– अविनाश दुधे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने १०० व्या वर्षात पदार्पण केलंय. संघ ही संघटना तुम्हाला आवडो, न आवडो. तिच्या कार्याबाबत, कार्यपद्धतीबाबत अनेक शंका, आक्षेपही असू शकतात, किंबहुना ते आहेतच. मात्र आज ह्या घडीला केवळ भारतातीलच नव्हे, तर जगातील ती एक भक्कम व ताकतवर संघटना आहे, ही गोष्ट कबूल करावीच लागते. आज समाजजीवनाचे असे एकही क्षेत्र नाही, जिथे संघ परिवाराने शिरकाव केला नाही. प्रत्येक क्षेत्रात माणसांचे भरभक्कम जाळे विणण्यासोबतच सर्व सत्ताकेंद्रे संघाने ताब्यात घेतली आहेत. लोकशाहीचे जे चार स्तंभ मानले जातात, त्यासह समाजजीवनावर प्रभाव टाकणाऱ्या आणि जनसामान्यांचे आयुष्य प्रभावित करणाऱ्या सर्व क्षेत्रांत संघाने शिरकाव केला आहे आणि तिथे त्यांचा प्रभाव आहे. गेल्या ११ वर्षांत केंद्रातील मजबूत व एकछत्री सरकारमुळे संघ परिवाराच्या प्रभावाचे दबदब्यात रुपांतर झाले आहे. संघ परिवाराचा हा प्रभाव व दबदबा एका रात्रीत निर्माण झाला नाही. गेल्या १०० वर्षात अनेक पिढ्यांतील प्रचारक व स्वयंसेवकांचे अथक परिश्रम, त्याग, निष्ठा आणि समर्पित वृत्तीने केलेल्या कामाने हा प्रभाव निर्माण झाला आहे. आज संघासाठी अनुकूल काळ आहे, पण प्रतिकूल काळातही संघ अतिशय चिकाटी व निष्ठेने काम करत होता. माणसांचे व्यवस्थापन संघ अतिशय कुशलतेने करत होता. मुंगीच्या चिकाटीने संघाने माणसं गोळा केलीत. विविध जातसमूहांच्या आकांक्षांना बळ आणि संधी देत, इतिहास आणि वर्तमानातील अनेक ताकतवर संस्था-संघटना, राजकीय पक्ष, त्यांचे कर्तबगार नेते या सर्वांच्या कार्यपद्धतीचा सखोल अभ्यास करीत, त्यातून आवश्यक धडा घेत संघाने आपली जागा निर्माण केली.
संघ स्थापनेच्या वेळी त्यांनी जी उद्दिष्ट्ये आणि ध्येय निश्चित केली होती, त्यांपैकी काही पूर्ण करण्यात त्यांना यश मिळाले. मात्र संपूर्ण भारत हिंदुमय करणे, हिंदुस्थान हा हिंदुंचाच, अखंड भारत यांसारखी अनेक उद्दिष्ट्ये पूर्ण करणे हे व्यावहारिक नाही. ही स्वप्न म्हणजे दिवास्वप्न आहेत, हे काही अंशी का होईना आता संघाच्या लक्षात येत आहे. एकविसाव्या शतकाच्या पंचवीस वर्षांत उत्तर आणि पश्चिमेतील अनेक राज्यांमध्ये दीर्घकाळ भाजपची सत्ता होती व आहे. केंद्रातही पहिले चार आणि गेले अकरा असे १५ वर्षे संघ -भाजपचे राज्य आहे. सत्ता तुम्हांला ताकत प्रदान करते, अनियंत्रित अधिकार देते पण अनेक विषयांतील आग्रह-दुराग्रह पातळ करायलाही भाग पाडते. तडजोडीच्या राजकारणात अनेकदा कमरेचे काढून डोक्याला बांधावे लागते. ही कसरत आपदधर्माच्या नावाखाली भाजपने अनेकदा केल्याचे देशाने पाहिले आहे. सत्तेसाठी देशातील वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे गणंग सोबत घेऊन भारतीय जनता पक्ष जे सत्तेचं राजकारण करतोय, त्याकडे संघ सोयीस्कर दुर्लक्ष करतो, हे देश अनुभवतोय. सत्तेसाठी ही माणसे कुठल्याही स्तरावर जातात, हे महाराष्ट्रासह देशही मागील काही वर्षांत अनुभवतो आहे. जे निवडून येऊ शकतील, ते कितीही भ्रष्ट असो, गुंडगिरी करणारे असो, व्यवस्था मोडीत काढणारे असो, त्यांच्या मागे ताकत लावण्यात संघही धन्यता मानतो, हे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पहावयास मिळाले.
संघाच्या स्थापनेनंतर गांधी हत्येतील प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष सहभागापासून अनेक आरोप, आक्षेप संघावर सातत्याने होत आले. पण तरीही देशातील संघाची माणसे प्रामाणिक, निष्ठावान, कुठल्याही मोह आणि आमिषाला बळी न पडणारी, तत्त्व आणि मूल्य जपणारी आहेत, अशी अनेकांची भाबडी समजूत होती व आहे . मात्र सत्तेचा स्पर्श होताच संघाच्या माणसांचे पायही इतरांसारखेच मातीचेच आहेत, हे सर्वांच्या लक्षात आलं आहे. साधारण २५-३० वर्षांपूर्वी नागपुरातील अभय पुंडलिक या संघ स्वयंसेवकाने पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून अनेकांची आर्थिक फसवणूक केली होती. तेव्हा संघाचे बौद्धिक प्रमुख मा. गो. वैद्य यांनी ‘संघ स्वयंसेवक नापास झाला’, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर बरंच पाणी वाहून गेलं. जसजशी सत्ता मिळत गेली, तिचा उन्माद चढत गेला आणि आता देशभर संघ आणि भाजपचे स्वयंसेवक, कार्यकर्ते नापास होण्याचे प्रकार नित्याचे झाले. यातून एक बरं झालं. संघाची माणसेही इतरांसारखीच असतात. तीही स्खलनशील असतात. मोह, माया, आमिष त्यांनाही खुणावते. त्यांचाही पाय ढळतो हे देशाने पहिले आहे,अनुभवले आहे. संघ धुरीणांच्या हे लक्षात येत नसणार, अशातला भाग नाही. पण आता काही गोष्टी नियंत्रणाच्या बाहेर गेल्या आहेत. संघ आणि भाजपची सारी हयात कॉंग्रेसवर टीका करण्यात गेली. या देशात जे काही वाईट आहे ते ते सारं काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांचे पाप आहे, हे ते शिरा ताणून बोलत असतात. मात्र आज त्यांची वाटचाल कॉंग्रेसच्याच मार्गावर आहे.
संघ गेल्या १०० वर्षांपासून उत्तम माणूस आणि चारित्र्य निर्मितीच्या गोष्टी करतो आहे. ‘उत्तम माणूस आणि चारित्र्य असलेल्या कार्यकर्त्यांच्या समूहातून हे राष्ट्र महान होईल’ अशी संघाची मांडणी होती व आहे. मात्र सत्ता आणि अनिर्बंध सत्ता सर्व मूल्ये, तत्त्व व आदर्शांवर पाणी फेरते याचा साक्षात्कार आता संघाला होत असणार. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील आजपर्यंतचे सर्वात मोठे नेते म्हणता येईल अशा दोन दिग्गज नेत्यांच्या मृत्यू का आणि कोणत्या परिस्थितीत झाला , याबाबत मोकळेपणाने संघ परिवारातील कार्यकर्त्यांना चर्चा करता येत नाही, अशी ती कारणं आहेत. (हे दोन्ही नेते आम्ही संघ स्वयंसेवक आहोत, असे अभिमानाने सांगत असत) यावरुन उत्तम माणूस आणि चारित्र्य निर्मितीच्या संघाच्या गोष्टी या फोकनाड आहेत, हे लक्षात येतं.
संघ जाहीरपणे ही गोष्ट कबूल करणार नाही, पण केवळ भाजपच नाही तर संघ परिवारातील वेगवेगळ्या संघटनांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सवयी ज्या पद्धतीने बदलत आहेत, त्याचे अनेक किस्से परिवारातीलच अनेक कार्यकर्ते खासगीत सांगतात. ज्यांनी संघटनेत अखिल भारतीय स्तरावरील पदे भूषवली आहेत, त्या माणसांना सत्तेचा स्पर्श झाला की, ते किती भ्रष्ट होतात हे महाराष्ट्राच्या आजी व माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी दाखवून दिले आहे. केवळ आर्थिक अपहाराचा विषय नाही, इतर विषयातही जे पतन झाले आहे, त्याचे किस्से सांगावे तेवढे कमी आहेत. प्रत्येक राज्यात ही स्थिती आहे. याला उत्तर देताना आपदधर्म म्हणून काही गोष्टी कराव्या लागतात, पण आम्ही कॉंग्रेसएवढे भ्रष्ट नाही, असे लटके समर्थन भाजपसह संघ परिवारातील संघटना करत असतात.
पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नैतिक घसरण आणि भ्रष्ट आचरण एवढाच संघासमोरचा चिंतेचा विषय नाही. गेली दहा दशकं जी आव्हानं आणि संकटं दाखवून स्वयंसेवकांना देशासाठी काम करण्यासाठी, प्रचारक, पूर्ण वेळ कार्यकर्ता होण्यासाठी प्रोत्साहित केले जात होते, ते विषय आता कार्यकर्त्यांच्या चेतना जागृत करत नाहीत . सत्तेत, व्यवस्थेत सगळीकडे आपलीच माणसे असताना आता त्याग वगैरे कशाला करायचा, असा प्रश्न स्वयंसेवकांना पडायला लागला आहे. निष्ठेने, व्यवस्था बदलण्याच्या तळमळीने काम करणाऱ्या संघ स्वयंसेवकांच्या पाठीमागे संघ उभा राहत नाही. तिथे मूल्यांपेक्षा व्यवहार पाहिला जातो, हे वास्तव आता परिवारातील कार्यकर्त्यांच्या लक्षात येत आहे. सत्तेत आणि व्यवस्थेत उच्च पदांवर असलेल्या माणसांच्या वर्तन आणि व्यवहारात जी विसंगती दिसतेय त्यातूनही कार्यकर्ते विचार करायला लागले आहेत. याशिवाय अधिकाधिक व्यक्तिकेंद्रित आणि चंगळवादी होत असलेल्या समाजात देशासाठी त्याग करणे, प्रचारक म्हणून आयुष्य झोकून देणे, ही उदाहरणे आता कमी होत चाललीय. संघ-भाजपची अनेक मंडळी एवढ्या वर्षांतील साधेपणा, नि:स्वार्थीपणा, मूल्यांवरील ठाम विश्वास हे विसरून प्रवाहपतित होत असताना आगामी काळात संघ कुठल्या मुद्द्यांवर देशातील तरुणाईला देशासाठी काही वर्ष देण्याचे आवाहन करेल, हा उत्सुकतेचा विषय आहे. प्रचारक ही संघातील वैशिष्ट्यपूर्ण व्यवस्था पुढील काळात नामशेष झाली तर काहीही नवल वाटायचे कारण नाही. संघाला आपल्या शाखांचे खूप कौतुक आहे. दरवर्षी देशात किती शाखा आहेत, त्यात कशी वाढ होते आहे, याची आकडेवारी जाहीर केली जाते. मात्र वास्तव हे आहे की, त्यालाही ओहोटी लागली आहे .
भाजप सर्वत्र सत्तास्थानी आहे म्हणून संघ-भाजपचा विचार आपल्याला कसा आकर्षित करतो आहे, असा आभास निर्माण करणाऱ्यांची गर्दी वाढते आहे, हे खरे आहे . पण हे सारे महाराष्ट्राच्या राजकारणातील एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटातील नेत्यांसारखे ‘जिधर दम, उधर हम’ प्रवृत्तीची गर्दी आहे. त्यांची निष्ठा विचारांवर नाही. सत्ता, पैसा आणि आपले हितसंबंध कसे सुरक्षित राहतील हीच त्यांची प्राथमिकता आहे. संघासमोर हा मोठा धोका आहे. प्रामाणिक, निष्ठावान कार्यकर्ते अजूनही सतरंज्या उचलत आहेत आणि बाजारबुणग्यांना सोन्याचे दिवस आले आहेत. काल्पनिक राक्षसांना पराभूत करण्याच्या उन्मादात, आपल्यातही राक्षस जन्माला येतो आहे, याचा मात्र संघाला- भाजपाला विसर पडतोय. कॉंग्रेसमध्येही नेमके असेच झाले होते. स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि नंतरही काही वर्षे समर्पित भावनेने, निष्ठेने, देशविकासासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांची कॉंग्रेसमध्ये गर्दी होती. त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामही केले. मात्र पुढे बाजारबुणग्यांची गर्दी वाढली. सत्तेसमोर सारेच गौण ठरले. भाजपही त्याच वाटेवर आहे. संघाला सर्व काही योग्य मार्गावर आणू , माणसांचे व्यवस्थापन करू हा आत्मविश्वास असला तरी, सत्ता नावाचा प्रकार कसा भस्मासूर असतो आणि तो सारं काही स्वाहा करतो, याचे पुरेसे भान आल्याचे दिसत नाही .
संघाचे हे नैतिक पतन अनेक वर्षांपासून सुरू आहे. संघाच्या १०० व्या वर्षात या पतनाचा वेग अचंबित करणारा आहे. काँग्रेसच्या विषयात अनेक वर्षांपूर्वी हे घडलं होतं, मात्र आम्ही इतरांपेक्षा वेगळे असा टेंभा मिरवणारे त्याच मार्गावर आहेत. काळ कोणाला माफ करत नाही. आज काँग्रेस जात्यात आहे. संघ-भाजप सुपात आहे, एवढाच तो फरक. आणखी काही वर्षांनी ‘गाढवही गेले आणि ब्रह्मचर्यही गेले’ असे म्हणण्याची पाळी संघावर आली तर नवल वाटायला नको! मराठीतील नामवंत कादंबरीकार रंगनाथ पठारे यांची ‘ताम्रपट’ ही गाजलेली कादंबरी आहे . स्वातंत्र्यपूर्व काळात गांधी विचार आणि एकंदरीतच स्वातंत्र्य चळवळीतील विचार आणि मूल्यांनी भारावलेल्या तीन मित्रांची ती कहाणी आहे. स्वातंत्र्य मिळाल्यावर एक राजकारण आणि सहकार क्षेत्रात, एक शिक्षक बनेल उद्योजक होतो, एक मात्र विचार आणि मूल्यांवर ठाम राहून अविरत काम करत राहतो. ही कादंबरी असली तरी कॉंग्रेसच्या अध:पतनाची कहाणी आहे. संघ परिवाराचा सध्याचा प्रवास डोळसपणे टिपणारा कोणी संवेदनशील लेखक जर असेल, सेम ‘ताम्रपट’ सारखीच कादंबरी पुन्हा जन्माला येऊ शकेल आणि ती संघ परिवाराच्या अध:पतनाची कहाणी असेल.
हे सुद्धा वाचा – राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी काही प्रश्न – https://mediawatch.info/a-few-questions-for-rss-by-avinash-dudhe/
…………………………………………
(लेखक ‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक, पब्लिकेशन व वेब पोर्टलचे संपादक आहेत )
8888744796
………………………………………….
अविनाश दुधे यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –अविनाश दुधे– type करा आणि Search वर क्लिक करा.