इलेक्ट्रॉनिक्स आणि मुद्रित माध्यमांत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होण्याला ‘धक्का तंत्र’ , ‘मास्टर स्ट्रोक’ अशा विशेषणांनी गौरवलं गेलं पण , त्यातच पत्रकारितेचं खुजेपण लपलेलं आहे . हे जे काही घडलं ते दीर्घ पूर्व नियोजित राजकीय रणनीतीचा भाग होतं . ( त्या बद्दल विनोद शिरसाठ आणि शैलेंद्र परांजपे यांनी व्यवस्थित लिहिलं आहे म्हणून पुनरुक्ती टाळतो . ) मुद्रित माध्यमं आणि प्रकाश वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी फुटीर / बंडखोर आमदारांसोबत सतत सोबत होते . हे आमदार कोणते कपडे घालतात , कोणती गाणी गातात , कसे नाचतात त्यांनी बघितलेले डोंगर , तिथली झाडी , हॉटेल अशी सगळी वर्णनं चविष्टपणे माध्यमातून चघळली गेली पण , नेमकं काय घडतंय या माहितीपासून पत्रकार कोसो मैल दूर राहिले . याचं कारण हे राजकारणी आणि पत्रकारांमध्ये असलेला विश्वासाधारित संवादाचा अभाव . या राजकारण्यांच्या पोटात शिरुन माहिती काढण्याचं कौशल्य दाखवण्यापेक्षा केवळ जे काही घडतं आणि दिसतं आहे ( हॅपनिंग ) ते दाखवणं आणि लिहिण्याचा ट्रेंड सध्या माध्यमांत आहे . त्यामुळे माध्यमांकडून सत्य आणि अचूक माहिती मिळण्याच्या हक्कापासून वाचक/श्रोते वंचित राहतात . वाचक वृत्तपत्र विकत घेतात आणि प्रकाश वृत्तवाहिनी नि:शुल्क पाहता येत असली तरी ब्रॉडकास्टरची सेवा सशुल्क आहे त्यामुळे वाचक आणि श्रोत्यांचं माध्यमांशी असलेलं नातं ग्राहकाचं आहे , हे लक्षात घ्यायला हवं .