-प्रवीण बर्दापूरकर
रत्नाकर महाजन यांच्या निधनानं राजकारणातला एक सुसंस्कृत आणि निष्ठावान आणि रुजू चेहेरा काळाच्या पडद्याआड गेला आहे . रत्नाकर महाजन यांच्याशी ओळख १९८५/८६ साली झाली . आमच्यातला संवाद शेवटपर्यंत कायम होता . ओळख झाल्यापासून त्यांना मी ‘अहो रत्नाकर’ असं संबोधत असे .
रत्नाकर वयानं माझ्यापेक्षा मोठे . राजकारणातला त्यांचा अनुभवही प्रदीर्घ . फार न बोलता समोर जे घडत आहे किंवा जो कोणी बोलत आहे त्याला शांतपणे जोखत राहणं हे रत्नाकर महाजन यांचं वैशिष्ट्य . त्याचं वाचनही अफाट होतं ; इंग्रजी , मराठी आणि हिंदीही ते वाचत . त्यामुळे त्यांच्या प्रतिपादनाला अनुभव आणि वाचन यांचा , युक्तिवाद न करता येण्यासारखा ठाम आधार असायचा . शिवाय भूतकाळातील घटनांचा अचूक संदर्भ ते देत . तरी आपण ज्ञानी आहोत , अनुभव संपन्न आहोत याचा कोणताही ताठा रत्नाकर यांच्या वर्तनात कधी आढळत नसे . प्रकाश वृत्त वाहिन्यांच्या अनेक चर्चात ते पक्षाची गरज म्हणून सहभागी होत . समोरचा कितीही वचावाचा बोलला/वागला तरी रत्नाकर यांचा तोल कधी ढळला आहे किंवा त्यांचा आवाज वाढला आहे असं आठवत नाही .
तीन-चार वर्षापूर्वीची आठवण आहे -एका प्रकाशवृत्त वाहिनीवरील चर्चेत रत्नाकर महाजन माहिती नसलेला आणि ती माहिती करुन घ्यावी याची तमाही न बाळगणारा एक पत्रकार सहभागी होता . रत्नाकर यांचा उपमर्द होईल असं तो पत्रकार बोलला पण , रत्नाकर मात्र त्याच्याकडे ‘अज्ञानी बालक’ असा फक्त एक कटाक्ष टाकला . नंतर फोनवर बोलताना तुम्ही अशा बाष्कळ चर्चात सहभागी होणं थांबवल पाहिजे असा आग्रह मी धरला . अशा ‘बालकां’मुळेच अशा चर्चात सहभागी होणं मी कसं थांबवलं आहे याचा दाखला दिला . अखेर रत्नाकर यांनी माझ म्हणणं ऐकलं .
अलीकडच्या पंधरा-सोळा वर्षात , मी दिल्लीला गेल्यापासून , त्यांच्यात माझ्यात संदर्भांचं नातं निर्माण झालेलं होतं . लेखनात कांही राजकीय संदर्भ अडला की मी रत्नाकर यांना शरण जात असे आणि हवा असलेला संदर्भ पटापट ते सांगत असत . विशेषत: काँग्रेस आणि दिल्लीतील राजकारणाचा संदर्भ कोश म्हणजे रत्नाकर होते . माझ्या लेखनात एखादा तपशील अर्धवट आला किंवा संदर्भ थोडा जरी चुकला तरी त्यांचा फोन येत असे . राजकारणावर आमच्यातही ‘सेलफोनी’क गप्पाही होत . प्रत्यक्ष असो का फोनवरील , रत्नाकर यांच्याशी गप्पा हा एक आनंददायी आणि ज्ञानात भर टाकणारा अनुभव असायचा .
मध्यंतरी सात-आठ वर्षापूर्वी पक्षाकडून रत्नाकर महाजन यांना राज्यसभेवर पाठ्वायचं निश्चित झालं . काँग्रेस बीट बघणाऱ्या दिल्लीतील एका पत्रकारानं मला ही हिंट दिली . मी कांही पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहात नव्हतो पण , एक मित्र म्हणून मला आनंद झाला . मी त्यांना अभिनंदनाचा फोन केला तर ते बराच वेळ ताकास तूर लागू देईनात . अखेर मी माहितीचा सोर्स सांगितला तेव्हा त्यांनी अभिनंदन स्वीकारलं पण , कुठे बोलू नका आणि बातमी फोडू नका. कारण राजकारणात शेवटच्या क्षणापर्यंत कांही खरं नसतं असं राजकीय वास्तवाची जाणीव असलेल्या रत्नाकर महाजन यांनी बजावलं . तसंही मी बातमी फोडणार नव्हतो कारण रत्नाकर जे कांही म्हणाले त्यातील तथ्य मलाही ठाऊक होतं .
अखेरच्या क्षणी रत्नाकर यांची संधी हुकली आणि एका संपादकाला उमेदवारी मिळाली . मी फोन केला तर राजकारणात हे असं घडणारच , असं म्हणत रत्नाकर यांनी दीर्घ सुस्कारा सोडला . उल्लेखनीय बाब म्हणजे ज्याला उमेदवारी मिळाली त्याच्याबद्दल एकही कडवट शब्द रत्नाकर यांनी उच्च्चारला नाही . अर्थात अपेक्षाभंग म्हणा की स्वप्नभंग म्हणा की डावललं जाणं , याचा हा रत्नाकर महाजन आलेला तो पहिला अनुभव नव्हता , हेही तेवढंच खरं आहे . निराशा आल्यानं कुणाबद्दल अपशब्द न उच्चारण्या इतका सुसंस्कृतपणा असणारा विरळ गुण रत्नाकर महाजन यांच्यात होता . राजकारण जवळून पाहिलेल्या रत्नाकर महाजन यांच्याकडून खाजगी गप्पातही कुणाबद्दल निंदाजनक शब्द उच्चारल्याचा दाखला किमान माझ्याकडे तरी नाही .
रत्नाकर महाजन यांच्या निधनानं सुसंस्कृत , ज्ञानी आणि पाय जमिनीवर असलेला एक मित्र गमावल्याची भावना माझ्या मनात आहे .
(लेखक-ज्येष्ठ संपादक , राजकीय विश्लेषक , ब्लॉगर , साहित्यिक आहेत .)
+919822055799








