पुरूषाची लैंगिकता आणि त्याच्यातील हिंसा

-उत्पल व्ही. बी.

२०१२ साली मी ‘जगन रेप कर’ हे मुक्तक लिहिलं होतं. गेल्या दोन-चार दिवसात हैदराबादमधील भीषण घटनेच्या पार्श्वभूमीवर ते काही मित्र-मैत्रिणींकडून पुन्हा शेअर केलं गेलं आहे. या मुक्तकाच्या मागोमाग ‘या जगनचं करायचं काय?’ हा एक लेखही मी मार्च २०१३ मध्ये लिहिला होता. ते दोन्ही ‘मिळून साऱ्याजणी’मध्ये एकत्र प्रकाशित झालं होतं. आज ते मुक्तक व लेख नव्याने वर आल्यामुळे त्याबाबत काही म्हणावंसं वाटतं.

हे मुक्तक लिहिलं तेव्हा मी ‘मिळून साऱ्याजणी’मध्ये काम करत होतो. विद्याताईंना हे मुक्तक कसं वाटेल याची मला उत्सुकता होती. त्यांना ते आवडलं. मात्र मूळ मुक्तकातील शब्दरचनेत आम्ही काही बदल केले. याच्या जोडीने एक सविस्तर लेख लिही असं गीतालीताईंनी (गीताली वि मं. – साऱ्याजणीच्या संपादक) सुचवलं. त्यामुळे तो लेखही लिहिला गेला. त्यावेळी या मुक्तकासंदर्भात साऱ्याजणीमध्ये काहीजणांशी चर्चा झाल्या होत्या. छाया दातार, वंदना भागवत, मंगला सामंत यांना माझी मांडणी पटली होती. मात्र ‘तुझ्या मुक्तकात त्या मुलाला – त्याच्या लैंगिक गरजेमुळे – स्त्रीचं शरीर/योनी मिळायलाच हवी, तो त्याचा ‘अधिकार’ आहे असं ध्वनित होतंय’ असंही छाया दातार म्हणाल्याचं मला आठवतं.

त्यावेळी झालेल्या बोलण्यातली आणखी एक गोष्ट. बलात्कार करणाऱ्यांना कायद्याने शिक्षा तर द्यायला हवीच, पण त्याआधी त्यांचे इंटरव्ह्यू घ्यावेत असं मी बोलताना सुचवलं होतं. त्यावर विद्याताईंनी येरवडा कारागृहामध्ये फोनही केला होता. पण अशा गुन्हेगारांना भेटण्याची परवानगी काही कारणामुळे नाकारली गेली होती. त्यानंतर माझ्याकडून याचा पाठपुरावा झाला नाही.

हैदराबादमधील निर्घृण प्रकाराचा विचार करताना मला असं वाटतं की बलात्कार आणि त्यानंतर खून या गुन्ह्यांना मध्ययुगीन काळातील शिक्षा द्याव्यात असं जे मत व्यक्त केलं जातं त्यावर खरंच विचार व्हावा. सर्वांसमक्ष फाशी देण्याचा प्रयोग खरोखर करून बघावा. यावर अर्थातच वाद होऊ शकेल. पण या मुद्द्यावरच माझं मत सांगतो – फाशी देणं योग्य की अयोग्य ही चर्चा सुरू ठेवायला हरकत नाहीच. संवैधानिक प्रक्रियेतून कायद्यानुसारच जर फाशी रद्द झाली तर तो निर्णय आपण अर्थातच स्वीकारू. पण आज जर फाशी अस्तित्वात आहे तर एक सामाजिक प्रयोग म्हणून ती सर्वांसमक्ष दिल्यास त्याचे काय बरे-वाईट परिणाम होतील यावर सामाजिक-कायदेविषयक तज्ज्ञांनी विचार व्हायला हरकत नाही असं मला वाटतं. (माझं व्यक्तिगत मत फाशीच्या विरुद्ध आहे. जुलै २०१५ मध्ये याकूब मेमनच्या संदर्भाने मी एक पोस्ट लिहिली होती. त्यात मी याबाबत लिहिलं होतं. मी असं म्हणेन की ‘सामाजिकदृष्ट्या आणि न्याय या संकल्पनेच्या व्यावहारिक उपयोजनाच्या दृष्टीने आवश्यक म्हणून घेतला गेलेला व्यवस्थात्मक निर्णय’ म्हणून फाशी मला मान्य आहे. उद्या माझ्या बायकोवर, बहिणीवर किंवा मैत्रिणीवर बलात्कार झाला आणि तिचा निर्घृण खून झाला तरी माझं व्यक्तिगत मत फाशीच्या बाजूने नसेल, पण व्यवस्थात्मक निर्णय म्हणून मला ते मान्य असेल. प्रत्यक्षात माझ्या जवळच्या स्त्रीबाबत असा भीषण प्रकार घडलेला नाही, त्यामुळे माझं हे म्हणणं ग्राह्य धरायचं की नाही हा प्रश्न आहेच. परंतु मला तत्त्वतः काय वाटतं हे सांगण्यासाठी हे लिहिलं. हा मुद्दा सविस्तर चर्चेचा आहे, त्यामुळे तो थोडक्यात नोंदवून आपण पुढे जाऊ.)

बलात्कार आणि त्यानंतर खून हे दोन्ही निर्घृण असले तरी खून आणि त्यातील हिंसा ही जाणिवा बधीर करणारी गोष्ट आहे. माणूस असा वागू शकतो यावर विश्वास बसत नाही. माणूस हा ईश्वरनिर्मित नाही, तो इतर सजीवांसारखाच उत्क्रांतीचं अपत्य आहे यावरील विश्वास दृढ व्हावा अशा काही गोष्टी असतात त्यापैकीच ही एक गोष्ट आहे. शिवाय माणसाने हत्यारं निर्माण केल्याने तो त्या सजीवांहून अधिक हिंस्त्र झाला आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर लक्षात घेण्याजोगे बरेच मुद्दे आहेत. त्यातला केंद्रीय महत्त्वाचा मुद्दा पुरूषाची लैंगिकता आणि त्याच्यातील हिंसा आणि त्यावर काय करावं हा आहे. या विषयाच्या अनुषंगाने काही मुद्दे इथे मांडतो –

– लैंगिक भूक आणि हिंसा या दोन्ही अतिशय ताकदवान आदिम प्रेरणा आहेत. त्यांचा थेट संबंध ‘माणूस या प्राण्याच्या’ अस्तित्वाच्या लढाईशी आहे. त्यामुळेच त्या इतक्या ताकदवान राहिल्या आहेत आणि पुरूष या दोन्ही गोष्टींचा मुख्य वाहक राहिलेला आहे. त्यामुळे पुरूषाची लैंगिक भूक आणि त्याच्यातील हिंसा हे यासंदर्भात होणाऱ्या सामाजिक संशोधनामधील मुख्य मुद्दे असणं आवश्यक आहे.
– आपण ‘सिव्हिलाइज्ड’ आहोत असं आपण म्हणतो. पण आपण ‘लिमिटेड सिव्हिलाइज्ड’ आहोत. संधी मिळाली की आपल्यातील हिंस्त्रपणा बाहेर येतो. फार लांब न जाता फेसबुकवरील मारामाऱ्या पाहिल्या तरी ते लक्षात येईल. शाब्दिक मारामारी, एखाद्याला कॉर्नर करून त्याच्यावर तुटून पडणे, इगोमुळे आणि इतर मनोव्यापारांमुळे होणारी हिंसा इथपासून ते अमानुष शारीरिक हिंसा असा हा मोठा स्पेक्ट्रम आहे. आपल्याला शारीरिक हिंसा भयंकर वाटते पण मनुष्यप्राणी आजही ती करण्याइतपत ‘केपेबल’ आहे हे सत्य आहे. माणूस इतका क्रूर कसा होऊ शकतो याचं एक उत्तर ‘तो इतका क्रूर व्हायला केपेबल आहे’ हे आहे. आणि याची मुळं त्याच्या ‘जैविक विचारप्रक्रिये’त आहेत. या विचारप्रक्रियेवर काम केलं, तिला वळण दिलं तर बदल होऊ शकेल.
– लैंगिक उपासमारीमुळे बलात्कार घडत नाही; तर तो पुरुषी हिंसेचा आणि सत्ता-प्रस्थापनेचा आविष्कार आहे, अशी मांडणी ‘अगेन्स्ट अवर विल : मेन, विमेन अँड रेप’ या पुस्तकातून सूझन ब्राऊनमिलर या स्त्रीवादी लेखिकेने १९७५ मध्ये केली होती. या विषयाची उत्क्रांतीजन्य बाजू दाखवणारं ‘अ नॅचरल हिस्टरी ऑफ रेप : बायॉलॉजिकल बेसेस ऑफ सेक्शुअल कोअर्शन’ हे रँडी थॉर्नहिल आणि क्रेग पाल्मर यांचं एक पुस्तक २००० मध्ये प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाच्या ‘व्हाय डू मेन रेप?’ या प्रकरणातील एक उतारा मी माझ्या ‘या जगनचं करायचं काय?’ या लेखात उद्धृत केला आहे. शक्य झाल्यास ही दोन्ही पुस्तकं पाहावीत.
– स्त्री-पुरूष संबंध आणि पुरूषाच्या लैंगिक व मानसिक अस्थिरतेमुळे या संबंधांचा होणारा विचका यावर बोलताना ‘पुरूषामधील बीजउत्सर्जन” यावर नीट बोललं गेलं पाहिजे. या संर्दभात ‘उद्याचा मराठवाडा’ दिवाळी अंकातील मंगला सामंत यांचा ‘कामशमनाची बिकट वाट’ हा लेख पाहावा.
– पुरूषांची कामेच्छा आणि तीमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी यावर ‘सेक्स ऑडिट’ हा एक मार्ग होऊ शकेल असं मी लोकसत्ता ‘चतुरंग’मधील सदरातील एका लेखात सुचवलं होतं. या सदराची लिंक खाली देतो आहे. त्यातील ‘पुरुषातील लैंगिकता, लैंगिकतेतील पुरुष’ आणि ‘संवादातून बदल’ हे लेख पाहावेत.
– या एकूण विषयाबाबत हे स्पष्टच आहे की कविता/लेख एका मर्यादेपलीकडे काही करू शकणार नाहीत. यासाठी प्रत्यक्ष काही करण्याची निकड आहे. गेल्या काही दिवसांपासून मंगला सामंत यांच्याबरोबर पुरूषांच्या लैंगिक गरजा/शंका/अडचणी, त्यांचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन, त्यातील सुधारणा याविषयी एक संवाद केंद्र सुरू करावं याबाबत बोलणं सुरू आहे. प्रामुख्याने दुर्बल आर्थिक स्तरातील पुरूषांवर फोकस असावा असा विचार आहे. यात प्राजक्ता कोलते चाही सहभाग आहे. मी आजवर जे लेख लिहिले त्यावर मला अनेक स्त्रियांनी व पुरूषांनी इ-मेल / फोन मार्फत त्यांच्या प्रतिक्रिया आणि अडचणीही कळवल्या. मी फोन/इ मेलवरून तर काहींना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी बोललो आहे. मी प्रोफेशनल काऊन्सेलर नाही, परंतु अनेकजणांना प्रोफेशनल काउन्सेलिंग नको आहे पण त्यांना त्यांच्या मनातलं बोलायचं आहे असं माझ्या लक्षात आलं. या कल्पनेला आकार आला तर मी अपडेट करेनच.

हेही वाचा-

जगन रेप कर…- http://bit.ly/2ReXvfH

पंरपरा आणि नवता – https://www.loksatta.com/-category/parampara-ani-navata/

(लेखक हे फ्रीलान्स कॉपी रायटर आहेत . अनेक वर्तमानपत्र, नियतकालिकात ते लिहितात)

-9850677875

Previous articleहे केवळ ‘देवेंद्र गेले , उद्धव आले’ नाही !
Next articleराहुल बजाज अमित शाहांसमोर काय बोललेत?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.