केशवराव पोतदार – असेही पत्रकार होते !

-प्रवीण बर्दापूरकर

केशवराव पोतदार यांच्या निधनाची बातमी तशी अनपेक्षित नव्हती . साडेशहाण्ण्व वर्षांचं आयुष्य ते जगले . माझ्या पिढीनं जे बलदंड तत्वनिष्ठ पत्रकार पहिले त्यात केशवराव पोतदार एक . चारित्र्यानं धवल , वर्तनानं निर्मळ आणि लेखणीनं तत्वनिष्ठ  असे व्रतस्थ केशवराव पोतदार यांच्यासारखे  पत्रकार कधी माध्यमांत होते यावर आजच्या पिढीचा विश्वास बसणार नाही कारण सध्या पत्रकार आणि पत्रकारितेचा बाज बदलला आहे . म्हणूनच राजकीय विषय बाजूला ठेऊन या आठवड्यात त्यांच्यावर लिहितो आहे –

केशवराव पोतदार यांची पहिली भेट लख्ख आठवते . ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकातल्या नोकरीचा तो माझा दुसरा दिवस होता . वर्ष १९८१ , महिना जानेवारी आणि वेळ सायंकाळची . प्रख्यात बालसाहित्यिक दिनकर देशपांडे आमचे मुख्य वार्ताहर होते . तेव्हा ‘नागपूर टाईम्स’ या इंग्रजी आणि ‘नागपूर पत्रिका’ या मराठी अशा दोन्ही दैनिकांची न्यूजरुम एकच होती . वाट्याला आलेल्या पत्रकांवरुन खाली मान घालून मी बातम्या लिहित असतांना ‘ काय दिनकरराव ? आज काय विशेष ?’ असा गडगडाटी आवाज आला .

मी चमकून वर बघितलं तर उंच , जरा धिप्पाड  , डोळ्यावर काळ्या जाड चष्मा , मागे वाळवलेले डोईवरचे अस्ताव्यस्त केस आणि गळ्यात शबनम बॅग असे एक गृहस्थ होते . खुर्ची ओढून त्यांच्या दिनकररावांशी गप्पा सुरु झाल्या . थोड्या वेळानं माझ्याकडे लक्ष गेल्यावर त्यांनी दिनकररावांना विचारलं , ‘नवीन वाटतं ? कुठले ?’

दिनकररावांनी आमची ओळख करून दिली , तेव्हा केशवराव पोतदार ‘महाराष्ट्र टाईम्स’ या दैनिकाचे प्रतिनिधी होते . त्यांचं लेखन मी वाचलेलं होतं . दिनकररावांनी त्यांना सांगितलं, ‘तुमच्या मराठवाड्यातलेच आहेत‘. मग त्यांनी आस्थेनं चौकशी सुरु केली .

केशवराव पोतदार यांचं मूळ गाव बीड जिल्ह्यातलं माजलगाव म्हणजे , आमचा जिल्हा एक . मग दैनिक मराठवाडा , अनंतराव भालेराव अशी नाळ जुळत गेली . राष्ट्र सेवादल , एसेम जोशी , समाजवाद , यदुनाथ थत्ते असे अनेक दुवे जुळत गेले आणि त्यांनी मला त्यांच्या पंखाखाली घेतलं . केशवराव पोतदार यांना मीही अण्णा म्हणू लागलो . केशवराव माझ्यापेक्षा सुमारे ३५/३६ वर्षांनी मोठे पण , त्यांनी ते कधीच जाणवू दिलं नाही आणि शिक्षकाची भूमिकाही पर पाडली . ‘नागपूर पत्रिका’च्या कार्यालयालगतच एक मंदिर आणि त्याच्या पाठीशी एक जुना वाडा होता ; त्या वाड्यात केशवराव राहात असत .

केशवरावं यांनी मॅट्रिक नांदेडहून केलं . दरम्यान औरंगाबादला त्यांची भेट प्रख्यात संपादक आणि लेखक गं. त्र्यं . माडखोलकर यांच्याशी झाली . त्यांची मराठी , इंग्रजी आणि उर्दू भाषांवरील हुकमत , राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आवाका पाहून माडखोलकर खूष झाले आणि केशवराव पोतदार यांना नागपूरला येण्याचं आवतन त्यांनी दिलं . नागपूरला आल्यावर केशवराव यांचा समावेश  ‘तरुण भारत’ या दैनिकाच्या संपादकीय मंडळात माडखोलकर यांनी केला . नागपुरातच केशवराव यांनी मराठी विषयात एम.ए. ची पदवी संपादन केली . आचार्य अत्रे यांनी दैनिक ‘मराठा’ची आवृत्ती नागपूरला सुरु केली तेव्हा संपादक म्हणून केशवराव यांची नियुक्ती केली . ती आवृत्ती फार चालली नाही पण केशवराव पोतदार यांच्या लेखणीत असलेला दम महाराष्ट्राला समजला . स्वतंत्र महाराष्ट्राचे एक शिल्पकार , प्रख्यात समाजवादी नेते  एसएम जोशी यांच्या लोकमित्र या दैनिकातही केशवरावांनी काम केलं . गोविंदराव तळवलकर यांनी त्यांना ‘महाराष्ट्र टाईम्स’चे विदर्भ प्रतिनिधी म्हणून नियुक्त केलं . निवृत्तीच्या दोन वर्ष आधी ‘टाईम्स’ व्यवस्थापन केशवराव पोतदार यांच्याशी वाईट वागलं . त्यांची बदली अचानक आहे त्याच पदावर मुंबईला केली . त्या वयात केशवराव यांना मुंबई मानवणारी नव्हती . त्यांनी बदलीचे प्रयत्न केले पण यश आलं नाही . अखेर राजीनामा देऊन केशवराव नागपूरला परतले . नंतर नागपूर पत्रिका’ व ‘मराठवाडा’ या दैनिकांच्या आवृत्तीचं संपादकपद भूषवलं .

त्यावेळचा एक प्रसंग आठवतो . एसेम जोशी आणि गोविंदराव तळवलकर यांचे संबंध अतिशय घनिष्ठ होते . केशवराव पोतदार यांचे चाहते असलेले लीलाताई चितळे , भास्कर लक्ष्मण भोळे आणि अन्य दोघे-तिघे एसेम यांना भेटण्यासाठी गेले . नेमकं त्यावेळी मी तिथं होतो . तेव्हा नागपूरला आलेले एसेम प्रतापनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर राहणाऱ्या श्री कायंदे यांच्याकडे उतरलेले होते . सगळं ऐकून घेतल्यावर एसएम म्हणाले , ‘एक तर मी अशी केलेली रदबदली केशवला आवडणार नाही आणि दुसरं म्हणजे गोविंदशी ( केशवराव आणि गोविंदराव या दोघांनाही एसेम पहिल्या नावानं संबोधत असत.  ) चर्चा करता येईल , वाद घालता येईल पण , त्याचे झालेले ग्रह दूर करत  येणार नाहीत’. खूप नंतर मी एकदा काय घडलं ते  केशवरावांना सांगितलं तर ते म्हणाले, ‘जर बदली अशी अण्णांच्या सांगण्यावरुन रद्द झाली असती तरी मी राजीनामा दिला असता .

तेव्हा नागपूरच्या पत्रकारितेत व्यासंगी आणि ज्ञानी माणसं होती . दैनंदिन वृत्तसंकलनात केशवराव , लक्ष्मणराव जोशी , दत्ता कवीश्वर , तु . भ. गोल्हर , एस. एन. दत्ता , विजय फणशीकर असे  दिग्गज होते . नागपूर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ , दलित चळवळ , स्वतंत्र विदर्भ , कॉंग्रेस , कम्युनिस्ट अशा अनेक चळवळीचं केंद्र होतं . वर्धा आणि पवनार जवळ होतं . साहित्य आणि सांस्कृतिक चळवळी सुरुच असत . राजकीय  नेते , साहित्यिक , कलावंत , गायक यांचा नागपूरला राबता असे . ते पत्रकारांना भेटत . पत्रकार परिषदेला जातांना काय तयारी कशी हवी , कोणत्या विषयावर प्रतिक्रिया घ्यायला हवी , कोणत्या विषयावर मत विचारवं , कोणते प्रश्न विचारावे , अनुत्तरीत राहिला किंवा टाळला गेलेला प्रश्न कसा उचलावा हे नवीन पत्रकारांना शिकवण्यात वर उल्लेख केलेले दिग्गज पत्रकार होते . पोतदार आणि गोल्हर तर प्रश्न काढून आणत . समोरच्याला बोलतं करण्यात या दोघांचा हातखंडा होता . पत्रकारितेच्या सुरुवातीच्या काळातच त्यांच्याकडून मिळालेलं हे शिक्षण पुढे पूर्ण आयुष्यासाठी शिदोरी ठरलं .

आजच्या पत्रकारितेला केशवरावाची तत्वनिष्ठा पेलणार नाही कारण कोणतीही तडजोड करुन त्यांनी लेखणी झिजवली नाही .  ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकाचे चे संपादक असतांना त्यांनी लिहिलेल्या एका अग्रलेखावरुन बरेच मतभेद झाले . व्यवस्थापन माफीवर अडून बसलं पण , केशवराव नमले नाहीत . मग , व्यवस्थापनानं त्यांना काढून टाकल्याचा निरोप तोंडी दिला आणि त्यांच्या केबिनच्या दरवाजाला कुलूप लावलं . केशवरावांनी दोन दिवस न्यूजरुममधे बसून अग्रलेख लिहिला इतर काम पाहिलं . व्यवस्थापनानं त्यांचे अग्रलेख प्रकाशित केले नाहीत . मग त्यांना प्रवेश बंदी करण्यात आली तर ठरल्याप्रमाणे वेतनाचा आग्रह त्यांनी धरला . त्यासाठी व्यवस्थापनाने नकार दिल्यावर एक दिवस केशवराव चक्क उपोषणाला बसले . ही बातमी कळताच केंद्रात मंत्री आणि त्या दिवशी नागपुरात असलेले वसंतराव साठे धावत आले . ‘मला काढून टाकण्याचा अधिकार व्यवस्थापनाला आहे पण वेतन त्यांना रोखता येणारं नाही’, अशी भूमिका केशवराव पोतदार यांनी घेतली . अखेर वसंतराव साठे यांची मध्यस्थी कामाला आली आणि ठरलेल्या वेतनाचा धनादेश मिळाला तेव्हाच केशवरावांनी उपोषण सोडलं .

केशवराव पोतदार हे साधेपणाचा उत्तुंग अविष्कार होते . स्कूटर असली तरी पायी चालण्यावरच कायमच त्यांचा भर असे . वस्त्र श्रीमंती न वापरण्याचा त्यांचा बाणा होता . त्यांच्या शबनम  बॅगेत पाठकोरे कागद आणि पुस्तक असे . लिहिण्यासाठी ते पाठकोरे कागद वापरत . कागदाच्या दोन्ही बाजू वापरात आल्याच पाहिजेत असा त्यांचा कटाक्ष असायचा . आलेल्या प्रेसनोटवरुन बातमी झाली की त्यातले चांगले पाठकोरे कागद दिनकरराव टेबलाच्या एका कप्प्यात ठेवत आणि दोन-चार दिवसांनी चक्कर मारणाऱ्या केशवराव यांच्या स्वाधीन करत ; केशवराव तो गठ्ठा लगेच शबनम बॅगमधे टाकत . वेळ मिळाला की शबनममधून पुस्तक काढून वाचायला सुरुवात करत . त्यांना शाईच्या पेननं लिहिणं जास्त आवडे . अक्षर पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत टपोरं आणि वळणदार . विचारात इतकी स्पष्टता की लेखनात खाडाखोड नाही . लेखन एकटाकी . गोळीबंद . विचारात स्पष्टता आणि व्यक्त होतांना सडेतोड ; delete किंवा add असा कोणताच गोंधळ त्यांच्या लेखनात कधीच नसे !

२०१२पर्यंतचा स्वानुभव सांगतो , ते शेवटपर्यंत नियमित वाचन करत आणि लेखन करत . मी ‘लोकसत्ता’च्या विदर्भ आवृत्तीचा आधी निवासी संपादक झालो तेव्हा दररोज प्रकाशित होणाऱ्या अंकाकडे भाषा आणि संदर्भ याबाबतीत त्यांचं बारीक लक्ष असे . कांही चुकलं की त्यांचा फोन येत असे . मी ‘नोस्टाल्जिया’ नावाचा एक स्तंभ सुरु केला . त्यात जुन्या आठवणी मी लिहित असे . ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकातील दिवसांबाबत लिहिलं तेव्हा केशवरावांचा फोन आला आणि त्यांनीही कांही आठवणी लिहितो असा प्रस्ताव दिला . मी तो आनंदानं मान्य केला आणि माझ्या सदरात केशवराव यांचे तीन लेख प्रकाशित झाले . त्यांनी पहिलीच आठवण ‘नागपूर पत्रिका’ हे दैनिक का सोडावं लागलं यासंबधी लिहिली . ती कोणतीही खळखळ न करता मी प्रकाशित केली . त्या दैनिकाचे तत्कालीन कार्यकारी संचालक आणि व्यवस्थापकीय संपादक नरेश गद्रे होते आणि त्यांच्याशी माझे निकटचे कौटुंबीक संबंध होते तरी तो लेख प्रकाशित केला म्हणून केशवरावांना छान वाटलं . त्यांनी दिलेली शाबासकी मोहरुन टाकणारी होती .

केशवरावांचा आवाज खणखणीत आणि गडगडाटी ! ते माझ्याकडे महिन्या-दीड महिन्यातून एकदा चक्कर मारत आणि मंगला व माझ्याशी गप्पा मारत . त्यांची मंगलाशी ओळख माझ्या आधीची . त्यांच्याशी गप्पा म्हणजे असंख्य आठवणी आणि संदर्भाचा पाऊसच असे ; आपलं काम फक्त त्यात भिजायचं . आम्ही बजाजनगरात तिसऱ्या मजल्यावर राहत असू पण , त्यांनी तळमजल्यावरुन ‘आहेत का बर्दापूरकर घरी ?’ ही केलेली विचारणा संपूर्ण गल्लीला ऐकू जात असे . नागपूर सोडून त्यांची पुणे , अकोला अशी भटकंती सुरु झाली तेव्हा आलेल्या फोनवरचं बोलणंही असंच गडगडाटी . ते थकत गेले तरी नागपूरला आल्यावर आमच्या घरी एक चक्कर असेच . हृदयावर बायपास झालेल्या माझ्या बेगम मंगलाची चौकशी करायला दोन वेळा तर एम. वाय. बोधनकर आणि लक्ष्मणराव जोशी यांना घेऊन काठी टेकत आले ; पण आमच्या घरची चक्कर चुकवली नाही .

आपली विचारसरणी कोणतीही असो बातमी लिहितांना ती आणायची नाही हा धडा गिरवून घेणारे केशवराव होते . पत्रकारांनी केवळ बातम्या लिहून थांबायला नको तर महत्वाच्या विषयावर मतप्रदर्शन करणारं लेखन करायला पाहिजे , त्यासाठी त्या विषयावर मिळेल ते आणि नाही मिळालं तर आणि जाणीवपूर्वक मिळवून वाचायला हवं , असा त्यांचा आग्रह असे . तेव्हा ‘गुगलबाबा’ जन्माला आलेला नव्हता . त्यामुळे संदर्भ मिळवण्यासाठी वाचावं लागे , वाचण्यासाठी ग्रंथालयात जावं लागे . इंस्टंट तो जमानाच नव्हता म्हणून ते घोटून घेणाऱ्या या जेष्ठ मंडळीचं आमच्या पिढीच्या जगण्यात येणं महत्वाचं आहे .

केशवराव पोतदार यांचा जनसंपर्क अफाट हा शब्द थिटा पडेल असा होता . एसेम जोशी , मधु दंडवते ते वसंत साठे , एनकेपी साळवे , रणजित देशमुख अशी ती लांब होईल . एसेम जोशी आमचे आदर्श . त्यांनाही आम्ही अण्णा म्हणत असू . ते आणि केशवराव असे दोन्ही अण्णा हास्यविनोदात रमले असल्याचं नागपुरात अनेकदा बघायला मिळायचं . सत्ताधारी आणि विरोधी पक्षात इतका लोकसंग्रह असूनही त्याचा आव केशवराव यांच्या वागण्यात नसे आणि त्यांनी कधीही यापैकी कुणाचं नाव वापरुन स्वत:चा एका पै चाही फायदा करुन घेतल्याचं स्मरत नाही . खरं तर , पत्रकार गृहनिर्माण संस्थेत सदनिका मिळणं हा केशवराव यांचा हक्कच होता पण , त्यासाठीही त्यांनी वारंवार म्हणूनही अर्ज केला नाही . माझं चांद्रमौळी झोपडं हाच माझं राजवाडा ही त्यांची भूमिका राह्यली .  पत्रकारितेची विश्वासार्हता आणि  अ(न)र्थकारणाविषयी आज जे कांही ऐकायला मिळतं , त्या पार्श्वभूमीवर केशवराव यांच्यासारखी माणसं स्वप्नच वाटत नाहीत का ?

केशवराव पोतदार यांनी लिहिलेली पुस्तके-

-प्रश्नोत्तरी राज्यशास्त्र

-चार निवडक राज्यघटना : तुलनात्मक अभ्यास

-संयुक्त राष्ट्रसंघ

-फ्रेंच राज्यक्रांती

– संपादक व संपादकीय –भारतीय साहित्यकार

 

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)

9822055799
Previous articleएकाकीपणाशी मैत्र…
Next articleमी आणि गांधीजी
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here