देवेंद्र फडणवीस तुम्हारा चुक्याच !

-प्रवीण बर्दापूरकर

विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या संदर्भात वापरलेली भाषा निषेधार्ह आहे ; हा निषेध करावा तेवढा थोडा आहे अशा पद्धतीने देवेंद्र फडणवीस विधानसभेत बोलले . हे असं भाषण त्यांनी त्यांच्या मतदारसंघात गोकुळपेठेत किंवा गिरीपेठ किंवा पांढरा बोडीच्या झोपडपट्टीत केलं असतं , तर एक वेळेस समजूनही घेता आलं असतं पण , हे भाषण त्यांनी चक्क लोकशाहीचं पवित्र मंदिर असलेल्या विधानसभेत केलेलं आहे .

खरं तर कडक टीका करतात पण , अशी टोकाची भाषा वापरण्याचे देवेंद्र फडणवीस यांची परंपरा नाही . देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरराव फडणवीस हे विधान परिषदेचे सदस्य असताना त्यांच्याशी आमचा निकटचा संपर्क आला . मला आठवतं गंगाधरराव यांचं व्यक्तिमत्व अतिशय सुसंस्कृत होतं . मितभाषी गंगाधरराव यांचा संपर्क राजकीय विचारांच्या पलीकडचा होता . कुणावरही टीका करताना कधी वावगा शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पाडला नाही . विधिमंडळाचं कामकाज उशिरापर्यंत सुरु राहणार असेल तर ते संपल्यावर हॉटेल्स सुरु राहिली नाही तर  तेव्हा आम्ही नवख्या असलेल्या तरुण पत्रकारांच्या क्षुधाशांतीची सोय करणाऱ्या सर्व सहृदयी लोकप्रतिनिधींमध्ये गंगाधरराव यांचा समावेश होता . गंगाधरराव फडणवीस यांचे निधन झालं तेव्हा त्यांच्याविषयी सभागृहात बोलताना विधान परिषदेचे तत्कालीन सभापती जयंतराव टिळक तसेच सभागृहाचे नेते शरद पवार यांनी राजकीय मतभेद बाजुला ठेऊन केलेली श्रद्धांजलीपर भाषण गंगाधरराव यांच्या सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वावर नेमका प्रकाश टाकणारी आणि अतिशय स्पर्शी आहेत ; त्या भाषणाचे साक्षीदार असलेल्या पत्रकारांच्या पिढीतील प्रस्तुत पत्रकार आहे . हवं तर  देवेंद्र फडणवीस यांनी ती भाषणं काढून एकदा अभ्यासावी म्हणजे , आपण कुणाची परंपरा पाळत नाही आहोत हे त्यांच्या लक्षात येईल .

सत्ताधारी पक्षांना घेतलेल्या कोणत्याही निर्णयाबद्दल किंवा केलेल्या कोणत्याही कामाबद्दल टीका करण्याचा अधिकार जसा विरोधी पक्षांना आहे तसा तो पत्रकार आणि जनतेलाही आहे . समाजमाध्यमे अस्तित्वात येण्याआधी जनतेला तो आवाज व्यक्त करता येत नव्हता , आता ती सोय सहज उपलब्ध आहे .  समाज माध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त करणारे  सर्वजण अभ्यासू आणि समंजस असतील अशातला भाग नाही हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे ; सर्व पक्षातील सर्वच राजकारणी  तरी कुठे अभ्यासू , समंजस आणि सुसंस्कृत आहेत ?

विरोधी पक्ष म्हणजे सत्ताधारी पक्षावरचा अंकुश असतो . मुंबई-पुणे मिसिंग लिंक ( कनेक्टिंग लिंक म्हणा हवं तर ! )वर जी कथित दरड कोसळली त्या संदर्भात समाजाच्या सर्व स्तरातून आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांकडूनही जी काही टीका झाली त्या टिकेचा समाचार सुसंस्कृत शब्दात देवेंद्र फडणवीस यांना घेता आला असता पण , तो घेताना विरोधी पक्षाचा असलेला टीकेचा अधिकार देवेंद्र फडणवीस विसरले . सभागृहात असलेल्या  विरोधी पक्षाच्या सदस्यांनी ही सर्व टीका ऐकून घेतली हे जास्त अनाकलनीय होतं . मुख्यमंत्र्यांनी आपल्यावर पातळी सोडून हल्ला चढवला आहे हे विरोधी पक्ष सदस्यांच्या  लक्षात येऊ नये यापेक्षा विरोधी पक्षाचं दुबळेपण वेगळं असू शकत नाही . सभागृहातच या वक्तव्याचा निषेध करुन जर विरोधी पक्षांनी सभात्याग केला असता तर , समाज माध्यमांवरुन झालेल्या कथित बेताल टिकेला कदाचित वाव मिळाला नसता पण , विरोधी पक्ष नेते व सदस्यही त्यांची जबाबदारी साफ विसरले हे लक्षात घ्यायला हवं .

याआधी विरोधी पक्ष नेते असताना देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात आणि सभागृहाबाहेर केलेल्या बेछूट वक्तव्याचे दाखले आहेत . राष्ट्रवादीसोबत कदापिही जाणार नाही , हे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांचच होतं . सिंचनातील कथित भ्रष्टाचाराचे सादर केलेले गाडीवर पुरावे विसरुन त्या वक्तव्यापासून देवेंद्र फडणवीस यांनी कसं घुमजाव केलं , हे या महाराष्ट्रानं पाहिलं आहे . देवेंद्र फडणवीस बोलतात एक आणि करतात काहीतरी वेगळंच याची अनेक उदाहरणं देता येतील . ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांचे खाजगी सचिव प्रवीण परदेशी यांचा पासपोर्ट घरी विसरण्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा  मोठ्या तार स्वरात देवेंद्र फडणवीस यांनी केली होती , त्या चौकशीचे काय झालं ते आता बारा वर्षे उलटली तरी समजलेलं नाही . पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या , पहिल्या उपमुख्यमंत्रीपदाच्या आणि दुसऱ्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत देवेंद्र फडणवीस यांनी अशा अनेक घोषणा केल्या आणि त्याची अंमलबजावणी झाली नाही . त्याबद्दल पत्रकारही त्यांना विचारत नाहीत आणि देवेंद्र फडणवीसही सांगत नाहीत . देवेंद्र फडणवीस यांना खरं तर ‘क्लीन चीट’चे बादशहा म्हणून जाहीर करायला हवं कारण त्यांनी जितक्या भ्रष्टाचारी आणि वादग्रस्त प्रकरणातील अधिकारी तसंच मंत्र्यांना ‘क्लीन चीट’ दिली , तेवढी महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासात कुणाही मुख्यमंत्र्यांना दिलेली नाही . खरं तर , मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या पण , अंमलात न आलेल्या घोषणा आणि ‘क्लीन चीट’ यांची चौकशी करण्यासाठी एखाद्या निपक्षपाती आणि स्वतंत्र आयोगाची स्थापना करायला हवी .

देवेंद्र फडणवीस राज्याचे एक अग्रगण्य नेते आहेत अभ्यासू आहेत महाराष्ट्राविषयी त्यांना तळमळ आहे , नितांत प्रेम आहे  , त्यांचा कामाचा उरक मोठा तसंच धाडसी आहे , याबद्दल दुमत होण्याचं कारण नाही . परंतु त्याचा अर्थ विरोधी पक्षातले किंवा समाज माध्यमांवरुन सरकार आणि क्वचित फडणवीस यांच्यावर टीका करणारे सर्वजण महाराष्ट्राचे शत्रू आहेत , भाड्याचे तट्टू आणि कुत्रे आहेत , असं  समजण्याचं कारण नाही . टीका करणारे याच महाराष्ट्रात जन्मले आणि याच महाराष्ट्रात मरणार आहेत , हे देवेंद्र फडणवीस यांनी विसरता कामा नये . ज्यांचा धर्म महाराष्ट्र आहे त्या धर्माला जागून जर विरोधी पक्ष आणि जनतेतील भाजप विरोधी काही पत्रकार किंवा सामान्य लोकांनी जर सरकारच्या कामकाजावर टीका केली तर ती समजून घेण्याची मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडून रास्त अपेक्षा आहे . आमदार असताना देवेंद्र फडणवीस अशा समंजसपणानं वागत असत अशा अनेक घटना प्रस्तुत पत्रकाराला जवळून ठाऊक आहेत पण , मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर आणि त्यातही विशेषतः मुख्यमंत्रीपदाच्या दुसऱ्या कारकिर्दीत देवेंद्र फडणवीस एवढे बेदरकार का झाले असा प्रश्न साहजिकच अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे .

पक्ष फोडणं तरी  नामानिराळं राहण्याच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस यांचं कौशल्य वादातीत आहे . ज्या पद्धतीने त्यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची (महा)राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष फोडले आणि तरी ते नामानिराळे राहिले यावरुन त्यांच्यावर खरं तर भरपूर टीका करता आली असती परंतु राजकारणात या गोष्टी चालणारच म्हणून त्या महाराष्ट्रात खपवून घेतल्या हे विसरुन देवेंद्र फडणवीस टीकाकारांवर घसरले आहेत . त्यामुळे तर फडणवीस हुरळून बेताल झाले नाहीत ना ? असा प्रश्न पडतो . देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय गुरु नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेही राजकारणी म्हणून सुसंस्कृत बोलण्या-चालण्याबद्दल ओळखले जात नाहीत . त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून देवेंद्र फडणवीस यांचा प्रवास सुरु झालेला आहे की काय अशी शंका  देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेतील वक्तव्यामुळे निर्माण झाली आहे . आणखी एक मुद्दा म्हणजे , मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर कामाचा मोठ्ठा बोझा आहे . मुख्यमंत्रीपदाशिवाय गृह , अर्थ , उर्जा , सामान्य प्रशासन अशी खाती आणि राज्याचे पक्ष नेते म्हणूनही त्यांच्यावर  ‘असंख्य’ जबाबदाऱ्या आहेत . त्यामुळे आलेल्या तणावाचा वैताग देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सभेत व्यक्त केला गेला नाही ना ? अशीही शंका घेण्यास भरपूर वाव आहे .

महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांच्यावर ‘अख्ख्या महाराष्ट्राचं  लाडकं व्यक्तिमत्व’ असलेल्या पु . ल . देशपांडे यांनी ‘अंतुले तुम्हारा चुक्याच’ या शब्दात टीका केली होती . टीका करणारा तो लेख महाराष्ट्र टाईम्स या दैनिकात प्रकाशित झाल्याचं अजूनही आठवतं . मात्र वाचाळ असणारे अंतुलेही त्यावर व्यक्त झाले नव्हते कारण झालेली टीका समजून घेण्याचा उमदेपणा त्यांनी त्यावेळेस दाखवला होता . देवेंद्र फडणवीस संघाच्या मुशीत तयार झाले आणि अटल बिहारी वाजपेयी तसंच लालकृष्ण अडवाणी यांच्या राजकीय संस्कारात घडले असं सांगितलं जातं . मात्र संघ , वाजपेयी आणि अडवाणी यांनी देवेंद्र फडणवीस यांना उमदेपणा शिकवला नाही असं किमान मी तरी म्हणणार नाही किंबहुना त्यांनी शिकवलेला उमदेपणा विरोधकांवर हल्ला चढवताना देवेंद्र फडणवीस यांना दाखवता आला नाही , हा दोष देवेंद्र फडणवीस यांचाच आहे असं म्हणावं लागेल . तो संस्कार विसरुन देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांची तर शिकवणी लावली नाही ना असा प्रश्न पडला . ‘बघून घेण्या’ ची भाषा वापरुन संजय राऊत आणि अन्य वाचाळवीरांवर टीकास्त्र सोडण्याची संधी देवेंद्र फडणवीस यांनी गमावली आहे कारण तेच त्या वाचाळवीरांच्या पंक्तीत जाऊन बसले आहेत .

माणूस म्हटलं की चुका होणारच . प्रत्येक माणूस कधी ना कधी कोणती न कोणती चूक करतोच मात्र , त्या चुकीतून धडा शिकणारा माणूस हा समंजस आणि अधिक परिपक्व होत जातो . बेताल आणि निषेधार्ह वक्तव्य करण्याची देवेंद्र फडणवीस यांची ही चूक पहिलीच ठरावी अशी अपेक्षा आहे . तरीही त्यांनी केलेली ही चूक विसरता येणार नाही . पु ल देशपांडे यांच्या भाषेत सांगायचं तर , ‘देवेंद्र फडणवीस तुम्हारा चुकीच चुक्याच !’

(लेखक-ज्येष्ठ संपादक , राजकीय विश्लेषक , ब्लॉगर , साहित्यिक आहेत .)

+919822055799

Previous articleअंतर्जनम: नंबुद्री ब्राह्मण स्त्रियांची संताप, शरम, अचंबा, कुतूहल, विषण्णता वाटणारी कहाणी
Team Media Watch
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here