माझा अनुभव सांगतो. ‘लोकमत’ च्या अमरावती आवृतीत माझा ‘मीडिया वॉच’ हा स्तंभ खूप गाजत होता . राजकीय घडामोडींवर मी करत असलेले रोखठोक विश्लेषण वाचकांना खूप आवडत होतं. स्तंभाला १०० आठवडे झाल्यानंतर त्या सर्व लेखांचे ‘मीडिया वॉच’ या नावाने पुस्तक प्रकाशित करण्याचा निर्णय माझ्या मित्रमंडळाने घेतला. गिरीशभाऊंनी त्या कार्यक्रमाच्या प्रकाशनासाठी जेष्ठय संपादक मधुकर भावेंना आमंत्रित केले . ते स्वतः त्यांना घेऊन आले. अमरावती जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी प्रकाशन समारंभाला उपस्थित होते . वाचकांच्या अलोट गर्दीत कार्यक्रम पार पडला.
संकटाच्या काळात भक्कमपणे साथ देण्यासोबतच ‘दातृत्व’ हा भाऊंच्या व्यक्तिमत्वातील विशेष गुण. आपल्या आयुष्यात किती लोकांना किती अर्धिक मदत केली, हे त्यांचं त्यांनाही सांगता येणार नाही. वैयक्तिक मदत करण्यासोबत समाजातील श्रीमंत व प्रस्थापितांच्या दातृत्वशक्तीला आवाहन करून त्यांच्याकडून चांगल्या कामासाठी , चांगल्या उपक्रमासाठी आणि गरजू व्यक्तींसाठी मदत मिळविणे ही गिरीशभाऊंची खासियत . ज्यांच्याजवळ पैसा आहे , साधनं आहेत , त्यांनी समाजासाठी झटणाऱ्या , आपल्या ज्ञानाने , कर्तृत्वाने समाजाला दिशा देणाऱ्या लोकांसाठी खर्च केला पाहिजे . हा त्यांचा प्रयत्न असतो . त्यामुळेच मारवाडी फाउंडेशनकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर , प्रबोधनकार ठाकरे या महामानवांच्या नावाचे मोठ्या रकमेचे पुरस्कार तेवढ्याच तोलामोलाच्या मान्यवरांना दिले जातात . याशिवाय त्यांच्या वेगवेगळ्या संस्था –संघटनांकडून भाऊ दरवर्षी जे पुरस्कार देतात , ती रक्कम २० -२५ लाखाच्या घरात जात असावी . मिळालेल्या पैशाचा योग्य उपयोग होत आहेत , ही खात्री पटल्याशिवाय धनाढ्य माणसं पैसा देत नाही . भाऊ या विषयात कमालीचे पारदर्शक असतात . कुठलाही कार्यक्रम आटोपल्याबरोबर ज्याच्याकडून देणगी , मदत आणली असते त्याला सविस्तर हिशेब पाठवला जातो . सार्वजनिक पैसा हा अतिशय नेकीने आणि जबाबदारीने वापरला पाहिजे , याबाबत ते आग्रही असतात . समाजाला पुढे घेऊन जाणाऱ्या नावीन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन व समाजातून पैसा मिळवण्याची क्षमता असणारा माणूसच सामाजिक , सांस्कृतिक चळवळीचा नेता होऊ शकतो . गिरीशभाऊ हे त्यांच्या या क्षमेतेमुळेच गेल्या कित्येक वर्षापासून विदर्भाचे एकमेव सांस्कृतिक नेते आहेत .