ठोंब्या विठोबा!

डॉ. मुकुंद कुळे

………………………………………………

पंढरपूरच्या विठ्ठलाइतकं भाग्य क्वचितच एखाद्या देवतेला लाभलेलं असेल. बघायला गेलं तर रूढार्थाने कोणतीही सौंदर्यलक्ष्यी लक्षणं विठ्ठलमूर्तीत नाहीत. रंगरूपानेही तो डावाच. ना साजिरा ना गोजिरा. अगदी महाराष्ट्रातल्या कुठल्याच जातीजमातीची विठोबा ही कुलदेवता नाही. अन् तरीही संपूर्ण महाराष्ट्राची उपास्य देवता म्हणून गेली आठेक शतकं विठोबा महाराष्ट्रावर अधिराज्य गाजवून आहे. त्याची मराठी जनमानसाला पडलेली ही भूल न उतरणारी आहे. आधुनिकतेचा परमोत्कर्ष ठरलेल्या एकविसाव्या शतकातही विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारीबरोबर पायी पंढरपूरला जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या वारकऱ्यांत पिढ्यान् पिढ्या ज्यांच्या घरात वारी आहे ते माळकरी आहेतच, पण आजची टेक्नोसॅव्ही पिढीही एका वेगळ्याच कुतूहलातून वारीत सामील होते आहे. विठ्ठलरूपाचे हे कसले गारूड आहे, त्याचा पुरता उलगडा अद्याप झालेला नाही. कदाचित होणारही नाही. कारण विठ्ठलाशी असलेलं जनमानसाचं नातं हे भावनिक आहे.

जितक्या सहजतेनं आपल्या शरीरातील धमन्यांतून रक्त वाहतं, तितक्याच सहजतेनं मराठी माणसाच्या मनात विठोबाच्या भावभक्तीचा झरा वाहतो. एवढ्या वर्षांनंतरही मराठी जनांच्या मनातला हा झरा कुंठित झालेला नाही. उलट पायाखालची माती आणि डोक्यावरचं आकाश जेवढं आदिम आणि अनंत, तेवढाच त्यांच्यासाठी विठोबाही प्राचीन आणि चिरंतन. हे महाराष्ट्रीय जनमानस आपल्या भावचक्षुंनीच विठोबाशी संवाद साधतं. त्यांना विठोबाच्या कभिन्न काळ्या अडीच फुटी उंचीशी काहीही देणंघेणं नसतं. ते कायमच संतांच्या ‘पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकीळ फाकती प्रभा’ या भारावलेल्या नजरेनंच पांडुरंगाकडे-विठोबाकडे पाहत असतात. त्यांच्यासाठी विठोबा हा निर्गुण निराकार नसतो, नाही. किंबहुना त्यांच्यासाठी तो सजीव-साकारच आहे. कृष्णाचं बाळरूप असलेला, हरिहराचं ऐक्य साधणारा, जनीला मदत करणारा, तर कधी चोख्याची घोंगडी खांद्यावर घेणारा आणि बरंच काही…

… पण त्याच वेळी पंढरपुरात विटेवर उभ्या ठाकलेल्या विठोबामूर्तीच्या अल्याडपल्याड नेमकं काय दडलंय, त्याचाही संशोधकांचा शोध शतकानुशतकं सुरूच आहे. त्याचं कूळ आणि मूळ संशोधकांना कायमच आव्हान देत आलं आहे. विठ्ठल रूपाचे आद्य अभ्यासक म्हणता येतील अशा डॉ. माणिक धनपलवार यांना विठ्ठल किंवा विठोबा ही देवता एखाद्या वीरगळातून आकाराला आलेली वाटते. ‘गायींचं रक्षण करताना मंगलवेढ्यानजीक विठ्ठल नावाचा एक गोपालक धारातीर्थी पडला, त्या गोपालकाच्या उभारलेल्या वीरगळातून आजचा विठ्ठल आकाराला आला’, असं ते म्हणतात. महानुभाव साहित्याचे अभ्यासक असलेल्या शं. गो. तुळपुळे यांनीही भडखंबा, म्हणजेच वीरगळातूनच विठ्ठल या देवतेची निर्मिती झाल्याचं म्हटलं आहे. मात्र आजचं विठोबा हे दैवत वीरगळातून उन्नत झालेलं असावं, यावर संशोधकांचं एकमत नाही. विशेषतः महाराष्ट्रातल्या देवतांची आपल्या संशोधनातून नव्याने मांडणी करणारे ज्येष्ठ अभ्यासक दिवंगत रा. चिं. ढेरे यांना ही उपपत्ती मान्य नव्हती. कारण वीरगळ ते विठ्ठलासारखं एक महान दैवत ही विकासप्रक्रिया विश्वसनीय प्रमाणांनी दाखवता येत नाही, असं त्यांचं मत होतं. असं असलं तरी विठोबा हा मूळ गोपजनांचा देव असल्याचं त्यांना मान्य होतं आणि त्यांनी ते त्यांच्या ‘श्रीविठ्ठल : एक महासमन्वय’ या ग्रंथात विठोबा या देवतेची उन्नयन प्रक्रिया दाखवून सिद्धही केलं आहे. धनगर-गवळ्यांसारख्या गोपजनांच्या विठ्ठल-बीरप्पा ह्या जोडदेवांपैकी एक असलेला विठ्ठल हे पंढरपूरच्या विठोबाचे आदिरूप असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मात्र धनपलवार ते ढेरे बहुतेक साऱ्या संशोधकांनी विठोबाच्या ‘विठ्ठल’ या नावारूनच त्याच्या आद्यरूपाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र आजचे एक महत्त्वाचे इतिहाससंशोधक आणि दैवतशास्त्राचे अभ्यासक असलेले संजय सोनवणी विठोबाच्या ‘पांडुरंग’ या नावावर लक्ष केंद्रित करतात आणि विठोबाचे एक वेगळेच रूप आपल्यासमोर उभे करतात. त्यांच्या मते- पांडुरंग हे विठोबाचे उपनाम असून त्याकडे साऱ्यांचे दुर्लक्ष झालेले आहे! ‘विठ्ठलाचा नवा शोध’ या पुस्तिकेत ते म्हणतात- ‘पांडुरंग, पुंडरिक, पंढरपूर, आणि पौंड्रिक क्षेत्र या व्यक्ती-स्थळनामांतच श्रीविठ्ठलाचे मूळ चरित्र दडलेले आहे. श्रीविठ्ठल म्हणजे अन्य दुसरे कुणी नसून पौंड्र या प्राचीन पशुपालक समाजातील एक महान शिवभक्त होता आणि त्यालाच आज आपण पांडुरंग किंवा विठ्ठल म्हणून पुजतो.’

तर असा हा विठ्ठल किंवा पांडुरंग. त्याच्या मूळ रूपाचा शोध अद्याप थांबलेला नाही. मात्र त्याचं मूळ रूप काहीही असो, जैनांपासून बौद्धांपर्यंत आणि शैवांपासून वैष्णवांपर्यंत साऱ्यांनीच त्याच्यावर हक्क सांगितलेला आहे. अन् तरीही ‘रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा’ म्हणतात त्याप्रमाणे विठोबा कायमच आपलं वेगळेपण जपत आला आहे. अर्थात मध्ययुगीन काळात त्याचं वैष्णवरूप सर्वसाधारण भाविकांना अधिक भावलेलं दिसतं आणि तेच समाजाच्या अंतरंगातही पाझरलेलं दिसतं. म्हणून तर विठ्ठलासंदर्भात लोकमानस जेवढं व्यक्त झालंय, तेवढं अन्य कुठल्याच देवदेवतेबद्दल व्यक्त झालेलं नाही. विठ्ठल त्यांना कायमच आपला सखा-सोयरा वाटत आलेला आहे. मात्र विठ्ठल हरी असो वा हर किंवा बौद्ध असो वा जैन, तो भक्तांना त्यांच्या जवळचा वाटतो तो त्याच्या उभ्या राहण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण लकबीमुळे. कारण त्याची उभी राहण्याची ही ढब अगदी एकमेवाद्वितीय आहे. अर्थात प्रत्येकच देवतेची मूर्ती ही उभी किंवा फारतर बैठी असते. परंतु मूर्ती उभी असली, तरी ती सालंकृत, आखीवरेखीव, डौलदार आणि बरेचदा बहुर्भुजा असते. पण विठ्ठलाचं तसं नाहीय. तो एकतर कष्टकऱ्यांच्या विटेवर उभा आहे आणि त्याचे हात कमरेवर आहेत. आपण नाही का दमलोभागलो की क्षणभर कमरेवर हात ठेवून उभे असतो, अगदी तसे. तेव्हा विठ्ठलाच्या या मूर्तीच्या रचनेवरूनच त्याचं इतर देवतांपासून असलेलं वेगळेपण अधोरेखित होतं आणि तो देवतागणांपेक्षा भक्तजनांशी अधिक जोडला जातो.

… आणि मला तर वाटतं तो ठोंब्यासारखा उभा आहे, म्हणूनच ‘विठोबा’ आहे. अगदी भाषाशास्त्रीय दृष्ट्या बघायला गेलं तरी त्याची उपपत्ती मांडता येते. उदाहरणार्थ- संस्कृतमध्ये स्तंभ, त्याचा मराठीत झाला खांब. याच संस्कृत स्तंभ किंवा मराठी ‘खांब’चा बोलीभाषेत झाला ‘ठम’. आजही तुम्ही ग्रामीण भागात गेलात, तर तिथे तीन किंवा चार रस्ते मिळतात तिथे जो खांब रोवलेला असतो, म्हणजेच जो स्तंभ उभारलेला असतो, त्याला ‘ठम’ असंच म्हणतात. या ठमवरून ठोंब्या हा शब्द तयार झालेला असावा. एखादी व्यक्ती नुस्तीच उभी असेल, तर तिला अनेकदा अगदी सहज म्हटलं जातं- ‘काय खांबासारखी उभी आहेस!’ तर खांब-ठम आणि त्यावरूनच बोलीभाषेत ‘ठोंब्या’ हा शब्द आला असावा. यातूनच विटेवर ठोंब्यासारखा उभा तो विठोबा, हा शब्द रूढ झाला असावा. सांगणारे ढीग सांगोत की- वि म्हणजे गरुड नि ठोबा म्हणजे आसन आणि म्हणून गरुड आहे ज्याचे आसन तो विठोबा. पण विठोबा नावाची ही उपपत्ती अगदी पुस्तकी आहे. जनमानसात एखादं नाव रुळण्यासाठी ते जनमानसातूनच यावं लागतं. विठोबा हा जनमानसातून आलेला देव आहे आणि तो खांबासारखा एकाच जागी विटेवर स्थिर उभा आहे म्हणून विठोबा! अर्थात आपल्या मराठी शब्दकोशात ‘ठोंब्या’ या शब्दाला काहीशी नकारात्मक छटा आहे. शब्दकोशात ठोंब्या शब्दाचा अर्थ सांगताना- जड बुद्धीचा असा अर्थ दिला आहे. परंतु हा अर्थ या शब्दाला मागाहून चिकटलेला असावा. मूळ शब्दाचा अर्थ, केवळ खांबासारखा उभा असणे, एवढाच असण्याची शक्यता आहे. मात्र आपला विठोबा एकाच जागी खांबासारखा उभा असला, तरी भक्तजनांच्या मदतीला धाऊन जाणारा आहे. त्यांच्या सुख-दुःखात वाटेकरी होणारा आहे. जणू काही तो एका जागी उभं राहून सगळ्यांवर नजर ठेवून आहे. महत्त्वाचं म्हणजे आज विठ्ठल हे त्याचं नाव अधिक रूढ झालेलं असलं, तरी विठ्ठल हे त्याचं संस्कारित नाव असावं, मूळ विठोबाच!!

पण विठोबा म्हटलं काय, विठ्ठल म्हटलं काय आणि पांडुरंग म्हटलं काय… त्याचं ते काळं कुट्ट रूपच आपल्याला अधिक भावतं. कारण गोडगोजिऱ्या रूपापेक्षा तेच सच्च वाटतं!

(साभार : दैनिक पुण्यनगरी)

(लेखक हे लोककला व लोकपरंपरेचे अभ्यासक आहेत)

9769982424

मुकुंद कुळे यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात मुकुंद कुळे– type करा आणि Search वर क्लिक करा.