-उत्पल व्ही . बी.
‘आजचा सुधारक’चा विचारभिन्नता विशेषांक ऑगस्ट-सप्टेंबर २०१६ मध्ये प्रकाशित झाला होता. त्याचा मी अतिथी संपादक होतो. त्यातील माझ्या लेखात मी हे लिहिलं होतं की केंद्रात सत्तेवर आलेल्या सरकारशी वैचारिक मतभेद असणं हे ठीक आहे. पण हा काही त्यांच्या कामाच्या मूल्यमापनाचा निकष होऊ शकत नाही. त्यामुळे सरकारने चांगलं काम करावं आणि देशाला पुढे न्यावं अशी आपली इच्छा असली पाहिजे. सतत आरडाओरडा कशासाठी? मी स्वतः कधीच भाजप/मोदींविषयी नकारात्मकतेने काही बोलत नव्हतो. सतत, अतिप्रमाणात, आऊट ऑफ प्रपोर्शन जाऊन विरोध केल्याने आपला एकांगीपणा समोर येतो आणि खरं तर विरोधातली धारही हरवते. त्यामुळे सतत तसं करू नये असं माझं मत होतं आणि अजूनही आहे.
मात्र गेल्या दोनेक वर्षापासून माझा उद्वेग वाढला. यावर थोडं नीट लिहिलं पाहिजे.
यात दोन भाग आहेत. पहिला म्हणजे नरेंद्र मोदींचं प्रशासकीय कौशल्य, त्यांनी घेतलेले जनहिताचे निर्णय याचा. ज्या गोष्टी सकारात्मक आहेत त्या योगदानाबद्दल त्यांचं कौतुक करायला हवंच. यात शंका नाहीच. अर्थात यातले जे जाणकार आहेत ते सरकारच्या कामाचं मूल्यमापन चांगल्या प्रकारे करू शकतात. परंतु चांगल्या हेतूने सुरू झालेल्या नव्या योजना, प्रकल्प ही निश्चितच कुठल्याही सरकारची जमेची बाजू असतेच.
दुसरा भाग जो आहे तो अधिक ठसठशीत आहे आणि त्याचा संबंध कार्याशी नसून मानसिकतेशी आहे. आणि तो मुख्य अडचणीचा भाग आहे. नरेंद्र मोदींच्या व्यक्तिमत्वाची जी बाजू अधिक प्रखरपणे समोर येत गेली ती त्यांच्या व्यक्तिमत्वाची दुसरी बाजू आहे. पहिल्या, प्रशासकीय कौशल्याच्या बाजूला झाकोळणारी. त्यात नेहरू, काँग्रेस यांच्यावर सतत टीका करणे, पंतप्रधानपदावरील व्यक्तीला शोभणार नाही अशी वक्तव्ये करणे (उदा. डिस्लेक्सियावरील विधान, कॅनडामध्ये केलेलं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर वरचं अगम्य विधान, गटारातील वायूपासून गॅस, हवामानबदलाविषयीचं विधान इ.), पत्रकार परिषद न घेणे, राष्ट्र्वादाचा प्रच्छन्न वापर करणे, भाषणांमधून खोटंही बोलणे (उदा. काँग्रेसचा कुणीही माणूस भगतसिंगला भेटायला गेला नव्हता. वास्तविक पंडित नेहरू गेले होते. १० ऑगस्ट १९२९ च्या ट्रिब्यूनमध्ये हे वृत्त प्रसिद्ध झालं होतं. ऐतिहासिक गोष्टींच्या मोदींनी केलेल्या विपर्यासाचे इतरही दाखले आहेत.) अशा काही गोष्टींचा समावेश होतो.
याच्या जोडीला इतरही काही उदाहरणे बघू. भाजपच्या आयटी सेलचे अध्यक्ष अमित मालवीय यांनी भाजपच्या ऑफिशियल पेजवरून नेहरूंचे मॉर्फ केलेले फोटो प्रसारित केले होते. अलीकडे ‘भाजपच्या विरुद्ध असणं म्हणजे अँटी-नॅशनल असणं’ असं विधान तेजस्वी सूर्या या भाजपच्या बंगलोरमधील उमेदवाराने केलं. अशा आशयाची विधानं सोशल मीडियावर भाजप समर्थकांकडूनही होत असतात. नेहरू-गांधींवर संघपरिवाराकडून किती खालच्या पातळीवर जाऊन टीका होते हे मी स्वतः अनुभवलं आहे. (हा सदाशिव पेठेतील नेहमीचा जीवनानुभव आहे). टीका करण्याबद्दल, कामाची समीक्षा करण्याबद्दल अर्थातच आक्षेप नाही, पण द्वेष? एक खंडप्राय देश स्वतंत्र होत असतो, त्यात शेकडो गुंते असतात, (त्यातून भारतासारखा देश म्हणजे अधिकच गुंते), त्या वेळी काही निर्णय घेतले जातात – आता हे निणर्य चुकीचे ठरू शकतात का? तर हो – ठरू शकतात. (हे मी वादाकरता घेतो आहे. प्रत्यक्षात निर्णय चुकले की योग्य होते हा वेगळा मुद्दा.) पण म्हणून द्वेष पसरवायचा? नेहरूंबाबत मी ‘नीच’ हा शब्ददेखील ऐकला आहे. सत्तर वर्षात काहीही झालं नाही हा मोदींचा आवडता मुद्दा आहे. वास्तविक ते एक वर्षाचे असताना भारतात एशियन गेम्सचं आयोजन झालं होतं. त्यांच्या टीनएजमध्ये आयआयटी स्थापन झाली होती. असे आणखीही दाखले देता येतील. झालं त्यापेक्षा अधिक होऊ शकलं असतं हे म्हणणं ठीकच आहे. पण काहीच झालं नाही? भाजपचे तुम्ही समर्थक असा अथवा नसा, संघ-भाजपने द्वेषाचं राजकारण केलं आहे आणि समाजात तेढ निर्माण केली आहे हे सरळच दिसतं. काही वर्षांपूर्वी मी मुझफ्फरनगर दंगलींबाबत केल्या गेलेल्या शोधपत्रकारितेच्या आधारे एक लेख लिहिला होता. त्यात भाजपच्या धार्मिक तेढ निर्माण करणऱ्या राजकारणाचा चेहरा दिसला होता.
हे म्हणत असताना मी हे पुन्हा लिहितो की याचा अर्थ ‘चांगल्या कामांकडे’ बघायचं नाही असा नाही. पण माझ्या मनात प्रश्न हा येतो की ही जी दुसरी बाजू आहे तिच्या पार्श्वभूमीवर ‘चांगली काम’ झाकोळली गेली तर त्यात नवल काय आहे? संघ-भाजप समर्थकांच्या हे लक्षात येत नाहीये का? ‘अटलबिहारी वाजपेयी’ हे नाव उच्चारलं की कारगिल युद्ध, पोखरण अणुचाचणी हे आठवतं. का? कारण वाजपेयींशी मतभेद असले तरी ते एक सुसंस्कृत, शालीन राजकारणी होते, ‘देशाचे पंतप्रधान’ या महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीने जसं वागायला हवं तसं ते वागत होते आणि त्यांची हीच प्रतिमा डोळ्यापुढे येते म्हणून. (इथे एक मुद्दा समजून घेऊ. कुणीही राजकारणी जसा वागतो-दिसतो तसा तो प्रत्यक्षात असतो का हा एक वेगळा प्रश्न आहेच. पण मुद्दा हा की मला – म्हणजे जनतेला – त्यांचं वागणं-बोलणंच फक्त दिसत असतं. मी त्यांना ऑफिसमध्ये काम करताना, ते बैठकी घेत असताना, निर्णय घेत असताना बघूच शकत नाही. मनमोहन सिंग हा एक विद्वान अर्थतज्ज्ञ आहे हे मला मी त्यांना रोज बघतो म्हणून नाही तर ते जे बोलतात आणि त्यांचे जे थोडेफार निर्णय माझ्यापर्यंत येतात, त्यांच्याविषयी जे लिहून येतं त्यावरूनच दिसतं. ही एक व्यवस्थात्मक मर्यादा आहे.) या पार्श्वभूमीवर ‘नरेंद्र मोदी’ म्हटलं की माझ्या मनात सकारात्मक असं काही ट्रिगर होत नाही हा माझा दोष की नरेंद्र मोदींचा? नरेंद्र मोदींची नकारात्मक प्रतिमाच उभी केली गेली आहे असं जर कुणी म्हणत असेल तर त्याला माझा विरोध आहे. कारण नरेंद्र मोदी यांचं इतकं अतिदर्शन झालं आहे की त्यांच्या व्यक्तिगत मर्यादा न ओळखणं अशक्य राहिलेलंच नाही. राहुल गांधी अगदी बावळट होता असं म्हणू, पण तो आज हे म्हणतोय की मी माझ्या चुकांपासून शिकलोय. तो आज लोकांमध्ये मिसळतोय. लोकांशी स्वतःला जोडून घेतोय. स्वतःमध्ये बदल घडवणारा, त्याबद्दल खुलेपणाने बोलणारा मनुष्य मला नेहमीच आश्वासक वाटतो. त्यामुळे आज राहुल गांधीबाबत मला जो विश्वास वाटतो तो मोदींबद्दल वाटत नाही. मोदी जर शांतपणे, गंभीरपणे, पंतप्रधानपदाचा आब राखत बोलले असते आणि कमी बोलले असते तर माझ्यासारख्याला त्यांच्याबाबत विश्वास वाटला असता. त्यांच्यावर इतकी टीकाही झाली नसती
दृष्टीकोनात फरक असतो हे मान्य. मला मुळातच हिंदुत्ववादी राजकारण मान्य नाही पण संघ-भाजप समर्थकांना ते मान्य आहे हेही मान्य. नरेंद्र मोदींविषयी संघ-भाजप समर्थकांना प्रेम आहे हे मान्य. प्रेम ही एक विशेष गोष्ट आहे, प्रेमाला भरती म्हणजे लॉजिकला ओहोटी हे मान्य. मी हेही मान्य करतो की डाव्या-पुरोगामी चळवळीने हिंदुत्ववादाची जी चिकित्सा केली त्यात नकळतपणे सामान्य हिंदू माणूसही दुखावला गेला. पुरोगामी चळवळीच्या मर्यादा, दोष सगळं मान्य. मोदींनी केलेली चांगली कामं मान्य. पण प्रश्न सुट्या मुद्द्यांचा नाही. तो आहे गोळाबेरजेचा. आणि ही गोळाबेरीज माझ्यासमोर काही प्रश्न उभे करते. ते असे – ‘चांगली कामं करणाऱ्या पंतप्रधानांना ‘काँग्रेसमुक्ती’ची गरज का वाटावी? भाजपला आयटी सेलमार्फत द्वेष पसरवण्याची गरज का वाटावी? (अलीकडे भाजप आयटी सेलमध्ये काम करणारा एक मुलगा भेटला होता. त्याने ते काम सोडलं. आता तो भाजपविरोधक आहे.) बरं, हे मान्य की राजकारण म्हणून, प्रचाराचा भाग म्हणून हे करावं लागतं. पण संसदेत शेवटचं भाषण करतानाही प्रचारच करायची गरज का वाटावी? हे प्रश्न मला ज्या उत्तराकडे नेतात ते असं की देशाचा विकास ही मोदींची आस असेल, पण काँग्रेसमुक्ती ही त्याहून मोठी आस आहे.
राहुल गांधी मागे एका सभेत म्हणाला होता की भाजप ही याच देशातील एक विचारधारा आहे, तिचं एक स्थान आहे आणि ते असलं पाहिजे. राहुल गांधी धुतल्या तांदळाचा नाही, तोही राजकारण करतो आणि करणार (धुतल्या तांदळाचा कुणीच नाही, मीही नाही) हे मान्य, पण व्यासपीठावरून ‘काँग्रेस ही या देशातली एक विचारधारा आहे, तिचं एक स्थान आहे आणि ते असलं पाहिजे’ असं विधान मोदी एकदा तरी करतील का? मोदी हे विधान करणार नाहीत याचं कारण ‘रेजिमेंटेशन’मध्ये आहे. आणि तोच माझा शेवटचा मुद्दा आहे. कोणत्याही कट्टरतावादी विचारधारेचा रेजिमेंटेशन हा प्रमुख गुण असतो. मी आजवर शंभरदा हे म्हटलेलं आहे की डाव्या-पुरोगामी विचारधारेत – ही विचारधारा पुढे नेणाऱ्या व्यक्तींमध्ये दोष आहेत. पण हे वाक्य मी दुसऱ्या बाजूकडून आजवर एकदाही ऐकलं नाही. याचं कारण बौद्धिक एकारलेपण, रेजिमेंटेशन हे आहे. माझ्यात किंवा मी ज्या विचारधारेचा पुरस्कार करतो त्या विचारधारेत दोष दिसले तर मी अस्वस्थ होतो, आत्मपरीक्षण करू लागतो, त्याविषयी उघडपणे बोलतोही. पण हे असं उघडपणे बोलणारा, त्यावर सविस्तर लिहिणारा संघ-भाजप समर्थक मला तरी आजवर दिसलेला नाही. हे रेजिमेंटेशन पद्धतशीरपणे केलं गेलेलं आहे आणि सदाशिव पेठेत राहत असल्याने मी त्याचा साक्षीदार आहे.
एक खूप चावून चोथा झालेलं वाक्य आहे. विरोध व्यक्तीला नाही, वृत्तीला असावा. चोथा झालेला असला तरी हे वाक्य खरं आहे. माझा प्रत्यक्ष नरेंद्र मोदींपेक्षा, कट्टर संघसमर्थकापेक्षा त्या वृत्तीला विरोध आहे. निवडणुकीत काय होईल ते होईलच. त्यात भाजप यशस्वीही होईल, पण माझ्या दृष्टीने ‘सोशल फॅब्रिक’ विस्कळीत करणारा कुठलाही पक्ष हा पराभूत झालेला पक्ष असेल. त्याने केलेली चांगली कामे कितीही असली तरी सामाजिक वीण उसवण्याचं काम हे त्या कामांचं मोल कमी करतं. आणि हे भाजपलाच नाही तर सगळ्यांनाच लागू आहे. उद्या जर नरेंद्र मोदींसारखा मनुष्य काँग्रेसमध्ये असेल आणि त्याला जर काँग्रेसने पंतप्रधान म्हणून पुढे केलं आणि त्यावेळी राहुल गांधींसारखा एखादा उमेदवार भाजपकडे असेल तर मी भाजपला मत देईन. काहीही झालं, अगदी मनातूनही पटलं तरी आपल्या नेत्याच्या सर्व चुका दृष्टीआड करणारे भाजपसमर्थक हाच विचार करून आज काँग्रेसला मत देतील का हा प्रश्न त्यांनी स्वतःला जरूर विचारावा.
Reality …
बहोत खूब लेख
Reality… Very true writing