राजकारणातले विरोधाभास , विसंगती आणि चमत्कृती !

-प्रवीण बर्दापूरकर

सात आंधळे आणि त्यांना उमगलेला हत्ती यासारखं राजकारण असतं . प्रत्येकजण त्याच्या आकलनानुसार  राजकारणाची मांडणी करत असतो ; प्रत्यक्षात मात्र वेगळंच घडत असतं . महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे कांही घडतं आहे ते विरोधाभास , विसंगती आणि चमत्कृती यांचा केवळ आणि केवळ सत्ताकांक्षी मेळ आहे तसंच त्याला कबुलीजबाबाचाही सूर आहे .

विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीला सत्ता स्थापनेचा कौल मिळाला पण , ही युती नाही तर या युतीतील केवळ शिवसेना सत्तेत आली आणि भाजपला विरोधी पक्षात बसावं लागलं  . निवडणूकपूर्व युत्या म्हणजे मोठी विसंगती असते आणि त्यालाच राजकारण म्हणतात हेच यातून दिसलं . महाराष्ट्रात हे का घडलं हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही दोन्ही पक्षांनी ‘दिलेला शब्द पाळा’ आणि ‘असा कोणताच शब्द दिलेला नाही’ अशी हुज्जत घातली मात्र नेमकं काय घडलं , कुठं घडलं या संदर्भात कोणताही ठोस दाखला दिला नाही आणि त्या संदर्भात पतंगबाजी करण्यासाठी माध्यमांना संधी दिली . शरद पवार जे बोलतात ते करत नाहीत , हेही पुन्हा एकदा जसं समोर आलं तसंच महाराष्ट्राच्या राजकारणावरचा शरद पवार यांचं प्रभाव व करिष्मा अजूनही ओसरलेला नाही हेही सिद्ध झालं . भाजपच्या गोटात गेलेला ( का पाठवलेला ?) अजित पवार नावाचा मोहोरा शरद पवार यांनी भाजपच्या डोळ्यादेखत कसा परत ओढून नेण्याचा राजकीय चमत्कारही याच काळात अनुभवायला मिळाला . आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल मिळाला आहे , आम्ही विरोधी बाकावरच बसू , असं शरद पवार निकालानंतर म्हणाले आणि सत्ताधारी बाकांवर कधी जाऊन बसले ते भाजपला समजलंच नाही . आजवर हिंदुत्वाची कास धरलेल्या शिवसेनेनं घूमजाव केलं आणि कॉंग्रेस व राष्ट्रवादीसोबत आघाडी करुन मुख्यमंत्रीपद पटकावलं . राजीनामे देणं , भाजपच्या गोटात जाणं आणि पुन्हा परत येणं , उपमुख्यमंत्री होणं असे अजित पवार नावाचे विरोधाभासी चमत्कृती राजकारणात घडतात हेही महाराष्ट्राला दिसलं आहे .

‘धर्म आणि राजकारण यांची आम्ही गल्लत केली’, असा कबुलीजबाब शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला . शिवसेनेच्या आजवरच्या राजकारणाला मिळालेलं हे सर्वात मोठ्ठ वळण आहे . सेनेच्या आजवरच्या राजकीय वाटचालीची दिशा चुकलेली होती , असाही त्या कबुलीजबाबाचा दुसरा अर्थ आहे . उद्धव ठाकरे हे विचारी नेते आहेत , महत्वाचं म्हणजे कमी बोलतात , कोणत्याही संदर्भात ते दुसरी बाजू आधी लक्षात घेतात आणि शांतपणे व चिवट संयमानं राजकारण करतात असा आजवरचा अनुभव आहे . नारायण राणे , राज ठाकरे सेनेतून फुटून निघाल्यावरही ते डगमगले नाहीत , हृदयाचं मोठं दुखणं उमळल्यावरही नाउमेद झाले नाहीत आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतरही त्यांनी शिवसेनेची धुरा निगुतीनं सांभाळली . राडा करणारा पक्ष ते राजकारणाकडे गंभीरपणे पाहणारा पक्ष , अशी शिवसेनेची वाटचाल त्यांच्याच काळात झालेली आहे , हे विसरता येणार नाही . भाजपनं ज्या प्रकारे गेल्या पांच वर्षात कोंडी केलेली होती ती उद्धव यांच्या लक्षात आलेली नाही आणि देवेंद्र राजकारणाच्या बाबतीत उजवे ठरत आहेत , हा जो समज पसरवला जात होता तो उद्धव यांनी साफ खोटा ठरवला आहे . ज्या पद्धतीनं सत्ता संपादन केली आणि राज्याचं मुख्यमंत्रीपद पटकावलं ते लक्षात घेता उद्धव यांनी ही तयारी निवडणुकीच्या निकालाआधीच सुरु केलेली होती असं म्हणायला वाव आहे . कौलाचे आंकडे मनासारखे आल्यावर त्यांनी निर्णायक हालचाली आणि तेही समोर न येता ज्या पद्धतीनं केल्या ते लक्षात घेण्यासारखं आहे . कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जायला नको , असा शिवसेनेतील अनेक जेष्ठांचा कौल होता पण , त्यावर हिकमतीनं मत करण्यात उद्धव ठाकरे यशस्वी ठरले आहेत .

सत्ता स्थापन करतांना उद्धव ठाकरे यांनी कांहीसं नमतं घेतल्याचा सूर उमटत आहे . त्यांनी नव्या-जुन्यांचा तोल सांभाळलेलं नाही हे खरं आहे . नव्या-जुन्यांचा तोल सांभाळताना विदर्भ आणि मराठवाड्यात संघटनात्मक पकड असणाऱ्या दिवाकर रावते यांच्यासारख्या      दोघा-तिघांचा समावेश त्यांनी मंत्री मंडळात करायलाच हवा होता , त्यामुळे पक्षातही चांगलं संदेश गेला असता . तरी मित्र पक्षांना सांभाळून घेणं ( जे भाजप आणि देवेंद्र फडणवीस करत नसत ) आणि नवी टीम तयार करण्याचे जे संकेत मंत्रीमंडळ स्थापनेतून उद्धव यांनी दिलेले आहेत , त्याचं स्वागत केलं पाहिजे . पुत्र आदित्य ठाकरे यांनाही सत्तेत योग्यवेळी       ( जरा जास्तच झुकत माप देऊन ) संधी दिली आहे पण , प्रत्येक वेळी मुलग्याला पदराला बांधून घेऊन वावरण्याची संवय चांगली नाही . एक पिता आणि मुख्यमंत्री म्हणून म्हणून आदित्य यांना स्वतंत्रपणे  काम करण्याचं वळण उद्धव यांनी  लावायला हवं . अन्यथा शहजादा म्हणून जशी एकेकाळी राहुल गांधी यांची झाली तशी हेटाळणी वाट्याला येऊ शकते .

अशात कांही अधिकाऱ्यांशी बोलणं झालं . त्यांनी नवीन मुख्यमंत्री आणि नव्या सरकारबद्दल आशादायक  ‘फीड बॅक’  दिला . देवेंद्र फडणवीस मंत्रालयात फारसे येत नसत ; सह्याद्री आणि वर्षावरुन कारभार चालवण्यावर त्यांचा भर असायचा . शिवाय एक-दोन अपवाद वगळता सर्व सत्ता मुख्यमंत्री आणि त्यांनी निर्माण केलेल्या ‘समांतर’ यंत्रणेभोवती केंद्रित झालेली होती . प्रशासनातल्या मोजक्या आणि वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या आहारी फडणवीस गेलेले होते . त्या अधिकाऱ्यांनी फडणवीस यांना चांगलंच गोत्यात आणलेलं होतं . शेतकऱ्यांची माफी , तूर डाळ खरेदी , आपदग्रस्तांना मदत अशी अनेक उदाहरणे त्या संदर्भात देता येतील .  मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात ठाण मांडून बसलंच पाहिजे . मुख्यमंत्री बसले की मंत्री , त्यापाठोपाठ सचिव आणि मग पूर्ण प्रशासनाला मंत्रालयात यावं लागतं , कामाला बसावं लागतं . तसं झालं नाही . मुख्यमंत्र्यांनी  आदेश दिल्यावरही आठ-दहा दिवस आदेश निघत नाहीत असं चित्र निर्माण झालं आणि अखेर नोकरशाही सहकार्य करत नाही असे निराश सूर देवेंद्र फडणवीस यांना आळवावे  लागले .

उद्धव ठाकरे मंत्रालयात येतात हे फारच चांगलं आहे . ते मंत्रालयात येतात , बैठका घेतात , प्रशासनातल्या अधिकाऱ्याकडून काय चाललंय ते ऐकून आणि समजून  घेतात हे प्रशासनावर वचक बसण्याच्या दृष्टीकोनातून आशादायक आहे . खाते वाटप झालेलं नसलं तरी मंत्री मंत्रालयात येत होते , लोकांना भेटत होते यावरुन हे सरकार कुणा एकाभोवती केंद्रित ( एकचालकानुवर्ती ) नाही असा संदेश गेलेला आहे . कामासाठी आलेल्या लोकांनी ओसंडून वाहणारं मंत्रालय अलीकडच्या कांही वर्षात इतिहासजमा झालेलं होतं . अशात मात्र मंत्रालयात गर्दी वाढली आहे . ग्रामीण भागातले लोक दिसू लागले आहेत . पक्ष चालवणं आणि सरकार , त्यातही तीन पक्षाचं चालवणं यात महद अंतर असतं हे आता उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आलेलं असणारच . उद्धव यांचं स्वभाव सौम्य आहे . हा सौम्यपणा म्हणजे कोपरानं माती खणण्याची संधी आहे , असा नोकरशाहीचा समज न होण्याइतपत किमान कणखरपणा उद्धव यांना दाखवावा लागणार आहे . सरकार चालवण्यासाठी प्रशासकीय वकूब लागतो . तो आपल्यात आहे हे उद्धव ठाकरे यांना सिद्ध करावं लागणार आहे . सरकारनं निर्णय घ्यायचे आणि प्रशासनानं त्याची अंमलबजावणी करायची अशी रचना असते . अंमलबजावणी झाली किंवा नाही हे तपासण्यासाठी एक पर्यायी यंत्रणा उभारली गेली तर नोकरशाही चुकारपणा करत नाही . नोकरशाही नाठाळ घोड्यासारखी असते ; त्या घोड्यावर पक्की मांड ठोकून बसावं लागतं आणि गरज भासली तर चाबूकही  उगारावा लागतो , हे उद्धव ठाकरे यांनी लक्षात घ्यायला हवं . तीन पक्षाचं सरकार असल्यानं रुसवे-फुगवे सांभाळण्याचीही कसरत त्यांना करावी लागणार आहे . एक मात्र खरं , उद्धव ठाकरे यांनी सुरुवात चांगली केली आहे .

या सरकारची तीन चाकांची रिक्षा , अशी संभावना पुन्हा मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न विरलेले आणि विरोधी पक्षात बसावं लागलेले देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे . तशी टीका करण्याचा अधिकार फडणवीस यांना नक्कीच आहे कारण ते कांही मुख्यमंत्री म्हणून अयशस्वी ठरलेले नाहीत .  विरोधी पक्षांनी टीका आणि आरोपांची फैर झाडली नाही तर राजकारण एकदम नीरस होईल पण , फडणवीस यांनी त्यांना कशा-कशाला तोंड दयावं लागलं आणि आताही पक्षातलेच कोण कसे त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत आहेत , हे विसरु नये . एकनाथ खडसे , विनोद तावडे , पंकजा मुंडे यांनी तेव्हा केलेली वक्तव्ये जरा आठवून पहावीत . शिवाय सरकार पडण्याचे कुडमुडी भविष्याचे उद्योगही देवेंद्र फडणवीस बंद करावेत . ज्यांच्या भरवशावर ‘पुन्हा येईन’च भविष्य वर्तवलं त्यांचं भविष्यविषयक ज्ञान आणि राजकीय आकलन किती तोकडं आहे याचं पितळ निवडणुकीच्या निकालानंतर  उघडं पडलेलं आहेच . या सरकारात एकापेक्षा एक दिग्गज आहेत , ते सत्तेसाठी राजकीय धारणा खुंटीला टांगून एकत्र आलेले आहेत आणि उद्धव ठाकरे म्हणजे सरकारला अडचणीत आणण्यासाठी हे दिग्गज पुरसे समर्थ आहेत ; त्यासाठी भविष्य वर्तवत मनातले मांडे खाण्याची गरज नाही . या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी जर समझदारी दाखवली तर हे सरकार टिकेल याबद्दल शंका नाही .

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)

9822055799
Previous articleमुलं तुम्हाला स्क्रीनसोबत रिप्लेस तर करत नाहीयेत ना?
Next article‘तानाजी’ चे शिन्मासमीक्षण
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.