-नितीन पखाले
व्हॅलेंटाइन डे विशेष
सध्या सभोवताली व्हॅलेंटाइन आठवड्याचा उत्साह ओसंडून वाहत आहे. १४ फेब्रुवारी येण्यापूर्वीच गेल्या सात दिवसांपासून लाल गुलाब, महागड्या भेटवस्तू आणि कॅफेमधल्या गर्दीत आजची तरुण पिढी प्रेमाचा उत्सव साजरा करत आहे. परंतु, प्रेमाचा हा उत्सव केवळ एका दिवसापुरता किंवा एका आठवड्यापुरता मर्यादित असावा का? हा कायम चर्चेतील प्रश्न आहे. भारताच्या मातीने जगाला प्रेमाची जी व्याख्या शिकवली, ती आजच्या ‘व्हॅलेंटाइन डे’च्या ‘इन्स्टंट’ युगापेक्षा खूप वेगळी आणि खोल आहे. भारताचा इतिहास धुंडाळला तर येथे शाश्वत प्रेमाचा वारसा असलेली असंख्य कथानक आहेत. या प्रेमाला महान विचारांची जोड मिळाली आहे.
सध्याच्या युगात प्रेम म्हणजे, एकच टप्प्यात सर्व मिळायला हवे, ही भावना आहे. मात्र आपल्या संस्कृतीत प्रेमाचा प्रवास हा शारीरिक आकर्षणाकडून वैश्विक कल्याणाकडे जाणारा राहिला आहे. गौतम बुद्धांनी जेव्हा प्रेमाचा विचार मांडला, तेव्हा त्यांनी त्याला ‘करुणा’ म्हटले. बुद्धांच्या मते, प्रेम म्हणजे केवळ एखाद्या व्यक्तीला प्राप्त करणे नव्हे, तर सर्व सजीवांप्रति आपुलकी वाटणे. ‘एखादे फूल आवडले की, आपण ते तोडतो, पण जर आपण त्या फुलावर प्रेम करत असू, त्याचा सुगंध अनुभवायचा असेल तर, आपण त्याला रोज पाणी घालतो.’ हा त्यांचा विचार आजही नात्यातील ‘मालकी हक्क’ आणि ‘काळजी’ यातील फरक स्पष्ट करणारा आहे.
विद्रोही कवी संत कबीर यांनी प्रेमाची व्याख्या अहंकाराच्या पलीकडे जाऊन केली. ‘जब मैं था तब हरि नहीं, अब हरि है मैं नाहिं’, असं म्हणणारे कबीर सांगतात की, जोपर्यंत मनात ‘मी’पणा किंवा अहंकार आहे, तोपर्यंत तिथे प्रेमाला जागा नाही. त्यांच्या मते प्रेम ही एक अशी साधना आहे जी विद्वत्तेपेक्षाही श्रेष्ठ आहे. संत ज्ञानेश्वरांच्या ‘पसायदाना’त तर प्रेमाचे विश्वरूप दर्शन घडते. ‘जो जे वांछिल तो ते लाहो,’ असे म्हणताना ते संपूर्ण चराचरासाठी जे मागतात, ते शुद्ध प्रेमाचेच लक्षण आहे. तर तुकोबांनी रंजल्या-गांजल्यांची सेवा करणे हेच प्रेम मानले. महात्मा गांधींनी या प्रेमाला ‘अहिंसे’चे स्वरूप दिले. त्यांच्या मते, प्रेम ही जगातील सर्वात मोठी शक्ती आहे, जी समोरच्या व्यक्तीचा तिरस्कार न करता त्याचे हृदय परिवर्तन करू शकते.आजची ‘जेन झी’ आणि त्यांच्या आधीची आमची पिढी यांच्या प्रेमाच्या संकल्पनेत मोठे वैचारिक अंतर आहे. पूर्वीच्या पिढीसाठी प्रेम म्हणजे ‘समर्पण’ आणि ‘त्याग’ होता. ‘एकदा लग्न झाले की ते मरेपर्यंत निभवायचे,’ ही धारणा होती. यात संयम होता, पण कधीकधी स्वतःच्या इच्छांची गळचेपीही होती. आमच्या पिढीने पत्रांची देवाणघेवाण आणि भेटीसाठी होणारी व्याकुळता यातून नात्यातील ओलावा जपला आहे. तेव्हा सोशल मीडिया नव्हता की, प्रेम ‘व्हायरल’ करण्याची हिंमतही त्या पिढीत नव्हती. याउलट, आजची पिढी ही ‘डिजिटल नेटिव्ह’ आहे. त्यांच्यासाठी प्रेम हे ‘एल्गोरिदम’ आणि ‘स्वाइप’वर आधारित आहे. आजच्या काळात ‘सिच्युएशनशिप’, ‘हुकअप कल्चर’ किंवा ‘ओपन रिलेशनशिप’ यांसारख्या संकल्पना उदयाला आल्या आहेत. याचे विश्लेषण करताना असे लक्षात येते की, ही पिढी नात्यात ‘स्पष्टता’ शोधते. पूर्वीच्या पिढीप्रमाणे नात्याचे ओझे वाहण्यापेक्षा, जर नाते आपल्याला आनंद देत नसेल, तर त्यातून बाहेर पडणे त्यांना योग्य वाटते. हे कदाचित स्वार्थी वाटू शकते, पण ते ‘स्व-प्रेमा’च्या संकल्पनेशी जोडलेले आहे.
आजच्या जेन झी तरुणाईचे प्रेम हे ‘वेगा’वर स्वार आहे, तर जुन्या पिढीचे प्रेम ‘वेळे’वर आधारलेले होते. आज ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने बाजारपेठेने प्रेमाचे व्यापारीकरण केले आहे. महागड्या भेटवस्तू देणे म्हणजे प्रेम व्यक्त करणे, असा एक आभास निर्माण झाला आहे. अशा वेळी कबीर, बुद्ध किंवा गांधीजींचे विचार आपल्याला आरसा दाखवून प्रेमाचा खरा अर्थ समजावू पाहत आहेत.खरे प्रेम हे केवळ सोशल मीडियावरील ‘कपल गोल्स’ फोटोमध्ये नसते, तर ते एकमेकांच्या स्वातंत्र्याचा आदर करण्यात आणि कठीण काळात सोबत उभे राहण्यात असते. आजच्या पिढीला गरज आहे ती जुन्या पिढीतील ‘संयम’ आणि आधुनिक काळातील ‘पारदर्शकता’ यांचा मेळ घालण्याची. केवळ गुलाब, गिफ्ट्स, चॉकलेट, मिठी आणि चुंबन यांची देवाणघेवाण करणे म्हणजे प्रेम नव्हे, तर एकमेकांच्या अस्तित्वाचा सन्मान करणे, या अंगानेही प्रेमाकडे बघायला हवे. जेव्हा आपण स्वतःच्या प्रेमाला केवळ व्यक्तीपुरते मर्यादित न ठेवता त्यात ‘करुणा’ आणि ‘निस्वार्थता’ आणू, तेव्हाच खऱ्या अर्थाने व्हॅलेंटाइन डे साजरा होईल.
(लेखक ‘मीडिया वॉच’ चे सहसंपादक आहेत.)
9403402401







