वर्ध्याची वाङ्‍‍मय परंपरा 

वर्धा येथे ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे . त्यानिमित्ताने वर्धा जिल्ह्यातील वाङ्‍‍मय परंपरा व तेथील साहित्यिकांच्या कार्याचा सविस्तर वेध घेणारा लेख

-डॉ. राजेंद्र मुंढे 

वरदा – वर्धा हे शहर संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे ते महात्मा गांधींच्या  सेवाग्राम वास्तव्यामुळे . प्र्शासकीयदृष्ट्या जिल्ह्याचा इतिहास केवळ दीड-पावणेदोनशे वर्षाचा असला तरी जिल्ह्याच्या अस्तित्वाच्या खुणा मात्र, त्याआधीच्या शतकात शोधता येतात , त्या प्राचीन – मध्ययुगीन कालखंडात गुणाढ्यसारख्या पैशाची भाषेच्या विद्वान जगतविख्यात ब्रहत्कथांचा  जनकाच्या  रूपात . त्याच्या हिंगणघाट तालुक्यात पोथरा यागावातील वास्तव्यामुळे . लोकभाषा व लोककथांचा मुळारंभ म्हणून गुणाढ्यांनी लिहिलेल्या या बृहत्कथांकडे पाहिले जाते. गुणाढ्याची मूळ लेखनसंहिता आज उपलब्ध नाही. गुणाढ्याच्या लोककथांचा आधार घेऊन क्षेमेंद्र यांनी ‘बृहत्कथा’ व सोमदेव यांनी ‘कथासरितासागर’ या दोन संस्कृत ग्रंथांची निमिर्ती केली. ज्येष्ठ संशोधक व विदर्भातील लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. भाऊ मांडवकर यांनी गुणाढ्य हे हिंगणघाट तालुक्यातील पोथरा गावातील मूळ रहिवासी असल्याचा दावा आपल्या ‘आदिजन’ या ग्रंथामध्ये केला आहे. ए. बेरेडल कीथ नावाच्या पाश्चिमात्त्य संशोधकाने कम्बोडिया येथे प्राप्त झालेल्या एका अभिलेखाच्या आधारे गुणाढ्याचा कालखंड शोधण्याचा प्रयत्न केला. जागतिक साहित्यक्षेत्रात गुणाढ्याच्या कलाकृतीबाबत रोज नवी चर्चा होत असताना डॉ. भाऊ मांडवकरांच्या या संशोधनाकडे वैदर्भीय नव्या लोकसाहित्य अभ्यासकांनी दुर्लक्ष केल्याचे दिसते , वाशीम आणि वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट पोथराशी थेट संबध असणारा गुणाढ्य  त्यातच अलीकडील काळात  तो  काश्मिरी होता, या  तर्कावर अभ्यासकांमध्ये चर्वितचर्वण  केल्या जात आहे .  हा युक्तिवाद वैदर्भीय सांस्कृतिक विश्वाला धोक्याचा ठरू शकतो .  गुणाढ्याचा हा संदर्भ सोडल्यास वर्ध्याच्या वाडमयीन परंपरेची मुळे खऱ्या अर्थाने रुजली ती आधुनिक काळातील स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर कालखंडात  ती म्हणजे गांधीजींच्या आगमनानंतरच .  म्हणूनच असे म्हटल्या जाते वर्धा जिल्ह्याला फारशी साहित्य परंपरा नाही.नभांगणात  अधूनमधून एखादा तारा चमकावा, असं कधी कधी घडत असतं. एकतर गांधी, विनोबांच्या राजकीय परंपरेने या जिल्ह्याचे अवघे विश्व झाकोळल्या गेले आहे. अजूनही हा जिल्हा या छायेतून बाहेर पडलेला नाही. परंतु  याच गांधी, विनोबांच्या वास्तव्याने काही विद्वान, संस्कृती, साहित्य व कलापुरुषांचा वर्ध्याला स्पर्श झाला, हेही तेवढेच खरे!.

                         स्वतः विनोबा भावे (११ सप्टेंबर १८९५ – १५ नोव्हेंबर १९८२) प्राच्यविद्या पारंगत व थोर साहित्यिक होते. ‘गीताई’, ‘मधुकर’सारखी रचना, ‘गीता प्रवचने’ सारखे अजोड साहित्य त्यांनी निर्मिले. ज्यात अष्टादशी (सार्थ), ईशावास्यवृत्ति, उपनिषदांचा अभ्यास, गीताई-चिंतनिका, गुरूबोध सार (सार्थ),जीवनदृष्टी,भागवत धर्म-सार,  लोकनीती, विचार पोथी साम्यसूत्र , साम्यसूत्र  वृत्ति , स्थितप्रज्ञ-दर्शन ही विनोबाची विपुल ग्रंथ संपदा आहे . विनोबांचा  वारसा दादा धर्माधिकारी यांनी ( जन्म इ.स. १८८९ तर मृत्यू  १ डिसेंबर, १९८५) त्यांच्या आपल्या गणराज्याची घडण  आपल्या गणराज्याची घडण (मराठी),गांधीजी की दृष्टी, ‘तरुणाई’, ‘दादांच्या बोधकथा, भाग १ ते ३, ‘दादांच्या शब्दांत दादा, भाग १, २’., ‘नागरिक विश्वविद्यालय – एक परिकल्पना’ , ‘प्रिय मुली’ , ‘मानवनिष्ठ भारतीयता’, ‘मैत्री’, ‘क्रांतिवादी तरुणांनो’, ‘लोकशाही विकास आणि भविष्य’, ‘सर्वोदय दर्शन’, ‘स्त्री-पुरुष सहजीवन’, हे ग्रंथ तर त्यांचे सुपुत्र न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी (जन्मतारीख: २० नोव्हेंबर, १९२७  मृत्यू: ३ जानेवारी, २०१९) यांनीही ‘अंतर्यात्रा’, ‘काळाची पाऊले’, ‘न्यायमूर्ती का हलफनामा’ (हिंदी), ‘भारतीय संविधानाचे अधिष्ठान’, ‘मंझिल दूरच राहिली!’, ‘माणूसनामा’, ‘मानवनिष्ठ अध्यात्म’, ‘लोकतंत्र एवं राहों के अन्वेषण’ (हिंदी), ‘शोध गांधींचा’, ‘समाजमन’, ‘सहप्रवास’, ‘सूर्योदयाची वाट पाहूया’ आदी ग्रंथातून  विपुल लेखन केले आहे . पु. य. देशपांडे(जन्म ११  डिसेंबर १८९९ मृत्यु २६ जुलै १९८६ )  यांच्या   ‘बंधनाच्या पलिकडे’ ,’सदाफुली’ ,  ‘अनामिकाची चिंतनिका’ -1962 साहित्य अकादमी पुरस्कार  ”भेविघोष- धर्मघोष,  ‘काळी राणी’,  ‘मयूरपंख’, ‘विशाल जीवन’ कादंबऱ्या व   ‘गांधीजीच का?’ हे वैचारिक लेखन  , आचार्य काका कालेलकर यांची गुजराथी – हिंदी- मराठीतील  वैविध्यपूर्ण  साहित्य संपदा  ,भदंत आनंद कौसल्यायन , भवाणीप्रसाद मिश्र ,  शंकरराव देव, आचार्य जावडेकर,  श्रीकृष्णदास जाजू, श्रीमननारायण, कुंदर दिवाण, रामेश्वर दयाल दुबे, डॉ. म. गो. ग० बोकरे, मदालसा नारायण, निर्मला देशपांडे, मधुकरराव चौधरी, ठाकूरदासजी बंग, सुमनताई बंग , डॉ . अभय बंग यांनी  पुढे नेलेला दिसतो. गांधीवादी साहित्य परंपरा इथेच थांबत नाही, तर पुढच्या काळात बौद्ध पंडित प्रो. धर्मानंद कोसंबी या प्रभावळीत येऊन सामील होतात. वामनराव चोरघडे यांच्या संस्कारक्षम कथांच्या पहिला  संग्रहाचा बहर येथेच बहरतो आणि पुढे मराठी लघुकथेच्या मांदियाळीत दाखल होतांना दिसतो , त्यांची खरी ‘जडण घडण’ (आत्मचरित्र, १९८१) वर्ध्यातच झालेली आहे .  तर आजही ‘खादीशी जुळले नाते ‘ या आत्मकथनातून रघुनाथ कुलकर्णी यांनी  स्वतःच्या जीवनप्रवासातून भारताच्या खादीक्षेत्रातील वाटचालीचं खरखुर चित्र रेखाटले आहे.

कवी मंगेश पाडगावकरांना ‘जिप्सी’ची भेट याच  गांधीनगरीत  होते, आधुनिक मराठी कवितेचे जनकत्व ज्यांना बहाल केले गेले , त्या केशवसुतांचे बालपण वर्ध्यात मामाकडे गेलेले.  गांधीजींच्या वर्ध्यात येण्यापूर्वी  महात्मा फुलेंची ओळख साऱ्या जगाला करून दिली ती याच शहराने ,  पंढरीनाथ पाटील यांनी लिहिलेले त्यांचे चरित्र येथील जीनदासजी चवडे यांनी प्रसिद्ध केले  . वर्ध्यात  महात्मा गांधीजी येण्यापूर्वी लोकमान्य  टिळक येथे आलेले होते ,   पुढे त्यांचे प्रत्यक्षपणे  वर्ध्याशी  नातेही जुळले.  गाधीजीची  पत्रकारिता व स्वातंत्र्य लढ्याची मुहूर्तमेढ सेवाग्राम येथून  झालेली असल्याने  हा कालखंड गांधीवादी साहित्याने प्रभावित झालेला;  परंतु संतसाहित्याची परंपरा  ल. रा. पांगरकरांसारखे  व्यासंगी अभ्यासक, प्रा.  अ. ना. देशपांडे, प्रा . मा.  शं वाबगावकर यांनी चालविली.   सुप्रसिद्ध कवी आणि वक्ते मधुकर केचेंचा जन्म देखील वर्धा नदीच्या कुशीत असलेल्या  अंतोरा या गावाचा , लेखक कादंबरीकार व संशोधक डॉ .भाऊ मांडवकर यांनी वर्ध्यात शिक्षण व काही काळ नोकरी निमित्त केलेले वास्तव्य या साहित्य प्रांतात छाप पाडून गेले . विजयराज बोधनकर हे मुळात चित्रकार असून ते सध्या मुंबईत स्थायिक असलेले लेखक आहेत. त्यांचे ‘गागरा’ हे आर्वी तालुक्यातील धनोडी बहाद्दरच्या आठवणींचे पुस्तक  , ‘साहित्यिकांची स्वभावचित्रे’ व ‘आपला स्वभाव जाणून घ्या’  प्रसिद्ध आहे.   पंडित कवी मोरोपन्तांच्या केकावलीचे भाष्यकार  श्रीधर विष्णु परांजपे , त्यांचे पुत्र  भाषा व संतसाहित्याचे अभ्यासक भा.  श्री. परांजपे यांचे वसंताच्या खुणा, दख्खनचा वाघ, नवनाथ, मत्सेंद्रनाथ, मुलांसाठी माडखोलकर , तर डॉ.जयंत  परांजपे ‘ग्रेस आणि दुर्बोधता’  अशा तीन पिढ्यांनी साहित्य परंपरा पुढे चालवली आहे पुढे चालविलेली दिसते. देवळीचे मिरणनाथ महाराजांचे रामजी हरी फुटाणे उर्फ हरीसुत यांनी दीड शतकापूर्वी लिहिलेले गीतेवरील अभंग वृत्तात अतिशय सुमधुर भाष्य संतसाहित्याचे अभ्यासक डॉ . गणेश मालधुरे यांनी अलीकडील काळात प्रकाशात  आणले आहे . हे  संत साहित्यात भर टाकणारे आहे .  डॉ सदाशिव डांगे यांचे – ‘हिंदूधर्म आणि तत्वज्ञान’, ‘अश्वत्थाची पाने’, ‘क्रिटीक ऑन संस्कृत ड्रामा’ हे पुस्तके आहेत .  म. ल. वऱ्हाडपांडे – ‘कोल्हटकर आणि हिराबाई’, ‘श्रीपाद कृष्ण कोल्हटकर’, ‘भ्रमर परागु’ ‘ट्रॅडिशन्स ऑफ इंडियन थिएटर’ , गोविंद विनायक देशमुख – ‘कालसमुद्रातील रत्ने’ (३ खंड) पद्माकर गणेश चितळे – ‘इमला’, ‘भोगनृत्य’, ‘पोर्टर’, ‘डाळिंबाचे दाणे’, समीक्षक  डॉ. वसंत कृष्ण वऱ्हाडपांडे यांची  ‘या मनाचा पाळणा’, ‘कोल्होबाची करामत’, ‘भारतीय स्त्रीरत्ने’ , ना’गपुरी बोली : भाषाशास्त्रीय अभ्यास’ करून नागपुरी बोलीची सुरुवात सेलू तालुक्यातील महाबला या गावापासून होते हे सप्रमाण सिद्ध केले आहे  , न्यायतीर्थ सत्यभक्त यांचे ‘सत्येश्वर गीता’, ‘दिव्य दर्शन’, ‘सत्यामृत’ आदी असंख्यग्रंथ रचना त्यांनी केली .  नंतरच्या कालखंडात मो. दा. देशमुख,  दिवाकर देशपांडे, डॉ. मधुकर आष्टीकर यांनी नाटककार, विनोदी लेखक म्हणून नावलौकिक मिळविला. मो. दा. देशमुखांच्या घराण्याचा न्यायदंड या  नाटकाने इतिहास घडविला. यानंतरच्या कालखंडात दे. गं. सोटे  सोटेशाही व वऱ्हाडी शब्दकोश   निर्माण केला, प्राचार्य डॉ. विद्याधर उमाठे ,  विजय कविमंडन ‘रेसकोर्स’ यांच्यासारखी लेखक कवींची पिढी उदयाला आलेली दिसते .

                             सर्वोत्कृष्ट कथांचे   कालखंडानुसार संपादन करणारे डॉ. राम कोलारकर हे मूळ हिंगणघाट येथीलच. ‘ज्वाला आणि फुले’चे कवी आणि विख्यात समाजसेवक  बाबा आमटे यांचे जन्मगावही हेच  , आर्वीचे आजोळ असणारे तत्वज्ञानाचे अभ्यासक आणि सौंदर्याचे व्याकरण लिहिणारे  डॉ . सुरेंद्र बारलींगे    तसेच  दलित साहित्यातील पहिल्या पिढीचे  अग्रगण्य कथाकार अमिताभ  हेही हिंगणघाटचे.नाट्यसमीक्षक  द. रा. गोमकाळे, पाच नाटके चे लेखक श्रीराम अट्रावलकर , नाना ढाकुलकर – त्यागवती रमाई आणि रावणावर लिहिलेले लंकेश कादंबरी त्यासह  अनेक नाटिका लिहिल्या आहेत .

  एकाद्या गावात साहित्य संमेलन झाल्यावर त्याक्षेत्रात उत्साह असतो, परंतु ; १९७० ते १९८० हे दशक यादृष्टीने कोरडे असल्याचा प्रत्यय येतो . साधारणतः १९८० नंतरचा कालखंड वर्धा जिल्ह्यातील साहित्य’ चळवळीला ऊर्ध्वावस्था प्राप्त करून देणारा ठरला आहे. प्रा. किशोर ‘सानप, प्रा. नवनीत देशमुख यासारख्या समीक्षक- लेखकांनी नोकरीनिमित्ताने वर्धा जिल्ह्यात प्रवेश केला आणि जिल्ह्याच्या साहित्य क्षितिज  उजळून निघू लागले , सुरुवातीला डॉ. किशोर सानप यांच्या पुढाकाराने विदर्भ साहित्य संघाचे कार्य जोर धरून यातूनच पुढे राजेंद्र मुंढे, सतीश पावडे, मनोज तायडे, अशोक चोपडे , प्रशान्त पनवेलकर आणि  संजय इंगळे तिगावकरांसारखी नवी पिढी पुढे आली. डॉ हेमचंद्र वैद्य यांचे हिंदी-मराठीतील लेखन ,  डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे हे  विज्ञान शाखेचे विद्यार्थी  , त्यांनी केलेले  विज्ञान कवितेच्या लेखनाचे   प्रयोग , पुढे कादंबरी, कथा, कविता, पटकथा  संवाद लेखक म्हणूनही नावालौकीक मिळाले  . ‘राजा शहाजी’ सारखी महाकादंबरी लिहून त्यांनी आपली ओळख संबंध महाराष्ट्राला करून दिली आहे. नवनीत देशमुख यांची ‘अंगणवाडी’, ‘झेड.पी’ व ‘माणसाळलेला’ ह्या  कादंबऱ्या , ‘ममी’, ‘काळा गुलाब’, ‘टेकओव्हर’ हे कथासंग्रह,  तर डॉ. किशोर सानप यांच्या ‘ऋतू’ कवितासंग्रह, ‘पांगुळवाडा’, ‘हारास व ‘भूवैकुंठ’ या कादंबऱ्या, वीस  समीक्षाग्रंथ आणि दोन   कथासंग्रह  अशी विपुल ग्रंथसंपदा डॉ. किशोर सानपांनी निर्माण करून एक साक्षेपी  समीक्षक म्हणून महाराष्ट्रात नावलौकिक प्राप्त केला आहे. रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांनी लिहिलेली ‘खेळघर’ कादंबरी गाजली असून त्यांची वैचारिक लेखनातील भरारी अकल्पित आहे.  प्रा. डॉ . राजेंद्र मुंढे यांनी कविता, कथा,समीक्षा लेखन करीत राष्ट्रसंत तुकडोजी हे  चरित्र,  बंडखोर खेड्यांची गोष्ठ (आष्टीच्या १९४२ लढ्याची गाथा) , राष्ट्रसंतांचे मौलिक विचार , डॉ . किशोर सानप व्यक्ती आणि वाड्मय, ‘वरदा … वर्धा’ .आणि  दोन प्रौढ साहित्याची पुस्तके ,  अनुवाद लेखन आदी असून त्यांची पाच पुस्तके प्रकाशनाधीन आहेत.  डॉ .सतीश पावडे  नाटककार, नाटय दिग्दर्शक, नाटय समीक्षक, नाटय शिक्षक -प्रशिक्षक म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. नाटक, समीक्षा, चरित्र, अनुवाद, रूपांतर तसेच संपादित अशी एकूण २६ पुस्तके आजतागायत प्रकाशित झालेली आहेत. ३८ नाटकांचे दिग्दर्शन,२१ एकांकिका-नाटकांचे लेखन, २० नाटकांचे अनुवाद /रूपांतरही त्यांनी केले आहे. “मराठी रंगभूमी आणि अँब्सर्ड थिएटर” हे   त्यांचे  पुस्तके सध्या चर्चेत आहेत . समीक्षक डॉ. मनोज तायडे यांची कवी नारायण सुर्वे यांची काव्यदृष्टी ,  आस्वादक समीक्षा आणि कर्मयोगी  गाडगेबाबा ही पुस्तके , सत्यशोधक साहित्याचे अभ्यासक  डॉ अशोक चोपडे यांचेही योगदान मोठे आहे . त्यांचीआधुनिक मराठी कवितेचे जनक जोतीबा फुले , विदर्भातील सत्यशोधक चळवळ आणि सत्यशोधक व्यंकटराव गोडे कृत साप्ताहिक ब्राह्मणेतर मधील अग्रलेख तसेच त्यांची आठ संपादित  पुस्तके सत्यशोधकी साहित्याचे संशोधन आणि अन्वेषण करणारी ठरली आहे , ‘पुर्वा’ या  आपल्या पहिल्या कवितासंग्रहातून  काव्यप्रांतात दाखल झालेले आणि ‘नवा पेटता काकडा ’ च्या रूपाने स्थिरावलेले एक महत्त्वाचे नाव म्हणजे प्रशांत पनवेलकर होय .

                               समीक्षेच्या  क्षेत्रात सध्या आघाडीवर असलेले डॉ. पुरुषोत्तम माळोदे यांचे सृजनाचे झरे , विदग्ध प्रतिभावंत :  विश्राम बेडेकर   , हिंडणारा सूर्य , सर्किट परमात्मा ही प्रयोगिक  कादंबरी लेखन  दखलपात्र ठरले आहेत .  मनोहर नरांजे यांचे कविता,  गद्य व पुरातत्व विषयक लेखन उल्लेखनीय आहे.     कविता -गझल लेखनात अग्रेसर असणारे संजय इंगळे तिगावकर यांचे ‘अंगारबीज आणि दोलनवेणा ‘ हा कवितासंग्रह नंतरचे गझल लेखन उत्साहवर्धक आहे. युवा कादंबरीकार प्रतीक पुरी यांनी वैनतेय , मेघापुरुष , वाफाळलेले दिवस यासारख्या तरुणांच्या मनाची स्पंदने टिपणार्या कादंबऱ्या लिहिल्या आहेत .  आजचे आघाडीचे समीक्षक आणि कवी नीतीन रिंढे यांचे महाविद्यालयीन शिक्षण तसेच वाड्मयीन जडण घडण संस्कार झालेत सुप्रसिद्ध कवी – अनुवादक  प्रफुल्ल शिलेदार आणि कवी   तीर्थराज कापगते यांचे शालेय शिक्षण वर्ध्यातच झालेले आहे . शिक्षक म्हणून नोकरीसाठी वर्ध्यात राहिलेले कथाकार सतीश तराळ , सुखदेव ढाणके ‘तांडाकार’ आत्माराम कानिराम राठोड ,   जुन्या पिढीतील रामदास कुहिटे हे ‘बोल अंतरीचे’, ‘कुरुक्षेत्र हे काव्य’ ,म .ना .घाटूर्ले , निसर्गकवी अनंत भिमणवार यांचा ‘रानबोली’ , डॉ . पुरुषोत्तम कालभूत ,  प्रभाकर पाटील , प्रभाकर उघडे यांचा  स्वप्नातल्या कळ्या , भालचंद्र डंभे, प्रमोद सलामे ,  दिलीप वीरखेडेचा ‘ऐन पस्तिशीच्या कविता’ संग्रह उल्लेखनीय आहे  , प्रशांत झिलपे .भालचंद्र डंभे , श्रीकांत करंजेकर ,डॉ. संजीव लाभे , दिलीप गायकवाड , सुरेंद्र डाफ , चंद्रकांत शहाकार , नारायण नखाते, वीरेंद्र कडू यांचे ‘उकंड्या’ आणि ‘कुळस्वामी बळीराजा’ हे दोन ग्रंथ प्रकांशित आहे.

            स्त्रीवादी दृष्टीकोनातून आणि जाणीपूर्वक लेखन करणाऱ्या लेखिका म्हणजे उषाताई देशमुख होत ,  स्त्री लेखनाची  परंपरा वर्ध्यात रुजविणाचा आणि अग्रणी लेखिका म्हणून   उषा देशमुख यांना मान द्यावाच लागतो  , त्यांचा  ’ दरवळ ‘ कविता संग्रह . त्यांनी त्यावेळी केलेले  गद्य लेखन तत्कालीन प्रतिष्ठित नियतकालिकातून  वाखाणल्या गेले .सुमारे पन्नास वर्षे त्यांनी सातत्यपूर्ण लेखन केलेले दिसते . डॉ. सुनिता कावळे यांनी ‘उत्तर’,   ‘कमला लेले’,’व्रतस्थ’  व  ‘अजिंक्य’ ‘ कॉलनी आजी’ या बाल   कादंबऱ्या,  बाल नाटके  , एकांकिका असे विपुलआणि वैविध्यपूर्ण लेखन करून स्त्री लेखनाच्या दालनाला समृद्ध केले . त्यांचा वारसा आणि  स्त्री संघर्षाच्या गाथा  दीपमाला कुबडे सांजसावल्या , स्वप्नगंधा या कादंबर्यातून तर दीपमाळ गझलांची या काव्यातून मांडतांना दिसतात, तर विदर्भातील एकमेव यशस्वी प्रकाशिका आणि लेखिका अरुणा सबाने यांच्या ‘मुन्नी’ , ‘विमुक्ता’ आणि ‘मी सूर्याला गिळले’ ही आत्मचरितात्मक कादंबरीतून स्वतःच्या पायावर कर्तृत्वाचं बळ प्राप्त करून,  स्वतःसह समचारणीला जगण्याचे उर्जास्रोत ठरणाऱ्या नायिका  जोरकसपणे उभ्या केल्या आहेत . काही वर्षे येथे वास्तव्यात असणाऱ्या इंदुमती  जोंधळे , तारा धर्माधिकारी आणि  लक्ष्मी गेडाम यांनीही कथालेखन केले आहे . सुमती वानखेडे यांच्या ‘मनोमनी’, ‘श्रावण भुलाव्याचे’, ‘कृष्णडोह’, ‘जाणता अजाणता’, ‘बंद उन्हाळसावली’, हे वर्तुळ असेच असते, ‘सायलेन्ट ऑब्झर्व्हर’ या त्यांच्या काव्य व ललित लेखनातून आत्मप्रत्ययाचा सहजोद्गार उमटलेला दिसतो , सुनिता झाडे यांच्या ‘कॉमन वुमन’, ‘आत्मनग्न’, ‘रसिया’ या काव्यातून स्त्रियांच्या अंतर्मनातील हळूवार संवेदनाची स्पंदने टिपल्या गेली आहेत  , डॉ . स्मिता वानखेडे यांचे समीक्षालेखन प्रगल्भ आहे ,डॉ. मधुमती जुनुनकर, डॉ . विजया मोरोणे , वीणा कावळे देव , प्रा. विमल थोरात मीना कारंजेकर ओंझळभर प्रकाशासाठी कवितासंग्रह व  क्रांतिकारी ऋषी विनोबा चरित्र  , मंजुषा चौगावकर, ऋता देशमुख खापर्डे , कथाकार कल्पना नरांजे , नूतन माळवी यांची  फुले – आंबेडकरी जाणीवेतून करीत असलेले लेखन लक्षवेधी ठरत आहे –  विदयेची देवता  सरस्वती की सावित्री , सावित्रीबाई फुले , लेकी भूमीच्या, सत्यशोधक विवाह पद्धती , श्री-पुरुष तुलना संपादन , प्रेरणांचा अर्थ,  बहुजन खियांच्या विकासाचे संदर्भ ही पुस्तके चर्चेत आहेत . ,सुषमा पाखरे , जयश्री कोटगीरवार ‘वनहरिणी’ , किरण नागतोडे , सुहास चौधरी यांची घरंट .व आभाळ पेलताना  , इंदुमती कुकडकर  यांच्या दोन कादंबर्या गराडा,अक्षदा प्रकाशित झाल्यात .आशा निभोरकार ह्या वऱ्हाडी  कथा लेखिका  आहेत.मुळ  वर्धेकर असणाऱ्या नि आता नागपूरकर असणाऱ्या मृणालिनी केळकर यांनी बंगाली लेखिका   आशापुर्णादेवी यांच्या साहित्याला मराठीत आणण्याचे महनीय कार्य केले तर  रंजना पाठक यांनी गंगोपाध्याय यांच्या साहित्याचा केलेल्या अनुवादाबद्दल साहित्य अकादमी पुरस्कार देखील मिळाला आहे ,  या  दोन स्त्री  लेखिकांची अनुवादाच्या क्षेत्रातील ही   उत्तुंग भरारी लक्षणीय  आहे .

                          दलित साहित्याची उज्वल परंपरा या जिल्ह्याला लाभली आहे. ‘पतितपावन दास सारखे काळाराम मंदिर प्रवेश चळवळीतील मुख्य त्यांच्यावर डॉ.  बाबासाहेब आंबेडकरांचा प्रगाढ विश्वास होता तसेच आर्वीचे पुरोहित, आंबेडकरी विचारवंत डॉ. मधुकर कासारे,नुकतेच निवर्तलेले सुर्यकांत भगत यांची बुद्ध , कबीर यांचे ह्यांच्या  साहित्यावर संशोधन आणि अनुवादाचे मोड कार्य  केले . कथाकार द्वय डॉ . अमिताभ यांचे कथासंग्रह: पड । ललकार । अंधारयात्री। प्रकाशकाकडे प्रकाशनाच्या मार्गावर: ये सोनेका टैम नहीं, अभ्यास करो । , योगेंद्र मेश्राम यांचे तीन कथासंग्रह लोकनुकंपा हे त्रैमासिक संपादन तर   डॉ. प्रदीप आगलावे उगवता क्रांतिदूत, फुले फुलली श्रमाची व   रजनी ह्या कादंबर्या , डॉ. सुभाष खंडारे  डॉ इंद्रजीत ओरके यांचे गद्य लेखन , ‘आग्ट’कार  अशोक बुरबुरे हे आंबेडकरी कवी / गीतकार / गझलकार / नाटककार म्हणून  महाराष्ट्रात ओळख आहे.त्यानी लिहिलेल्या ‘आग्टं ‘ हे सामाजिक प्रश्नांना भिडणारे प्रभावी नाटक  ठरले.प्रा . डॉ . सुभाष खंडारे यांचे    कविता संग्रह व  समीक्षा ग्रंथ प्रकाशित आहेत .  मनोहर नरांजे यांची .सर्पगंधा, लोकयात्रा (कविता संग्रह ) भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचे पुरातत्व(संशोधन ग्रंथ) बैरागड( डॉ.रवींद्र व डॉ. स्मिता कोल्हे यांची संघर्ष गाथा.. चरित्र)  पुरात्तत्वविय शोधयात्रा,सरस्वती प्रवाह आणि प्रतीक ही प्रकाशित पुस्तके आहेत .

                        वैभव सोनारकर यांचे ब्लूप्रिंट  2004 ,  काषाय अक्षरे 2014  व  ओम मणि पद्मे हुं 2022 हे कवितासंग्रह दलित – आंबेडकरी कवितेचा आजचा आवाज आहे .  दीपक रंगारी यांची ‘माय’ ही कविता एक वेगळे वैशिष्ट्य राखून आहे . मनोहर नाईक यांचा युद्धशाला , भूषण रामटेके कवितासंग्रह उजेडाच्या कविता – २००७ , तुटलेल्या लोकांची कविता – २०१२ , मी रांगेतच उभा आहे २०१८ समीक्षा जागतिकीकरण आणि साहित्यसमीक्षा २०१९ वैचारिक ग्रंथ धर्म , धम्म आणि जातींचे राजकारण २०१८ प्रकाशित आहेत . बांडगूळ , भेटलं मांग फिटलं पांग  ,  धगीतून चालली ती , वांझ, ठणक व षंड ह्या सहा कादंबऱ्या ,  तीन कथासंग्रह , चार समीक्षा ग्रंथ निर्माण करणारे मिलिंद कांबळे हे लिहिते लेखक आहेत .  प्रशान्त ढोले , संजय ओरके यांचेही कविता लेखनात सातत्य दिसून येते .मोरेश्वर सहारे ,  राजेश डंभारे , संदीप  धावडे कवी-लेखक मंडळी पुढे येत आहे.

            जिल्ह्यातील आदिवासी साहित्यिकांनी साहित्य , भाषा , संशोधनाच्या क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे , यातील अग्रणी असलेले व्यंकटेश आत्राम प्रभाव दिसून येतो. संस्कृत भाषेवरही त्यांनी प्रभुत्व मिळविले होते. ‘गोंडी संस्कृतीचे संदर्भ’ (१९८९), ‘दोन क्रांतिवीर’ (१९६८) ‘आंबेडकरी चळवळ आणि आदिवासी समाज : समज-गैरसमज ‘ (१९८७) हे तीन संशोधनग्रंथ त्यांच्या प्रकांड बुद्धिमत्तेची साक्ष देणारे आहेत. बुद्धिनिष्ठ आणि भावनिष्ठ हे दोन्ही लेखनप्रकार हाताळण्यात त्यांचा हातखंडा होता .  त्यांच्या या कार्याला काही अंशी मारोती उईके  गोंडवनातला आक्रण्दन हा काव्यसंग्रह , सरकारी सरण आणि आदिवासींचे मरण, आदिवासी संस्कृतीवर हरामाखोरी हल्ला ,  रावेन हा गोंड राजाच होता अशा हिंदी -मराठी  दहा ग्रंथातून पुढे नेण्याचा प्रयत्न करताना दिसतात , तर डॉ.  विनोद कुमरे यांचा ‘आगाजा’ हा कविता संग्रहामुळे आणि ‘गोंदण’  या नियतकालिकच्या रूपाने   आदिवासी कवितेत एक आश्वासक कवी म्हणून ते ओळखल्या जातात . राजेश मडावी यांनी भूजंग मेश्राम यांच्या आदिवासी कविता  अनुवाद प्रकल्प पुस्तकात प्रफुल्ल शिलेदार यांचा ,  सहयोगी लेखक म्हणून कार्य केले आहे त्यांची सेवाग्रामची पत्रकारिता ही पुस्तिका  लवकरच प्रकाशित होत आहे , मारोती चावरे ,रंजना उईके, रेखा जुगनाके यांचेही लेखन महत्त्वाचे आहेच .

                        साहित्य आणि पत्रकारिता एकमेकांच्या हातात हात घालून चालत असते वर्ध्यात याचा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात प्रत्यंतर आलेले दिसते . जीनदासजी चवडे हे जैन धर्मीय वर्ध्यातील पत्रकार व पहिले  प्रकाशक होत . त्यांनी १८९७ साली या व्यवसायाचा आरंभ करून जैन भास्कर हिंदी पत्रिका सुरु केली,  तर १९०९ मध्ये जैन बंधू वार्तापत्र सुरु केले .  मराठी  भाषिक असूनही हिंदी पत्रकारितेत अपूर्व ठसा उमटविणारे मनोहर सप्रे यांचा वर्ध्याशी संबंध आलेला होता.त्यांनी नागपुरातून ‘केसरी’ची हिंदी आवृत्ती  सुरु करून स्वातंत्र्य चळवळीत मोलाची भूमिका बजांवली. गांधीजींच्या वर्धा वास्तव्यात गांधीजीनी त्यांची वर्तमानपत्रे सेवाग्राम येथून चालविली होती . पुढे  त्यांच्यापासून प्रेरणा घेतलेली अनेक  वृत्तपत्रे निघू लागली  होती .याव्यतिरिक्त  साप्ताहिक  ब्राह्मणेतरचे  पत्रकार- व्यंकटराव गोडे ,  मा. गो. वैद्य  व   दि . मा . घुमरे हे दोघेही तरुण् भारताचे मुख्य संपादक राहिले आहेत  , तर वामनराव घोरपडे व भा. शि. बाभले यांनीही सामाजिक बांधिलकीतून प्रबोधनपर पत्रकारीतेचे धडे गिरवित वृत्तपत्रसृष्टीत आपले स्थान आढळ केले , तर  वर्तमान काळात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे  आघाडीचे ‘अनुभव’  मासिकाचे संपादक सुहास कुलकर्णी हे देखील वर्ध्याचे सुपुत्र होत , त्यांची ग्रंथ सांपदा विपुल असून त्यात  आमचा पत्रकारी खटाटोप, – अवलिये आप्त , माहिती कोश संपादन: यांनी घडवलं सहस्रक , असा घडला भारत, आयडॉल्स भाग  1 , आयडॉल्स भाग 2,  ही महत्त्वाची पुस्तक – संपादने आहेत सध्या ते ‘अनुभव’ मासिक मुख्य संपादनासह समकालीन प्रकाशनाचे मुख्य संपादक आहेत .

    चित्रपट -नाटक -कला यात देखील वर्धेकर मागे नाहीत , चित्रपट दिग्दर्शक राजदत्त उपाख्य  दत्ता मायाळू त्यांनी  युवावस्थेत वर्ध्यात रंगमंच गाजविला आहे . त्यांचीच परंपरा देवळीचे संजय सुरकर व यांच्यानंतर वर्ध्यात  बालपण व शालेय शिक्षण घेतलेल्या एड. समृद्धी पोरे  आता पुढे चालवीत आहे . जुन्या जमान्यातील चित्रपटाची मोठमोठी हुबेहूब  होल्डिंग चितारणारे वर्ध्याचे  विठ्ठलराव बडगेलवार चित्रकार यांनी बी. विठ्ठल हे नावधारण करून एकेकाळी  मुंबई गाजविली आहे ,सेवाग्राम बापू कुटी  वास्तव्य  करणाऱ्या विख्यात चित्रकार अमृता कौर व चित्रपट अभिनेते बलराज सहानी यांनाही वर्धेकर विसरू शकत नाहीत.  सद्यस्थितीत  विजयराज बोधनकर , विजय राउत , सविता बजाज , डॉ.पंकज भांबुरकर ही चित्रकार मंडळी आज कार्यकर्तृत्व गाजवीत आहेत . संगीत क्षेत्रातील   वसंत जळीत – कमल भोंडे हे बंधू -भगिनी , श्याम गुंडावार , विकास काळे आणि अजय हेडाऊ यांचे नाव आदराने घेतले जाते .

**************************

(लेखक ज्येष्ठय पत्रकार आहेत )

 ९४२२१४००४९

Previous article‘वाळवी’: रोचक, मनोरंजक आणि उत्तम कथानक असेलला चित्रपट
Next articleनेत्याविना तिसरा राजकीय पर्याय !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here