स्वप्न पृथ्वीचे!

-मोहन थुटे

माझ्या देशात केवळ नऊ हजार स्त्रिया, सात हजार पुरुष आणि एक हजार मुले होती. पृथ्वीवरील मानवाने भयापोटी दुर्लक्षित केलेल्या, विषारी हवेने सतत आच्छादलेल्या व घनदाट दलदलीच्या अशा बेटाखालील पाण्यात, सुमारे सातशे वर्षांपूर्वी आमच्या देशाची निर्मिती झाली. इतर मानवांच्या नजरेत येऊ नये म्हणून, त्या बेटांवरील वनस्पतींना अतिशय विषारी वायू निर्मिणारी खते आम्ही देत असू. त्या अरण्यातील अनेक वाटांवर, दलदलीमध्ये व झाडांवर, मानवी देहाला वितळवून टाकू शकतील असे वायू सोडणारी यंत्रे बसविली होती. याशिवाय आमच्या देशातील मुख्य नियंत्रण कक्षातील काही ‘टुलो’ मशिन्स, त्या जंगलातील घडामोडींवर सतत लक्ष ठेऊन असत.

आमच्या देशाभोवती जमिनीचा परकोट होता आणि त्याच्या भिंतींना काही छोटी-मोठी छिद्रे होती. दर सहा महिन्यांनी आमच्या देशातील पाणी, बाहेर समुद्रात सोडून दिले जायचे. मग आम्ही पातळ धातूंच्या तुकड्यांनी रस्ते निर्माण करत असू. ही सारी कामे स्वयंचलित यंत्रेच करायची. काही वाहने केवळ पाण्यातच चालायची तर काही केवळ जलविहीन रस्त्यांवर; परंतु बरीचशी वाहने ही पाण्यात व रस्त्यावर अशी दोन्हीकडे चालू शकत होती. आमच्या घरातील व घराबाहेरील दिवे मात्र नेहमीच सुरु असायचे. आमच्या देशातील चार प्रमुखांनी इतर तीस उपप्रमुखांची इलेक्ट्रॉनिक परवानगी घेतल्यानंतरच, मोठा झगमगाट निर्माण करणाऱ्या उपकरणातून संपूर्ण देशातील प्रकाश बंद व्हायचा व तोदेखील केवळ चार तासांसाठीच!

आमच्या देशातील प्रत्येक मानवाच्या देहात, चार ठिकाणी अतिसूक्ष्म यंत्रे ठेवलेली असायची. प्रमुख नियंत्रण कक्षातील ‘इन्स्लोम’ नावाच्या मोठ्या उपकरणाशी ती यंत्रे नेहमीच कनेक्टेड असायची. आमच्या देशातील प्रत्येक मानवासाठी ज्याप्रकारची स्पंदने योग्य व आवश्यक असतील, ती सर्व स्पंदने तत्क्षणी पुरविण्याचे कार्य हे ‘इन्स्लोम’ करीत असे. सूर्यशक्तीपासून किंवा जलशक्ती- मधून ऊर्जा घेऊन, ती आमच्या शरीरात सोडल्या जायची. चाळीस दिवसांतून एकदाच थोडेसे भोजन आम्ही घ्यायचो; पण दर चार दिवसांनी काही गोळ्या खायचो. त्यामुळे आमच्या देहाची वाढ होत असे
आम्ही लोकं आपापसांत बोलताना शब्दांचा वापर फारच कमी प्रमाणात करायचो. आमच्यात बराचसा संवाद हा ‘क्रो’ नावाच्या मनगटी यंत्रानेच व्हायचा. अनेकदा तर विचारांची नि भावनांची देवाणघेवाण आम्ही इन्स्लोमच्या माध्यमातूनच करायचो. आमच्या देशाबाहेर असणाऱ्या दुसऱ्या मानवांच्या जगात आम्ही जेव्हा काही कामा- निमित्ताने जायचो, तेव्हा आमच्याजवळ असणाऱ्या यंत्रानेच त्यांचे बोलणे आम्ही समजून घ्यायचो आणि त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तरे द्यायचो. असे हे दुभाषा-कुशल ‘म्लो’ नावाचे यंत्र आमच्या जबड्यात बसवलेले असे. म्लोच्या सहाय्याने तब्बल ‘चौतीस’ भाषांमध्ये आम्ही संवाद साधू शकायचो. आमच्या पूर्वजांनी कठोर मेहनत घेऊन सतत प्रयत्न केले होते आणि आम्हीसुद्धा वैज्ञानिक प्रयोगांची पराकाष्ठा केली होती. त्यामुळेच आमच्या देशातील मानवसमूह इतका विकसित झाला होता.

आमच्यातील मानवांस साधारणतः ७४ वर्षांनी मृत्यू स्वीकारावा लागे – नव्हे तसा नियमच होता! त्याचप्रमाणे मृत्यूदेखील आपोआप होत असे. सर्व जीवनाचे नि मृत्यूचे संचालन देखील यंत्रेच करीत होती. वयाचे पंधरावे वर्ष उलटले की आमच्या देशातील प्रत्येक व्यक्ती ही ‘प्रौढ’ म्हणूनच गणली जात असे. मग ती विविध वैज्ञानिक उपक्रम आणि नवीन शोध यांमध्ये सहभाग नोंदवू लागे.
अर्थात आमच्यांतसुद्धा मतभेद होतच असत. परंतु इतर मानवांसारखे दुर्गुण आमच्यात नव्हते – जसे की क्रोध, सूड, कपट नि क्रौर्य. तसेच अति-भावुकता, परोपकार, त्याग असले सद्गुणही आमच्यात नव्हते. आम्ही अति-बुद्धिमान, निष्कपट, सरळ मनाचे, कष्टाळू, शांत, संयमी व निर्भय होतो. आमच्या देशातील शिकवणीतून रुजलेले जे वैचारिक ध्येय होते, त्याच्याशी आम्ही पूर्णतः एकनिष्ठ होतो. आमच्या पूर्वजांनी पिढ्यानपिढ्या खपून, मानवातील वेगवेगळ्या गुणसूत्रांवर निरनिराळे प्रयोग केले होते. त्यातूनच आमच्या देशातील हा वर्तमान-समूह विकसित झाला होता.

आमच्या दृष्टीने अयोग्य ठरलेल्या बालकांना पृथ्वीवरील इतर मानवी समुदायात वाढविल्या जात असे. आमच्या बालकांची निर्मिती ही स्त्रियांच्या गर्भाशयातच होत असे. बरेचदा असेदेखील व्हायचे की काही काळासाठी त्यांना, गर्भाबाहेरील प्रयोगनलिकेत वाढविल्या जात असे. बालकाची निर्मिती ही नेमकी कोणत्या स्त्रीच्या गर्भाशयात करायची, याचा निर्णय हा देशातील चार प्रमुख व्यक्तींचे मंत्रिमंडळ घेत असे. त्यासाठी इन्स्लोमचे सहकार्य घेतले जायचे; अर्थातच त्यासाठी संबंधित स्त्री-मातेची पूर्वसंमती ही अत्यावश्यक होती. स्त्री व पुरुष या दोन्ही बीजांची निर्मिती मात्र प्रयोगशाळेच्या देखरेखीतूनच व्हायची आणि बीजाची अंतिम निवडसुद्धा काही वैज्ञानिकांच्या सल्ल्यानेच होत असे.
आमच्या देशातील बालकांना ‘पिता’ म्हणून असा कोणीच व्यक्ती नसे. मातासुद्धा कधी जन्मतःच तर कधी चार-सहा महिन्यांनी अपत्यापासून दूर होई. कुठल्याही परिस्थितीत नवजात शिशु हा कोणत्याही मातेजवळ दोन वर्षांपेक्षा अधिक काळ रहात नसे. त्यामुळे वाढणाऱ्या बालकांना ‘आई-बाबा’ असले कोणतेच नाते समजत नव्हते. मात्र समुदायातील सर्वच स्त्री-पुरुष आणि विशेषतः मुलामुलींवर देखरेख ठेवणारे व त्यांना प्रशिक्षित करणारे संबंधित लोकं, हे त्यांच्याशी प्रेमळपणेच वागत.
आपलेपणा वा परकेपणा असले भाव आम्हाला शिवतच नव्हते. यथावकाश प्रयोग करून नको ते गुणसूत्र (Genes) स्त्रीबीज नि पुरुषबीजात असू नयेत याची आम्ही काळजी घ्यायचो; नंतरच त्यांच्यातून बालकांची निर्मिती होत असे. ज्या मातेच्या गर्भाशयात ते नवशिशु निर्माण होत, तेथेही असले प्रादुर्भाव होऊ नयेत याची खबरदारी घेतल्या जात असे. इतके सारे करूनही सुरुवातीच्या दोन वर्षांत, नवीन बाळांची पुष्कळदा कसून तपासणी होई. काही अल्पसे दोष आढळल्यास त्यावर लगेच उपाय शोधले जायचे. एवढे करूनसुद्धा एखाद्या बालकात जर हेवा, ईर्षा, स्वार्थीपणा व हिंसकवृत्ती आढळली, तर पृथ्वीवरील अनेक देशांत आमच्याशी संलग्न अशा ज्या गुप्त वसाहती होत्या, त्यांपैकी एखाद्या ठिकाणी त्या बालकांना पाठविले जायचे.

मानवाने आपल्या समूहात आपुलकीने, प्रेमाने व निर्भयतेने रहावे असे आम्हाला वाटे. ईर्षा, व्देष, एकमेकांवर वर्चस्व गाजविण्याची प्रवृत्ती, क्रोध, क्रौर्य, दुष्टपणा, कपटीपणा, इतरांना हीन व स्वतःला श्रेष्ठ समजणे, कोणाची दया मागणे किंवा कोणावर उपकार करणे, कुण्या अपरिचित ईश्वरी अथवा सैतानी शक्तीची पूजा करणे, असले दोष नसलेला मानवसमूह निर्माण करण्यातच आमचा देश मग्न होता. अनेक योगी, भक्त, तपस्वी नि तांत्रिक ह्यांच्याशी आमच्या पूर्वजांनी दोस्ती केली होती व त्यांच्यावर बरेच प्रयोगही केले होते. त्या प्रयोगांमुळे मानवी देह-मन-बुद्धी आणि बाह्य नैसर्गिक परिस्थिती यांच्यात नेमके कोणते बदल घडतात, हे तपासले होते. किंबहुना आपल्या प्रयोगशाळेत त्यांनी तसे बदल घडवूनही आणले होते. बाहेरच्या अनेक देशांत आमच्याशी सलोखा, मैत्री व गुप्त-करार असणारे मानवी समुदाय होते. त्यांना आम्ही बरीच मदतसुद्धा करायचो; परंतु आमच्या देशात येण्याची वा आम्हाला जाणून घेण्याची क्षमता त्यांच्यात नव्हती.

आमच्या देशातील मानवांत स्नायूंची वाढ ही कमी प्रमाणात केल्या जायची. शरीरात रक्ताचे प्रमाणही तसे कमीच होते. त्यामुळे फुफ्फुस वा हृदयाला फारसे काम नव्हतेच. आमच्यातील ज्या मानवांना बाहेरील जगात विशेष कार्यासाठी पाठविले जायचे, त्यांच्या हाडांतील पोकळीत बरीच धातूची यंत्रे बसविली जायची. काहीजणांना तर कृत्रिम हृदयसुद्धा जोडल्या जाई. यकृत व मूत्रपिंड आदींचे काही भाग हे आतून पोकळ केले जायचे आणि त्यांत काही उपकरणे बसविली जायची. आमच्या देहातून बाहेर पडून धातूंनाही वितळविणारी किरणे, ही इन्स्लोमच्या सहकार्याने आमच्या देहात (आम्हांस योग्य वाटेल अशा ठिकाणी) निर्माण केल्या जाऊ शकत होती. आमच्या देहातील उपकरणांतून सूक्ष्म संकेत मिळताच, वाऱ्याहून वेगवान असा आदेश इन्स्लोम-मार्फत सुटत असे. त्यातूनच अदृश्य किरणांचे एक अभेद्य असे वलय आमच्या देहाभोवती तयार होई. त्यामुळेच आमचे शरीर हे अतिशय घातक अशा बाह्य हल्ल्यांपासून सुरक्षित राही.

कोणतेही मानवी आवेग आमच्या देहात वा मनात शिरून कुठलीही कृती होणे हे जवळजवळ अशक्यप्राय होते. कधी-कधी स्त्री-पुरुषांमध्ये कामवासना जागृत व्हायची; पण संभोगाची इच्छा ही इन्स्लोमकडून नियंत्रित अशा परिस्थितीतच होत असे. अन्यथा उत्पन्न झालेल्या वासनेचे तरंग हे विरघळून जायचे व ती आम्हाला किंचितही विचलीत करू शकत नसे. वेळोवेळी आमच्या देहात बसविलेल्या यंत्रांना व्यावहारिक मार्गदर्शनाचे काही संकेत इन्स्लोमकडून प्राप्त होत. त्यामुळे आमच्या देहात नि मनात जी विशिष्ट स्पंदने निर्माण होत, ती कधीच आम्हाला अहितकारी निर्णय घेऊ देत नसत. किंबहुना तशी कृती करण्याची प्रबळ इच्छाच आमच्यात उत्पन्न होत नसे.
आमच्या अरण्यात अदृश्य असणाऱ्या एका मोठ्या व्दारातून आमची याने ही मंगळ, शुक्र, बुध, गुरु व शनी या ग्रहांवरदेखील पोहोचत होती. चंद्रावर तर आमची एक भक्कम मोठी प्रयोगशाळाच कार्य करीत होती. तसेच चंद्रावरील काही भागात तुळशी वनस्पतीला जगविण्याचे यशस्वी प्रयोगसुद्धा आम्ही केले होते. चंद्रावर काही ठिकाणी आमची जलनिर्मिती करणारी सहा याने कार्यरत होती. प्रत्येक ग्रहावर आमचे वास्तव्य असताना त्या संबंधित ग्रहाचे आमच्या मनोबुद्धीवर नेमके कसे प्रभाव पडतात, याचा आम्ही सखोल अभ्यास केला होता. लाखो वर्षांपूर्वी यांपैकी काही ग्रहांवर मानवी वस्ती ही नक्कीच होती. आम्ही पृथ्वीची उत्पत्ती असल्यामुळे की काय कोण जाणे, पण सर्वात सुरक्षित, शांत, ओजस्वी, स्वाभाविक आणि सुसंगत तरंग निर्माण करणारे स्थळ हे फक्त पृथ्वीच आहे असे आम्हांस वाटायचे. चंद्रावरील वातावरणामुळे मानवांत काहीसा भित्रेपणा, लपविण्याची प्रवृत्ती आणि थोडासा खुनशीपणा वाढतो; मंगळावरील वातावरणामुळे विद्रोहाची भावना, आगाऊ धाडसाची आवड आणि इतरांवर कुरघोडी करण्याची ऊर्मी उठते; शुक्रावरील वातावरणामुळे भावनांमध्ये हळवेपणा वाढून, माणूस स्वप्नांत रंगू पाहतो. अशाप्रकारे वेगवेगळ्या ग्रहांवरील वातावरणाने मानवात बदल घडतात, हे आम्हांस समजले होते. म्हणूनच त्या-त्या स्थळी जर मानवास अधिक जगू दिले, तर निरनिराळ्या ग्रहांवरील या मानवजमाती एकमेकींशी निश्चितच युद्ध करतील आणि त्यातून विनाश हा अटळ ठरेल. म्हणूनच इतर ग्रहांवरील मानवांचे वास्तव्य हे आम्ही नेहमीच फार कमी काळाचे ठेवायचो.

‘भारत’ नावाच्या देशातील थोड्या वेगळ्या मानवांच्या एका वसाहतीत मला पाठविण्यात आले. हा मानवसमूह वैज्ञानिक प्रगतीत तर आमच्यापेक्षा खूपच मागासलेला होता; परंतु त्या समूहातील अधिकाधिक स्त्री-पुरुष हे स्वतःमधील योगसामर्थ्य प्रगट करून, नवीन मानवजात निर्माण करण्याच्या कामी गुंतले होते. त्या समूहातील सर्वोच्च व्यक्तीस भेटून ज्ञानाची देवाण-घेवाण करणे, हे महत्वाचे कार्य माझ्या देशातील प्रमुखांनी मजवर सोपविले होते. त्या व्यक्तीशी माझी सतत चार दिवस चर्चा झाली. वेगवेगळ्या संदर्भात आम्ही एकमेकांवर प्रयोगही केलेत. माझ्या डोळ्यातील विशिष्ट दाहक किरणांनी त्या योग्याच्या पायाची थोडीशी कातडी मी जाळून दाखविली; तसेच काही क्षणात ती पूर्वीपेक्षा अधिक सतेजदेखील करून दाखविली. त्या योग्यातील कोणत्याही घातक सामर्थ्यामुळे, माझ्या देहास किंचितही नुकसान होऊ शकले नाही.

कधीतर त्या योग्यातील काही घातक स्पंदनांमुळे मी बेशुद्ध पडतो की काय, असेही मला वाटायचे. परंतु मला इन्स्लोमकडून मिळणाऱ्या स्पंदनांमुळे मी कधीही मूर्च्छित झालो नाही. मात्र त्या योग्याकडून येणाऱ्या काही स्पंदनांना, माझे मन वा बुद्धी ही अनेकदा पेलू शकत नसे. अशावेळी त्या योग्याच्या स्पंदनांचा माझ्या मनाशी व बुद्धीशी असणारा संपर्क, हा माझ्यावरील इन्स्लोमच्या नियंत्रणामुळे तुटत होता. त्या योग्याने माझ्यावर बरेच प्रयोग केलेत आणि माझ्या मनाची व बुद्धीची बरीच प्रशंसाही केली. “ठरवल्यास तुझ्यावरील इन्स्लोमचा प्रभावही मी कमी करू शकतो; परंतु मी तसे कदापि करणार नाही”, हेदेखील त्या योग्याने मला समजाविले.

त्या देशाच्या एका आश्रमातील काही विभाग-प्रमुखांशी मी चर्चा केली. त्यांचा जो आश्रम-प्रमुख होता, त्याच्या डाव्या पायाची कातडी मी जाळल्याचे एकाने ऐकले होते. मग त्याच्या उजव्या पायावरही तोच प्रयोग करण्याचा त्याने मला आग्रह केला. मी संमती देताच त्याने आपल्या ध्यानाची एकाग्रता वाढविली. त्या विभागप्रमुखाचा जो पाय होता त्याच्या कातडीबाहेरील सूक्ष्म कवचात, माझ्या डोळ्यातून निघणारी घातक विषारी किरणे ही विलीन होऊ लागली. या गोष्टीचे मला खूपच आश्चर्य वाटले आणि त्यापुढे माझे विज्ञान हे थिटे वाटू लागले. त्या विभाग-प्रमुखांपैकी हवेत तरंगता तरंगता कवायती शिकविणाऱ्या एकीशी – नीलमशी – मी बरीच गट्टी जमवली. माझ्या देशाने केलेल्या वैज्ञानिक प्रगतीचे तेथील आश्रम-प्रमुखांनी अभिनंदन केल्याचे मला कळले. मी त्या आश्रम-प्रमुखांना असे म्हणालो होतो की योगसाधनेमुळे केवळ तो योगीच विकसित होतो, इतर मानवांची कुवत मात्र कमजोरच राहते; परंतु आमच्या वैज्ञानिक प्रयोगाने अवघी मानवजात विकसित होते. माझ्या अशा बोलण्यावर त्या आश्रम-प्रमुखांनी एक रहस्यमय ‘स्मित’ केले होते. त्याविषयी नीलमने मला एकदा असे सांगितले की, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आश्रम-प्रमुख मला समजावू इच्छितात. परंतु त्यासाठी माझ्या मनोबुद्धीने काही अलौकिक स्पंदनांना अनुभवणे आवश्यक आहे. माझ्यावरील इन्स्लोमच्या प्रभावामुळे ती स्पंदने मला अनुभवता येत नाहीत व म्हणूनच मला ते समजू शकत नाही.
वरील बाबीचे थोडे अधिक स्पष्टीकरण नीलमने मला देऊ पाहिले.

बाह्य भौतिक सृष्टीतील प्रकृतीचे बरेच नियम हे आतापर्यंत मानवी बुद्धीने उलगडून दाखविले. त्याचबरोबर मानवी देहातील, मनातील व समाजातील व्यवहारांवर प्रकाशझोत टाकला. ह्याच विज्ञानामुळे आम्ही अनेक प्रयोगदेखील केले आणि मानवी देह-मन-बुद्धी व बाह्यसृष्टी यांच्यात बदलही घडविले. असे असूनसुद्धा प्रकृतीचा पुष्कळ मोठा भाग हा आमच्या विज्ञानास अजूनही अगम्य आहे. कधीतरी त्या अंधारातून आकस्मिकपणे एक मोठा झंझावात येतो आणि आमच्या वैज्ञानिक प्रगतीवर येऊन आदळतो. अशी प्रगती समूळ नष्ट होण्याइतकी त्याची तीव्रता असते – नव्हे, मानवाच्या भूतकाळात अनेकदा तसे घडलेले आहे! विविध गुह्य जगतांतील अनेक शक्तींचा प्रभाव हा पृथ्वीवरील मानवी जीवनावर कार्यरत असल्याचे तिने मला सांगितले. तसेच नीलमने मला हेदेखील सांगितले की गुह्य जगतांतील विविध कार्यपद्धतींवर नियंत्रण प्रस्थापित करण्याइतपत, आश्रम-प्रमुखाच्या योगसामर्थ्याचा विकास झालेला आहे.

प्रकृतीमधील एखाद्या विकसित भागाच्या सक्षम प्रभावामुळे, त्यातील दुसरा कमजोर भाग हा तात्पुरता त्या विकासाच्या प्रभावाखाली राहतो हे निश्चित; पण तसे असले तरीही मुळात तो भाग कमजोरच राहील. म्हणूनच मानवाच्या आतील व बाहेरील सर्व प्रकृतीसामर्थ्य (आणि गुह्य जगतातील सामर्थ्यसुद्धा) स्वयं जागृत झाले पाहिजे. त्या सर्वांच्या आतील असे एक केंद्र जागे झाले पाहिजे, जे प्रकृतीच्या इतर अनेक अंतस्थ केंद्रांशी ‘एकत्वाच्या’ लयबद्धतेत कार्य करेल. दृश्य व अदृश्य प्रकृतीत अनेक प्रकारची नि वेगवेगळी सत्ताकेंद्रे आहेत; प्रत्येक माणसाचा वा प्राण्याचा देह हादेखील एक सत्ताकेंद्र आहे. तसेच देहातील फुफ्फुस, हृदय किंवा यकृत यांसारखे भागसुद्धा एकमेकांपासून भिन्न पण स्वतंत्र अशी सत्ताकेंद्र आहेत. त्याचबरोबर मानवातील ऐकण्याच्या (कान), श्वसनाच्या (नाक), बोलण्याच्या (घसा) व बघण्याच्या (डोळे) रचनेतसुद्धा बरीच सत्ताकेंद्रे आहेत. मानवी मनामध्येही संस्कारांची अनेक सत्ताकेंद्रे आहेत. त्यासोबतच जल, वायू, अग्नी, आकाश, ग्रह आणि उपग्रह अशी निरनिराळी सत्ताकेंद्रे आहेत. त्यातील प्रत्येकाची कार्यपद्धती ही दुसऱ्याशी थोडीफार सुसंगत, तर बरीचशी विसंगत आहे. म्हणूनच विकासाबरोबर विनाशदेखील होत असतो. परंतु या सर्व प्रकृतीकेंद्रांचे मूळ हे एकच आहे. त्या मूळ चेतनेशी संलग्न होऊन प्रकृतीचे कार्य हे जर अधिकाधिक प्रगटले, तर तिच्यातील अनेक सत्ताकेंद्रांचे आपापसांतील व्दंव्दयुद्ध संपेल. हेच कार्य करण्यासाठी ‘श्रीअरविंदांनी’ एक वेगळा आश्रम पूर्वी स्थापन केला होता.

बाह्य वैज्ञानिक उपकरणांवर अवलंबून राहण्यात एक सुरक्षितता जाणवते; परंतु आमच्यातील वेगवेगळी व सूक्ष्म अशी योगसामर्थ्ये जागृत करून त्यापेक्षा अधिक सुरक्षितता लाभते. ती अधिक श्रेष्ठ दर्जाची आहे असे नीलम म्हणाली. येथील साधक हे स्वतःच्या चेतन-सामर्थ्याचा वापर करून, आपल्या देह-मन-बुद्धी यांच्या निरनिराळ्या भागांमध्ये सुप्तावस्थेत असणाऱ्या एकत्वाच्या आत्मकेंद्रांना जागृत करतात. त्यांना विकसित करून बाह्य जगतावर या आत्मचेतनेचा प्रभाव गाजवितात आणि संरक्षणही मिळवितात; तसेच बाह्य सृष्टीतल्या वेगवेगळ्या सामर्थ्यांमधील आत्मकेंद्रे जागृत करण्याचा प्रयास करतात. श्रीअरविंद योगसाधनेने प्रगटविलेली सुप्रामेंटल चेतना ही या कार्यात त्यांना सतत मार्गदर्शन करत असते व सामर्थ्य देत राहते. परंतु माझ्यासारख्यांना तर केवळ स्वतःच्याच मनाची सचेतन अवस्था समजते आणि फक्त स्वतःच्याच बुद्धीची जागृती कळते. त्यापलीकडेही मानवांत अनेक सामर्थ्यकेंद्रे उद्घाटीत होऊन कार्य करू शकतात; पण हे सारे आम्ही समजू शकत नाही, या नीलमच्या म्हणण्याने मला खूप विचलित केले.

त्या आश्रमातील योग्याजवळ येणाऱ्या साधकांचे मी बारकाईने निरीक्षण केले. अनेकांच्या चेहऱ्यावरील निर्मळता, लवचिकता, स्नेहाचे आकर्षण, समर्पण आणि भावनेची स्निग्धता ही आमच्या देशात मला कधीही जाणवली नव्हती. त्या योग्यापासून दूर गेल्यावर ही साधक-मंडळी एकमेकांशी भांडत नि वाद घालत; क्वचित कधीतरी त्यांच्यातील व्देषही जागा होई; परंतु काहीतास त्यात होरपळून निघाल्यावर, त्यांच्या आतून पुकारणारी काही स्पंदने उठत. मग त्यांच्या प्रमुख योग्याजवळ असणारी प्रेमळ, निर्मळ, शांत नि कोमल भाव निर्माण करणारी अशी स्पंदने, या साधकांच्या देह-मन-बुद्धीत अवतरू लागत. असा आनंद, समाधान, सौंदर्यानुभूती आणि विशालता ही माझ्या देशातील मानवांना कधीच अनुभवायला मिळाली नव्हती. मग आपल्याभोवती असलेल्या बाह्य जगाविषयी वाटणारे सुसंवादाचे नि एकत्वाचे भाव हे मला हलकेसे का होईना, पण उमजू लागले. या एकत्वाच्या स्पंदनांत आपल्या वेगळेपणाची जाण विरघळत जाते आणि त्यालाच ही माणसे ‘दिव्यप्रेम’ असे म्हणतात, हेसुद्धा मला थोडेफार समजू लागले. तेथील जीवनप्रवाहात स्वतःला पूर्णपणे झोकून द्यावे, अशी ओढ माझ्या मनामध्ये निर्माण होऊ लागली.

माझे जीवन, माझे जगणे व माझ्या देशातील प्रगती ही मला कृत्रिम वाटू लागली. माझ्या हृदयात एक नवीच लुकलुक नि हुरहूर जागृत होऊ लागली. त्यावर इन्स्लोमचे नियंत्रण हे टिकेनासे झाले आहे, असे मला जाणवू लागले. माझ्या देहातील इन्स्लोमने नियंत्रित होणाऱ्या चारही उपकरणांचे कार्य, हे हळूहळू थांबत असल्याचे मला जाणवू लागले. आता आपण मृत्युमुखात जात असल्याचे मी ओळखले. माझा श्वासोच्छवास क्षीण होत गेला; संवेदनशक्ती लुप्त होऊ लागली. मी त्या प्रमुख योग्याचे स्मरण केले आणि माझ्या जीवनाशी माझा संपर्क तुटला.मी देहाबाहेर होतो; माझा देह हळूहळू वितळत असल्याचे मी पाहिले. माझ्या त्या सूक्ष्म देहाजवळच तो महान योगी प्रगटला. माझ्याकडे पाहून त्याने स्मित केले आणि माझी संमती मिळताच एका ध्यानस्थ साधकाच्या डोक्यात मला सोडले.

….मी डोळे उघडले. श्रीअरविंद आश्रमातील समाधीपुढे मी बसलो होतो. माझ्या आजूबाजूला पुष्कळ साधक बसले होते. सर्वत्र अंधार होता. समाधीवरील छोटासा दिवा तेवढा मंद प्रकाश देत होता. शेकडो उदबत्त्यांचा सुगंध तिथे दरवळत होता. संध्याकाळच्या सामूहिक ध्यानाची वेळ संपली आहे, अशी सूचना देणारी घंटी वाजली आणि हळूहळू दिवे लागत गेले.

 

Previous articleदंडकारण्यातील बंगाली
Next articleमी पाहिलेला बिहार
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here