आसाराम लोमटे यांचा लोकसत्तेतील लेख –
आपण माणूस आहोत. प्राणी असलो तरी अन्य प्राण्यांहून निराळे आहोत. आपल्याला बुद्धी आहे, आपण विचार करतो. जो विचार चाललेला असतो त्यातून आपले व्यक्तिमत्त्व घडते. त्यानुसार आपल्याला काही मतेही असतात. वेळप्रसंगी आपण ती व्यक्तही करू शकतो. ती जशी बरी तशीच वाईटही असू शकतात. यातही व्यक्तिसापेक्षता असते. बऱ्या-वाईटाची प्रत्येकाची कल्पना निराळी असते. म्हणजे आपल्याला जी बाब बरी वाटू लागते ती अन्य कोणाच्या नजरेत वाईट असू शकते आणि आपण ज्याला वाईट म्हणतो ते कोणाच्या तरी नजरेत चांगलेही असण्याची शक्यता असते. जे असायचे ते असेल, पण बोलले तर पाहिजेच. हेही बरोबर आणि तेही बरोबर किंवा हे ठीक आहे आणि तेही वाईट नाही अशी खुबीने कसरत करणारी माणसे समाजात आढळतात. आपल्याला एखाद्या गोष्टीवर काही मत आहे आणि आपण ते मांडले पाहिजे याचा विसरच पडतो अनेकांना. तटस्थतेचा अर्थ आपल्या सोयीनुसार घेण्याचाच हा प्रकार आहे. मुळात नि:पक्षपातीपणा असा काही नसतोच. आपण विचार करीत असू आणि आपल्याकडे बऱ्या-वाईटाची चिकित्सा करणारा विवेक असेल तर मग भूमिकेच्या पातळीवर कुठला तरी पक्ष घ्यावा लागतो. तो कोणासाठी पूरक असेल तर कोणाकरिता विरोधी. तटस्थपणा आणि तथाकथित अलिप्ततावादी धोरण हे फक्त एखाद्या निर्जीव वस्तूतच असू शकते. ती जिवंत माणसाची, विचारी माणसाची ओळख असू शकत नाही.
तडजोड हाच जिथल्या पर्यावरणाचा गाभा असतो तिथे माणसाच्या चांगुलपणाची मूलभूत व्याख्या केली जाऊ शकत नाही आणि निखळ अशा कसोटय़ांवरती माणूसपणही जोखले जाऊ शकत नाही. अशा पर्यावरणात माणसाच्या चांगुलपणाची व्याख्या कोणती? तर जो कोणाच्या अध्यात नाही, मध्यात नाही, आपण आणि आपले काम भले असे मानतो तो. कोणाच्याच कशात नसणे म्हणजे नामानिराळे असणे. उसातून जायचे, पण पाचट अंगाला लागू नये याची काळजी घ्यायची. अळवावरचा पाण्याचा थेंब जसा त्यावर अलगद स्वत:ला सावरून बसतो तशी खूप माणसे असतात समाजात. त्यांना समाजाकडून सारे काही हवे असते. काय स्वीकारायचे, कशात किती लक्ष द्यायचे, कोणालाही न दुखावता आणि सगळ्यांशी हार्दिक नाते ठेवत सर्व काही साध्य करायचे असा हा हिशोबी व्यवहार असतो. हे अलिप्ततावादी धोरण जपायचे, पण स्वत:पुरती ही अलिप्तता गळूनही जाते कधी कधी. कोणाची नाराजी ओढवून घ्यायची नाही, कुठे स्पष्ट प्रतिक्रिया द्यायची नाही, एखाद्या विषयावर ठाम मत व्यक्त करायचे नाही आणि जरा धक्का लागेल असे वाटले की, गोगलगायीसारखे सारे शरीरच आकसून शंखात घालायचे असा हा प्रकार.
..चालले ते ठीक आहे, आपण कशाला कोणाच्या डोळ्यात यायचे, असे बिनदिक्कतपणे बोलतात माणसे. कोणाच्या नजरेच्या टप्प्यातसुद्धा नको इतके आपापल्या कोषात राहताना सावधपण बाळगले जाते. शक्यतो सगळ्यांशी गोडच राहायचे. असे राहिले की नोंदही घेतली जाते आणि जिभेवर साखर आहे अशी ओळखही करून दिली जाते. प्रत्यक्षात जिभेवर साखर ठेवून कोणाला आपली भूमिका कायम पार पाडता येईल असे नाही (आपले सणही असे की तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला, स्पष्ट बोला, कडवट असले तरी चालेल, पण खरे बोला असे नाही.) ज्याच्यावर खूप लोक खूश असतात तिथे समजायचे की तडजोड हीच एक शैली असणार इथे. ग्रामीण भागात सर्रास एक वाक्प्रचार वापरला जातो. कोणाची नाराजी ओढवून घ्यायची नसेल आणि कुठेच स्पष्ट बोलायचे नसेल, तर मग ‘मी कशाला कडू वाळकं तोडू?’ असे बोलून जातात माणसे. वाळूक हे शेतात वेलीला लागणारे एक फळ आहे. त्यात जसे गोड वाळूक असते तसेच कडूही. दोन्ही प्रकारचे वेल असतात. एखाद्याला दुखवायचे नसेल तर मग कडू वाळूक कशासाठी तोडायचे असे बोलले जाते. असे वाळूक तोडून उपयोग तरी काय? असे गणित त्या पाठीमागे असते.
‘अजातशत्रू’ हे असेच एक मजेशीर विशेषण आहे. एखाद्याची ओळख करून देताना ते हमखास वापरले जाते. अजातशत्रू माणूस जास्त लोकप्रिय आणि त्याच्या संबंधाची साखळी जास्त मोठी असेही मानले जाते. माणूस अजातशत्रू कसा काय असू शकतो?
हिणकसपणे एखाद्याचे वैरत्व घेणे अथवा एखाद्याला द्वेषभावनेतून शत्रुत्व बहाल करणे हे माणूसपणाला धरून असू शकत नाही, ते वाईटच आहे. शिवाय द्वेषापोटी माणूसपणाला खुजे करणारे वैगुण्य बाळगून जर एकमेकांत मतभेदाची दरी निर्माण केली जात असेल तर तेही चूकच, पण आपल्यासमोर जो काही वास्तवाचा पडदा आहे त्यासंबंधी मत नोंदविताना, प्रतिक्रिया देताना, भूमिका घेताना ती एकाच वेळी सर्वाचे समाधान करणारी असू शकत नाही. काही जण नाराज होणार, कोणाला आपले मत आवडणार नाही किंवा कोणासाठी गरसोयीचे असेल तर कोणी दुखावणारसुद्धा. ..पण कोणाला नाराज करायचे नाही असा सावध पवित्रा घेण्याचा प्रकारही आता सरळ सरळ अजातशत्रू या सदरात मोडू शकतो. सगळ्याच कल्पनांची सरमिसळ होण्याचा सध्याचा काळ आहे.
गावात एखादा व्यापारी असेल किंवा एखादा धंदा करणारा व्यावसायिक असेल तर तो थेट कोणत्याच संघर्षांत पडत नाही. सर्वाशी गोड राहूनच आपला धंदा त्याला करायचा असतो आणि या धंद्यात उत्कर्ष साधायचा असतो. त्याला आपले उत्पादन विकायचे असते, ग्राहक जोडायचे असतात. ‘आपला धंदा बरा आणि आपण’ अशी भावना असते त्या पाठीमागे.
गावात एखाद्या सार्वजनिक ठिकाणी भांडण असेल तर ते सोडविण्यासाठीही हा माणूस मध्ये पडणार नाही. कोणावर डोळ्यादेखत अन्याय झाला असेल तरीही चकार शब्द उच्चारणार नाही आणि एखाद्या कलहात ठामपणे आपले मतही नोंदविणार नाही. आपल्याला धंदा करायचाय. हस्तक्षेप करणे आपले काम नाही असे वाटते त्याला. जिथे जिथे पक्ष-प्रतिपक्ष समोर ठाकले असतील आणि काही चर्चा होत असेल अथवा एखादा संवेदनशील विषय असेल तर तिथे सहभागीदार होणे सोडा, साधे साक्षीदार होणेही नको वाटते अनेकांना. कारण आपण धंदेवाईक आहोत, आपले हे काम नाही असे या माणसांना वाटत असते. जी माणसे ठामपणे काही बोलत नाहीत ती योग्य वेळी मौन धारण करतात. अळवाच्या पाण्यावरच्या थेंबाप्रमाणे अलिप्तता जपतात. आपली बरी-वाईट व्यक्त झालेली मते आपल्याला तोटय़ाची ठरू शकतात असे ज्यांना वाटते तेही जणू व्यावसायिकच असतात आणि त्यांनी स्वत:लाच विकायला काढलेले असते. या धंद्यात तोटा नको याची काळजी मनोमन घेत असताना अशा अजातशत्रूंची संख्या दिवसेंदिवस समाजात वाढत चालली आहे आणि निरोगी समाजासाठी हे बरे नाही.