डॉ. विवेक कोरडे
निवडणुकीमध्ये गेली अनेक वर्षे भारतीय जनता पक्ष रामाला बरोबर घेऊन उतरतो. भाजपला सत्तेचा सोपान रामानेच दाखवला असला तरी सध्या या पक्षाला राम पूर्वीसारखी साथ देईनासा झाला आहे. २०१४ मध्ये विकासाचा फार मोठा बोलबाला करून गुजरातचे फसवे चित्र लोकांपुढे उभे करून प्रधान प्रचारक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष विजयी झाला. पण लवकरच विकासाचं तुणचुणं पिचून गेलं आणि खुद्द गुजरातमध्ये लोकांनी ‘विकास वेडा झाला आहे’ असं म्हणायला सुरुवात केली. साऱ्या विकासाचा असा बोजवारा उडालेला असतानाच आता साऱ्या निवडणुका जिंकायच्या आहेत याची खूणगाठ प्रधान प्रचारक आणि निवडणूक धोरणांचा अमल करणारे प्रधान चाणक्य यांनी बांधली आहे. प्रत्यक्षातही स्थिती पूर्वीपेक्षा खराब झाली असून आता निवडणूकीत राम आणि विकास यांना थोडं बाजूला सारून बरोबरीला अन्य मंडळी आणणं आवश्यक होऊन बसलं आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये पाकिस्तान, कसाब, अफजल गुरू, अकबर, औरंजेब यांनाही उतरवलं जात आहे. उपरोक्त मंडळींनी जे जे काही बरं वाईट केलं (खरंतर सारं वाईटच केलं!) ते सारं भारतीय राष्ट्रीय काँग्रसची परवानगी घेऊनच केलं असं सांगितलं जात आहे आणि म्हणूनच भाजपला मत द्या असा प्रचार सुरू आहे.
कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये भले भाजपचा विजय झाला असेल पण त्यासाठी त्यांना जनरल थिमैय्या आणि जनरल करिअप्पा यांना प्रचारामध्ये उतरवावं लागलं तेही खोटा इतिहास रचून. त्यांचा नेहरूंनी अपमान केल्याचं भाजपने बिनदिक्कत सांगितलं. प्रसार माध्यमांनी त्यांचा खोटेपणा समोर आणल्यावर प्रधान प्रचारक मोदी यांनी वि. दा. सावरकर आणि भगत सिंग यांना प्रचारामध्ये उतरवलं. अंदमानच्या तुरुंगात असताना सावरकरांना आणि भगत सिंग तुरुंगात असताना भेटायला काँग्रेस नेते गेले नाहीत म्हणून भाजपला मतं द्या, असा त्यांचा आग्रह होता. पण सावरकर तुरुंगामध्ये मातृभूमीच्या ओढीने एवढे व्याकूळ झाले होते की त्यांनी तिथे बसल्या बसल्या ‘सागरी प्राण तळमळला’ ही कविता केली. पण त्याने त्यांचं समाधान झालं नाही. त्यांनी ५४ दिवसांतच ब्रिटीश सरकारला माफीपत्रांद्वारे “मला हिंदुस्थानात परत पाठवा मी तुम्हाला सर्व ती मदत करीन” असे माफीनामे पाठवायला सुरुवात केली आणि ५० वर्षांची शिक्षा दहा वर्षांतच संपली. त्यानंतर ते ब्रिटिशांचे ६० रुपये पेन्शन घेऊन हिंदू-मुसलमान वितुष्ट वाढवून ब्रिटिशांना मदत करत राहिले. हा इतिहास नागपूर आवृत्तीत शिकवत नसल्याने कदाचित प्रदान प्रचारकांना माहित नसावा.
त्याचबरोबर शहीद भगत सिंग आणि त्यांचे साथी शहीद राजगुरू, शहीद सुखदेव यांना काँग्रेस अध्यक्ष जवाहरलाल नेहरू केवळ भेटायलाच गेले नाहीत तर त्यांच्यावरील न्यायालयीन खटल्यामध्ये त्यांना सर्व ती मदत मिळेल याची काळजी नेहरूंनी घेतली. हे देखील इतिहासाच्या त्या आवृत्तीमध्ये शिकवत नसल्याने प्रधान प्रचारकांनी त्यांनाही प्रचारात उतरवलं. अशा पद्धतीने इतिहासाची मोडतोड करून स्वतःच्या सोयीचा इतिहास सांगण्याची भाजपची ही पहिली वेळ नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अत्यंत हुशारीने ठरवलेलू ही रणनीती आहे. स्वातंत्र्य आंदोलनामध्ये संघाचा नसलेला सहभाग सिद्ध करण्यासाठी वारंवार या रणनीतीचा वापर केला जातो. सारे क्रांतीकारक एकाच विचाराचे होते आणि काँग्रेसचा त्यांना विरोध होता, असं मुद्दाम पसरवलं जातं. त्यामुळेच माननीय प्रधान प्रचारक एकाच दमात सावरकर आणि भगत सिंग यांचं नाव घेतात आणि ते दोघं जणू एकाच विचारसरणीचं असल्याचं भासवतात. शहीद भगतसिंगांच्या पंक्तीला सावरकरांना बसवलं की, दोघेही हिंदुत्ववादी होते, असा भ्रम निर्माण करणं सोपं जाईल, असं संघाला वाटत असतं. त्यामुळेच या दोघांच्या विचारसरणीमधला फरक लोकांसमोर मांडण्याची गरज आहे.
१८५७ च्या उठावानंतर अनेक क्रांतिकारकांनी कधी संघटीतपणे तर कधी एकाकीपणे झुंज दिली असली तरी त्यांची विचारधारा भिन्न होती. १९ व्या शतकाच्या शेवटी २०-२२ वर्षांत महाराष्ट्रातील क्रांतिकारकांची प्रेरणा धर्म होती. त्यांच्या संघटनेच्या नावातच हिंदू धर्म संरक्षिणी सभा असं होतं. १९१३ मध्ये अमेरिकेत स्थापन करण्यात आलेल्या गदर पक्षाची प्रेरणा धर्म आणि राष्ट्रवादाच्या पुढे जाऊन भारतात इंग्रजी शासकांना काढून अमेरिकेप्रमाणे जनवादी- ज्यात धर्म, संप्रदाय, जात वा वर्ण भेदांशिवाय सर्व भारतीय समान रुपाने स्वतंत्र असतील असे सरकार स्थापन करावे, अशी होती. सहाजिकच सेक्युलर लोकशाहीची स्वप्नं ही मंडळी पाहत होती.
सावरकर महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी गटाच्या प्रभावाखाली असलेले आणि माफी मागून सुटका करून घेतल्यावर हिंदुत्ववादी राजकारणाला वैचारिक चौकट देण्यासाठी ग्रंथलेखन आणि भाषणं करणारे हिंदू महासभेचे पुढारी होते. ब्रिटनमध्ये असतानाही त्यांनी इंडिया हाऊस मधून हिंदुस्थानात २१ पिस्तुलं पाठवणं, मदनलालला कर्नल वायलीचा खून करण्यासाठी भडकवणं, खून केल्यावर त्या कटाशी आपला काहीही संबंध नाही असं म्हणणं आणि अटक झाल्यावर फ्रांसच्या किनाऱ्यावर बोटीतून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न करणं- यात कोणतंही क्रांतिकारक काम नाही.
१९२४ मध्ये सावरकरांचे वास्तव्य रत्नागिरी जिल्ह्यात सुरू झाले. त्यांना परवानगीशिवाय जिल्ह्याची हद्द ओलांडण्याची मनाई होती. पण त्याच साली त्यांच्या भावानी बाबाराव सावरकरांनी रत्नागिरीमध्ये हिंदू महासभेची शाखा सुरू केली. या गोष्टी सरकारला दिसत होत्या. त्याच वर्षापासून हिंदू महासभेने साऱ्या भारतभर पसरण्याचा प्रयत्न सुरू केला आणि एका वर्षातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. यामागे सावरकर होते, असे त्यांचे चरित्रकार सांगतात. या हिंदू महासभेने ब्रिटिशांना विरोध करण्याएेवजी काँग्रेस आणि गांधीजींना विरोध केला. तोच त्यांचा स्वातंत्र्य लढा होता. भगत सिंग ज्या क्रांतीकारी संघटनेचं प्रतिनिधीत्व करत होते त्या संघटनेने ब्रिटीशविरोधी लढा देताना काँग्रेसला सहकार्य केलं. १९१९ च्या असहकाराची चळवळ सुरू करताना महात्मा गांधींनी क्रांतिकारकांबरोबर एक बैठक आर. सी. दास यांच्या मध्यस्थीने आयोजित केली. त्या बैठकीला भगत सिंगाच्या संघटनेचे प्रमुख चंद्रशेखर आझाद उपस्थित होते आणि त्यांनी गांधीजींचं आंदोलन सुरू असताना क्रांतिकारी कारवाया थांबवण्याचं केवळ वचनच दिलं नाही तर ते वचन पाळून अनेक क्रांतिकारक या आंदोलनात सहभागी झाले.
आर. सी. दास, डॉ. सैफुद्दीन किचलू, गणेश शंकर विद्यार्थी यांच्यासारखी काँग्रेसमधील मंडळी काँग्रेस आणि क्रांतीकारक यांच्यामध्ये समन्वयाचं कार्य करीत होती. मोतीलाल नेहरू हे चंद्रशेखर आझादांना आर्थिक मदत करत होते. ही मदतीची परंपरा पंडित नेहरूंनी सुरू ठेवली. चंद्रशेखर आझादांनी पोलिसांशी लढा देत शेवटची गोळी जेव्हा स्वतःवर झाडून घेऊन मृत्यू पत्करला तेव्हा नेहरूंनी त्यांना दिलेल्या ५०० रुपयांतलेही पैसे त्यांच्या खिशात शिल्लक होते. त्यांचं शव कमला नेहरूंनी ताब्यात घेतलं आणि अंत्यसंस्कार वाराणसी काँग्रेस कमिटीने केले. काँग्रेस आणि क्रांतीकारकंतील हे परस्पर सहकार्य आणि ध्येय स्वातंत्र्य असल्यामुळे शक्य होतं. सावरकर आणि त्यांच्या हिंदू महासभेला स्वातंत्र्याशी काही देणं-घेणं नव्हतं.
१९२१ मध्ये म्हणजे वयाच्या १४ व्या वर्षी भगत सिंग नवव्या इयत्तेत असताना असहकाराच्या आंदोलनामध्ये उतरले. आंदोलन मागे घेतल्यावर लाहोरमध्ये महाविद्यालयात शिकत असताना क्रांतिकारक गटात सामील झाले आणि शेवटपर्यंत तिथेच कार्य करत राहिले. या साऱ्या काळामध्ये क्रांतीवरील त्यांची श्रद्धा ढळली नाही. उलट त्यांनी या आंदोलनाला नेतृत्व दिलं आणि सक्षमपणे निभावून नेलं. सावरकरांनी आपली निष्ठा ब्रिटिशांच्या चरणी अर्पण केली. त्यांच्याशी सहकार्य करण्याचं मान्य केलं. ब्रिटिशांचं पेन्शन घेतलं आणि आपला शब्द पाळला. त्यांची ब्रिटीश निष्ठा इतकी जाज्ज्वल्य होती की, ती निभावण्यासाठी सावरकरांनी दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटीश सैन्य भरतीची मोहीम हाती घेतली. ही सैन्य भरती करताना हे सैन्य नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या आझाद हिंद सेनेच्या विरोधात लढणार याची जाणीवही त्यांनी ठेवली नाही.
भगत सिंग आणि सावरकरांमधला सर्वात मोठा फरक म्हणजे भगत सिंग योजना आखायचे आणि स्वतः अंमलात आणायचे. सावरकर मात्र दुसऱ्याला काम सांगून स्वतः नामानिराळे रहायचे. मदनलालला भरीस घालून सावरकर नामानिराळे राहिले. पण भगतसिंग शेवटपर्यंत आपल्या सहकाऱ्यांशी प्रामाणिक राहिले. ते धाडसी होते, भेकड नव्हते. असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकून स्वतःला अटक करवून घेणं म्हणजे फाशीला सामोरं जाणं हे त्यांना माहीत होतं. बॉम्ब टाकून पळून जायची संधी असतानाही त्यांनी ती नाकारली आणि खटल्याचा उपयोग आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी आणि जनमानस निर्माण करण्यासाठी केला. सावरकरांनी कधीही ब्रिटिशांविरोधात वक्तव्यं केलं नाही वा कोणाताही लढा ब्रिटिशांच्या विरोधात दिला नाही. या तथाकथित क्रांतिकारकांच्या पिस्तुलातून सावरकरांच्या हयातीत एकही गोळी ब्रिटिशांविरोधात उडाली नाही. कदाचित ती ३० जानेवारी १९४८पर्यंत महात्मा गांधींसाठी राखून ठेवली होती.
भगत सिंग गांधी विचारांच्या विरोधी होते. पण गांधींचे लोकसंघटन करून स्वातंत्र्याचे आंदोलन लढण्याचे श्रेय त्यांनी गांधींना दिलं आहे. तसंच पिस्तुलं आणि बॉम्ब यांनी नव्हे तर क्रांती लोकसंघटनेतून हेते म्हणून लोकांना संघटीत करण्यावर गांधींचा भर होता.
भगत सिंग आणि सावरकरांमधला मुख्य फरक यांनी ब्रिटिशांना लिहिलेल्या दयेच्या अर्जातून दिसून येतो. सावरकरांनी आपल्या माफीनाम्यात लिहून दिलं आहे की, “मी सरकारची सेवा सरकारला जशी आवडेल तशी करायला तयार आहे. कारण माझं (संविधानिक मार्गावरचं) परतणं इमानदारीचं आहे म्हणून माझी भविष्यातील वर्तणूकही तशीच असेल अशी माझी आशा आहे. मला कैदेतून सोडवण्याच्या तुलनेत मला कैदेत ठेवून काहीच मिळणार नाही. केवळ सर्वशक्तीमान दयावान बनू शकतो आणि म्हणून अतिव्ययी मुलगा मायबाप सरकराच्या दारी परतण्याहून अन्य काय करू शकतो? ”
या दयेच्या अर्जाच्या तुलनेमध्ये भगत सिंगांनी ब्रिटिशांना लिहिलेला दयेचा अर्ज पहा. “ आपल्या न्यायालयाच्या निकालानुसार आम्ही युद्ध सुरू केले आहे आणि म्हणून आम्ही युद्ध कैदी आहोत हे आम्हांस आपल्या निदर्शनास आणून द्यायचं आहे. तशाच प्रकारची वागणूक आम्हाला देण्यात यावी अशी आम्ही मागणी करतो आणि म्हणूनच आम्हाला फाशी देण्याएेवजी गोळ्या घालाव्यात अशी आमची हक्काची मागणी आहे. ”
तुरुंगातून सुटण्यासाठी ब्रिटिश सरकार सांगेल तशी वागण्याची हमी देणारे माफीवीर कुठे आणि युद्धकैदी असल्याने आम्हाला गोळ्या घालून मारा, तो आमचा हक्क आहे, असं म्हणणारे शहीद भगत सिंग आणि त्यांचे साथी कुठे ? या दोघांचं नाव एकाच व्यासपीठावरून उच्चारून संघ परिवार आणि त्यांचे प्रधान प्रचारक शहीद भगतसिंगांचं अवमूल्यन करत आहेत. या दोघांना एकत्र पाहणं म्हणजे शहिदांचा अवमान आहे.
– डॉ. विवेक कोरडे
लेखक गांधीवादी विचारवंत असून “जातीयवादी राजकारणाचा अन्वयार्थ” हे त्यांचे पुस्तक आहे.