बैल पोळ्याच्या दुस-या दिवशी शहरात पारंपारिक पद्धतीने आणि वाजत गाजत चौकाचौकात मिरवणूक काढली जाते. यातही वेगवेगळ्या प्रकारच्या मारबती असतात. त्यातील काळी मारबत आणि पिवळी मारबत प्रसिद्ध आहे. काळ्या मारबतीला १३५ आणि पिवळ्या मारबतीला १३० वर्षाचा इतिहास आहे.
‘मारबत व बडग्या’ हा जगातला एकमेव असा मिरवणुक प्रकार फक्त नागपूरातच आहे. पूर्वी भोसले घराण्यातील बांकाबाई हिने इंग्रजांशी हातमिळवणी केली त्याचा निषेध म्हणुन बांकाबाईच्या, कागद व बांबू वापरुन केलेल्या पुतळ्याची, तान्ह्या पोळ्याच्या दिवशी (पोळ्याचा दुसरा दिवस) मिरवणूक काढण्यात येते आणि नंतर त्याचे दहन होते. यामध्ये काळी व पिवळी मारबत असे दोन प्रकार आहेत.
बांकाबाईच्या नवर्याने या तिच्या कृत्याचा विरोध केला नाही म्हणुन त्याचाही पुतळा बनवून त्याचीही तिच्यासोबतच मिरवणुक काढतात. तिच्या नव-याच्या पुतळ्याला ‘बडग्या’ म्हणतात.
श्रावण अमावस्येच्या दुस-या दिवशी नागपूर व जवळपासच्या गाव-खेडयातील लोक नागपूरला आपल्या लहानग्यांना घेउन येतात.मिरवणूक मार्गाच्या दुतर्फा उभे राहून मारबत व बडग्या बघतात. ही एक प्रकारे जत्राच आहे. तेथे अनेक फेरीवाले फुगे, खेळणी व अन्य वस्तु विकतात. या वेळेस पावसाळ्याच्या जोर कमी झालेला असतो. शेतीची कामेही झालेली असतात. त्यामुळे शेतक-यांना एक विरंगुळा मिळतो.
इंग्रजांचे राज्य जाऊन आज कितीतरी वर्षे लोटली. परंतु, नागपूरकर आणि या परिसरातील नागरिकांच्या मनात बांकाबाईच्या कुकृत्यामुळे झालेली जखम अजून भळभळतेच आहे.