जवाहरलाल नेहरू विशेष लेखमाला – भाग १७
साभार – साप्ताहिक साधना
– सुरेश द्वादशीवार
फैजपूरनंतर सारेच काँग्रेस नेते निवडणुकीच्या कामाला लागले. नेहरूंनी या निवडणुकीत ६५ हजार मैलांचा प्रवास केला. कुठे विमानाने कुठे गाडीने, कारने, ट्रकने, हत्तीवरून, उंटावरून, घोड्यावरून, बैलगाडीने, सायकलने तर कधी पायी. दरदिवशी वीस तासाहून अधिक काळ ते खपत राहिले. दर दिवशी बारा सभा. कधी पहाटे तर कधी थेट मध्यरात्रीपर्यंत. काही हजारांच्या तर काही लाखांच्या. सुमारे दोन कोटीहून अधिक स्त्री-पुरुषांनी त्यांची भाषणे या काळात ऐकली.
पंजाबातील एका खेड्यात ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देणार्या शीख जमावाने त्यांच्या भोवती गराडा घातला. ‘या घोषणेचा अर्थ काय?’ नेहरूंनी त्यांना विचारले. ‘धरती’ त्यांनी उत्तर दिले. ‘कोणाची धरती?’ त्याला स्वत:च उत्तर देत ते म्हणाले, ‘तुमची धरती, तुमचा प्रांत, तुमचा देश, भारत आणि जग.’
‘तुमचे म्हणणे उलगडून सांगा.’ असे त्यातल्या एकाने म्हणताच नेहरू म्हणाले, ‘भारत माता म्हणजे हा देश. या देशातली जनता. आपण भारतमातेच्या पुत्रांचा व कन्यांचा जयजयकार करीत आहोत. तुम्ही भारत माता की जय म्हणता, तेव्हा तो खर्या अर्थाने तुमचा व आपल्या सार्यांचाच जयजयकार असतो.’
या निवडणुकीतील काँग्रेसचा विजय नेत्रदीपक होता. विधिमंडळाच्या एकूणी १८८५ जागांपैकी (यातील ६५७ जागा सरकारसाठी राखीव) काँग्रेसला ७१५ जागांवर विजय मिळाला. पाच प्रांतात त्याला स्वबळावर बहुमत मिळाले. मद्रास, संयुक्त प्रांत, मध्य प्रांत, बिहार आणि ओरिसा हे प्रांत पूर्णत: त्याच्या ताब्यात आले. मुंबई प्रांतात तो पहिल्या क्रमांकाचा मोठा पक्ष बनला. इतर राष्ट्रवादी पक्षांच्या मदतीने तेथेही त्याला सरकार स्थापन करता आहे. आसामात त्याला १०८ पैकी ३५ जागा मिळाल्या. पण मित्रपक्षांच्या मदतीने तेथेही त्याने सत्ता मिळविली. वायव्य सरहद्द प्रांत या मुस्लिमबहुल प्रांतातही १९ जागा मिळवून तो सर्वात मोठा व सत्ताधारी पक्ष बनला. ११ पैकी ८ राज्यात काँग्रेसची सरकारे आली. बंगाल, पंजाब व सिंधमध्ये तो अल्पमतात राहिला. त्यातील २५० पैकी ६० जागा त्याच्या वाट्याला आल्या. काँग्रेसचा सर्वात आश्चर्यकारक विजय मद्रासमधील होता. १९२२ पासून तेथे जस्टिस पार्टी बहुमतात होती. यावेळी काँग्रेसला तेथे १५९ तर जस्टिस पार्टीला अवघ्या २१ जागा मिळाल्या.
तथापि या निवडणुकीने स्पष्ट केलेली एक महत्त्वाची बाब ही की काँग्रेसचे यश हे हिंदुबहुल क्षेत्रातले तर मुस्लिम लिगचे मुस्लिम क्षेत्रातले होते. त्यातून जिनांचे बळ वाढले. आपल्या अनुयायांना उद्देशून दिल्लीत भाषण करताना ते म्हणाले, ‘हिंदू आणि मुसलमानांनी वेगळे व स्वतंत्र संघटन करणे गरजेचे आहे. त्यामुळे ते एकमेकांना अधिक चांगले समजू व ओळखू शकतील. मी देशातील ८ कोटी मुसलमानांना संघटित करू इच्छितो त्यामुळे त्यांचे बळ वाढणार आहे.’ पुढे १९४० च्या डिसेंबरात त्यांनी मुस्लिम लिगसह प्रत्यक्ष फाळणीची व पाकिस्तानच्या निर्मितीची योजनाच जाहीर केली.
निवडणुकीतील विजयानंतर काँग्रेसने सरकारसमोर काही अटी मांडल्या. त्यानुसार गव्हर्नरने त्याच्या अमर्याद अधिकारांचा वापर करून मंत्रिमंडळाच्या अधिकारांचा संकोच करू नये असा आग्रह पुढे केला. त्यावर सरकार व काँग्रेस यांच्यात बरीच चर्चा होऊन नवे गव्हर्नर जनरल लॉर्ड लिनलिथगो यांनी गांधीजींना तसे न करण्याचे आश्वासन दिले. मात्र जे प्रश्न अतिशय गंभीर व साम्राज्याच्या हिताला बाधा आणणारे असतील तेथेच असा हस्तक्षेप केला जाईल हे स्पष्ट केले. त्यानंतर काँग्रेसने आपली मंत्रिमंडळे विविध राज्यात स्थापन केली. काही काळानंतर व तडजोडी करून आसाम आणि वायव्य सरहद्द प्रांतातील काँग्रेसची सरकारेही कामाला लागली. ही मंत्रिमंडळे १९३९ पर्यंत अधिकारावर राहिली. त्यावर्षी इंग्रज सरकारने भारतीय जनतेच्या सहमतीवाचूनच भारताला आपल्या बाजूने दुसर्या महायुद्धात सामील करून घेतले. त्याचा निषेध म्हणून या मंत्रिमंडळाने राजीनामे दिले.
मुळात नेहरूंना हा सहभागच नको होता. सुभाषबाबूही त्यांच्याच मताचे होते. परंतु वर्किंग कमिटी व बहुसंख्य काँग्रेसजनांना सरकारात प्रवेश हवा होता. अखेर पक्षाचा निर्णय मान्य करूनच नेहरूंनी या निवडणुकीत भाग घेतला होता. त्यांच्या मते ही काँग्रेसची दुहेरी वाटचाल होती. एकीकडे पक्ष स्वातंत्र्यासाठी लढत होता व दुसरीकडे त्याच्यावर गुलामगिरी लादणार्या सरकारशी बरोबरीने सहकार्यही करीत होता. यापुढली अनेक वर्षे नेहरूंनी देशाच्या ग्रामीण भाागाचा दौरा करण्यात घालविले. तामीळ, मराठी, शीख, गुजराती, सिंधी, आसाम आणि ओरिसासारख्या भागात ते खेडोपाडी हिंडत राहिले. देशाचा आत्मा येथेच असल्याची त्यांची जाण त्यातून वाढली. अशिक्षित व निरक्षर माणसेही जाती-धर्माचे भेद विसरून रामायण-महाभारतातील कथा वाचीत होते. त्यावरची नाटके करीत होते. कुठेकुठे त्यांना त्या काळचे जुने पोषाख चढवून नाटके करणारी माणसे व सुंदर स्त्रियाही पाहता आल्या. या दौर्यात त्यांनी देशात असंख्य भाषणे केली. त्यात आपल्या खेड्यापुरता विचार न करता देशाचा विचार कराफ अशी शिकवण ते देत राहिले. काही जागी ते जागतिक अर्थकारण, युद्धस्थिती व भारताचे धोरण हेही विषय मांडताना दिसले.
जनतेत उत्साह होता. आपली सरकारे प्रांतात का होईना अधिकारारूढ झाल्याचा अभिमान त्यांच्यात होता. आपले प्रश्न आता सुटतील याची आशा होती. या सरकारांनी शेतकर्यांवरील कर्जाचा भार कमी केला. कारखान्यातील श्रमिकांचे वेतन वाढविले. स्वच्छता व आरोग्याच्या सोयी वाढविल्या. मूलभूत शिक्षणाची व्यवस्था केली. वाट्याला आलेला अल्पकाळ व देशाची गुलामी यामुळे फार मोठी साध्ये त्यांना गाठता आली नसली, तरी मिळालेल्या मर्यादित अधिकारांचा चांगला वापर करून त्यांनी जनतेचा आशावाद जागविला आणि वाढविला. ही सरकारे अधिकारारूढ होताच त्यांच्या व नेहरूंच्या लक्षात आलेली पहिली बाब, या सरकारांजवळ कोणतीही महत्त्वाची आकडेवारी उपलब्ध नसल्याची होती. लोकसंख्या, तिच्या गरजा, त्यांच्या पूर्तीसाठी लागणार्या बाबी यांचीही मूलभूत माहिती त्यांच्याजवळ नव्हती. त्यामुळे १९३८ मध्ये ही माहिती व तिचा तपशील एकत्र करण्यासाठी नेहरूंनी राष्ट्रीय स्तरावर एका राष्ट्रीय नियोजन मंडळाची स्थापना केली. ते स्वत: तिचे अध्यक्ष झाले. या मंडळाच्या दोन डझन उपसमित्या बनविल्या गेल्या. त्यात लष्करापासून आर्थिक कार्यक्रमापर्यंत व शिक्षणापासून पाणीपुरवठ्यापर्यंतच्या कार्यक्रमांचा विचार करणार्या समित्या होत्या. त्यात देशातील तज्ज्ञ माणसांची त्यांनी नेमणूक केली होती.
काही काळाच्या परिक्षणांनंतर या समित्यांनी सादर केलेल्या अहवालात देशाची सद्यस्थिती बदलायची असेल तर त्याचे उत्पादन ५०० ते ६०० टक्क्यांनी वाढविणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. मात्र आहे त्या साधनांसह ही वाढ २०० ते ३०० टक्क्यांपर्यंतच करता येईल हेही त्यांनी जाहीर केले. या समित्यांना व मंडळाला त्याचे काम मात्र पूर्ण करता आले नाही. १९४० च्या ऑक्टोबरात नेहरूंना सरकारने अटक करून चार वर्षांची शिक्षा सुनावली. पुढे १९४२ च्या चले जाव आंदोलनानंतर ते थेट १५ जून १९४५ पर्यंत कोणत्याही सुनावणीवाचून त्यांच्या सर्व वरिष्ठ सहकार्यांसह अहमदनगरच्या किल्ल्यात जेरबंदच राहिले. मात्र पुढे देश स्वतंत्र होताच नेहरूंनी या मंडळाची पुनर्रचना करून तिचे राष्ट्रीय नियोजन आयोगात रूपांतर केले.
(लेखक नामवंत विचारवंत , वक्ते व ‘लोकमत’ च्या नागपूर आवृत्तीचे संपादक आहेत)
9822471646
जवाहरलाल नेहरू विशेष लेखमाला– जुने सगळे लेख वाचण्यासाठी क्लिक करा- http://bit.ly/2IALWvx