-डॉ. रेखा शेळके
महाराष्ट्राच्या मातीला दोन अखंड प्रवाह लाभले आहेत—एक श्रमाचा आणि दुसरा प्रज्ञेचा. शेतकऱ्याच्या घामाने ही भूमी सुपीक झाली; तर बुद्ध, तुकाराम, शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी समाजमनाची मशागत घडली. करुणा, विद्रोह, सत्यशोधन, रयतेचे राज्य, समता आणि विवेक यांच्या या महान परंपरेतील एक सशक्त, निर्भय व चिंतनशील दुवा म्हणजे ज्येष्ठ विचारवंत डॉ. आण्णासाहेब हरी साळुंखे.
इतिहास केवळ वाचणारे अनेक असतात; इतिहास लिहिणारेही असतात. परंतु इतिहासातील प्रस्थापित धारणांना प्रश्न विचारून वर्तमानाला जागे करणारे विचारवंत विरळच . डॉ. आ. ह. साळुंखे यांचे कार्य याच अर्थाने महत्त्वाचे ठरते. ते केवळ संस्कृतचे अभ्यासक, तत्त्वचिंतक, प्राध्यापक वा साहित्यिक नाहीत; तर झोपलेल्या विवेकाला प्रश्न विचारण्याचे धाडस देणारी त्यांची लेखणी हीच त्यांची खरी ओळख आहे.
वैचारिक प्रवासाची पायाभरणी
१ जून १९४३ रोजी सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील शिवाजीनगर—पूर्वीचे खाडेवाडी—येथे डॉ. साळुंखे यांचा जन्म झाला. ग्रामीण मातीत वाढलेल्या या प्रतिभावंताने पुढे महाराष्ट्राच्या वैचारिक विश्वात स्वतंत्र आणि प्रभावी स्थान निर्माण केले.
त्यांचा शैक्षणिक प्रवास विलक्षण उज्ज्वल राहिला. बी.ए. संस्कृत परीक्षेत शिवाजी विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवत त्यांनी भारत सरकारची राष्ट्रीय शिष्यवृत्ती संपादन केली. त्यानंतर एम.ए. संस्कृत परीक्षेतही त्यांनी शिवाजी विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावला. ही केवळ गुणवत्तेची नोंद नव्हती; ती पुढील गहन संशोधनाची आणि बौद्धिक संघर्षाची सुरुवात होती.
संस्कृतचा अभ्यास त्यांनी परंपरेचे अंध समर्थन करण्यासाठी केला नाही. उलट, परंपरेची मुळे तपासण्यासाठी, तिच्यातील अंतर्विरोध ओळखण्यासाठी आणि समाजजीवनावर पडलेल्या परिणामांचा चिकित्सक शोध घेण्यासाठी त्यांनी संस्कृतचा आधार घेतला. ‘चार्वाक दर्शनाचा चिकित्सक अभ्यास’ हा त्यांच्या पीएच.डी. संशोधनाचा विषय होता. चार्वाकाच्या तर्कनिष्ठ आणि इहवादी परंपरेचा अभ्यास करताना त्यांनी भारतीय वैचारिक परंपरेतील दुर्लक्षित प्रवाहांवर प्रकाश टाकला.
वर्गाबाहेरचे शिक्षक
सुमारे बत्तीस वर्षांच्या अध्यापनकार्यात डॉ. साळुंखे यांनी हजारो विद्यार्थ्यांवर संस्कार केले. मात्र त्यांचा शिक्षक म्हणून प्रभाव केवळ वर्गखोलीपुरता मर्यादित राहिला नाही. त्यांनी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांतील माहिती लक्षात ठेवण्यापेक्षा विचार करण्याची दृष्टी दिली.
प्रस्थापित धारणांकडे आंधळेपणाने पाहण्याऐवजी त्यांना नम्रपणे, पण ठामपणे “का?” असा प्रश्न विचारण्याची सवय त्यांनी समाजाला लावली. हा प्रश्न केवळ विरोधासाठी नव्हता; तो सत्यशोधनासाठी होता. श्रद्धा आणि अंधश्रद्धा, परंपरा आणि विवेक, मिथक आणि इतिहास, धर्म आणि मानवी मूल्ये यांच्यातील फरक समजून घेण्याचे भान त्यांच्या लेखनाने दिले.
त्यांच्या विचारांचा गाभा साधा पण अत्यंत प्रभावी आहे—माणसाने स्वतःच्या बुद्धीचा वापर करावा, स्वतःचे जीवन स्वतःच्या विवेकाने समजून घ्यावे आणि कोणत्याही विचाराला प्रश्नांशिवाय स्वीकारू नये. “स्वतःच्या शरीरावर स्वतःचेच डोके हवे,” हा त्यांचा आशयपूर्ण विचार असंख्य तरुणांसाठी वैचारिक स्वातंत्र्याचा संदेश ठरला.
लेखणीचा विवेकवादी वारसा
डॉ. साळुंखे यांची ग्रंथसंपदा महाराष्ट्रातील वैचारिक चळवळीचा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. त्यांच्या प्रत्येक पुस्तकामागे दीर्घ अभ्यास, मूळ स्रोतांचा शोध, तर्कशुद्ध मांडणी आणि मानवी समतेची बांधिलकी दिसते. त्यांनी इतिहासातील दंतकथा व मिथकांचे आवरण बाजूला सारून वास्तवाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
‘हिंदू संस्कृती आणि स्त्री’ या ग्रंथातून त्यांनी स्त्रीला दुय्यम ठरविणाऱ्या सामाजिक-धार्मिक मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. स्त्रीदास्याचा प्रश्न केवळ व्यक्तिगत किंवा कौटुंबिक नसून तो सामाजिक संरचनेशी निगडित आहे, ही जाणीव त्यांच्या लेखनातून प्रकर्षाने पुढे येते.
‘विद्रोही तुकाराम’ या पुस्तकातून त्यांनी संत तुकारामांना केवळ भक्तिभावाच्या चौकटीत न ठेवता, त्यांच्यातील सामाजिक विद्रोह, अन्यायाविरुद्धचा आवाज आणि मानवी प्रतिष्ठेचा आग्रह अधोरेखित केला. टाळ-मृदंगाच्या गजरात अनेकदा झाकोळला जाणारा तुकोबांचा परिवर्तनवादी आशय त्यांनी नव्या पिढीसमोर आणला.
‘सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध’ या ग्रंथातून बुद्धांना केवळ पूजनीय प्रतिमेपुरते न पाहता समता, करुणा, विवेक आणि विज्ञाननिष्ठ जीवनदृष्टीचे प्रवर्तक म्हणून मांडले. बुद्धांचे विचार देव्हाऱ्यात बंदिस्त न राहता सामाजिक व्यवहारात उतरावेत, हा संदेश त्यांच्या लेखनातून स्पष्टपणे व्यक्त होतो.
‘शिवराय : संस्कार आणि शिक्षण’ या लेखनातून छत्रपती शिवाजी महाराजांचे रयतेच्या कल्याणाशी जोडलेले, लोकाभिमुख आणि विवेकनिष्ठ व्यक्तिमत्त्व समजून घेण्याचा प्रयत्न दिसतो. शिवरायांना जातीय किंवा धार्मिक चौकटीत अडकविण्याऐवजी त्यांच्या राज्यकारभारातील लोककल्याणकारी दृष्टी महत्त्वाची असल्याचे ते अधोरेखित करतात.
‘आस्तिकशिरोमणी चार्वाक’, ‘महात्मा फुले आणि धर्म’, तसेच वैदिक धर्मसूत्रे, जातिव्यवस्था आणि बहुजनांच्या गुलामगिरीशी संबंधित त्यांच्या लेखनाने महाराष्ट्रात वैचारिक चर्चा घडवून आणली. त्यांच्या मांडणीत वाद असू शकतात, मतभेद असू शकतात; पण त्यांच्या भूमिकेचा केंद्रबिंदू कायम मानवी स्वातंत्र्य, सामाजिक समता आणि बुद्धिप्रामाण्यवाद हा राहिला आहे.
संघर्षाचा आधार करुणा
डॉ. साळुंखे यांच्या लिखाणावर टीका झाली, वाद झाले, वैचारिक प्रतिवादही झाले. परंतु त्यांच्या लेखणीतील संघर्ष हा वैयक्तिक द्वेषाचा नव्हता. त्यामागे समाजातील अन्याय, जातीय विषमता, स्त्रीदास्य, अंधश्रद्धा आणि मानसिक गुलामगिरी यांविरुद्धची अस्वस्थता होती.
त्यांच्या विचारात आक्रस्ताळेपणा नाही; तर्क आहे. वैचारिक आक्रमकता आहे; पण तिच्या मुळाशी करुणा आहे. ते परंपरेला नाकारण्यासाठी परंपरेवर टीका करीत नाहीत; तर मानवी प्रतिष्ठेला बाधा आणणाऱ्या परंपरांचे चिकित्सक परीक्षण करतात. म्हणूनच त्यांचे लेखन एका विशिष्ट समूहापुरते सीमित न राहता व्यापक समाजाला विचार करायला भाग पाडते.
खरा लढा तलवारीचा नसतो; तो विचारांचा असतो, सांस्कृतिक अस्तित्वाचा असतो आणि माणूस म्हणून जगण्याच्या हक्काचा असतो, हे त्यांच्या कार्याने दाखवून दिले. बहुजन, वंचित, स्त्रिया आणि शोषित घटकांच्या इतिहासाकडे नव्या नजरेने पाहण्याची प्रेरणा त्यांच्या लेखनाने दिली.
सन्मान एका विचारयात्रेचा
पासष्टहून अधिक प्रकाशित ग्रंथ, मराठी विश्वकोशातील शंभरहून अधिक अभ्यासपूर्ण लेख, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक धोरणाच्या मसुदा समितीचे अध्यक्षपद, बालभारतीच्या इतिहास पुस्तकांच्या संपादन समितीतील नेतृत्व आणि विविध साहित्यिक-वैचारिक उपक्रमांतील सक्रिय सहभाग—ही त्यांच्या कार्याची ठळक रूपे आहेत. त्यांना मिळालेले शंभरहून अधिक पुरस्कार त्यांच्या योगदानाची सार्वजनिक दखल आहेत.
तथापि, डॉ. आ. ह. साळुंखे यांचे सर्वांत मोठे यश कोणते असेल, तर त्यांनी घडविलेला विचारशील वाचक. त्यांनी तरुणांना उत्तरांपेक्षा प्रश्नांचे महत्त्व शिकवले. स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवायला शिकवले. सामाजिक अन्यायाकडे संवेदनशीलतेने पाहायला आणि सत्याच्या शोधासाठी निर्भयपणे उभे राहायला शिकवले.
छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम विद्यापीठातर्फे त्यांना प्रदान करण्यात येणारी ‘डॉक्टर ऑफ लेटर्स’ अर्थात डी.लिट. ही सर्वोच्च सन्माननीय पदवी केवळ एका लेखकाचा वा विद्वानाचा गौरव नाही. हा सन्मान सत्याच्या निर्भय शोधाचा आहे. हा सन्मान विवेक, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांशी आजीवन निष्ठा राखणाऱ्या एका प्रज्ञावंत विचारवंताचा आहे.
डॉ. आ. ह. साळुंखे यांची विचारयात्रा आपल्याला पुन्हा पुन्हा सांगते की समाज बदलण्यासाठी केवळ घोषणा पुरेशा नसतात; त्यासाठी विचाराची मशागत करावी लागते. अंधाराशी लढण्यासाठी प्रकाशाची गरज असते, आणि तो प्रकाश विवेकाचा असतो.
(लेखिका एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे सामाजिक शास्त्रे व मानव्य विद्याशाखेच्या अधिष्ठाता आहेत.)
83088 33898










