सूरसम्राज्ञीला निरोप देताना सापडलेला जगण्याचा ‘सूर’

-आशुतोष शेवाळकर

झोपेतून उठल्यावर खूप साऱ्या ‘मिस्ड कॉल्स’ पाहून दीदी गेल्या असाव्यात या शंकेची पाल मनात चुकचुकली. अगोदरच्या दिवशीही खूप सारे चौकशीचे फोन आले होते. मात्र ती पुन्हा एक नवीन अफवा असावी, असं मनाचं समाधान करून घेण्याचा प्रयत्न केला होता. मंगेशकरांच्या घरी कुणाला फोन करून ‘कन्फर्म’ करण्याची हिम्मतही होत नव्हती. अनेकदा उठलेल्या अशा अफवांमुळे व त्यानंतर झालेल्या फोनमुळे मनात संकोच होता. खाली आल्यावर आईच्या चेहेऱ्यावरून खात्री पटली. ‘भाऊला टीव्ही लाऊन दे’, एवढंच ती घरच्या काम करणाऱ्या माणसाला म्हणाली.

लगेच मुंबईला जायला साडेतीनचं एकमेव विमान होतं.  पण त्यात एकही तिकीट उपलब्ध नव्हतं. इंडिगोच्या मॅनेजमेंटमधे खटपट केल्यावर एक सीट मोठ्या मुश्किलीने मिळू शकली. मुंबई एयरपोर्टवर उतरलो तेव्हाच बहुदा पंतप्रधानांचं विमान ‘लँड’ झालं होतं. त्यामुळे एयरपोर्टच्या बाहेर निघाल्याबरोबरच त्यांच्या ‘ग्रीन कॉरिडॉर’ साठी अडवलेल्या ट्रॅफिकमधे अर्धा तास अडकावं लागलं. शेवटी तगमगीपायी ट्रॅफिकची लांबच लांब रांग पायी चालत जावून समोरून शिवाजी पार्कसाठी टॅक्सी पकडण्याचा प्रयत्न करत होतो. तेवढ्यात ट्रॅफिक मोकळा करण्यात आला. ड्रायव्हरला फोन करून तिथेच थांबून गाडीत बसलो.

थोडं दूर गेल्यावर मागून येणाऱ्या एका ‘लेक्सस’वाल्याने आमच्या गाडीला बाजूनी हलका धक्का मारला. ‘थांबू नको चल’ म्हणून ड्रायव्हरला डोळ्यानीच खूण केली. त्यालाही माझी घाई व तगमग समजत होती. त्याने गाडी शक्य तितक्या वेगाने चालवत पुढे हाकली. पण त्या ‘लेक्सस’वाल्यानी गाडी समोर आणून आडवी टाकली व उतरून तो माझ्या ड्रायव्हरशी भांडू लागला, उघड्या खिडकीतून त्याला मारू लागला. ती ‘लेक्सस’ गाडी तिचा मालक स्वतःच चालवत होता. मी खाली उतरून मधे पडल्यावर तो इंग्लिशमधे माझ्याशी भांडायला लागला व परत माझा ड्रायव्हर आरमुगमला मारू लागला. अपमानाने आरमुगम बिथरला ‘मै प्यारसे समझा रहा हू.और तू मारता क्यु है. अब मै काटही डालूंगा तुझे’ असं म्हणून की चेन मधला छोटा चाकू बटन दाबून बाहेर काढत त्याच्या अंगावर धावला. मधे मधे तिरप्या नजरेने तो माझ्याकडे पहात होता. उशीर होत असल्यामुळे होणारी माझ्या डोळ्यातली तगमग दिसून त्याला ‘गिल्टी’ पण वाटत होतं.

आता नवीन सुरू झालेल्या या प्रकरणामुळे दीदीचं शेवटचं दर्शन आपल्या नशिबात नाही हे मी ‘फायनली’ मनाला समजावलं व शांत राहून पुढे काय होतं, ते पाहू असं ठरवलं. तेवढ्यात कुठून तरी २-३ ट्रॅफिक पोलीस धावन आलेत. त्यांना दोन्ही गाड्यांना मार कुठे, कसा लागला आहे हे समजावलं, तो ‘लेक्सस’वाला त्याचीच चूक असताना उगीचच भांडतो, मारतो आहे हे पण सांगितलं. मराठी बोलण्याचा फायदा झाला. त्यांनी पोलीस स्टेशनमधे चला, वगैरे  स्वतःचा फायदा करून घेण्याची संधी सोडली. किंवा पंतप्रधान पुन्हा याच मार्गाने येणार असल्याने त्यांना ड्युटीची जागा सोडणं शक्य नसेल कदाचित म्हणून त्यांनी दोघांनाही गाड्या पुढे घ्यायला सांगितलं. दीदीनां शेवटचं पाहता येईल ही आशा मनात पुन्हा जागृत झाली. आरमुगमला गाडी जोरात हाकायला सांगितली.

 आरमुगम हा माझा मुंबईचा नेहमीचा प्रायव्हेट टॅक्सी ड्रायव्हर. धारावीच्या झोपडपट्टीत राहतो. काळाकभिन्न, आडदांड असा राक्षसासारखा दिसतो. दोन थोबाडीत खाण्याच्या अपमानाने तो मनात विव्हळत होता. पण माझी तगमग पाहून तरीही तो गाडी रेटत होता. माझ्यावर याचं अतिशय प्रेम व मग हळूहळू करत माझी आई, बायको, मुलं असा सगळया कुटुंबीयांशी तो जुळत गेला, आमच्या कुटुंबात  मिसळला. तामीळनाडूतल्या त्याच्या शहरात सुट्टीत गेला की तिथला गावराणी गूळ आणतो आणि नागपूरला कोणी येणार आहे का, हे शोधत राहून तो घरी पाठवतो. माझ्यासाठी थर्मासमधे त्या गुळाचा काळा चहा, फळं, पाणी, लायटर अशा सगळ्या गोष्टी मी विमानातून उतरण्याच्या आधीच त्याने गाडीत तयार ठेवलेल्या असतात. कधी जास्त पैसे बरोबर असतील तर त्याला तसं सांगून पैशांची ती बॅग त्याच्या सुपूर्द करत असतो. दिवसभर मी कामासाठी बाहेर उतरलो की ती बॅग पोटाशी धरून तो गाडीत बसलेला असतो. त्या वेळेस  तो डोळ्याला डोळा लागू देत नाही, मोबाईल पाहत नाही. कधी कुणाच्या आजारपणाच्या कामासाठी  मुंबईला जावं लागलं तर हॉस्पिटल, औषध, डब्बा, रिपोर्टस आणणे सगळे कामं घरच्या माणसासारखी करतो. माझी मुंबईची सगळी ओळखीची घरं, ऑफिसेस, माणसे, हॉटेल, रेस्टारंट याला ओळखतात. तिथली सगळी कामं तो करून आणत असतो.

मुंबईत रोजाने भाडयाच्या गाड्या मिळतात. त्या घेऊन तो चालवायचा व त्यात स्वतःची रोजी रोटी काढायचा. त्याच्या कमाईचा महत्तम हिस्सा ही भाडी भरण्यातच जायचा म्हणून मी त्याला ‘मार्जिन मनी’ साठी पैसे दिलेत व बँकेचं लोन घेऊन त्याने स्वत:ची गाडी घेतली. करोनाच्या दोन लॉकडाऊनमधे हप्ते न भरू शकल्याने बँकेने त्याची गाडी जप्त केली. दोन महीने तो घरी राहिला. दोन महिने तामिळनाडूमधे त्याच्या गावात जाऊन राहिला. मग आता पुन्हा कुणाचीही गाडी दिवसाच्या रेटनी भाड्याने आणतो व ती चालवून आपली रोजी रोटी काढतो. माझे पैसे अजूनपर्यंत परत करू शकला नाही म्हणून तो हळहळतो. ओशाळल्या चेहेऱ्यानी माझ्याकडे पाहतो. ‘मै आपके पैसे जरूर वापस करुंगा’ असं मला अगदीच अनावश्यक असलेलं आश्वासन देऊन तो स्वत:चेच समाधान करून घेत असतो. कधी ५० हजार रुपयाची गड्डी हळूच माझ्या हातात सरकवतो व ‘आगे के भी पैसे देता हू जी’ असं ओशाळल्या चेहेऱ्यानी म्हणतो. करोनाच्या पहिल्या लाटेत माझ्या नागपूरच्या ड्रायव्हरची मुलगी मुंबईत अडकली होती. बस, रेल्वे, सगळं बंद, प्रवास बंदी, जिल्हा बंदी, पासशिवाय कुठे जाणे येणे शक्य नाही. सर्वसामान्यांना पास मिळणे शक्य नाही असा तो काळ होता. पास घेऊन महाबळेश्वरला निघालेले ‘व्हीआयपी’ पण पकडले जात होते. याला फोन करून त्या मुलीचा नंबर दिला व तिला कसंही करून नागपूरला पोहोचवून दे म्हणून सांगितलं. त्याने दुसऱ्याच दिवशी तिच्या ठिकाणावर जाऊन तिला घेतलं व ५-६ जिल्हयांची जिल्हा बंदी अनेक हिकमती करून पार करत रात्री ११.०० वाजता तिला नागपूरला माझ्या घरी आणून पोहचवलं. लगेच “मै रिटर्न जाता हू” म्हणून तो परत जायलाही निघाला. करोनाच्या काळात मुंबईवरुन आलेला माणूस  मुला-बाळांच्या घरात कोण कसा काय ठेऊन  घेऊ शकेल, बाहेर लॉज वगैरे सगळे बंद म्हणून संकोचाने तो असं करतो आहे, हे मला लक्षात आलं. मी त्याला आंघोळीसाठी बाथरूममधे पाठविलं. गरम गरम जेऊ घातलं व घरीच झोपायला सांगितलं. सकाळी नाश्ता करायला लावला व सोबत जेवणाचा डबा देऊन मग त्याला रवाना केलं. कारण मधे वाटेत काही खायला मिळण्याची तेव्हा सुतराम शक्यता नव्हती. या आडदांड माणसातलं नाजुक हृदय मला कधीचच दिसलं होतं व म्हणूनच त्याच्याशी माझे भावबंध जुळत गेले होते.

घाई करत आम्ही शिवाजी पार्कला पोहोचलो पण गाडी पार्किंगला लावत नाही तोच तो ‘लेक्सस’वाला आणखीन २-३ माणसं सोबत घेऊन पुन्हा आमच्या मागे पोहचला. पुन्हा तो आरमुगमशी भांडू लागला व दोघं-तिघं मिळून त्याला मारू लागलेत. आता मात्र आरमुगम बिथरला. बाजूलाच एक टॅक्सीवाला गाडी जॅकवर चढवत होता. धावत जाऊन त्याने जॅकचा हँडल त्याच्या हातून हिसकला व त्या हँडलनी ‘लेक्सस’वाल्याच्या मानेवर एक जोरदार प्रहार केला. माझा हात खिशातल्या मोबाईलकडे आणि डोकं आधीच दौडू लागलं होतं. हातासरशी ५-१० माणसं घेऊन येऊ शकणारा मित्र आता ‘अंडरवर्ल्ड’चाच कुणी असावा लागणार होता. तसा जवळ दादर इस्टला एक होता. आम्ही दादर वेस्ट मधे होतो. त्याला यायला १०-१५ मिनिटे तरी लागणार. त्याला फोन करून तोपर्यंत या ३-४ माणसांना थोपवायचं म्हणजे यातल्या दोन जणांना आपल्याला  आता अंगावर घ्यायचं आहे. याशिवाय दुसरा उपाय नाही, हे माझ्या लक्षात आलं. पण तेवढ्यात तिथे गाड्या पार्क केलेले ५-६ टॅक्सीवाले भोवती जमा झालेत. आरमुगमने त्यांना दोन्ही गाड्यांना लागलेल्या माराच्या जागा दाखविल्या त्यावरून त्या ‘लेक्सस’वाल्याचीच मागून मारल्याची चूक आहे, हे त्यांच्या लक्षात आणून दिलं. आणि तरीही पुन्हा हाच मला मारतो आहे हे समजावून सांगितलं. त्यांना परिस्थिती लक्षात आली. हा पण  आपल्यासारखाच एक टॅक्सी ड्रायव्हर हे लक्षात आल्यावर ते सगळे आमच्या बाजूचे झालेत. विशेषत: आपल्यासारख्याच एका ड्रायव्हरला मारलं जातं आहे म्हणून त्यांना सहानुभूती वाटत होती. मग सगळ्यांनी मिळून ‘लेक्सस’वाल्याला व त्याच्या साथीदारांना चोप द्यायला सुरवात केली. ५-१० मिनिटातच हात जोडून माफी मागत ते ‘लेक्सस’वाले लोक रवाना झालेत.

 पण या सगळया भानगडीत मी शिवाजी पार्कच्या पूर्वेकडच्या भागाला गाडीतून उतरलो होतो. आत फोन केल्यावर ‘व्हीआयपी एंट्री’ पश्चिमेकडे कॅडल रोडवरून आहे व ‘तिथे ताबडतोब ये’ असा निरोप मिळाला. पार्किंगच्या दक्षिणेच्या बाजूला सर्वसामान्यांसाठी एंट्री होती. पूर्व व दक्षिण बाजू मिळून जवळपास एक किलोमीटरची रांग होती. ती रांग पूर्ण धावत जाऊन मी दुसऱ्या कॅडल रोडवरच्या व्हीआयपी गेटकडे जायला निघालो. रस्त्यात ठिकठिकाणी पोलिसांचे बॅरिअर्स होते. मला तिकडच्या गेटवर जायचं आहे, असं समजाऊन सांगूनही पोलिस ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. गर्दी आणि लोकांच्या रेट्यामुळे त्यांचीही मन:स्थिति चिडचिडी झाली होती. मग जिथे जिथे बॅरिअर येईल तिथे बाजूच्या शिवाजी पार्कच्या वस्तीच्या गल्लीबोळामधून धावत मी पुढे जात होतो. एवढ्या गर्दीमुळे नाकावरचा मास्क खाली करावा असं पण वाटत नव्हतं. नुकताच मी डेंगू आणि कोविड अशा एकत्रित आलेल्या ‘डबल ॲटॅक’ मधून सावरत होतो. रक्तातल्या ‘प्लेटलेट्स’ कमी झालेल्या होत्या. त्याचा खूप थकवा होता. असा प्रसंग आला नसता तर प्रवास करायचा ‘फिटनेस’ माझ्यात मुळीच आलेला नव्हता. हा शरीरातला आधीचाच थकवा व त्यात मास्क घालून धावणे यामुळे दम लागत होता. दीदींच्या अंत्यदर्शनाच्या दिवशी हे सगळं काही आपल्या बाबतीत व्हावं म्हणजे ही आपलीच मागची काही प्रारब्धातली पापं, असे विश्लेषण मी मनातल्या मनात स्वत:शी करत होतो.

कसाबसा मी कॅडल रोडच्या बाजूला पोचलो. पश्चिम बाजूचीही पूर्ण वाहतूक बॅरिअर्सनी अडवलेली होती. पोलिस बॅरिअर्सच्या आत जाऊ देत नव्हते. पण नशिबाने इकडे तेवढी गर्दी नसल्याने या बाजूच्या पोलिसांची मन:स्थितीशांत होती. पहिलं बॅरिअर मी त्यांना समजावून सांगून पार करू शकलो. दुसऱ्या बॅरिअरवर पोलिसांचं दुर्लक्ष आहे असं पाहून फुटपाथच्या बाजूनी हळूच आत शिरलो. कसंबसं करत मी ‘व्हीआयपी एंट्री’च्या समोर पोहचलो व तिथून आत फोन लावला. पण तेवढयात दोन इन्स्पेक्टर माझ्याकडे धावत आलेत व ढकलून मला बाहेर हाकलण्याचा प्रयत्न करू लागले. मी त्यांना काकुळतीनी विनंती केली की ‘मला फक्त ५ मिनिट इथे उभं राहू द्या, आतून कोणीतरी मला न्यायला येईल. ५ मिनिटात कोणी आलं नाही तर मग मला हाकला’. पण दोन मिनिटातच मुख्यमंत्र्यांचे सचिव श्री. अनिल त्रिवेदी स्वत:च मला घ्यायला आलेत. त्यांना बघूनच पोलीस बाजूला सरकलेत आणि मी आत जाऊ शकलो.

  अग्नी देण्याची वेळ जवळ आली होती व पंडित गीतेचा १२ वा अध्याय वाचत होते. दीदीचं शेवटचं दर्शन मला घ्यायला मिळालं, पायावर डोकं टेकवता आलं. माणसाचं मन कसं असतं पहा …एका क्षणासाठी दीदी गेल्याचं दु:ख मी विसरलो व मला त्यांना शेवटचं पाहता आलं, त्यांच्या पायावर डोकं ठेवता आलं याचाच आनंद मला त्या क्षणी होत होता.

एका माणसाने आपल्याला आयुष्यात सगळ्यात जास्त वेळा आनंद दिला असेल असं संख्येने मोजायचं झालं, वजनाच्या मापानी मोजायचं झालं किंवा तीव्रतेच्या अंगानी मोजायचं झालं तरी त्याचं उत्तर ‘लता मंगेशकर’ हेच येईल. आयुष्यात अनेकदा पिडलेलं, खचलेलं मन दीदींच्या एका लकेरीनी, सुराने पुन्हा उमेदीनी भरल्याचे सगळ्यांचेच अनुभव असतील. आज एका व्यक्तीचा नाही तर एका युगाचा अंत झाला आहे, असं वाटत होतं. An End of An Era. संगीताच्या क्षेत्रात अवतरलेला एक ईश्वरी अवतार आज संपला होता. काही मृत्यूंनी आपल्या स्वतःतलाही  दोन चार टक्के भाग मरत असतो. तसा हा मृत्यू होता. एकसंध असे आपण एकदम मरतच नसतो ,असं मला आजकाल वाटायला लागलं आहे. असं २-४ टक्के मरत जात मग शेवटचा जो काही २५-३० टक्के भाग आपल्यातला उरत असेल तेवढाच फक्त आपल्या स्वतःचा मृत्यू नेत असेल. असा आपल्यातला २५-३० टक्केच भाग उरल्यावर कदाचित आपल्यालाही मृत्यू हवा हवासाही वाटायला लागत असेल. मग मृत्यूला आपण एवढं घाबरायचं कशाला? तसंही विज्ञान शिकतांना ‘लॉ ऑफ कॉन्झरव्हेशन ऑफ एनर्जी’ वाचल्यापासून तिचा ठायी ठायी प्रत्यय सतत येतच असतो. आपल्या अस्तित्वातला जीवित भाग हा उर्जेचाच काही प्रकार असू शकतो हे ही लक्षात येत असतं व त्यामुळे पुनर्जन्मावरचा विश्वास पण ठाम होत जातो. आणि असं असूनही आपण मृत्यूला घाबरत असतो. कुणी जवळचं गेलं की आतून तुटून जात असतो. स्वतःच्या मृत्यूची पण आपल्याला भीती वाटत असते. गाडी ५-६ वर्ष वापरून झाल्यावर आपल्याला बदलावीशी वाटते. नवीन गाडीची ओढ लागते, मग देह बदलावासा का वाटत नाही? नवीन देहाची ओढ का लागत नाही? कदाचित हा नवीन देह मिळण्यात मधे ५०-६० वर्ष जात असतील. पण एक आयुष्य जगून झाल्यावर इतका आराम, इतका ‘ब्रेक’ आवश्यकही असेल. जगणं फार थकवून टाकणारं असतं. दीदींना आता नवीन देह मिळेल, नवीन गळा, नवीन स्वरयंत्र लाभेल. चांगलच आहे न हे… असे विचार मनात सुरू होते.

सगळे निघून गेल्यावरही आदिनाथ (मंगेशकर) तिथे थांबलेला होता. मला पण निघावसं वाटत नव्हतं. मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी, वार्ड ऑफिसर, मिलिटरीचा प्रोटोकॉल, दादर स्मशानभूमीचे कर्मचारी, पोलिस हे तिथे शेवटची आवरासारव करत होते. समोर दीदींची चिता जळत होती व मागे त्यांच्याच आवाजातले पसायदानाचे सुर वाजत होते.

दादरच्या समुद्रावरचे गार गार वारे अंगावर शिरशिरी आणत होते. चितेच्या अगदी जवळच खुर्ची टाकून आम्ही बसलेलो होतो. दीदींच्या जळणाऱ्या चितेच्या आगीची ऊब त्या थंडीत मिळत होती. दीदी अस्तित्वाच्या शेवटच्या कणापर्यंत अजूनही ऊब देत आहेत हे मनात येऊन अंत:करण ओलावत होतं. दर्शनार्थींची रांग अजूनही सुरूच होती. त्यातल्या एका लुगडेवाल्या बाईचं अंग हुंदके देतांना गदागदा हालत होतं. चितेसमोर डोकं टेकवून ती ढसाढसा रडली. गेली दोन वर्ष सतत दीदींची सेवा केलेल्या दोन नर्सेसच्या डोळ्यातून गळणाऱ्या धारा थांबतच नव्हत्या. एक माणूस त्याने स्वतः काढलेल्या दीदींच्या चित्राचा अल्बम घेऊन आला व तो चितेसमोर ठेऊन हात जोडून उभा राहिला. मधेच काही ‘लतादीदी अमर रहे’ च्या घोषणा देत होते.

दीदींची फुलाफुलांचं कव्हर असलेली उशी चितेजवळ पडली होती. मी मागे पाहून कुणाशी काही बोलत असताना महानगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्याने उचलून ती उशी चितेत टाकली. चेहरा पुन्हा चितेकडे वळल्यावर मला ती दिसली. मी एकदम ओरडलो. पण दोन मिनिटातच ती उशी अर्ध्याच्या वर जळून गेलेली होती. मला ती उशी घरी आणायची होती. रोज डोकं टेकवून झोपण्यासाठी वापरायची होती. दीदी माझ्या वडिलांपेक्षा दोन वर्षांनी मोठ्या म्हणजे मला मातृस्थानी होत्या. त्यांच्या मांडीवर डोकं टेकवून झोपल्यासारखा ‘फील’ त्यांच्या या उशीनी मला दिला असता. दीदींची एक जुनी साडी न्यायची व तिच्यात कापूस भरून तिची गोधडी करून पांघरायला घ्यायची, असं मग मी ठरवलं.

एक महानिर्वाण झाल्याचं जाणवत होतं. असं मला लहानपणी विनोबा गेलेत त्या वेळेस वाटलं होतं. पण ते स्वतःला हळूहळू विसर्जित करत गेले होते. आदल्या दिवसभर त्यांचे हे विसर्जन जवळ उभं राहून मी पाहिलं होतं. नंतर बाबा आमटे गेलेत त्यादिवशीही असं वाटलं होतं. नंतर माझे वडील गेलेत त्या दिवशी एक युग संपुष्टात आल्याचं महानिर्वाण जाणवलं होतं.

पाऊल निघत नव्हतं तरी शेवटी जड अंत:करणानी आम्ही सगळेच तिथून निघालो. आरमुगमला फोन करून मी गाडी कॅडल रोडवरच्या गेटवर बोलावली. आरमुगम फारच अस्वस्थ होता. मला अंत्यदर्शन मिळालं नसेल म्हणून ‘गिल्ट’ पायी तो अस्वस्थ असेल असं वाटलं, म्हणून मी त्याला माझं  दर्शन व्यवस्थित झाल्याचं सांगितलं. पण तरीही तो अस्वस्थच होता. थोडं पुढे गेल्यावर तो म्हणाला “सर मुझे अच्छा नही लग रहा है, मै किसीको कभी मारता नही सर. लेकीन आज उसने बहोत ज्यादती कर दिया. लेकिन तबसे मुझे अच्छा नही लग रहा है. दो मीनट के गुस्सेमे अपन मार देते है, लेकिन अभी उसको यहा कितना दुख रहा होगा” असं स्वतःच्या मानेवर हात फिरवत तो म्हणाला “रातभर उसको अब यहापे बहोत दर्द होगा. ये सोचके मुझे अच्छा नही लग रहा है”. हे त्याचं वाक्य ऐकल्याबरोबर मला एकदम जगण्याचा मघापासूनचा हरवलेला ‘सूर’ सापडला. हा असा विचार मनात येऊ शकायला जे उत्क्रांत मन व उन्नत भावना लागते ती त्या दीड कोटीच्या ‘लेक्सस’ च्या मालकाकडे नव्हती, पण बँकेने गाडी जप्त केलेल्या व आता कसं बसं पोट भरणाऱ्या आरमुगमकडे ती  आहे. हा चांगुलपणा जगात आता कितीही अल्पप्रमाणात असेल पण तो अजून टिकून राहिलेला आहे. केवळ हा एक आपल्यासारखा गरीब ड्रायव्हर एवढ्याच ओळखीवर आम्हाला मदत केलेल्या त्या इतर टॅक्सी ड्रायव्हर्समधे पण तो होता. ते धावून आले नसते तर आता यावेळी मी दीदीचं अंत्यदर्शन घेऊ शकण्याऐवजी कुठल्यातरी हॉस्पिटलमधे बँडेज बांधून घेणे, एटिसचे इंजेक्शन घेणे, ब्लड टेस्ट करून प्लेटलेट्स मोजणे, असं काही करत असतो.

दर शंभर दोनशे वर्षांनी बुद्ध,येशू ख्रिस्त ,आद्य शंकराचार्य, महावीर,ज्ञानेश्वर, तुकाराम, सॉक्रेटीस, लिओ टॉलस्टॉय, कबीर, गांधी असा कुठला तरी एक महापुरुष येऊन जगातला चांगुलपणा पूर्ण ताकदीनिशी ‘चार्ज’ करून जात असतो. मग हळूहळू हा ‘चार्ज’ ओसरत जाऊन तुरळक दिसणाऱ्या चांगुलपणावर आपली ज्योत पेटवत ठेऊन जगण्याची आजच्या सारखी वेळ आपल्यावर येते. पण अशी वेळ, असा काळ येणे ही कुठल्यातरी महापुरुषाच्या आगमनाची चाहूल खूणही असते. Time is now ripe for an arrival of a Mahatma. असा उमेद देणारा विचार मग माझ्या मनात आला.

मी काहीच बोललो नाही म्हणून मला राग आला आहे का असं कदाचित वाटून आरमुगमने मागे वळून माझ्याकडे पहिलं. माझ्या डोळ्यात ओथंबलेला आनंद व त्याच्याविषयीचं अपार कौतुक कदाचित त्याला दिसलं व तो समाधानाने गाडी चालवू लागला. पुढल्या टर्नवर गाडी डावीकडे वळली व तिथून डावीकडे बघितल्यावर दीदींच्या चितेच्या आसमंतात जाणाऱ्या ज्वाळा पुन्हा दिसू लागल्यात. तिथे येतांनाच्या प्रवासात ‘बेसूर’ झालेल्या मला जगण्याचा ‘सूर’ पुन्हा सापडला आहे, ही बातमी मी त्या ‘सूरसम्राज्ञीला’ डोळ्यांनीच सांगितली आणि दूरवर चिता दिसेनाशी होईपर्यंत तिच्याकडे डोळा भरून पहात राहिलो.

(लेखक शेवाळकर डेव्हलपर्सचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत)

9822466401

आशुतोष शेवाळकर यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –आशुतोष शेवाळकर– type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous articleनरेंद्र मोदी खोटारडे आहेत , असं म्हणणार नाही पण-
Next articleगहराईयॉं’: प्रेमाबाबतच्या सर्व कल्पना मोडीत काढणारा चित्रपट
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here