–प्रवीण बर्दापूरकर
दिवस अन वार नक्की आठवत नाही पण , हे नक्की आठवतं की १९७७चा मे महिना होता .
मुंबईच्या आताच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसला एक टॅक्सी थांबली . खादीचा पांढरा कुडता , त्यावर जाकीट घातलेले एक गृहस्थ उतरले आणि प्रवासाची बॅग हातात घेऊन ते गृहस्थ औरंगाबादला ( आताचे छत्रपती संभाजी नगर ) जाणाऱ्या रेल्वेत जाऊन बसले . पुढे मध्यरात्री मनमाडला उतरले आणि बॅग स्वत:च घेऊन दुसऱ्या रेल्वेत जाऊन बसले . कांही लोक त्यांच्या हातातली बॅग घेण्यासाठी धावले पण त्यांनी ठाम नकार दिला . औरंगाबादला सकाळी उतरल्यावर ऑटोरिक्षानं ते सुभेदारी विश्रामगृहात जाऊन विसावले .
त्यांच्या या कृतीची एक बातमी चौकटीत ‘मराठवाडा’ दैनिकात दुसऱ्या दिवशी प्रकाशित झाली कारण , हे गृहस्थ कुणी सामान्य नागरिक नव्हते तर जेमतेम दोन आठवड्यांपूर्वी म्हणजे १७ मे १९७७ रोजी देशातल्या एका मोठ्या आणि महत्वाच्या महाराष्ट्रासारख्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार झालेले ते शंकरराव चव्हाण होते . आमदार , मंत्री , मुख्यमंत्रीपद भूषवूनही त्यांचं मुंबईत घर नव्हतं !
बाय द वे , तेव्हा माजी मुख्यमंत्र्याला निवास , वाहन आणि पोलिस बंदोबस्त अशा सुविधा नव्हत्या . पुढे १९९५मध्ये सेना-भाजप युतीचं सरकार राज्यात सत्तारुढ झाल्यावर त्या सुविधा माजी मुख्यमंत्री आणि माजी उपमुख्यमंत्र्याना देण्याचा निर्णय झाला तसंच त्या काळात मुंबईहून औरंगाबादला येताना किंवा जाताना मनमाडला जाताना रेल्वे बदलावी लागत असे .
■
लोकप्रतिनिधी इतका जमिनीवर वावरणारा असतो , यावर आजच्या पिढीचा विश्वासच बसणार नाही , अशी स्थिती आहे पण , माझ्या पिढीच्या म्हणजे आज सत्तरीच्या उंबरठ्यावर असलेल्यांना ही बातमी नक्की आठवत असेल . ही आठवण झाली त्याचं कारण सध्या व्हायरल झालेली मार्क रुट ( Mark Rutte) यांची सायकल स्वारी आहे . मार्क रुट हे नेदरलँड या देशाचे सलग १४ वर्ष पंतप्रधान होते . नुकताच त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला . पदाची सूत्रे सोपवल्यावर मार्क रुट कार्यालयाबाहेर आले आणि चक्क सायकल चालवत त्यांच्या घरी रवाना झाले ! इतका साधा राजकारणी असू शकतो आणि तो आपल्या देशात का नाही , अशा चर्चा समाज माध्यमांवर सुरु झाल्या आणि मन भूतकाळात गेलं…मार्क रुट तसंच शंकरराव चव्हाण यांच्यासारखी माणसं आपल्या देशाच्या आणि राज्याच्याही राजकारणात बहुसंख्येनं कशी होती , यांची आठवण झाली आणि जाणवलं , खरंच गेले ते ते दिन गेले…