भारतातील १ अब्ज २५ लाख लोक दरवर्षी ज्याची आतुरतेने वाट पाहतात त्या मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन झालं आहे. विदर्भात कोणत्याही क्षणी मान्सूनच्या धारा बरसतील, अशी स्थिती आहे. मान्सूनचं आणि आपल्या देशाचं एक अनोखं नातं आहे. मान्सूनला ‘भारताची जीवनरेखा’ असंच म्हटलं जातं, ते उगीच नाही. आपल्या देशातील माणसं अक्षरश: डोळ्यात प्राण एकवटून मान्सूनची वाट पाहत असतात. एवढी तीव्रता भारतालगतचे काही देश सोडलेत, तर इतर देशांत क्वचितच असेल. आपल्या येथे मान्सून हा जीवनमरणाचाच प्रश्न असतो. मान्सूनचं आगमन थोडं जरी लांबलं वा मान्सूनचा पाऊस व्यवस्थित कोसळला नाही, तर एक प्रचंड अस्वस्थता आपल्याकडे निर्माण होते. देशाचं अर्थकारण, राजकारण, समाजकारण या सार्याच घटकांवर मान्सूनचा प्रभाव वाढतो. मान्सून हा भारताचा पालनकर्ताच आहे.प्रचंड उन्हामुळे सारी जमीन आणि माणसाची मनं करपून गेली असताना मान्सून येतो आणि देशातील नद्यांना प्रवाहित करतो, धरणं भरतो, शेतीला पाणी देऊन देशाला अन्न देण्याची सोय करतो. माणसांना, पशुपक्ष्यांना आणि निसर्गाला खर्या अर्थाने दरवर्षी तो नवजीवन बहाल करतो. हा मान्सून अगदी प्राचीन काळापासून सर्वांच्या औत्सुक्याचा आणि अभ्यासाचा विषय राहिला आहे. वेदकाळापासून मान्सूनचा अभ्यास झाला आहे. वराहमिहीर, भास्कराचार्यांसारख्या त्यावेळच्या शास्त्रज्ञांनी मान्सूनच्या शास्त्रीय नोंदी घेऊन मान्सूनच्या गुणधर्माचा अभ्यास केल्याचे पुरावे आहेत. भारतीय कालगणनेमध्ये मान्सूनच्या आगमनापासून तो परत फिरण्याच्या कालावधीपर्यंतच्या घटना शास्त्रीय आधारावर समाविष्ट करण्यात आल्या आहेत. आपल्या देशातील शेतकरी, आदिवासी आणि मच्छीमार हजारो वर्षांपासूनचे पारंपरिक ज्ञान व नैसर्गिक निरीक्षणाच्या आधारे पावसाचे अंदाज हवामान खात्यापेक्षाही अचूक लावत असल्याचे पाहावयास मिळते. |
||
मान्सूनबाबत इतर रोचक माहिती जाणून घेण्याअगोदर आपण मान्सून म्हणजे काय हे समजून घेऊ या. साधारणत: उष्णकटिबंधीय प्रदेशात जे देश वा भूभाग समुद्राने वेढले असतात, तिथे मान्सून ही वार्षिक हवामानाची स्थिती अनुभवायला मिळते. मान्सूनचं खरं कारण दडलं आहे ते तापमानात. उन्हाळ्यात जमीन प्रचंड तापायला लागली की, तापलेल्या जमिनीवरील हवा वर जाते आणि त्यामुळे तेथे कमी दाब निर्माण होतो. जमिनीच्या तुलनेत समुद्राचे पाणी कमी प्रमाणात तापते. त्यामुळे तेथून हवा वर जाण्याचे प्रमाण कमी असते. दाब मात्र जास्त असतो. वारे नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात. अशा रीतीने समुद्राकडून जमिनीच्या दिशेने वारे वाहू लागतात. ठरावीक काळ हे वारे त्या-त्या प्रदेशात पाऊस देतात. नंतर समुद्राचे तापमान वाढू लागले की समुद्रावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राकडे ते वारे पुन्हा उलट्या दिशेने फिरतात. पृथ्वी फिरत असल्याने आपल्याकडे हे वारे नैऋत्य मोसमी वारे म्हणतात. मोसमी वार्यांचे आगमन झाले की, मान्सून आल्याचे मानले जाते. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यामुळे वर्षानुवर्षे ही प्रक्रिया सतत सुरू असते. भारताप्रमाणे आफ्रिका, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया या भागातही अशाच प्रकारे मान्सून येतो. आपल्याकडे मान्सूनचे वेळापत्रक ठरले आहे. दरवर्षी २0 ते २५ मे दरम्यान मान्सून अंदमान-निकोबार बेटांवर धडकतो. त्यानंतर १ जूनच्या आसपास तो केरळमध्ये घुसतो. महाराष्ट्रात त्याच्या आगमनाची तारीख ७ जून असते. या तारखांच्या आसपास तो हमखास येतोच. त्यानंतर टप्प्याटप्प्याने तो पुढे सरकतो आणि १ जुलैपर्यंत जवळपास संपूर्ण देश तो व्यापून टाकतो. यानंतर जवळपास तीन महिने तो कमी-जास्त प्रमाणात कोसळत असतो. मान्सून समाधानकारक असला, तर देशाची नाडी व्यवस्थित चालते. अजूनही देशातील ७0 टक्के शेती मान्सूनच्या पावसावर अवलंबून असल्याने आपल्या कृषी उत्पादनावर मान्सून मोठा प्रभाव टाकतं. पिण्याच्या पाण्याबाबतही अशीच स्थिती असते. पावसाळ्यात धरण, विहिरी भरल्या नाहीत, तर या वर्षी मराठवाड्यात जसा दुष्काळ पडतो, तसा दुष्काळ पडतो. सरकारकडे असलेल्या नोंदीनुसार १८0२ पासून आतापर्यंत ४२ वेळा देशात जीवघेणे दुष्काळ पडले आहेत. त्यामुळेच मान्सून समाधानकारक असण्याचा-नसण्याचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडतो. १९२५ मध्ये तत्कालीन कृषी आयोगाने Indian economy as the Gamble on Mansoon असं वर्णन करून ठेवलंय. ते वर्णन अजूनही आपल्या देशाला चपखल बसतेय. जोपर्यंत थेंब न थेंब पाण्याचं योग्य नियोजन करणं आपण शिकत नाही, तोपर्यंंत मान्सूनवरच आपलं भवितव्य अवलंबून असणार आहे. भ्रमणध्वनी – ८८८८७४४७९६ |