतिस्पर्धी आहे असं अजूनही वाटतं असाच होतो . या भाषणानं तर महाराष्ट्राच्या बद्दलही त्यांच्या मनात राग म्हणा की आकस आहे हेच दिसून आलं , असंच म्हणावं लागेल . कारण कष्टकऱ्यांच्या स्थलांतरासाठी केवळ कॉँग्रेसपक्षानंच नव्हे तर या राज्यातील प्रत्येक संवेदनशील माणसानं यथाशक्ति मदत केलेली आहे . अगतिक होऊन कष्टकरी मिळेल त्या मार्गानं घरी परतत होते , त्यांचे तांडे रस्तोरस्ती , रेल्वे मार्गावरही दिसत होते . घरी परतणारे कांही कष्टकरी तर रेल्वेखाली चिरडून मेले . अशा वेळी संवेदनशील माणूस निर्विकार राहू शकत नाही म्हणून तो माणुसकीच्या भावनेनं मदतीसाठी पुढे आला . माणुसकीच्या या धर्मावर टीका करण्याचा अधिकार नरेंद्र मोदी यांनाच नाही तर कुणालाच नाही .
देशातला कोरोना महाराष्ट्रातून सोडलेल्या रेल्वेमुळे वाढला असा एक शुद्ध देशी तुपात फोडणी दिलेला दावा नरेंद्र मोदी यांनी केला आहे . कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या काळात ( अवघ्या चार तासांची मुदत देऊन देशात मनमानी पद्धतीने लावलेल्या ) टाळेबंदीनंतर महाराष्ट्रापेक्षा जास्त रेल्वे गुजरातमधून सुटल्या . (महा)राष्ट्रवादीच्या लोकसभा सदस्य सुप्रिया सुळे यांनी सभागृहात केलेल्या भाषणात दिलेली आकडेवारी ‘हिंदू’ या दैनिकात प्रकाशित झालेली आहे . त्यानुसार कोरोनाच्या त्या काळात गुजरातमधून १०३३ , महाराष्ट्रातून ८१७ आणि पंजाबमधून ४०० रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या . ( वृत्तपत्राचं नाव ‘हिंदू’ असल्यानं तरी या वृत्तपत्रावर लोकसभेतलं भाषण न ऐकलेल्या भाजपच्या समर्थकांनी विश्वास ठेवायला हरकत नाही . ) सुप्रिया सुळे यांनी दिलेली आकडेवारी चुकीची आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अद्यापही जाहीर केलेलं नाही . याचा अर्थ ती आकडेवारी खरीच आहे , मग जास्त रेल्वे ज्या राज्यातून सुटल्या , ज्या राज्यातून सर्वाधिक मजुरांचं स्थलांतर झालं , त्या राज्याला दोष देण्याऐवजी कॉँग्रेसचं नाव घेऊन संपूर्ण महाराष्ट्रालाच नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून बोल लावत आहेत , हे मुळीच पटणार नाही . खरं तर , ही महाराष्ट्राची सरळ बदनामीच आहे . संसदेच्या पायऱ्यांना वंदन करुन सभागृहात प्रवेश करणारे किती धडधडीत असत्य बोलतात याचंही हे उदाहरण आहे .
देशाची रेल्वे केंद्र सरकारच्या अखत्यारित येते , हे लक्षात घेता टाळेबंदीच्या काळात कोरोना वाढीची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारनं ठिकठिकाणांहून मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी रेल्वे सोडण्याचा निर्णयच मुळी का घेतला , हा निर्णय घेतला तेव्हा कोरोना वेगानं पसरण्याचा धोका त्यांच्या लक्षात का आला नाही , या प्रश्नांची उत्तरं मोदी यांनी आधी द्यायला हवी होती आणि मगच महाराष्ट्रावर दोषारोपण करायला हवं होतं . भाजप या(ही) संदर्भात किती दुटप्पी आहे याचं उदाहरण सांगतो , या रेल्वे जर सोडल्या नसत्या तर कष्टकऱ्यांना त्यांच्या गावी पोहोचता आलं नसतं , त्या कष्टकऱ्यांच्या हालात मोठी भर पडली असती म्हणून भाजप सरकारनं रेल्वे सोडण्याचा निर्णय कसा घेतला आहे , याचं श्रेय घेणाऱ्या जाहिराती तेव्हा भाजपाच्यावतीनं प्रकाशित झालेल्या आहेत . बिहारातून अशा रेल्वे सोडल्याबद्दल भाजपनं तेव्हा प्रकाशित केलेली स्वकौतुकाची , एका वाचकानं पाठवलेली जाहिरातच या मजकुरात प्रकाशित केली आहे.
केंद्रानं जरी रेल्वे सोडल्या असल्या तरी महाराष्ट्र सरकारला त्या रिकाम्या परत पाठवता आल्या असत्या , अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्षचंद्रकांत ( दादा ) पाटील यांनी व्यक्त केलेली आहे . समजा महाराष्ट्र सरकारनं खरंच असं केलं असतं तर , भाजपाच्या बोलभांडांनी राज्य सरकारचं जीणं ‘उभं पिसं आणि नांदू कसं’ करुन सोडलं असतं . राज्यातल्या भाजपचं धोरण तसंही सध्या राज्य सरकारनं काहीही केलं तरी ते चूकच असल्याचा डांगोरा जोरजोरात पिटण्याचं आहे . मुळात कष्टकऱ्यांना त्यांच्या गावी स्थलांतर करण्यापासून रोखल्याचे अगदी प्रारंभीच्या काळातले गंभीर परिणाम या देशानं अनुभवले आहेत ; त्या कष्टकऱ्यांच्या चालून-चालून भेगाळलेल्या टांचातून आलेल्या रक्तानं डांबरी रस्त्यांनाही अश्रू आवरले नव्हते…हजारो कष्टकऱ्यांचे तांडे त्यांच्या राज्यातल्या गावी कसे चालले आहेत याची हृदय विदीर्ण करणारी छायाचित्रे सर्वच माध्यमात प्रकाशित झालेली आहेत. म्हणूनच या कष्टकऱ्यांना रोखण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारनं पार पाडायला हवी होती , हे चंद्रकांत( दादा ) पाटील यांचं म्हणणं , ढोलकी दोन्ही बाजूंनी बडवण्याचाच नमुना म्हणायला हवा .
कोरोना जर महाराष्ट्रामुळे पसरला असेल तर उत्तरप्रदेशातून वाहणाऱ्या गंगेत वाहून आलेल्या प्रेतांचं काय ? हाही प्रश्न उरतोच . ही प्रेतं काही संख्येनं केवळ दहा-वीस नव्हती तर , शेकडो…हजारोंनी असल्याची छायाचित्रं आंतरराष्ट्रीयही माध्यमात प्रकाशित झालेली आहेत . महाराष्ट्रातीलज्या लोकांचे प्राण कोरोनानं गेले त्यांचे मृतदेह महाराष्ट्र सरकारनंच विमानानं गुपचुप नेऊन गंगेत टाकले , असंच तर नरेंद्र मोदी यांना सुचवायचं नाहीये ना ? तसं असेल तर मग नरेंद्र मोदी यांना आताच भारतरत्न सन्मान देऊन टाकायला हवा !
नरेंद्र मोदी हे चतुर राजकारणी आहेत , याबद्दल प्रस्तुत पत्रकाराच्या मनातही कोणतीच शंका नाही . संपूर्ण महाराष्ट्रालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करताना बाळासाहेब ठाकरे यांचा हवाला देऊन शिवसेना आणि रेल्वेची तिकीटं कष्टकऱ्यांना दिल्याचा दाखला देऊन काँग्रेसवर अवाजवी टीका करत नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर मात्र स्तुती सुमनांचा वर्षाव केला आहे . त्या पार्श्वभूमीवर तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मौन फारच क्लेशदायक म्हणायला हवं . महाराष्ट्र काँग्रेसलाही या संदर्भात आलेली जाग राजकीय तत्परतेची होती असं म्हणता येणार नाही . महाराष्ट्राची बदनामीच हा मार राज्यातील भाजपचे नेते तोंड दाबून सहन करत आहेत , याचा अर्थ या पक्षात अस्सल महाराष्ट्राभिमानी उरलेला नाही असाच काढावा लागेल .महाराष्ट्रातलं तीन पक्षांचं महायुतीचं आधीच लडखडत चाललेलं सरकार असताना , शरद पवार यांच्यावर स्तुती सुमनं उधळून या तीन पक्षात कलागत लावण्याचाच उद्योग नरेंद्र मोदी करत आहेत , असंही म्हणायला वाव आहे ; ‘तुम्हा दोघापेक्षा शरद पवार आम्हाला जास्त निकटचे आहेत’ , हाही संदेश नरेंद्र मोदी यांनी शिवसेना आणि काँग्रेसला एकाच वेळी देऊन टाकला आहे असाही या स्तुती सुमनांनचा अर्थ काढला , तर त्यात कांहीच गैर नाही .
प्रत्येक भाषणात काँग्रेस नेहरु यांचा उद्धार केल्याशिवाय नरेंद्र मोदी यांना चैन पडत नाही . बरं जे बोलतात तेही काही साधार असतं अशातला भाग नसतो . जवाहरलाल नेहरु आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सर्वच सरकारांच्या काळात देशाची मुळीच प्रगती झाली नाही हा नरेंद्र मोदी यांचा आवडता दावा आहे . तसं तर , ज्या संघ परिवारातून मोदी आले आहेत , त्या संघ परिवाराची ती ‘मूलभूत धारणा’च आहे ; तशी धारणा असल्याशिवाय संघ किंवा भाजपचं प्राथमिक सदस्यत्व सुद्धा मिळत नसणार आणि त्याला मोदी तरी अपवाद कसे असणार ? भारत स्वतंत्र झाला तेव्हा म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरु यांनी पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा , भारताची अवस्था साधी सुई निर्माण करण्याची सुद्धा नव्हती . तेथंपासून ते १९९० पर्यंत म्हणजे नरेंद्र मोदी यांचा राजकीय उदय होण्याआधी या देशानं कोणकोणत्या क्षेत्रात कशी प्रगती केली याची नीट माहिती नरेंद्र मोदी यांनी करुन घ्यायला हवी . देश स्वतंत्र झाल्यावर भारताच्या औद्योगिक उत्पादनात १२ पट वाढ झाली , एकूण राष्ट्रीय उत्पन्न पाच पट वाढलं . दरडोई उत्पन्न दुप्पट झालं . याच म्हणजे १९४५ ते ९० या काळात भारताच्या ऊर्जा , वाहतूक तसंच बँकींग क्षेत्राचा मोठा विस्तार झाला…असं खूप कांही आहे . अर्थात , हे सर्व माहिती करुन घेतल्यावरही भाजपचे एकजात सर्वजण भारतात आजवर काहीच घडलं नाही हीच रेकॉर्ड सवयीनं वाजवतच बसतील यात शंकाच नाही .
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना वैदर्भीय भाषेत सांगायचं तर नरेंद्र मोदी यांनी आणखी एक ‘फोकनाड’ मारली आहे . ‘मेक इन इंडियामुळे देशातली लाचखोरी संपली’ असं मोदी म्हणाले . मोदींचं हे विधान किती हास्यास्पद आणि निराधार आहे , याचा अनुभव देशातील जनता पदोपदी घेत आहे . देशातली लाचखोरी संपली , हे नरेंद्र मोदी यांचं म्हणणं म्हणजे , भर दिवसा घराचे दरवाजे बंद करुन , पडदे लावून अंधार करुन बघितलेलं स्वप्न आहे . इकडे भ्रष्टाचाराच्या यादीत भारत ‘प्रगती’ करतो ; ही प्रगती जर नरेंद्र मोदी यांना भूषणावह वाटत असेल तर याला दिवसा उजेडी केलेलं स्वप्नरंजन म्हणायचं नाहीतर काय ?
–असं असलं तरी नरेंद्र मोदी खोटारडेपणाचा कळस गाठत आहेत , असं मी म्हणणार नाही कारण खोटारडेपणा हा शब्द संसदीय नाही आणि पंतप्रधानांसारख्या पदावरच्या व्यक्तीला खोटारडा म्हणावं , असा संस्कार माझ्यावर नाही . उलट , केवळ देशातीलच नाही तर विश्वातील कोरोनाच्या महाभयानक आपत्तीसाठी महाराष्ट्रालाच जबाबदार न धरल्याबद्दल ‘विश्वगुरु’ नरेंद्र मोदी यांचे आभारच मानायला हवेत !
शेवटी-इतकं गंभीर दोषारोपण होऊनही काँग्रेसचे लोकसभेतील सदस्य आक्रमक झाले नाहीत हे , हा पक्ष किती गलीतगात्र झालेला आहे याचंच लक्षण समजायला हवं .
(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत) ९८२२० ५५७९९
प्रवीण बर्दापूरकर यांचे जुने लेख वाचण्यासाठीwww.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –प्रवीण बर्दापूरकर – type करा आणि Search वर क्लिक करा.