– सानिया भालेराव
आर्टिकल 15′ या चित्रपटाबद्दल लिहायला तसा उशीर झालाच आहे पण यावर लिहिणं गरजेचं वाटलं आणि तो जास्तीत जास्त लोकांनी चित्रपटगृहात जाऊन बघावा असं वाटल्याने ही पोस्ट. पुण्याच्या एका पॉश मॉलमध्ये मी हा चित्रपट पाहायला गेले होते. एका तरुण मुलांच्या ग्रुपच्या मागे उभी होते. गर्दी म्हणता येईल असा मोहोल होता. या ग्रुपमधल्या एका मुलीने इतरांना विचारलं, ‘वैसे आर्टिकल १५ है क्या?.. आय मीन व्हाट्स द सो मच फझ अबाऊट इट? ” यावर हिला काय उत्तर देत आहेत याकडे माझे कान होते. त्या ग्रुपमधल्या सर्वात हुश्शार मुलाने इतरांना ज्ञान देणं हे आपलं आद्य कर्तव्य असल्याप्रमाणे सांगितलं ” अरे वो है ना.. कॉन्स्टिट्यूशन मै कुछ.. कास्ट के अंगेस्ट.. उस पर है”… हे ऐकून मला फार वाटत होतं की कोणीतरी विचारावं ‘यह कास्ट क्या होती है?’ पण तसं झालं नाही आणि जेंव्हा ‘जात म्हणजे काय असतं?’ असा प्रश्न आपल्याकडच्या भावी पिढयांना पडेल.. तेंव्हा आर्टिकल 15 सारख्या चित्रपटांची गरज पडणार नाही पण तोवर दुर्दैवाने जात नामक किडीचा नायनाट आपल्या सगळ्यांना मिळून करावा लागेल आणि म्हणून अनुभव सिन्हाचा खऱ्या घटनांवर आधारलेला ‘आर्टिकल 15’ हा चित्रपट महत्वाचा.
आहे काय हे आर्टिकल 15?
“Article 15 of the Indian Constitution prohibits discrimination of Indians on basis of religion, race, caste, sex or place of birth” “भारतीय संविधानानुसार जात, धर्म, लिंग, जन्मस्थळ यासारख्या बाबींवरून भेदभाव करणं हा गुन्हा आहे.”
तर, आता अशा पांढरपेशा गुन्हेगारांची संख्या अतिप्रचंड असणार यात शंका नाही पण माणसं बदलतात यावर माझा विश्वास असल्याने हे असे चित्रपट येणं, त्यानिमित्ताने त्यावर लिहिलं जाणं, चर्चा होणं हे गरजेचं. चित्रपट हा थ्रिलर बेस्ड घेऊन दिग्दर्शकाने ही संपूर्ण कथा फार हुशारीने हाताळली आहे. आयुषमानचा देसी बॉर्न फिरंगी ऑफिसर, मनोज पाहवा यांचा उच्च जातीचा पोलीस , कुमुद मिश्रांचा खालच्या जातीतून ( हा शब्द सुद्धा वापरावासा वाटत नाही खरं तर) वर आलेला सब इन्स्पेक्टर, जातीच्या उतरंडीत पिचलेल्या समाजाची प्रतिनिधी सयानी गुप्ताची गौरा, या लोकांचा रॉबिन हूड निषाद – मोहम्मद झीशान अयुब ही सगळी स्टारकास्ट तगडी आहे. चित्रपटाची कथा यावर काहीही लिहिणार नाहीये कारण स्पॉयलर्स दिले जाण्याची चिकार शक्यता आहे पण याचित्रपटाच्या निमित्ताने जे मुद्दे उपस्थित होतात ते महत्वाचे.
पगारात तीन रुपयाने वाढ व्हावी ही मागणी करणाऱ्या दलित जातीच्या मुलींना त्यांची जागा (?) दाखवण्यासाठी एका सवर्ण कॉट्रॅक्टरने आणि इतर साथीदारांनी आळीपाळीने बलात्कार करावा, मग त्यांना मारून गावातल्या एका झाडावर लटकवून टाकावं, याला ऑनर किलिंगची केस म्हणून दडपवून टाकावं, दलितांच्या हातचं खाऊ नये, खालच्या जातीतल्या माणसाची साधी सावली सुद्धा आपल्यावर पडू नये.. हे असं सगळं अनाकलनीय पण वास्तव आपल्या डोळ्यासमोर येतं. सो कॉल्ड अर्बन इंडियाला माहिती नसेल असं.. पण म्हणून मॉडर्न भारतीय जात मानत नाही असं म्हटलं तर ते साफ खोटं ठरेल. कदाचित या चित्रपटात दाखवलं तसं गटारात साचलेली घाण साफ करण्यासाठी त्या पाण्यात डुबकी मारून साफ करणारा माणूस आपल्याला दिसणार नाही पण आपल्या सोसायटीत कचरा घेऊन जाणारी बाई वा माणूस आपण बघतोच. जर कधी हे लोक कचरा नेताना आपल्या बरोबर लिफ्टमधून यायला लागले तर नाकं मुरडतो.. सफाई कर्मचाऱ्यांशी, गाडी साफ करणऱ्यांशी कसं वागतो आपण? स्वयंपाक करणाऱ्या मावशी आपल्या घरातील इतर मदतनीसांपेक्षा स्वतःला वर समजतात, वरच काम करणाऱ्या मावशी घराच्या स्वच्छतेची काम करणाऱ्या मावशींपेक्षा वर.. ही सगळी उतरंड आहेच की..
सोसायटीमधला कचरा साफ करणाऱ्या मावशींनी तिथल्या एका घरी पाणी मागितलं तर त्यांना कोणता ग्लास दिला जाईल आणि नंतर त्या ग्लासची किती स्वच्छता केली जाईल? हा कळीचा मुद्दा आहे. आम्ही जात मानत नाही म्हणणारे मदतनीसांसाठी वेगळे कप, ग्लास ठेवताना मी पाहिलं आहे. त्यामुळे जात हा अतिशय सेन्सिटिव्ह विषय आहे. जाती वरून भेदभाव न करणं याची डेफिनिशन प्रत्येकाची वेगळी असू शकते. हे असं काही लोक मानत नसले तरी जेव्हा आपल्या मुलीचं/ मुलाचं लग्न ठरतं तेंव्हा जात हा क्रायटेरिया न पाळणारे किती लोक असतील? लव्ह, अरेंज काहीही असो.. जात, धर्म अजूनही पाहतातच.. मला वाटतं तुझी जात काय किंवा अडून अडून आडनाव विचारणं.. या असल्या गोष्टी मनात सुद्धा न येणं.. हे जेंव्हा शक्य होईल तेंव्हा हा जातीय भेदभाव नष्ट होईल. तेव्हा जात न मानणं ही टर्म खूप ब्रॉड आहे आणि त्यात खूप पदर आहेत..
मी ब्राह्मण आहे यात अभिमान वाटावा असं काय आहे हे मला आजवर न उलगडलेलं कोडं. मी ब्राम्हण असण्यात माझं असं काही काँट्रीब्युशन आहे का? तर नाही.. मी जर दलित असते किंवा मुसलमान असते तर त्यामध्येही माझं ती जात असणं यात काय काँट्रीब्यशून आहे? तर शून्य..हं आता ब्राह्मण असल्यामुळे माझ्या पिढ्या कदाचित एक चांगलं सजग आयुष्य जगू शकल्या, त्यांना अमुक एक जात असल्यामुळे पोषक वातावरण मिळालं हे मी नाकारत नाही आणि म्हणून ज्या जातींवर कित्येक वर्ष अन्याय झाला त्यांना सजग आयुष्य, समान संधी मिळावी यासाठी सर्वतोपरी उपाय व्हावे या मताची मी आहे. माझ्या मेडिकलच्या ऍडमिशनच्या वेळी माझ्याहून कमी मार्क असलेल्या एका मैत्रिणीला तिच्या जातीवरून ऍडमिशन मिळाली तेंव्हा माझ्या मागच्या पिढ्यांनी तिच्या पिढ्यांवर जो अन्याय केला त्याची ही अगदी छोटुशी मोजता सुद्धा न येणारी भरपाई आहे असं मी माझ्या बाकीच्या ओपन कॅटेगरीमधल्या मैत्रिणींना म्हणाले होते तेंव्हा त्यांनी मला मूर्खात काढलं होतं. माल तेंव्हा वाटलं की कदाचित वयाच्या अठराव्या वर्षी यांना हे असं वाटतंय.. कालांतराने असं वाटणं, हा क्रोध मावळेल.. पण असं झालं नाही.. दोनीही बाजू पेटलेल्या राहिल्या.. इतके वर्ष तुम्ही आम्हाला ठेचलं आता आमची बारी आणि या लोकांना अजून किती हवंय असं म्हणणारा सवर्ण वर्ग.. दोन बाजू.. दोन टोकं!
यात सगळ्यात दुर्दैवाची बाब म्हणजे.. या सवलतींचा लाभ घ्यायला कोणी हवा आणि घेतंय कोण? तीन रुपये वाढावे म्हणून झाडावर लटकवलेल्या त्या मुलीपर्यंत हे पोहोचणार आहे का? हा विचार करून कसंस झालं. आपण फार चौकटीत जगतो असं वाटत राहतं. जातीयवाद इतका खच्चून भरला आहे, त्याचं इतकं विद्रुप चित्र आहे की आपल्या चौकटीतल्या आयुष्याला ते कदाचित मानवणार नाही. असं असलं तरी आपण ज्या जागी आहोत तिथे नक्कीच बदल घडवून आणू शकतो. आडनाव या गोष्टीचं मूल्य आपण शून्य करू शकतो. जात, धर्म, आणि काम यांना बाजूला ठेवून समोरच्या व्यक्तीला माणूस म्हणून बघू शकतो. तुझी जात काय असं आजकाल कोणी डायरेक्ट विचारत नसलं तरी तुझं संपूर्ण नाव काय, आडनाव काय यामागचा केवळ जात जाणून घेण्याचा हेतू जेव्हा नष्ट होईल तेव्हा आपण माणूस म्हणून जगण्याला लायक बनू.. जेंव्हा तू आमच्यातली, आपल्याकडे अमुक एक, त्यांच्यात असतं तसं.. हे सगळं गळून पडेल.. जात काय यावर जणू कोणी विनोद म्हणून हा प्रश्न विचारला आहे आणि त्यावर सगळे खळाळून हसत आहेत.. असं होईल.. त्या दिवशी आर्टिकल 15 चा अर्थ आपल्याला उमजेल.. डोळ्यावर जातीयवादाची झापडं चढवून जगणाऱ्यांनी जरूर बघावा असा, अर्बन इंडियातल्या मॉडर्न माणसांना न्यू इंडियात काय काय चाललं आहे कळावं या करिता, आणि जातीयवादाने कित्येक आयुष्य आजही होरपळून निघत आहे याचं भान देणारा.. आपण स्वतःच हिरो बनून बदल घडवून आणू शकतो हे सांगणारा आर्टिकल 15…फरक न करता फरक घडवून आणावा असं वाटायला लावणारा.. जरूर बघावा असाच!
(लेखिका संशोधिका असून पाणी प्रदूषण या विषयात त्या काम करतात . त्यांची स्वतःची या विषयात काम करणारी ‘इकोसोल’ नावाची कंपनी आहे . वेगवेगळ्या भाषेतील पुस्तकं वाचणे, चित्रपट बघणे व त्यावर लिहिणे ही त्यांची आवड आहे )