बापू कथेच्या माध्यमातून महात्मा गांधींचे जीवनकार्य समाजासमोर मांडणारे सर्व सेवासंघाचे माजी अध्यक्ष नारायणभाई देसाई यांचे रविवारी वार्धक्याने निधन झाले. गांधींचे स्वीय सहायक तथा चरित्रकार महादेवभाई देसाई यांचे ते सुपूत्र होते. नारायणभाईंच्या आठवणींना उजाळा देणारा हा विशेष लेख.
१९६७ मध्ये बिहारमध्ये भीषण दुष्काळ पडला. अन्नान दशा निर्माण झाली. आम्ही नुकतेच पदवीधर होवून कॉलेजातून बाहेर पडलो. अशावेळी तरुण मनात काही विशेष कार्य करण्याची उर्मी असते. जयप्रकाशजींचे तरुणांना बिहारमधील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी येण्याचे आवाहन वाचण्यात आले. यवतमाळवरून चार तरुण मित्र निघालो. तरुणांना दुष्काळात मदत कार्य कसे करावे? दुष्काळांची मूलभूत कारणे कोणती? दुष्काळ ईश्वर निर्मित असतो की मनुष्यनिर्मित? इत्यादी विषयावरचे सखोल चिंतन देशभरातून आलेल्या आम्हा तरुणांसमोर मांडले. आमची विचारांची दारे उघडल्या गेली. कार्याला योग्य दिशा मिळाली. ती नारायणभाई देसाई यांच्यामुळे. १९६७ ते २0१४ म्हणजे ४७ वष्रे आम्ही त्यांच्या विचाराच्या निकट सानिध्यात वावरत होतो.
साने गुरुजींना आम्ही कधी भेटलो नाही किंवा पाहिले नाही. परंतु त्यांच्या कथा-गोष्टींनी बालवयातच मनाची पकड घेतली. त्या विचाराचे पोषण करण्याचे, वाढविण्याचे काम नारायणभाईंच्या सहवासामुळे वाढीस लागले. योगायोग म्हणजे साने गुरुजी आणि नारायणभाई देसाई यांचा जन्मदिवस एकच म्हणजे २४ डिसेंबर. त्यामुळे आमचे नाते अधिक दृढ झाले. ”गुरुबिन कौन बटाए बाट, बडा कठीण यमघाट”
माझ्यासारख्या कित्येकांनी मनोमन नारायणभाईंना गुरूस्थानी विराजमान केले. तशी त्यांनी स्वत: कधीच इच्छा व्यक्त केली नाही. बालवयातच त्यांना महात्मा गांधीजींचे निकट सानिध्य लाभले. अ आ ई चा पाठ गांधीजींनीच त्यांच्याकडून गिरवून घेतला. त्यानंतर ते कधी कोणत्याही चार भिंतीच्या शाळा-कॉलेजात शिकायला गेले नाहीत. गांधीजींचा सेवाग्राम आश्रम आणि साबरमतीच्या आश्रमात येणार्या थोरा-मोठय़ांच्या सहवासात त्यांचे सहज शिक्षण होत गेले. विचारांची प्रगल्भता वाढत गेली. गुजराती त्यांची मातृभाषा. महाराष्ट्रात त्यांचे बर्याच काळपर्यंत सेवाग्रामला वास्तव्य झाल्यामुळे मराठीची ओळख झाली, तीही पक्की. ओरिसाचे मुख्यमंत्री नवकृष्ण चौधरी यांच्या मुलीसोबत विवाह झाल्यामुळे उडीया भाषाही त्यांनी आत्मसात केली. इंग्रजी व हिंदी भाषांवर त्यांचे सारखेच प्रभूत्व. गुजराती साहित्य क्षेत्रातील अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले.
गांधीजींनी १९२0 साली स्थापन केलेल्या गुजरात विद्यापीठ अहमदाबादचे ते शेवटच्या काळापर्यंत कुलगुरू होते. गांधी स्मारक समिती व आंतरभारतीचे संचालक डॉ. एस. एन सुब्बाराव एकदा आपल्या भाषणात म्हणाले, ” नारायणभाईजीने ‘बापू कथा’ शुरू की, और उन्हे जीने का मक्सद मिल गया.” सर्वसेवा संघाच्या अध्यक्षपदावरून मुक्त झाल्यावर त्यांनी आपले उर्वरित आयुष्य गांधीजींचे जीवनकार्य समाजासमोर मांडण्याचे ठरविले. गांधीजींच्या सहवासात ज्यांनी आपले जीवन घालविले त्यांचे वडील महादेवभाई देसाई हे गांधीजीचे सचिव होते. गांधीजीनंतर विनोबांनी भूदान-ग्रामदान आंदोलन केले. त्यामध्ये नारायणभाई सहभागी झाले. त्यानंतर १९७६-७७ झालेल्या जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती आंदोलनात नारायणभाई अग्रभागी होते. गांधी-विनोबा आणि जयप्रकाश या तीनही महापुरुषांच्या सहवासात राहून त्यांच्या आंदोलनात सक्रियपणे ते सहभागी झाले. त्यामुळे त्यांच्या देश-विदेशात झालेल्या बापूकथांना सर्वत्र उत्तम प्रतिसाद मिळाला. जेव्हा एखादी व्यक्ती एका महत्त्वपूर्ण कार्यासाठी आपले जीवन सर्वस्व सर्मपण करतो, तेव्हा त्याचे उचित परिणाम दिसून आल्याशिवाय राहत नाही. त्यांनी आम्हा मित्रांना १३ हजार मैलावरील इक्केडोर देशात घडलेला प्रसंग सांगितला. ते म्हणाले, ” तिथे मी बापूंच्याबद्दल बोललो. ते ऐकल्यावर अनेक श्रोते माझ्यासोबत शेकहॅन्ड करायला आले. एका मध्यम वयाच्या माणसाने माझा हात धरून थँक यू, थँक यू, थँक यू.. म्हणणे सुरू केले. तो हात सोडायला तयारच नव्हता. सोबतच्या दुभाषाने त्याला विचारले असता तो अगदी भारावून म्हणाला, गांधीच्या पवित्र हाताचा स्पर्श आपल्याला अनेकदा झाला आहे. त्या हाताची पवित्र लहर तुमच्या मार्फत माझ्या शरीरात निर्माण व्हावी, यासाठी मी तुमचा हात हलवतो आहे.”
महाराष्ट्र, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, पुणे येथे नारायणभाईंच्या बापूकथा ऐकायला मित्रांसह मी गेलो. चंद्रपूरला वार्ताहरांनी त्यांना विचारले, तुमचे वय आता झाले. तुमच्या फिरण्याला आपोआपच र्मयादा येणार, पुढे या बापूकथा सांगण्याची परंपरा कोण चालविणार. यावर नारायणभाई म्हणाले, माझी सारी भिस्त तरुणांवरच आहे, हा यवतमाळचा ‘बाळ सरोदे’ हा तरुण शांतिसेनेच्या स्थापनेपासून आमचा साथीदार आहे. तो चालवेल ही बापूकथा पुढे. कारण तो महाराष्ट्रात सानेगुरुजी कथामालेचे कार्य गेल्या ४0 वषार्ंपासून करीत आहे.
पुण्याला बापू कथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी पूर्णवेळ मला त्यांच्यासोबत राहण्याचे सौभाग्य लाभले. गांधीभवन, कोथरुड पुणे येथे आम्ही साने गुरुजी कथामालेच्या वतीने बापू कथा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले. त्यावेळी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून कथा-कथनाची आवड असणारी मंडळी त्यात सहभागी झाले. आपापल्या परिसरातील शाळा, कॉलेजातून बापू कथा सांगण्याचे कार्यासाठी एक चांगली चमू तयार झाली. मी व मंगला दोघांनी बा-बापू कथाकथन कार्यक्रम सुरू केले. नंदुरबार, उस्मानाबाद, जिल्ह्यातून कार्यक्रम झाले. त्याबाबतचा अहवाल नारायणभाईंना भेटून सांगितला. तेव्हा त्यांनी समाधान व्यक्त केला आणि काही महत्त्वाच्या सूचना केल्या.
दरवर्षी १५ ते १७ नोव्हेंबर विनोबांच्या परंधाम आश्रम पवनार येथे विनोबा स्मृतिदिनानिमित्त मित्रमिलन आयोजित केला जातो. यावर्षी सहा महिन्यांपूर्वी त्यांची झालेली भेट शेवटची ठरेल असे वाटले नाही. त्या भाषणात त्यांनी आपला अनुभव सांगितला. त्यावळी आमचे तरुण वयात आम्ही स्टडी सर्कल चालवित होतो. आजचे तरुण मात्र सिनेमा अँक्टर, क्रिकेट प्लेअर, सेलेब्रिटी यामध्ये स्वत:चे सत्त्व व तत्त्व विसरून गेले आहेत. आम्ही त्यांच्या वयात देशासमोरील समस्यांसंबंधी विचार करीत होतो. कारण आम्ही अभ्यास वर्गातील तालीमीतून तयार झालो होतो. गांधीजींनी आम्हाला एकादशव्रत म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय.. वगैरे ११ व्रते, १२ प्रकारची रचनात्मक कार्यक्रम आणि अहिंसात्मक सत्याग्रहाचे अमोघ अस्त्र हातात दिले होते. तरुण पिढीला सृजनात्मक कार्याची दिशा धरून नवनिर्माणाच्या दिशेने वाटचाल करावी लागेल. त्यातूनच उद्याच्या काळाची पाऊले पडल्याशिवाय राहणार नाही. अशी आशा त्यांनी व्यक्त केली. वयाची ९0 गाठत असताना त्यांनी जगाचा निरोप घेतला. आपल्या समोरील जगाचे अवलोकन करीत असताना कुठूनही का होईना प्रकाश मिळेलच. आपण त्या प्रकाशवाटेने चालून आपली पाऊलांची ठसे उमटविणे आवश्यक आहेत. आपले त्या योग्य दिशेने पडणारे पाऊलच उद्याच्या सुजलाम सुफलाम समाचाचे चित्र साकार करेल. पू.नारायणभाई देसाई यांच्या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन.
बाळासाहेब सरोदे
(लेखक जेष्ठ्य गांधीवादी कार्यकर्ते आहेत.)
भ्रमणध्वनी : ९८५0६२८२११