कोरकू बांधवांचा आत्मानंदी लोकोत्सव : डोलार

-डॉ. पृथ्वीराज सिंह राजपूत
      मेळघाटचे अरण्यपुरुष प्रा. डॉ. एकनाथ तट्टे यांचा आदेश आला. “उद्या मेळघाटात जायचे आहे.” नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे जास्तीची चौकशी टाळून ‘भटकंती किट’गाडीत टाकल्या गेल्या. डॉ. पद्माताई, विदर्भ आंदोलन समितीच्या महिला प्रदेशाध्यक्ष श्रीमती रंजनाताई मामर्डे, त्यांचा मुलगा विक्रम, स्नुषा भाग्यश्री, नातू रुद्र, असा आमचा कुणबा भल्या पहाटे परतवाड्यात दाखल झाला. सरांच्या घरी, कोरकू समाजातील उच्चशिक्षित इंग्रजी विषयाचे प्राध्यापक सूरज कासदेकर व गवळी समाजाचे नव्या उमेदीचे प्रा. उमेश आलोकर आमची वाट बघत होते. सौ. नीताताई तट्टे यांच्या नेहमीच्या आग्रही चहा फराळानंतर लगेच आमची मेळघाटवारी सुरू झाली.
    परतवाडा, बहिरम, खोमई, सावलमेंढा या मार्गे भैसदेहीला आलो. तिथून पुढचा मार्ग काहीसा नवखा होता. गाडी गोटुटोला मार्गाने चांदू, रंभा, नांदा, रातामाटी, पुढे तापी नदी पार करून चिल्लौर, बेहडा, झिंज़िरीनंतर लगतच्या डुलारिया, दामजीपुरा बाटली जीर्णा, जावस, गोसाई खेडा, बाबरी टोली, कामोट या गावांना वळसा घालून अखेर घनदाट जंगलातील, जवळपास दोनशे किमी प्रवासानंतर गंतव्य स्थळ चाळीदा येथे पोहचलो.
       चाळीदा गावात रस्त्याच्या दुतर्फा  घरांच्या लांब रांगा आहेत. चार पाच घरे गेली, की शेत शिवारातील वेली फुलांनी सजविलेला डोलार झूला लावलेला होता. अख्ख्या गावभर डोलारची लगबग जाणवत होती. किशोरवयीन मुला मुलींचा आनंद ओसंडून वाहत होता.
गावाच्या वरच्या टोकाला प्रा. सूरज यांचे चुलत बंधू झनकलाल उर्फ डावलू यांच्या घरी पोचलो. ते सागवान लाकूड फाट्यांचे कोरकू पद्धतीचे शेणामातीने सारवलेले स्वच्छ व निटनेटके घर होते. समोरच्या प्रशस्त ओसरीत खाटांवर अंथरून टाकून केलेली बैठक व्यवस्था, कुटुंबातील लहान-थोरांचे भावस्पर्शी आदरातिथ्य, हे सर्व पाहून मन अनामिक ऋणानुबंधाने अगदी भरून आले. चहापान आटोपल्यावर डावलूच्या कुटुंबासोबत आमच्या गप्पा रंगात येऊ लागल्या. तेवढ्यात कोरकूंच्या विशिष्ट आदीम वाद्यांचा कर्णमधुर, ठसकेबाज नाद कानावर पडू लागला. आता डोलार सुरू होणार असे कुणीतरी सांगितले. आमची उत्सुकता वाढली. ओसरीतून बाहेर रस्त्यावर आलो तर नखशिखांत नटलेल्या तरुणींनी प्रत्येक झुला गच्च भरलेला. लांब लाकडी खांबाच्या झुल्यावर एकदुसरीला अगदी खेटून रंगीबेरंगी पेहेरावात बसलेल्या मुली कोरकू लोकगीते एका सूरात गात होत्या. त्या लयीत उंचं उंचं झोके घेत होत्या.
या गीतांमधून नवरा-बायको, वहिनी-दीर, नणंद-भावजय, सासू-सून अशा विविध नात्यातील वीण, लाडिक रुसवे-फुगवे, राग-प्रेम यातून हळूवारपणे उलगडल्या जात होती.
रस्त्यावर आता पुरुष मंडळी बासरी, मृदंग व  तंतू वाद्याच्या तालावर फेर घरून नाचू लागली. एक मोठ्ठा समूह रिंगण करून दंड लोकनृत्य करू लागला. अख्खा गाव डोलारच्या रंगात रंगू लागला.
हां हां म्हणता तिसरा प्रहर झाला आणि दिवस कलू लागला.
डोलार खाली उतरविला जाऊ लागला. रानवेली-फुलांनी सजविलेल्या प्रत्येक डोलारच्या दोन्ही धुरा दोन मुलींनी जोडी-जोडीने हाती धरून रस्त्याच्या मधोमध रांग लावली. एका मागून एक असे गावातील सर्व डोलार एकत्रित आले.
आता डोलार उत्सव शिगेला पोचला. एका सूरात एका तालात शेकडो मुलींचा कारवा लयबद्ध नृत्य करीत डोलारच्या विसर्जनासाठी नदीकडे प्रयाण करू लागला. समुद्रात ज्याप्रमाणे लाटा उठतात अगदी तशाच डोलार लाटा रस्त्यावर उठू लागल्या. जिरोती पासून सुरू झालेला हा आदीम लोकोत्सव तब्बल एक महिन्यानंतर डोलारच्या विसर्जनाने समाप्त होतो.
        सातपुड्याच्या कुशीतील आदीम बांधवांच्या या अनोख्या संस्कृतीचा रोमांच अवर्णनीय असतो. यावेळी रिमझिम पावसाच्या सरींनी तर माहोल अधिकच बेधुंद केला.  नकळत आमचा कुणबा सुद्धा लोकगीत-संगीताच्या लहरींवर थिरकत, डोलारच्या झुलव्यात रममाण झाला. हजारो वर्षांपासून मनोभावे आपली आदीम संस्कृती जोपासणाऱ्या कोरकू बांधवांप्रती मन कृतज्ञतेने भरून आले.
प्रा. डॉ. एकनाथ तट्टे यांनी एकूण एक क्षण आपल्या व्हिडिओ कॅमेऱ्यात टिपून ठेवला.
Previous articleब्रिटीश डॉक्टरच्या भूताची गोष्ट!
Next articleSlow life म्हणजे काय?
Team Media Watch
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here