इंडिगोचा डोलारा कोसळला: स्वस्त तिकिटांमागे दडलेली विस्कळीत सेवा!

​- नितीन पखाले
​गेल्या काही वर्षांपासून भारतीय विमानसेवा बाजारात इंडिगो (Indigo) चा दबदबा वाढला आहे. परंतु, सध्या व्यवस्थापनातील विस्कळीतपणामुळे याच विमानसेवेवर कोसळण्याची वेळ आली आहे, याची प्रचिती मला नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय प्रवासात आली. आठ दिवसांपूर्वीच नागपूर-दिल्ली-हाँगकाँग असा दुहेरी कनेक्टेड प्रवास करताना इंडिगोच्या एअरबसमध्ये आलेले काही सुखद पण अनेक वाईट अनुभव, हेच दर्शवतात की, सेवा दरात मक्तेदारी (Monopoly) असल्याने कंपनी ग्राहकांना अत्यंत सुमार वागणूक देत आहे.
खरं तर, प्रवासादरम्यानच मी सहकाऱ्यांशी बोललो होतो की, ही कंपनी इतकी वाईट सेवा देऊनही सरकार त्यांच्यावर कुठलीच कारवाई करत नाही! इंडिगो जितकी स्वस्त तिकीटे देतात, त्यापेक्षा अधिक किमतीत आकाशात असताना खाद्य पदार्थ विकतात. नागपूरहून दिल्ली जात असताना, गरम पाण्यात कॉफीचे पाउच टाकून दिलेली कॉफी फक्त अडीचशे रुपये! ही किंमत ऐकूनच कॉफी पिण्याची इच्छा मेली. (काही प्रवासी येथेही दिखाऊपणा करतात) इंडिगोची विमाने ऑड वेळेस असल्याने ते कमी किमतीत तिकिटं देतात, पण त्या तुलनेत सुविधा सुमार आहेत.
हाँगकाँगवरून जेव्हा आम्ही दिल्ली एअरपोर्टवर टर्मिनल तीनवर पोचलो, तेव्हा आमचे नागपूरला जाणारे विमान टर्मिनल एकवरून सुटणार होते. खरे तर कनेक्टेड फ्लाईट असल्याने हाँगकाँगवरून टाकलेले बॅगेज नागपूरला मिळणे अपेक्षित होते. मात्र हाँगकाँगला इंडिगोच्या कर्मचाऱ्याने सांगितले की, दिल्ली येथे तुम्हाला बॅग स्वतः कलेक्ट कराव्या लागतील, तेथे कस्टम तपासणी होईल. दिल्ली विमानतळावर बॅग मिळायला जवळपास पाऊणतास प्रतीक्षा करावी लागली. कस्टमच्या भीतीपोटी घेतलेल्या बॅग साध्या पोलिसांनाही तपासल्या नाहीत. त्यामुळे बॅग घेऊन सर्व सहकारी टर्मिनल एकवर जायला निघाले, तर कनेक्टेड फ्लाईट असूनही इंडिगोची बस व्यवस्था नव्हती, की विमानतळ प्राधिकरणचीही बस व्यवस्था नव्हती. दिल्लीतील टर्मिनल तीन ते टर्मिनल एक हे अंतर 15 ते 20 किलोमीटर असावे. त्यात दुपारचे ट्रॅफिक असल्याने हे अंतर कापायला जवळपास पाऊण ते एक तास जातो. नागपूरसाठी सुटणारे विमान दुपारी सव्वा चार वाजताचे होते. दिल्लीच्या टर्मिनल तीनवरच अडीच वाजत आले होते. घड्याळाचे काटे बघून सर्व सहकाऱ्यांच्या हृदयाचे ठोके वाढले होते. चेक इन बंद झाले तर विमान निघून जाणार या धास्तीने माझ्या सहकाऱ्यांनी धावतपळत एक टॅक्सी केली. टर्मिनल एकवर पोहोचायला त्यांना साडेतीन वाजले. तिथे परत बॅगेज विमानात देणे आवश्यक होते. पण त्या ठिकाणी भलीमोठी रांग बघून विमान हुकणार याचा अंदाज आला.
        इंडिगोच्या काउंटरवर मदतीसाठी विचारणा केली तर, उर्मट भाषेत उत्तर मिळाले. जेव्हा आमच्या एका सहकाऱ्याने त्यांना इंग्रजीत खडसावले आणि आमची हाँगकाँग_दिल्ली_नागपूर अशी कनेक्टेड फ्लाईट आहे, आणि आम्हाला बॅगेजसहित टर्मिनल तीनवरून एकवर पोहचविण्याची जबाबदारीही इंडिगोची आहे. चेक इन बंद होण्याची वेळ आली तरीही, विमान कंपनीचे कर्मचारी ऐकत नसतील तर येथे ठिय्या देतो, असे धमकावले. त्यानंतर एका मॅनेजरने एका महिला कर्मचाऱ्यास सोबत देऊन, स्पेशल काउंटरवरून बॅगेज सील करून रवाना केले. त्यानंतर सुरक्षा तपासणीत अंगावरचे कपडे वगळता चपला, बुट, बेल्ट, घड्याळ सारे काढून तपासणी करून चेक इन बंद होण्यास अवघे पाच मिनिट बाकी असताना सर्व जण (ज्येष्ठ व्यक्तीसह लहान मुलगी) असे धावत पळत इंडिगोच्या गेटवर पोहोचले, तेव्हा दिल्लीतील गोठवणाऱ्या थंडीत सारे घामाघूम झाले होते.
माझे सहकारी दिल्लीहून नागपूरला परत आले, त्याचवेळी मी दिल्लीहून इंडिगोच्याच विमानाने अहमदाबादला जाणार होतो. माझे विमान संध्याकाळी 6.50 चे होते. दुपारपासून चेक इन करून मी संबंधित गेटवर पोहोचलो. एरवी, एक तास आधी गेटवरून प्रवेश दिला जातो. मात्र त्या दिवशी संध्याकाळी साडेसहा वाजले तरी गेट उघडण्याची कुठलीच हालचाल नव्हती. काउंटरवर कोणी कर्मचारी फिरकला नाही, की विमान उशिरा उडणार आहे, याबद्दल इंडिगोने साधी उद्घोषणाही केली नाही. बरोब्बर पावणे सात वाजता इंडिगोचे कर्मचारी धातपळत आले, त्यांनी घाईघाईने तपासणी सुरू केली आणि प्रवाशांना आत सोडले. तोपर्यंत घड्याळात 6.50 झाले होते, आणि बोर्डावर विमान वेळेत धावत असल्याची सूचना सुरू होती! विमानात बसल्यानंतरही विमान वेळेत धावणार असल्याचीच उद्घोषणा सुरू होती, जेव्हा की घड्याळात सात वाजून गेले होते. अखेर, वैमानिकाने उद्घोषणा करून विमान उड्डाणास विलंब होणार असल्याचे जाहीर करून, प्रवाशांना होत असलेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली, आणि प्रवाशांनी दाखवलेल्या संयमांबद्दल धन्यवादही मानले. उड्डाणाच्या विलंबाबाबत हवाई सुंदरीला विचारले तर आधीचे विमान उशिरा land झाल्याने या उड्डाणास उशीर झाल्याचे तिने सांगितले.
          अहमदाबादला ज्या कार्यक्रमासाठी गेलो तो मी दिलेल्या वेळेत न पोहोचल्याने होऊन गेला. तिथे एका सहकाऱ्याला इंडिगोच्या वाईट सेवेबद्दल बोललो तर, तो म्हणाला हीच सर्वसामान्यांना परवडणारी सेवा आहे. सध्या सर्वात चांगली सेवा देणारी कंपनी आहे. प्रवाशांनाच त्यांची जबाबदारी कळत नाही वगैरे वगैरे. त्याचवेळी त्याला म्हटले की, इंडिगोची विमानसेवा कोलमडण्याच्या स्थितीत आहे, बघ लवकरच कळेल. आणि, त्यानंतर बरोब्बर पाच दिवसानंतर कंपनीतील विस्कळीत व्यवस्थापनामुळे इंडिगोचा डोलारा कोसळला. अहमदाबादवरून नागपूर असा प्रवासही इंडिगोच्याच पहाटेच्या विमानाने केला. तेव्हा नागपूर येथे लँडिंगवेळी हवाई सुंदरी सीटबेल्ट बांधून तिच्या जागेवर बसली. त्यावेळी तिच्या डोळ्यात थकवा आणि झोप जाणवत होती. विमान लँड झाले, प्रवाशांनी सीटबेल्ट सोडले तरी, ती बिचारी डोळे मिटून होती. ड्युटीचे तास आणि थकवा यामुळे तिला बहुतेक गाढ डुलकी लागली होती!
तर असे हे इंडिगो पुराण!
(लेखक ‘मीडिया वॉच’ चे सहसंपादक आहेत)
9403402401
Previous articleसंघ : स्कूल ऑफ मॅनेजमेंट
Next articleमुखवट्यामागचा संघ
Team Media Watch
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here