प्रतिभा आणि प्रतिमा!

(‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०२५)
-प्रकाश अकोलकर
शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या पाच-सहा दशकांच्या राजकीय कारकर्दीत अनेक चढउतार पाहिले. अनेकदा या दोघांनाही शून्यातून सुरुवात करावी लागली; पण ते आपल्या राजकीय चातुर्याच्या तसंच शहाणपणाच्या जोरावर महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर नवनवं नेपथ्य उभं करत राहिले. ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव यांनी पण तोच वसा पुढं चालवला. त्यामुळे आज बाळासाहेब आपल्यात नसले आणि पवार ८५ व्या वर्षी तरुणाच्या उमेदीनं राज्यभरात संचार करत असल्याने, या दोन नेत्यांना बाजूस सारून महाराष्ट्राचं राजकारण तसूभरही पुढे सरकू शकत नाही, हेही गेल्या अडीच-तीन दशकांत सतत दिसून आलं आहे.
        मराठी भाषकांच्या या स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती १९६० साली झाली आणि संयुक्त महाराष्ट्र समितीच्या प्रदीर्घ काळ सुरू असलेल्या प्रखर आंदोलनानंतर मिळालेला हा ‘महाराष्ट्राचा मंगलकलश’ यशवंतराव चव्हाण यांच्या हातात अलगद पडला, तेव्हापासून पहिली दोन दशकं राज्याच्या राजकारणावर त्यांचाच वरचष्मा होता. पण, त्याही काळात ठाकरे यांनी आपल्या चार नेत्यांना मुंबईचं महापौरपद आपल्या चतुर राजकीय खेळींनी मिळवून दिलं होतं. मात्र, त्यानंतर पवार आणि ठाकरे हेच दोन ‘ब्रॅण्ड’ महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावरील नेपथ्य कसं असेल, ते ठरवत आले आहेत.
             पवार आणि ठाकरे यांचंच नाणं महाराष्ट्राच्या राजकारणात खणखणीतपणे वाजतं, याची साक्ष त्यांच्याच विरोधात उभ्या ठाकलेल्या नेत्यांनीही अनेकदा दिली आहे. १९८५ नंतर आणि विशेषत: १९८७ मध्ये मुंबईतील पश्चिम उपनगरात झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीनंतर ठाकरे यांनी पवारांशी उभा दावा पुकारला. अनेकदा असभ्य भाषेत त्यांच्यावर शिवराळ अशी टीकाही केली. पण, त्यापूर्वी दोन-अडीच वर्षं आधीच गिरणी संप शिगेला पोचलेला असताना, याच ठाकरे यांनी पवार तसंच जॉर्ज फर्नांडिस यांच्या समवेत शिवाजी पार्कवर जाहीर सभा घेतली. तेव्हा तर त्यांनी महाराष्ट्राचं भवितव्य यापुढे पवार यांच्याच हातात सुरक्षित राहील, अशी चक्क ग्वाही दिली होती! पण, ठाकरे आणि पवार या दोन ‘ब्रॅण्ड’ची गरज, त्यांच्याशी दगाबाजी करणाऱ्यांनाही कशी भासत होती, त्याचं खऱ्या अर्थानं प्रत्यंतर २०२२ मध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आपापल्या नेतृत्वाविरुद्ध बंड पुकारलं, तेव्हा आली.
        शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दगा देऊन, भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी केल्यानंतर त्यांच्या पोस्टर्सवर सतत आनंद दिघे यांच्या समवेत चक्क बाळासाहेब ठाकरे यांचेही छायाचित्र बघायला मिळते. शिंदे यांच्या या दगाबाजीनंतर काही महिन्यांतच अजित पवार यांनीही तोच मार्ग स्वीकारत भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तेही आपल्या पोस्टर्सवर शरद पवार यांचं छायाचित्र वापरत असत. मात्र, शरद पवार यांच्या गटानं त्यास सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आणि न्यायालयानं, अजित पवार गटास तसं न करण्याचा आदेश दिला! एवढंच नव्हे तर ‘तुम्हाला तुमचं स्वतंत्र अस्तित्व दाखवायचं असेल तर तुम्ही तुमची नवी ओळख (आयडेंटीटी) निर्माण करा,’ अशी तंबीही दिली. ‘पवार ब्रॅण्ड’चं महत्त्वच सर्वोच्च न्यायालयाच्या या टिपणीमुळे अधोरेखित झालं. तर ‘ठाकरे ब्रॅण्ड’ची अधिकाधिक मोडतोड करण्यासाठी भाजप गेली दहा वर्षं सातत्यानं करत असलेल्या कारवाया बघता, तो ‘ब्रॅण्ड’ही राज्याच्या राजकारणात किती महत्त्वाचा आहे, त्याचीच प्रचीती येत राहते.
।।। ।।। ।।।
शरद पवार यांनी आपल्या आयुष्यातली पहिली-वाहिली निवडणूक लढवली ती १९६७ मध्ये आणि वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी ते आमदार झाले. त्याच्या एकच वर्ष आधी बाळ ठाकरे नावाच्या एका व्यंगचित्रकारानं ‘शिवसेना’ नावाच्या मराठी माणसांच्या संघटनेची स्थापना केली होती. शिवसेनेचा पहिलाच जाहीर मेळावा शिवाजी पार्कवर भरवण्याचं धाडसही त्यांनी त्याच वर्षी ३० ऑक्टोबर १९६६ रोजी प्रत्यक्षात आणलं. त्या मेळाव्याला प्रचंड गर्दी झाली आणि बाळ ठाकरे या व्यंगचित्रकाराचं रूपांतर ‘बाळासाहेब’ ठाकरे यांच्यात झालं.
          या दोन्ही घटनांना आज जवळपास सहा दशकं लोटली आहेत.
पवार आज ८५ वर्षांचे आहेत तर बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्षं येत्या जानेवारीत सुरू होत आहे. पवार आजही महाराष्ट्राच्या राजकारणात कमालीचे ‘ॲक्टिव्ह’ आहेत आणि बाळासाहेबांच्या निधनाला आता एक तप उलटून गेलं आहे. तरीही महाराष्ट्राचं राजकारण आजही ‘पवार’ आणि ‘ठाकरे’ याच दोन ‘ब्रॅण्ड’भोवती घुटमळत आहे. गेल्या पाच वर्षांत या दोन्ही ‘ब्रॅण्ड’ची मोडतोड करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षानं, केंद्रातील सत्तेमुळे हाती आलेल्या तपास यंत्रणांचा वापर करून केला. त्यातून आज महाराष्ट्रात उद्धव तसंच राज हे दोन ठाकरे आणि तीन सेना असं नेपथ्य राजकीय रंगमंचावर उभं राहिलं. पवारांच्या पक्षाचेही दोन तुकडे भाजपच्या याच दीर्घद्वेषी राजकारणानं केले.
        तरीही आज नसलेले ठाकरे आणि वयाच्या ऐंशीतही तरुणाच्या उमेदीनं उभे ठाकलेले पवार यांना वगळून महाराष्ट्रात राजकारण होऊ शकत नाही, हे खरं आहे. पण पुढचं वर्ष मात्र हे या दोन्ही ‘ब्रॅण्ड’साठी त्यांच्या सहा दशकांच्या प्रवासातील सर्वांत कठीण वर्ष असणार आहे. याच म्हणजे २०२६ या वर्षात महाराष्ट्रात मुंबई-ठाणे-नवी मुबई-पुणे तसंच आदी महानगरांत महापालिका निवडणुका होऊ घातल्या आहेत. ‘ठाकरे ब्रॅण्ड’साठी हा सर्वार्थानं अस्तित्वाचा प्रश्न आहे. राजधानी मुंबईतील महापालिका गेले अडीच-तीन दशकं मध्यंतरीचा तीन वर्षांचा कालावधी वगळता शिवसेनेच्याच ताब्यात आहे. ही महापालिका काबीज करण्यासाठी आणि त्याचबरोबर ‘ठाकरे ब्रॅण्ड’चं अस्तित्वच महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावरून पुसून टाकण्यासाठी भाजपनं आतापासूनच सर्वशक्तिनिशी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यास उत्तर देण्यासाठी उद्धव आणि राज या दोन ठाकरे बंधूंचा प्रवास ‘भाऊबंदकी’ या दोन दशकं रंगलेले नाट्यानंतर आता ‘भाऊबंधना’च्या दिशेनं होईल, अशी आशा ओरिजिनल ‘ठाकरे ब्रॅण्ड’च्या चाहते करत आहेत. हे दोन्ही म्हणजे राज तसंच उद्धव हाच ‘ठाकरे ब्रॅण्ड’ वाचवण्यासठी एकत्र येतील, असे संकेत मिळत असले तरी भूतकाळात या दोन्ही बंधूंनी कधीही ‘लॉजिकल’ विचार करून कोणताही निर्णय घेतल्याचा इतिहास नाही. शिवाय, हे दोघे एकत्र आले तरी, दोघांच्याही मतपेढ्या म्हणजे मुंबईतील मराठी माणसांचे मोजकेच उरलेले बालेकिल्ले बघता, त्या दोघांसाठीही जागावाटप हा एकत्र येण्यापेक्षाही कठीण मुद्दा आहे. त्यामुळे ‘ठाकरे ब्रॅण्ड’च्या भवितव्याचा फैसला येत्या वर्षभरात होईल, असं दिसत आहे.
।।। ।।। ।।।
शिवसेनेच्या स्थापनेनंतरच्या या सहा दशकांच्या प्रदीर्घ प्रवासात महाराष्ट्रात आणि विशेषत: मुंबापुरीत अनेक नेत्यांची मांदियाळी उभी राहू पाहत होती. त्यात मुंबईतील गिरणी कामगारांच्या हातात ‘लाल बावटा’ देणारे कॉम्रेड डांगे, याच महानगरातील महापालिका कर्मचाऱ्यांच्या गळ्यातील ताईत असलेले साथी जॉर्ज फर्नांडिस,  पुढे १९८०चं दशक उजाडताना गिरणी कामगारांचा तो अभूतपूर्व संप पुकारणारे डॉ. दत्ता सामंत, गोरेगावच्या ‘पाणीवाली बाई’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मृणाल गोरे अशा अनेकांनी अल्प-स्वल्प काळ का होईना, मुंबईवर अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न केला होता. पण ते सारे नेते काळाच्या पडद्याआड गेल्यावर त्यांचं तोडकं-मोडकं राज्यही आपसूकच खालसा झालं होतं. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना होण्यापूर्वी स. का. पाटील यांना मुंबईचे ‘अनभिषिक्त सम्राट’ म्हटलं जात होतं. लागोपाठ तीन वर्ष मुंबईच्या महापौरपदी विराजमान होण्याचा एक अनोखा विक्रमही त्यांच्या नावावर आहे.
 ‘ठाकरे ब्रॅण्ड’ मात्र या साऱ्यांना पुरून उरला.
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना १९६० साली ती केवळ कॉम्रेड डांगे, साथी एस. एम. जोशी, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे आणि आचार्य प्र. के. अत्रे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या झंजावाती आंदोलनामुळेच, हे स्पष्ट आहे. मात्र, मराठी भाषकांच्या या राज्याच्या निर्मितीनंतर ते आंदोलन, अस्मितेचा तो निखारा, ते मराठी भाषा प्रेम, ती केंद्र सरकारच्या विरोधातील धगधगती ज्वाला हळूहळू विजत गेली आणि महाराष्ट्रात भले मऱ्ह्याठ्यांचं राज्य आलं असलं तरी मुंबईच्या आर्थिक नाड्या मात्र अमराठी-परप्रांतियांच्याच हातात असल्याचं स्पष्ट होत गेलं.
           मुंबईत मराठी भाषकांची उपेक्षा होत आहे, असं हळूहळू दिसू लागलं होतं. मात्र, उपेक्षेच्या त्या असंतोषाला वाचा फोडण्याचं काम बाळासाहेब ठाकरे यांनी या मराठी भाषकांच्या स्वतंत्र राज्याच्या निर्मितीनंतर अवघ्या तीन महिन्यात सुरू केलेल्या ‘मार्मिक’ या व्यंगचित्र-साप्ताहिकातून केलं. त्याची परिणती बाळासाहेबांच्या भोवती मुंबईतील बेरोजगार तरुणांचा गोतावळा उभा राहण्यात झाली. शिवसेनेची स्थापना ही एका अर्थाने महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर ‘संयुक्त महाराष्ट्र समिती’ म्हणजेच तेव्हाचा विरोधी अवकाश लृप्त झाल्यामुळे घडलेला अपघात होता. समितीनं पेटवलेल्या मराठी अस्मितेच्या अवकाशावरच बाळासाहेब ठाकरे यांनी कब्जा केला आणि मुंबई-ठाणे-नवी मुंबई अशा मोजक्याच टापूत वर्चस्व गाजवणारा हा ‘ब्रॅण्ड’ स्थापनेनंतर दोन दशकांनी महाराष्ट्रभर लोकप्रियही करून दाखवला. पण त्यासाठी आपला मराठी बाणा बासनात बांधून ठाकरे यांना हिंदुत्वाची भगवी शाल खांद्यावर घेणं भाग पडलं होतं. त्यात ते यशस्वी झाले. ठाकरे यांनी १९८५ मध्ये मुंबई महापालिका जिंकल्यावर ‘आता घोडदौड महाराष्ट्रात!’ अशी घोषणा दिली. तेव्हा विश्व हिंदू परिषदेचं ‘राम मंदिर आंदोलन’ वेग घेत होतं. तो मुद्दा हाती घेत ठाकरे यांनी ‘गर्व से कहो हम हिंदू है!’ ही विश्व हिंदू परिषदेची घोषणा विलेपार्ले या मुंबईच्या पश्चिम उपनगरात १९८७ मध्ये झालेली पोटनिवडणूक जिंकताना घराघरांत पोचवली. त्यामुळेच १९८०च्या दशकाच्या उत्तरार्धात विश्व हिंदू परिषदेनं पुकारलेल्या रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनावर केवळ दूरवरून दृष्टिक्षेप टाकणाऱ्या भाजपनं हिमाचल प्रदेशातील पालमपूर येथे झालेल्या अधिवेशनात ठराव करून, हा हिंदुत्वाचा वसा अधिकृतपणे हातात घेतला आणि महाराष्ट्रातील ‘शिवसेना-भाजप युती’ची पायाभरणी केली.
            आज ठाकरे ‘ब्रॅण्ड’ वाचवण्यासाठी उद्धव तसंच राज हे  दोन ‘ठाकरे’भाजपशी प्राणपणानं लढण्याच्या गोष्टी करत आहेत. मात्र, याच भाजपशी ‘युती’ करून बाळासाहेबांनी त्या पक्षाला महाराष्ट्राचं मैदान खुलं करून दिलं, ही त्याची राजकीय आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. खरं तर ते नव्वद दशक संपत असताना, महाराष्ट्रावर बाळासाहेबांनी कमालीची पकड मिळवली होती. १८८५ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेना फक्त मुंबईत लढली आणि छगन भुजबळ यांच्या रूपानं ठाकरे यांचा एकमेव आमदार विधानसभेत जाऊ शकला होता. पण पुढच्या पाचच वर्षांत म्हणजे १९९० मध्ये झालेल्या निवडणुकीत सेना-भाजप युतीचे चक्क ९४ आमदार निवडून आले आणि त्यात शिवसेना आमदारांची संख्या ५२ होती! भाजप महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं फोफावला तो, याच निवडणुकीत जिंकून आलेल्या ४२ आमदारांच्या जोरावर. त्यानंतर ठाकरे यांनी कधीही स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला नाही. अखेरीस २०१४ मध्ये मोदी लाटेच्या जोरावर भाजपनंच शिवसेनेशी युती तोडली. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी तेव्हा स्वत:च्या बलबुत्यावर भाजप, काँग्रेस तसंच राष्ट्रवादी आणि हो राज यांची मनसेही, अशा चार पक्षांशी लढा देत आणि त्यातही मोदी लाटेचा सामना करत ६३ आमदार निवडून आणले! त्यामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर असताना बाळासाहेब १९९० वा ९५ मध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवते तर निकाल काय लागले असते, याचा फक्त अंदाजच करता येतो. त्यामुळेच १९८९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेशी युती केल्यानंतरच्या पुढच्या दोन-अडीच दशकांत, ठाकरे यांनी कितीही आक्रमक बाज दाखवला आणि मोठा आवाज लावून, अवहेलना केली तरी भाजपनं ही युती कधीही तुटू दिली नाही, हे या ‘ठाकरे ब्रॅण्ड’चं मोठंच यश मानावं लागेल. अर्थात, ठाकरे यांनीही कधी तसा विचार करून नवा राजकीय डाव मांडण्याचा विचार केला नाही, हेही तितकंच वास्तव आहे.
             पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर तीन वेळा स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या. पहिली निवडणूक अर्थातच इंदिरा गांधी यांनी आणीबाणीनंतर पवारांचं सरकार बरखास्त केल्यानंतर १९८० मध्ये झाली. तेव्हा आणि पुन्हा १९८५ मध्येही पवार काँग्रेसविरोधात लढले. मात्र, या दोन्ही वेळा पवार एकटे नव्हते. १९७८ मध्ये त्यांनी उभ्या केलेल्या ‘पुलोद’मधील (पुरोगामी लोकशाही दल) सहकारी पक्ष म्हणजेच डावे, समाजवादी तसंच भाजपही त्यांच्या समवेत होते. पण या दोन्ही निवडणुकांत पवारांचा पक्ष साठीही ओलांडू शकला नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्या दोन्ही निवडणुकांत इंदिरा गांधी लाट होती. १९८५ मधील निवडणुका तर श्रीमती गांधी यांच्या अमानुष हत्येनंतर काही महिन्यांतच झाल्या होत्या. तेव्हा देशभरात काँग्रेसच्या बाजूनं सहानुभूतीची मोठी लाट उसळली होती आणि त्या आधी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘चारसो पार’ मजल मारली होती.
             पवार खऱ्या अर्थानं एकटे लढले ते १९९९ मध्ये. त्या आधी १९९५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सेना-भाजप युतीनं त्यांच्याच हातातून सत्ता हिसकावून घेतली होती. त्यानंतर पवारांनी काँग्रेसमधून आपली हकालपट्टी ओढवून घेतल्यानं महाराष्ट्रात सत्तारूढ सेना-भाजप युती विरुद्ध काँग्रेस विरुद्ध पवारांनी नव्यानंच स्थापन केलेली राष्ट्रवादी काँग्रेस असा तिरंगी सामना झाला. त्यात पवारांनी ५८ जागा जिंकल्या आणि महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा हुकमाचा एक्का आपल्याच हातात असल्याचं दाखवून दिलं. तेव्हा पवारांची प्रतिमा गांधी घराण्याचे विरोधक या रूपात उभी राहिली होती. त्यामुळे पवार सेना-भाजप युतीबरोबर जातील, अशा वावड्यांचं पेव फुटलं होतं. पण आपली पुरोगामी प्रतिमा कायम राखली आणि चक्क काँग्रेसबरोबरच हातमिळवणी करून सरकार स्थापन केलं.महाराष्ट्रात ‘पवार ब्रॅण्ड’ किती महत्त्वाचा आहे, त्यावर या निकालांनी शिक्कामोर्तब केलं होतं. विधानसभेच्या २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतरही हाच ‘पवार ब्रॅण्ड’ कामास लागला आणि ‘महाविकास आघाडी’चं गणित जमवून भाजपला सत्तेपासून रोखण्यात यशस्वी झाला.
त्यानंतर जे काही घडलं, तो आता इतिहास झाला आहे.
।।। ।।। ।।।
शिवसेना हा महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावरील एक अपघात होता की काय, याची चर्चा नेहमीच होत असते. पण एक योगायोग बघा. शिवसेना साठीच्या दशकात प्रवेश करत असताना, महाराष्ट्रात हिन्दी सक्तीचा अनाकलनीय निर्णय ‘महायुती’ सरकारने घेतला. उद्धव तसंच राज या ‘ठाकरे ब्रॅण्ड’च्या वारसदारांच्या हातात त्यामुळे सरकारच्या विरोधात आयतंच कोलित येऊन पडलं. शिवाय, बाळासाहेबांनी खांद्यावर घेतलेली हिंदुत्वाची भगवी शालही पुन्हा खुंटीवर लटकवणं भाग पडलं आहे. मात्र, आता भाजपनं हातात दिलेलं ते कोलित आणि तो पलिता हाती घेऊन हे दोघे बंधू महायुती सरकार आणि मुख्यत: भाजप यांच्या विरोधात कितपत आग उभी करू शकतात, ते बघण्यासाठी आता कधीही जाहीर होऊ शकणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निकालांची वाट बघावी लागणार आहे,
।।। ।।। ।।।
बाळ ठाकरे यांचं रूपांतर ‘बाळासाहेबा’मध्ये शिवसेनेच्या स्थापनेनंतर वर्षभरातच झालं होतं. पण शरद पवार यांना मात्र ‘पवार साहेब’ या उपाधीसाठी बराच कालावधी लागला. १९६७ मध्ये पवार पहिल्यांदा आमदार झाले. बहात्तरच्या निवडणुकीनंतर यशवंतराव चव्हाण यांनी शब्द टाकल्यामुळे राज्यमंत्रिपदही त्यांच्याकडे चालून आलं. पुढे यथावकाश ते मंत्रीही झाले. पण तरीही ते ‘शरद पवार’च होते. पुढे वसंतराव नाईक यांची जागा शंकरराव चव्हाणांनी घेतली आणि त्यानंतर ती आणीबाणीची दोन-अडीच वर्षं गेली. पवार मंत्री होते. शिक्षण, कृषी खात्यात ते मनापासून रस घेत होते. शिक्षण खात्यात त्यांनी काही मूलगामी बदलही घडवून आणले. पण तरी ते ‘शरद पवार’च होते. ‘साहेब’ ही उपाधी खऱ्या अर्थानं त्यांच्या नावामागे लागायची होती.
        मात्र, आणीबाणीनंतर काँग्रेस फुटली आणि नंतरच्या विधानसभा निवडणुकीनंतर एकमेकांविरोधात लढलेल्या दोन काँग्रेसनीच एकत्र येऊन वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनवलं. तेव्हा एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या या दोन पक्षांचं सरकार कसंबसं चालत असताना, शरद पवार यांनी इंदिरा गांधी यांच्या एकाधिकारशाहीच्या विरोधात बंड केलं आणि जनता पक्षाशी हातमिळवणी करून सरकार स्थापन केलं.
वयाच्या अवघ्या अडतिसाव्या वर्षी मुख्यमंत्रीपद हासील करणारे शरद पवार आता ‘पवार साहेब’ झाले होते.
शरद पवार यांच्या आयुष्यातील हा ‘टर्निंग पॉईंट ’ जसा होता, त्याचबरोबर हीच आजतागायत महाराष्ट्राच्या राजकारणाला पुरून उरणाऱ्या ‘पवार ब्रॅण्ड’ची मुहूर्तमेढ होती. पवार साहेबांच्या या एकाच निर्णयामुळे देशभरात त्यांचं नाव जाऊन पोचलं आणि महाराष्ट्राबरोबरच देशपातळीवरील राजकारणातही पावलं टाकायला त्यांनी सुरुवात केली.
।।। ।।। ।।।
त्या दरम्यान बाळासाहेब ठाकरे यांचं राजकारण हे प्रामुख्यानं मुंबई, ठाणे, नवी मुंबई अशा काही राज्यातल्या महापालिकांपुरतंच मर्यादित होतं. अर्थात, तिथंही कधी निर्विवाद बहुमत हे त्यांना मिळालं नव्हतं. तरी काँग्रेसमध्ये १९६९ मध्ये पडलेली फूट आणि मुंबई महापालिकेतील गटातटाचं राजकारण याचा फायदा उठवत, बाळासाहेबांनी अल्पावधीतच सत्तेतील कळीची पदं हासिल करण्याची चतुराई दाखवली होती. शिवसेनेच्या स्थापनेनंत अवघ्या तीनच वर्षांत म्हणजे १९७० साली शिवसेनेचे नेते डॉ. हेमचंद्र गुप्ते मुंबईचे महापौर झाले होते. हे ठाकरे यांच्या साटेलोट्याच्या चतुर राजकारणाचंच फलित होतं. पुढच्या १५ वर्षांत ठाकरे यांनी मुंबई महापालिकेवर निर्विवाद सत्ता स्थापन केली आणि त्यानंतरच ‘ठाकरे ब्रॅण्ड’ ही नेमकी काय चीज आहे, याची जाणीव त्यांना झाली.
त्यानंतरच ‘आता घोडदौड महाराष्ट्रात!’ आणि ‘गाव तेथे शाखा, घर तेथे शिवसैनिक!’ अशा घोषणा देत त्यांनी महाराष्ट्रात आपले हात-पाय पसरायला सुरुवात केली
।।। ।।। ।।।
या दरम्यान पवार साहेब नेमकं काय करत होते?
काँग्रेसमधून बाहेर पडून आणि जनता पक्षाशी हातमिळवणी करून, ते १७७८ मध्ये मुख्यमंत्री झाले होते, हे तर खरंच. पण आणीबाणीनंतर आलेलं जनता पक्षाचं सरकार अवघ्या दोन-अडीच वर्षांत कोसळलं आणि १९८० मध्ये सामोऱ्या आलेल्या मध्यावधी निवडणुका जिंकून इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान झाल्या होत्या आणि पवार विरोधी बाकांवर जाऊन बसले होते. त्यानंतर पुढची काही वर्षं पवारांच्या पायाला भिंगरी लागलेली होती. विधिमंडळाची अधिवेशनं संपली की लगोलग महाराष्ट्र पालथा घालायला मुंबईबाहेर निघत. याच दौऱ्यांमधून त्यांनी मराठवाडा तसंच उत्तर महाराष्ट्रात आपलं जबरदस्त बस्तान बसवलं. वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र हा त्यांच्यावर काहीसा नाराज होता. तर विदर्भ हा प्रामुख्यानं आपली निष्ठा इंदिरा गांधी यांच्या चरणी वाहून मोकळा झाला होता.
            पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडून मुख्यमत्रीपद हासील केलं, त्यास आणीबाणीची पार्श्वभूमी होती. आणीबाणीच्या काळात काँग्रेसमधील प्रस्थापित तसंच सरंजामशाही बड्या नेत्यांनी आपापली साम्राज्यं, आपापल्या टापूत उभी केली होती. पवारांचं ते १९७८ मधील बंड हे एका अर्थानं या बड्या नेत्यांनाही आव्हान होतं. त्याचा फायदाच पवारांना झाला. या नेत्यांच्या मनमानी कारभारामुळे अस्वस्थ असलेली तरुणाई ही पवारांसोबत आली. तेव्हापासूनची आज जवळपास चार दशकं लोटली तरीही पवारावर फिदा असलेली ग्रामीण महाराष्ट्रातील तरुणांची फौज त्यांच्या मागे असते, हे अनेक निवडणुकांमधून दिसून. खुद्द पवारांनीच तरुण आपल्या मागे कसे असतात, त्याचा २०१९ मधील निवडणुकीच्या वेळचा एक किस्सा ‘लोक माझे सांगाती…’ या आपल्या राजकीय आत्मकथेत नमूद केला आहे. ही २०१९ मधील विधानसभा निवडणुकीच्या वेळची गोष्ट आहे. पवार सांगतात : ‘पक्षातून बाहेर पडणाऱ्यांची रांग लागली होती. उदयनराजे भोसले यांनीही अपेक्षेनसार भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी राजीनामा दिल्यानं सातारा लोकसभेचं आव्हानही आमच्यासमोर उभं ठाकणार होतं…. मी निर्धार केला आणि महाराष्ट्रव्यापी संघटनात्मक दौरा सुरू केला. लक्षात आलं की पक्षातला युवावर्ग संतप्त आहे. ज्यांनी सत्तेची पदं भूषवली, मानमरातब मिळवले, सत्तेच्या मखरात सुखेनैव नांदले, त्यांनी संकटाच्या काळात पक्षाच्या गळ्यालाच नख लावण्याचा प्रयत्न केल्यामुळे हा तरुण क्षुब्ध होता. तरुणांची कायम साथ, हे माझ्या राजकीय कारकिर्दीचं वैशिष्ट्य आहे.’
बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय कारकिर्दीचंही नेमकं तेच वैशिष्ट्य आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतरही मुंबईत पदोपदी अवमानित होणाऱ्या आणि नोकऱ्यांच्या शोधात वणवण भटकणारा तरुणच ठाकरे यांच्या पाठीशी उभा राहिला. त्याच्या दुखावलेल्या मनावर बाळासाहेबांनी अस्मितेची फुंकर घातली आणि तेव्हापासून पुढची पाच-सहा दशकं तरुणांचे जत्थे हेच शिवसेनेचं पाठबळ राहिलं. ठाकरे आपल्या सभांमधून त्यांच्याशी संवाद साधत तोही त्याच अस्वस्थ तरुणांच्या भाषेत. ठाकरे यांचं वय वाढत गेलं, पण त्यांची भाषा कधी बदलली नाही. शिवसेनाही आज साठीच्या उंबरठ्यावर उभी आहे. ठाकरे आज नाहीत. पाहिल्या तीन-साडेतीन दशकांत त्यांना मोलाची साथ देणारे शिलेदारही आज नाहीत. पण तरीही तरुणांचा एक समूह या ‘ठाकरे ब्रॅण्ड’च्या पाठीशी उभा आहेच.
              पवार आणि ठाकरे या दोन ‘ब्रॅण्ड’ मध्ये एवढी एकच गोष्ट ‘कॉमन’ आहे आणि ती सोडल्यास हे दोन्ही ‘ब्रॅण्ड’ महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर अगदी दोन परस्परविरोधी दिशांना तोंड करून गेली पाच-सहा दशकं उभे होते. पण नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या भाजपविरोधानं अखेर या दोन्ही ‘ब्रॅण्ड’ना एकत्र आणलं आहे.
।।। ।।। ।।।
पवार काँग्रेसमधून एकदा बाहेर पडले आणि आठ वर्षांनी पुन्हा काँग्रेसमध्ये गेले, त्यानंतर राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सोनिया गांधी यांनी राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. पुढे पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. या दरम्यान अयोध्येत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारानं ‘बाबरीकांड’ घडवून आणलं आणि एक ऐतिहासिक वास्तू दांडगाई करून जमीनदोस्त केली. नरसिंह राव सरकारचा १९९६ मध्ये पराभव झाल्यानंतर  काँग्रेस गलितगात्र झाल्याचं चित्र उभं राहू पाहत होतं. तेव्हा १९९७-९८ मध्ये काँग्रेसची सूत्रं हाती घ्या म्हणून सोनियांच्या विनवण्या करणाऱ्या नेत्यांमध्ये पवारही होते. त्यानंतर १९९९ मध्ये पवारांनी सोनिया गांधींच्या विदेशी मूळाचा मुद्दा उपस्थित करून काँग्रेसमधून आपली हकालपट्टी ओढवून घेत आपलं स्वतंत्र संस्थान उभं केलं. पण काँग्रेसमधून बाहेर असतानाही आपला चेहरा हा कायम काँग्रेसीच राहील, याची त्यांनी जातीनं दक्षता घेतली. ‘फुले-शाहू-आंबेडकर’ यांचा वारसा महाराष्ट्रात फक्त आपणच चालवतो, असा किमान देखावा तरी त्यांनी मोठ्या चातुर्यानं उभा केला. त्यामुळे एकदा १९७८ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर पुन्हा आठ वर्षांनी १९८६ मध्ये ते आपल्या सर्व सहकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये सामावून जाऊ शकले. त्यानंतर १९९९ मध्ये सोनिया गांधी यांच्या विदेशी मूळाचा मुद्दा उपस्थित करून, त्यांनी आपली हकालपट्टी ओढवून घेतली. पण त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी काँग्रेसशीच हातमिळवणी करून महाराष्ट्राचं राज्यही शिवसेना-भारतीय जनता पक्ष यांच्या ‘युती’कडून हिसकावून घेतलं. त्यावेळी पवार सेना-भाजप युतीबरोबर जाणार, अशा अफवांचं पेव फुटलं होतं. पण, पवारांनी ते न करताही सत्ता संपादन केली आणि आपली ‘पुरोगामी’ प्रतिमा कायम राखली. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेना आणि भाजप तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे चारही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले. तेव्हा भाजपला सत्तास्थापनेसाठी काही मोजक्याच जागा कमी पडत असताना, राष्ट्रवादी पक्षानं स्थिर सरकारसाठी पाठिंबा जाहीर करून खळबळ उडवून दिली होती. पण पुढे भाजपच्या विरोधात लढलेल्या शिवसेनेनंच भाजपशी जमवून घेतलं आणि राष्ट्रवादीला विरोधी बाकांवरच रोखून धरलं. हा राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या इतिहासातील एकमेव अपवाद वगळता बाकी गेली २५ वर्षं पवारांनी आपला तसंच आपल्या पक्षाचाही चेहरा हा पुरोगामीच राहील, याची जातीनं दक्षता घेतली. संपूर्ण देशात महिला धोरण राबवणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं आणि ते पवारांनी मुख्यमंत्री असताना झालं होतं. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याला मोठा विरोध झाल्यावर तो विषय पवारांनाच मुख्यमंत्री या नात्यानं बासनात बांधून ठेवावा लागला होता. पण पुढे पुन्हा मुख्यमत्रीपद हाती आल्यावर, त्यांनी तो प्रश्न अत्यंत कौशल्यानं सोडवला होता. एवढ्या दोनच बाबी त्यांची पुरोगामी प्रतिमा अधोरेखित करण्यास पुरेशा ठरायला हरकत नसावी. शिवाय, एकीकडे जागतिकीकरणाला पाठिंबा देतानाच, राज्यातील सहकार क्षेत्रावर त्यांनी कायमच मजबूत पकड राखली आहे.
               ठाकरे यांचा चेहरा यापेक्षा पूर्णपणे वेगळा होता. पवार यांच्याप्रमाणे तेही छत्रपती शिवरायांचं नाव सातत्यानं घेत. पण त्यांना शिवाजी महाराजांच्या ‘हिंदवी स्वराज्य संस्थापक’ या प्रतिमेत अधिक रस होता. तर पवारांचा गौरव, त्यांचे चाहते ‘जाणता राजा’ अशा शब्दांत करत आले आहेत. हा अर्थात, पवारांना त्यापेक्षा ‘रयतेचा राजा’ अशी उपाधी अधिक आवडली असती. ठाकरेही खरं तर एका अर्थानं ‘रयतेचा राजा’ होते. पण, दोघांवर प्रेम करणारी ही ‘रयत’ अगदीच वेगळी होती. महाराष्ट्राचं अवघं राजकारण हे शेती आणि सहकार याच दोन क्षेत्रांवर अवलंबून आहे, याची पवारांना जाणीव होती आणि त्यामुळे आमदारकीची पहिली निवडणूक लढवण्याआधीपासूनच ते अवघा महाराष्ट्र पिंजून काढत असत. त्यांची ही सवय अगदी कर्करोगासारख्या दुर्धर रोगावर मात केल्यानंतरही सुरूच राहिली. अगदी गेल्या वर्ष-दीड वर्षात झालेल्या लोकसभा तसंच विधानसभा निवडणुकांच्या वेळीही या वयात त्यांनी ज्या वेगानं महाराष्ट्रभर संचार केला, तो आश्चर्यचकित करणाराच होता. ठाकरे यांनी १९६६ मध्ये शिवसेनेची स्थापना केल्यानंतरही महाराष्ट्रात आपला पक्ष नेण्याचा पहिली दोन दशकं बिलकूलच विचार केला नव्हता. मुंबई-ठाणे-नवी मुंबई एवढाच टापू त्यांनी आपलं कार्यक्षेत्र म्हणून मुक्रर केला होता. शेती-सहकार अशा महाराष्ट्राच्या राजकारणाचा मुख्य आधार असलेल्या विषयांशी ते फटकूनच वागत. त्यांचं राजकारण हे मुख्यत्वे शिवसेनेची स्थापना केल्यानंतर अल्पावधीतच त्यांना जो काही ‘करिष्मा’ प्राप्त झालं, त्यावरच आधारित होतं आणि ‘मराठी अस्मिते’चा मुद्दा त्यांना या परप्रातींयांचा वरचष्मा असलेल्या मुंबईवर राज्य करण्यास पुरेसा ठरत असे. पण पुढे त्यांनी हिंदुत्वाची भगवी शाल खांद्यावर घेतली आणि ते थेट ‘हिंदूहृदयसम्राट’च झाले.
।।। ।।। ।।।
पवार आणि ठाकरे.
पवारांकडे प्रतिभा होती पण त्यांची प्रतिमा मात्र कायम डागाळलेलीच राहिली. पहिला मुद्दा हा अर्थातच पवार यांच्या विश्वासार्हतेचा होता. १९७८ मध्ये त्यांनी अचानक काँग्रेसमधून बाहेर पडून जनता पक्षाशी हातमिळवणी करून मुख्यमंत्रीपद हासील केलं, तेव्हापासून त्यांनी काँग्रेसच्या म्हणजेच तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला गेला. त्या ‘खंजीरा’स ते आजतागायत दूर भिरकावून देऊ शकलेले नाहीत. पुढे पुन्हा काँग्रेसमध्ये येऊन, ते तीनवेळा मुख्यमंत्री झाले. पण १९९५ मध्ये त्यांना महाराष्ट्राची सत्ता गमवावी लागली, तेव्हा तर त्यांच्या विरोधात गाडीभर पुरावे असल्याची भाषा अण्णा हजारे, गो. रा. खैरनार आदी मंडळी करत होती. त्या आरोपांतूनही ते बाहेर आले आले आणि २०१९ मध्ये तर ‘महाविकास आघाडी’चे शिल्पकार म्हणून, त्यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात मोलाची कामगिरी बजावली. पवारांकडे अफाट प्रतिभा आहे. महाराष्ट्राला प्रगतिपथावर नेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. पण त्यांची प्रतिमा मात्र कायम विविध कारणांमुळे कायम डागाळलेलीच राहिली.
ठाकरे यांनी आपलं चार-साडेचार दशकांचं राजकारण हे केवळ आपल्या करिष्म्याच्या जोरावरच केले. आर्थिक प्रश्न, राज्याचं विविध प्रश्नांसोबतचं धोरण यासंदर्भात ते कधीच बोलत नसत. पण मराठवाडा विद्यापीठास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यास विरोध केल्यानंतरही त्यांची लोकप्रियता कधीच कमी झाली नाही. इतका त्यांचा करिष्मा अद्‍भूत होता. ते कायम तरुणांच्या भाषेत बोलत आणि त्यामुळेच साठी-सत्तरी ओलांडल्यानंतरही त्यांच्याभोवती तरुणांचं मोहोळ असे.आज पवार आहेत आणि ठाकरे नाहीत.पण तरीही त्यांचं नाव घेतल्याविना महाराष्ट्राचं राजकारण तसूभरही पुढे सरकू शकू नये, हाच भाजपच्या मनातील खरा सल आहे आणि त्यामुळेच गेली जवळपास दहा-बारा वर्षं हे दोन्ही ‘ब्रॅण्ड’ उद्‍ध्वस्त करण्याचा प्रयत्न केंद्रातील सत्तेच्या जोरावर भाजप करू पाहत आहे. तरीही हेच दोन्ही ‘ब्रॅण्ड’ महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर नवनवं नेपथ्य उभं करत आहेत. हीच या दोन ‘ब्रॅण्ड’ची खरी महती आहे
(लेखक हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे ‘जय महाराष्ट्र! हा शिवसेना नावाचा इतिहास आहे.’,
‘अयोध्या ते वाराणसी’ आदी पुस्तके गाजली आहेत.)
98927 27700
 
 
 
 

 

Previous articleबिंब-प्रतिबिंब – कवितांमधून उलगडणारे चित्रपट..!
Next articleअघोर पंथ – समज गैरसमज आणि वास्तव! 
Team Media Watch
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here