लोकशाहीचा पाचवा स्तंभ

-शेखर पाटील

फेसबुकचा संस्थापक तसेच व्हाटसअ‍ॅप व इन्स्टाग्रामचा मालक मार्क झुकरबर्ग हा पस्तीशीतला तरूण पृथ्वीतलावरील सर्वार्थाने शक्तीशाली असणार्‍या बोटावर मोजता येणार्‍या व्यक्तींपैकी एक आहे. जगातील जवळपास निम्म्या लोकसंख्येची ‘डिजीटल कुंडली’ जवळ बाळगून असणारा मार्कबाबा अधून-मधून अनेक महत्वाच्या विषयांवर भाष्य करत असतो. या अनुषंगाने अलीकडेच जॉर्जटाऊन विद्यापीठात भाषण करतांना (लिंक : http://bit.ly/2MBkcaR ) त्याने एका महत्वाच्या मुद्याला हात घातला आहे. मार्कच्या मते फेसबुकसारखे मंच हे लोकशाहीच्या पाचव्या स्तंभासमान असून आता राजकीय, सामाजिक, न्यायिक क्षेत्रांसह प्रसारमाध्यमांमध्ये आपले मत ठामपणे मांडण्यासाठी हा पर्याय अतिशय उत्तम आहे.

………………………………………………………….

आजवर कायदेमंडळ, कार्यपालीका, न्याय व्यवस्था आणि प्रसारमाध्यमे यांना लोकशाहीचे चार आधारस्तंभ म्हणून गणले जात होते. साठच्या दशकापासून समांतर प्रेस उदा. भूमिगत वर्तमानपत्रे, रेडिओ स्टेशन्स आदींच्या माध्यमातून उदयास येऊन याला ‘फिप्थ इस्टेट’ म्हणजेच ‘पाचवा स्तंभ’ असे नाव मिळाले. मात्र, लोकशाहीचा हा पाचवा स्तंभ इंटरनेटच्या आगमनानंतर चांगलाच बहरला. विशेष करून जगातील कोणतेही वर्तमानपत्र अथवा वृत्तवाहिनीसाठी अशक्यप्राय असणारे गौप्यस्फोट विकिलीक्सने केल्याने डिजीटल मीडिया हा लोकशाहीचा पाचवा स्तंभ असल्यावर शिक्कामोर्तब झाले. यामुळे विकिलीक्सचा संस्थापक ज्युलिअन असांजच्या जीवनावरील चित्रपटाला ‘द फिप्थ इस्टेट’ असे नाव मिळाल्याची बाब लक्षात घेण्योजोगी आहे. आता तर खुद्द मार्क झुकरबर्गदेखील फेसबुकसह अन्य सोशल मीडियाला पाचवा स्तंभ म्हणत असल्याची बाब ही अनेक अर्थांनी लक्षणीय आहे.

झुकरबर्गच्या मते कोणत्याही समाजातील आधीच्या चार सत्ता केंद्रांसोबत खर्‍या अर्थाने मुक्त असणार्‍या पाचव्या स्तंभाची आवश्यकता आहे. फेसबुकसारखे माध्यम हीच भूमिका पार पाडत असल्याचे नमूद करून आम्ही फिप्थ इस्टेट असल्याचे त्याने पहिल्यांदाच ठामपणे बजावले आहे. याआधी अनेकदा झुकरबर्ग याला फेसबुक हे मीडिया हाऊस आहे का ? असे विचारले असता त्याने याचा साफ इन्कार केला होता. ”फेसबुक ही टेक्नॉलॉजी कंपनी असून मीडिया हाऊस नव्हे !” असे त्याने अमेरिकन संसदेच्या समितीसमोर स्पष्ट केले होते. (लिंक: https://cnb.cx/32DtDMO ) आम्ही मीडिया कंपनी असल्याने आमच्या माध्यमातून प्रसारित करण्यात येणारी माहिती, जाहिरातीतील आणि यातील सत्यासत्यतेची जबाबदारी आमची नसल्याचेही त्याने बजावले होते. या पार्श्‍वभूमीवर, पहिल्यांदाच मार्क झुकरबर्ग याने फेसबुकसह सोशल मीडिया हा समाजव्यवस्थेतील पाचवा स्तंभ असल्याची स्वीकारोक्ती दिली आहे. अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य हे निकोप लोकशाहीसाठी आवश्यक असून फेसबुकसारखे मंच हेच काम करत असल्याचेही त्याने नमूद केले आहे. तर चीनसारख्या देशांमधील इंटरनेट सेन्सॉरशीपवरही त्याने टिकेची झोड उठविली. हे मुक्त इंटरनेट आहे का ? असा सवालदेखील त्याने उपस्थित केला. तथापि, एकीकडे ‘फ्रिडम ऑफ एक्सप्रेशन’बाबत बोलतांना मार्क झुकरबर्गने आपण फेसबुकवरील जाहिरातींच्या मजकुरात हस्तक्षेप करणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे. म्हणजे एकीकडे आपण अभिव्यक्तीसाठी विश्‍वव्यापी मोफत माध्यम उपलब्ध केल्याचा आव आणतांना दुसरीकडे यावरील कंटेंटची जबाबदारी झटकण्याची मखलाशी मार्क झुकरबर्गने केली आहे. अर्थात, फेसबुक, ट्विटर, व्हाटसअ‍ॅप, युट्युब, इन्स्टाग्राम आदींसारखे मंच हे लोकशाहीच्या पाचव्या आधारस्तंभाचे महत्वाचे घटक बनल्याची बाब आता अधिकृतपणे मान्य करण्यात आलेली आहे. येणार्‍या कालखंडात लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारा मेनस्ट्रीम मीडिया कमजोर होत असतांना पाचव्या स्तंभाला बळकटी येणार असल्याचे यातून स्पष्टपणे अधोरेखीत झाले आहे. अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा घटक आता चौथ्या स्तंभाकडून पाचव्याकडे सुसाट गतीने झेपावल्याचे दिसून येत आहे. याचे श्रेय घेण्यासाठी मार्क झुकरबर्ग आणि अन्य टेक कंपन्यांचे सीईओ तयार असले तरी यातील गैरप्रकार आणि विशेष करून फेक न्यूज, हेट स्पीच, दिशाभूल करणार्‍या जाहिराती आदींबाबत सर्वांनी सोयिस्कर मौन बाळगले आहे. असे असले तरी आज समाजात पाचवा स्तंभ अतिशय मजबुतीने उभा राहिल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

आता सर्वात महत्वाचा मुद्दा…लोकशाहीच्या चौथ्या स्तंभात काम करणार्‍यांनी करावे तरी काय? त्यांनी या स्थित्यंतरात कसे टिकून रहावे ? प्रश्‍न गहन असले तरी उत्तर सोपे आहे-बदलांचा स्वीकार करा. नव्या माध्यमातील संधी शोधा. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभात दमदार कामगिरी करणार्‍यांना पाचव्या स्तंभातदेखील तितकीच संधी असेल हे लक्षात ठेवा. काही जण आधीच फिप्थ इस्टेटमध्ये शिफ्ट झालेत…तर काहींची तयारी सुरू आहे. यामुळे इतरांनीही तयारी करणे हाच सर्वोत्तम पर्याय होय. आणि या नवीन क्षेत्राकडे फक्त करियर म्हणून पाहू नका. मार्क झुकरबर्गने या भाषणात उद्धृत केलेले वाक्य इंग्रजीतून मुद्दाम देतोय. यात तो म्हणाला की, “People having the power to express themselves at scale is a new kind of force in the world — a Fifth Estate, alongside the other power structures of society.”
अर्थात फिप्थ इस्टेट ही आधुनिक युगातील एक मोठी ताकद म्हणून उदयास आलेली आहे. याकडे दुर्लक्ष करणे आपल्याला परवडणारे आहे का ? नसेल तर या लाटेवर स्वार होण्यात काहीच गैर नाहीय !

(लेखक नामवंत पत्रकार , ब्लॉगर व टेक्नोक्रेट आहेत.)

92262 17770

https://shekharpatil.com

 

Previous articleसरन्यायाधीशांचे ‘ सर्वोच्च ‘ मराठीपर्व !
Next articleविमी- बॉलीवूडमधील सर्वात दर्दनाक मौत झालेली देखणी अभिनेत्री
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here