स्वरमाउलीचे पसायदान

(साभार: साप्ताहिक ‘चित्रलेखा’)

-ज्ञानेश महाराव

———————————————–

‘एक चिमणी आली नि दाणा घेऊन गेली’ ही अखंड चालणारी ‘चिमणकथा’ लता मंगेशकर, यांनी १९४७ ते २००६ ह्या काळात नव्या रूपाने आणली होती. ‘आप की सेवा मे’ पासून सुरू झालेली त्यांची भारतीय चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायनाची कारकीर्द तब्बल ६० वर्षांनी ‘रंग दे बसंती’ने थांबली. दरम्यानच्या काळात चिमणकथेतल्या चिमणीसारख्या एकेक नट्या आल्या आणि त्या लतादीदींच्या आवाजावर लहरत- लहरत दीदींसाठी काळाला आपल्या वयातलं एक वर्ष देऊन गेल्या. मधुबाला ते माधुरी दीक्षित आणि ‘रंग दे’ मधली क्रिकेटपटू पतौडी आणि शर्मिला टागोर यांची मुलगी- सोहा अली खान. अशा ६० हून अधिक नट्या असतील. त्या सगळ्या आल्या आणि गेल्या. लतादीदींचा आवाज मात्र वयाच्या ७७ वर्षी ‘रंग दे’मध्येही ‘मै सोला बरस की’सारखा कोवळाच राहिला. तो आवाजच नाही, तर ते बालिश हसणं- बघणं, लाजणं- वागणं; लहान मुलीची नम्रताही अखेरपर्यंत तशीच होती.

लतादीदींची गाणी ऐकता-ऐकता अठरा वर्षांचे ऐंशी वर्षांचे झाले. मात्र, त्यांचे वार्धक्य क्षणात झटकून तारुण्यात पोहोचवण्याचे काम लता मंगेशकर यांनी गायलेल्या प्रत्येक गाण्याने केलं आहे आणि पुढेही अनंतकाळ करीत राहिलं. त्यांच्या गाण्यात जणू काळाला विरघळून टाकण्याचे सामर्थ्य होते आणि आहे; इतके ते चिरतरुण आहे. हा ’अजीब दास्ता’ आहे. तो ‘कहा शुरू, कहा खतम’ असा ‘भुतो न भविष्यति’ असा आहे. तो तसा, वडील दीनानाथ मंगेशकर यांच्या अकाली निधनानाने १९४२ पासून सुरू झाला होता. त्याआधीही त्यांनी वडील असताना, त्यांच्या मालकीच्या ‘बलवंत संगीत नाटक कंपनी’साठी अडचणीच्या प्रसंगात ‘संगीत सौभद्र’ नाटकात ‘नारद’ वयाच्या ७-८ व्या वर्षी सादर केला होता. तेव्हाच त्यांनी आपल्यातल्या उपजत गानकौशल्याची चुणूक दाखवली होती. तीच त्यांनी ‘किती हसाल’ ह्या चित्रपटासाठी गायलेल्या पहिल्या गाण्यातूनही दाखवली. त्यातील ’नाचू या गडे, खेळू दारी’ ह्या गीतगायनासाठी त्यांना मानधनाचे ३० रुपये मिळाले होते.

त्याच वर्षी त्यांनी ’पहिली मंगळागौर’ ह्या चित्रपटात गाण्यासह अभिनयही केला होता. त्यानंतरच्या पुढच्या १९४२ ते ४७ ह्या ५ वर्षांत त्यांनी ‘चिमुकला संसार’, ‘गजाभाऊ’, ‘माझं बाळ’, ‘छत्रपती शिवाजी’, ह्या मराठी चित्रपटांसह ‘बड़ी माँ’, ‘जीवनयात्रा’, ‘मंदिर’, ‘सुभद्रा’ ह्या हिंदी चित्रपटात अभिनयासह गाणी गायली. १९४७ च्या ‘आप की सेवा मे’पासून मात्र त्यांचा निव्वळ पार्श्वगायनाचा प्रवास सुरू झाला. ३० रुपयांच्या मानधनापासून सुरू झालेला हा गानप्रवास ‘भारतरत्न’पर्यंतचे असंख्य सन्मान प्राप्त करीत; सार्थपणे मिरवीत करोडो रुपयांची संपत्ती मागे ठेवीत, ६ फेब्रुवारीला वयाच्या ९२ वर्षी (जन्म : २८ सप्टेंबर १९२९) अनंतकाळाच्या आठवणींसाठी थांबला.

यातील ७५ वर्षं त्यांनी भारतीय कुटुंबातील आजी-आजोबा आणि नातवंडं, अशा तीन पिढ्यांना एकाच वेळी आयुष्य सुरेल करण्याचा साक्षात अनुभव दिला. तो आनंददायी असला तरी त्याची निर्मिती आनंदातून झालेली नाही. गाणार्या पाखराची एक गोष्ट आहे. हे पाखरू सुरेल गातं. पण त्यासाठी ते स्वतःला काटेरी झुडपावर लोटून देतं, आपल्या काळजात काटा खुपसून घेतं. काटा जेवढा आत घुसेल, तेवढं त्या पाखराच्या कंठातून येणारे गाणं अधिक गोड होतं. गोष्टीतलं हे पाखरू प्रत्यक्षात कुणीही पाहिलं नसणार. पण दुःखाचं नितांतसुंदर गाणं होऊ शकतं, याचा प्रत्यक्ष अनुभव ‘अखंड भारत’ गेली ७५ वर्षं घेत होता आणि तो जगभर पोहोचला होता.

जगाला आनंद देणाऱ्या लताबाईंच्या दु:ख- दुर्दैवाची सुरुवात वयाच्या ५ व्या वर्षांपासून झाली होती. तेव्हा त्यांना ‘देवी’ आल्या होत्या. त्या त्यांना उद्ध्वस्त करायचं ठरवूनच आल्या होत्या. एक गेली की दुसरी यायची. आगीला आग लागावी, असा प्रकार होता. त्याबाबत लतादीदींच्या आईंनी – माईंनी सविस्तर लिहिलंय. तीन महिन्यांनी ह्या ‘देवी’ गेल्या, पण सर्वांगावर जीवघेण्या झुंजीचे व्रण ठेवून गेल्या. मात्र एवढे करूनही देवींना लतादीदींच्या कंठातलं गाणं आणि काळजातली हिंमत नेता आली नाही. त्यामुळे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वडिलांचं निधन झाल्यावर लतादीदी आई आणि चार भावंडं यांचं कुटुंब सावरण्यासाठी वयाच्या १३ व्या वर्षी घराबाहेर पडल्या. चरितार्थासाठीच्या कमाईकरिता चित्रपटाच्या- स्वप्नांच्या सौदागरांच्या दुनियेत शिरल्या. त्यासाठी गाठीशी ‘दीनानाथांची मुलगी’ ही ओळख आणि गळ्यातलं गाणं एवढंच होतं. यातली पहिली गोष्ट सांगायची होती आणि दुसरी करून दाखवायची होती. दोन्हीला साजेसं कर्तृत्व गाजवायची जबाबदारी दीदींनी कोवळ्या वयात उचलली होती.

त्यांच्या आई-माई ह्या कवी नव्हत्या. पण लतादीदींचे त्यावेळचे जगणं – वागणं आठवताना त्यांचे शब्दही कविता झाले. त्या लिहितात –

बापाचा लळा फार, रडून रडून डोळे सुजले फार

बाप तिचा सागर, ती दु:खाने झाली बेजार-

ओल्या डोळ्याने बापाला बघितले वरती*

सागराला आली भरती- १

सान असताना पडला तिजवर बोजा*

शत्रू आणि मित्र पाहात होते मजा-

लहानगी भावंडं बघुनी तिचे हृदय भरले

ओल्या डोळ्यांनी तिने तंबोऱ्यास हाती धरले-२

लतादीदींचं गाणं कसं सुरू झालं, त्याचं त्यांच्या आईने काढलेलं हे शब्दचित्र आहे. ओल्या डोळ्यांनी तंबोरा हाती धरणार्या लताबाईंनी आपले आणि आपल्या कुटुंबाचे डोळे कधीच कोरडे राहू नयेत, ह्याची काळजी घेणारे गानकौशल्य आयुष्यभर दाखवले. त्यासाठी गाणार्या पाखरानं काळजात काटा रुतवून घ्यावा, तसं लतादीदींनी दुःखाला काळजातच कोंडून ठेवलं. दुःख, दैन्य, अपमान, अवहेलना, टवाळी आणि उपेक्षासुद्धा शांतपणे रिचवली- पचवली. त्या सगळ्याचंच त्यांनी गाणं केलं आणि त्यांना नानारूपात पेश करीत रसिकांना नादावलं. आपलं गाणं, लोकाचं केलं. त्यामुळे अरसिकही रसिक झाले. अमानुषांना माणूस होता आले. कृतघ्न कृतज्ञ झाले. आजारी लतादीदींची गाणी ऐकत ठणठणीत बरेही झाले. त्यांचं गाणं प्रेमिकांचे प्रेम बनले. दीनदुबळ्यांचे आधार बनले. शत्रू राष्ट्राशी मैत्री संबंध जोडून देणारे ‘राजदूत’ही बनले.

असं सर्वस्पर्शी – सर्वव्यापी गाणं गाणार्या लतादीदी आपल्याला चालत्या-बोलत्या गात्या पाहायला- अनुभवायला मिळाल्या. त्यांचं सर्वसाक्षी असलेलं ऐश्वर्य समजलं. पण त्याच्या मुळाशी असलेलं प्रचंड दुःख -दैन्य आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी घेतलेली खडतर मेहनत समजली का? की, ती घेण्यास उसंतच मिळाली नाही? किंवा ते समजून घेण्याची आवश्यकताच वाटली नाही? यापैकी काहीही असेल, तर तो करंटेपणा झाला.

लता मंगेशकरांना ‘भारतरत्न’ हा देशातला सर्वोच्च पुरस्कार मिळाला. तरीही त्या गात राहिल्या. कारण त्यांनी गायनकलेपेक्षा आपण मोठे आहोत, अशी स्वतःची समजूत करून घेतली नाही. ७०० वर्षांपूर्वी आई-वडील गमावल्याचं दु:ख ताजं असताना, सनातनी वृत्तीच्या नीच धर्मलंडी ब्राह्मणांकडून झालेला अपमान, अवहेलना शांतपणे स्वीकारत ‘अमृतातेही पैजा’ जिंकणारा मुलगा आपल्या महाराष्ट्रभूमीत भावंडांसह ‘संत’ झाला! त्या ‘योगीराज माउली’चीच वाट चालतच लता मंगेशकर ‘स्वरमाउली’ झाल्या आहेत. संत ज्ञानेश्वरांनी ‘पसायदान’ लिहिले. त्या शब्दांना लतादीदींनी आईच्या ममतेनं सुरांनी सजवले. शब्द-सूर एक झाले. ‘पसायदान’ सर्वभूती- सर्वसुखी करणारे झाले!

————

समाज सर्वेश्वराला दीदींचे साकडे

आपल्याकडे देव-धर्माइतकंच जातीपातीचं खूळ मोठं आहे. त्याआडून लता मंगेशकर यांच्याप्रमाणेच भीमसेन जोशी यांनाही ‘भारतरत्न’ने सन्मानित केले होते. त्यांच्यासाठी पुण्याची वैकुंठ स्मशानभूमी २१ बंदुकीच्या गोळ्यांची सलामी देण्यासाठी पुरेशी ठरली असताना ; लता मंगेशकर यांना ’सरकारी इतमाम’ देण्यासाठी मुंबईत शिवाजी पार्कला स्मशानभूमी करण्याचे कारण काय? अशीही चर्चा झाली. मंगेशकरांसाठी अशी चर्चा नवीन नाही. मास्टर दीनानाथ यांचं नाटक-गाणं गाजत असताना; त्यांच्याच समकालीन एका गायक-नटाचं गाणं ‘ब्राह्मण सभे’त होते. ती मैफल संपल्यावर कुणीतरी त्या गवयाला ‘मास्टर दीनानाथाचं गाणं ऐकलं का? कसं आहे?’असं विचारलं. तो गवई पटकन बोलून गेला, ‘हो ऐकलं की त्याचं गाणं! ते त्याच्या जातीप्रमाणे आहे!’

ही शेरेबाजी दीनानाथांपर्यंत पोहोचताच, ती सांगणाऱ्या आपल्या शिष्याला ते म्हणाले, ”ते म्हणतात ते बरोबरच आहे. माझ्या गाण्यात ब्राह्मणाची विद्वत्ता आहे आणि क्षत्रियाचं तेज आहे.” आपल्या गाण्याचं वैशिष्ट्य सांगताना दीनानाथ म्हणत, ”मी केशवराव भोसले यांच्या गाण्यातली तडफ आणि बालगंधर्वांचा गोडवा घेऊन, त्याला मी स्वतःची रिंग दिली आहे!”

गायन क्षेत्रातल्या ह्या ताण्याबाण्याची ओळख लता मंगेशकर यांना वडिलांबरोबरच्या चर्चेतून झाली होती. आई-माई आपल्या आठवणीत लिहितात, ”लता जी काही हसली असेल, बोलली असेल, कोट्या केल्या असतील, त्या आपल्या बापाबरोबर! तिचं सगळंच वेगळं आहे. आपल्या खोलीत ती आपल्याला बंद करून राहते. ती फार देवभक्त आहे. ती कुठेही गेली तरी तिचे देव बरोबर असतातच. तिच्या कपाटात दागिने दिसणार नाहीत. सगळं कपाट देवांनी भरलेले दिसेल. गडी माणसांना कधी लागेल असं बोलणार नाही. आलं कुणी भेटायला तर मिनिटभर उभी राहिली, बोलली की बाकी सारा वेळ खोलीत! लता कधी घरात आहे, असं कधी वाटत नाही!”

लतादीदी यशाच्या कीर्ती शिखरावर असताना आई-माईंनी रेखाटलेले हे शब्दचित्र आहे. त्यात कालानुरूप थोडाफार बदल झाला असेल. पण निमित्ताशिवाय कार्यक्षेत्राच्या चौकटी बाहेर लतादीदी भरकटल्या, असं कधी झालं नाही. त्यासाठी त्यांना स्वत:ला खोलीत बंद करून घेण्याची सवय उपयुक्त ठरली असावी. तरीही मनात प्रश्न येतोच! ‘बंद खोलीत त्या आपला वेळ देवांबरोबर कशा घालवत होत्या?’ कारण कथेतले देव भक्तांची कसोटी बघताना अक्षरश: दानव झालेले वाचायला-ऐकायला मिळतं. ते भक्ताला छळ छळ छळतात. त्याची बायका- मुलं त्याच्या डोळ्यादेखत अन्नावाचून तडफडून मारतात. गोरा कुंभाराला पोटच्या पोराला पायाखालच्या चिखलात त्याला तुडवायला लावतात. आई -वडिलांना आत्महत्या करायला लावून ज्ञानेश्वरादी भावंडांना अवहेलना करीत दारोदार फिरवतात.

लतादीदी आणि त्यांच्या भावंडांना कथित देवानं अथवा दैवानं असंच धारेवर धरलं होतं. अफाट कर्तृत्व आणि दातृत्व असलेल्या पित्याने आपल्या लेकीला सर्वस्व दिलं असतं. पण त्यांनी गाण्यातलं इवलंसं काही देऊन जगाचा निरोप घेतला. त्यांचे हे अचानक जाणं, दीदींच्या काळजातली कधीही भरून न येणारी जखम झालं होतं.

त्याची खदखद व्यक्त करताना त्या एका ठिकाणी लिहितात, ”बा, नटव्या नि फसव्या समाज सर्वेश्वरा! तू माझ्या बाबांची फसवणूक करून जसा अकाली त्यांचा घात केलास, तसा कोणत्याही जातिवंत खर्या कलोपासकाचा करू नकोस! तू आपल्या क्षणैक स्वार्थाकरिता, आता यापुढे तरी कोणत्याही कलावंताची बेअब्रू करीत स्वतः बदनाम होऊ नकोस! स्वतःच्या गरजू चैनीकरिता, यापुढे कोणत्याही कलावंताला कसल्याही मोहाचे व्यसन लावून, तू त्याचा अल्पकाळात बळी घेऊ नकोस! तू शहाणा असशील, तुला जर कलावंताची कला आवडत असेल, तर या गोष्टी तुजकडून अवश्य होतील! तू कलावंतांवर निर्व्याज प्रेम कर. पण त्यांना व्यभिचारी करू नकोस! तू कलावंतांवर पैशाचा वर्षाव कर. पण त्याकरिता त्यांचा नैतिक अध:पात होऊ देऊ नकोस! तू त्याला जरूर माया लाव. पण कलावंताच्या कौटुंबिक जीवनात यत्किंचितही बिघाड आणणारी निंदेची टवाळी वा लावालावीची वावटळ उठवू नकोस! कारण कलावंताच्या कौटुंबिक जीवनातूनच विविध कलांचा उद्गम व विकास होणार असून त्यामुळेच सृष्टीचा गुणोत्कर्ष हा उत्तरोत्तर वृद्धिंगत होणार आहे!”

हे देवाच्या नावानं स्वत:ला खोलीबंद करून केलेलं कला आणि कलावंताच्या भल्यासाठीचं चिंतन आहे. ते आज ‘संविधान’ बदलण्यापर्यंतची भाषा करणार्या बेताल कलावंतांना आणि त्यांना वापरणार्यांना ताळ्यावर आणणारं आहे. ते चिंतन अंमलात आणण्यासाठी लतादीदींनी ‘समाज सर्वेश्वराला- म्हणजे जनतेला साकडं घातलं आहे.

———-

कल्पवृक्ष गाण्यातून बहरत ठेवला

लतादीदींच्या बोलण्यात कायम वडिलांचा उल्लेख आलाय. चार महिन्यांपूर्वी वाढदिवसांच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लतादीदींना ‘फोन कॉल’ केला. तेव्हाही त्या बोलताना म्हणाल्यात, ”मी जी काही आहे, ती आई-वडिलांचे आशीर्वाद आणि मायबाप रसिकांचे प्रेम यामुळे आहे!” थोडी जुनी; डिसेंबर १९९७ मधली गोष्ट आहे. केशवराव भोसले यांनी स्थापन केलेली आणि बापूराव व भालचंद्र पेंढारकर ह्या पिता-पुत्रांनी वाढविस्तार केलेल्या ‘ललितकलादर्श’ ह्या नाटक कंपनीला ४ जानेवारी १९९८ रोजी ९० वर्षे पूर्ण होणार होती. पेंढारकर अण्णांनी वयाची ७८ वर्षे गाठली होती. तरीही ‘ललितकलादर्श’चा ९० वा ‘वर्धापन दिन सोहळा’ साजरा करण्यासाठी मी अण्णांना तयार केलं. समारंभाचं नियोजन आकार घेऊ लागलं, तसं अण्णांनी मला सुचवलं, ”आपल्याला लता मंगेशकर यांना कार्यक्रमाला आणता येईल का?” या प्रश्नाबरोबरच त्यांनी लता मंगेशकर यांना आमंत्रित करण्याच्या औचित्याचा संदर्भ सांगितला. १९४० ते ४२ दरम्यान ’बलवंत नाटक कंपनी’चे मालक दीनानाथ मंगेशकर गेले; तसे त्यांचे प्रमुख सहकारी चिंतामण कोल्हटकर हेदेखील गेले. त्याचवेळी ‘ललितकलादर्श’चे चालक-मालक बापूराव पेंढारकर यांचंही निधन झालं. त्यांच्या पश्चात दोन्ही नाटक कंपन्या बंद पडल्या. लतादीदी सिनेमात गेल्या. भालचंद्र पेंढारकर गायन कलेचं शिक्षण घेत होते. चिंतामणरावांचे पुत्र चित्तरंजन कोल्हटकर हेदेखील रंगभूमीवर प्रवेश करण्याच्या प्रयत्नात होते.

१९४८ मध्ये भालचंद्र पेंढारकर यांनी ’ललितकलादर्श’ पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी ‘संगीत भावबंधन’ ह्या नाटकाचे प्रयोग करण्याचे निश्चित केले. त्यात अण्णा ’प्रभाकर’, चित्तरंजन कोल्हटकर ‘मनोहर’ आणि लता मंगेशकर ‘लतिका’च्या भूमिकेत होत्या. भालचंद्र पेंढारकर सांगत होते, ”तेव्हा आम्ही तिघेही विशी-पंचविशीत होतो. त्यालाही आता ५१ वर्षं होतील, म्हणून लताबाईंना आपण बोलावू. चित्तरंजन कोल्हटकर तर येणारच आहेत.”

मलाही ते औचित्यपूर्ण वाटले. आम्ही दाजी पणशीकर यांच्या माध्यमातून लतादीदींशी संपर्क साधला. अण्णा, मी आणि दाजी ‘प्रभुकुंज’वर गेलो. लतादीदी भरपूर बोलल्या. कार्यक्रमाला येण्याचीही इच्छा दर्शवली. पण त्याच दरम्यान त्यांचे परदेशी जाणे नियोजित असल्याने त्यांनी उपस्थितीला असमर्थता दर्शवली. त्यावर मी त्यांना ‘व्हिडिओ शूटिंग’ करून ते कार्यक्रमात दाखवू म्हणालो. त्याला तयार झाल्या.

वरळी येथील ‘नेहरू सेंटर’चे व्यवस्थापक काझी यांच्या कार्यालयात शूटिंग करण्याचे ठरले. लतादीदींच्या संपर्कात राहण्याची जबाबदारी माझ्याकडे होती. शूटिंगच्या एक दिवस आधी दीदींचा फोन आला. म्हणाल्या, ”आपण जिथे शूटिंग करणार आहोत, तिथे बॅकग्राउंडला काही असणार आहे का?’

मी म्हटलं, ‘हो, केशवराव, बापूराव आणि अण्णा या तिघांचेही ‘गायन गुरू’ वझेबुवा होते. त्यांचा फोटो असेल. तसेच अण्णा वडिलांचा- बापूरावांचा फोटो घेऊन येणार आहेत.”

त्यासरशी लतादीदी म्हणाल्या, ”मीही बाबांचा फोटो आणला तर चालेल का?” मी गोंधळलो. कारण चित्तरंजन कोल्हटकर यांना काय वाटेल, हा प्रश्न मनात आला. पण जे काय होईल, ते पाहू म्हणत ‘हो’ म्हणालो.

दुसऱ्या दिवशी लतादीदी स्वत: दीनानाथांचा फोटो घेऊन आल्या. तिघांच्या शूटिंगमधील गप्पा छान रंगल्या. अखेरीस, चित्तरंजन कोल्हटकर त्यांना म्हणाले, ”लता, आपण तिघेही सत्तरी पार झालोत. आता ‘निरोपाचं भावबंधन’ करू या का? एखादा प्रयोग…”

वातावरण थोडं गंभीर झालं. पण ते दीदींनीच हलकं-फुलकं केलं. म्हणाल्या, ”हो! खूप मजा येईल. किमान नाट्यवाचन तरी करूच!” ते झालं नाही. या गप्पातही त्या ‘भावबंधन’ प्रयोगाच्या आठवणीपेक्षा दीनानाथरावांच्या गाण्याबद्दल, नाटकाबद्दल अधिक बोलत होत्या. आपल्यासाठी कल्पवृक्ष लावणाऱ्या वडिलांना त्या विसरत नव्हत्या. तो ‘वैभवाने बहरलेला कल्पवृक्ष बघायला बाबा पाहिजे होते,’ ही त्यांची अखेरपर्यंतची आस होती. काळाचे काटे घडाळ्यासारखे उलटे फिरत नाहीत, हे त्यांनाही ठाऊक होते. म्हणूनच त्यांनी ह्या इच्छेचंही गाणं केलं. स्वत:सह रसिकांतही दीनानाथरावांची आठवण जागती ठेवली.

■ (लेखनकाळ : ७.२.२०२२)

(लेखक साप्ताहिक ‘चित्रलेखा’ चे संपादक आहेत)

9322222145

Previous articleजहॉं तेरी यह नजर है..
Next articleनरेंद्र मोदी खोटारडे आहेत , असं म्हणणार नाही पण-
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.