–सानिया भालेराव
चित्रपट म्हणजे माझं एक मॅड प्रेम आहे. कधीही म्हणजे कधीही कोणत्याही क्षणी मी पिक्चर पाहू शकते. आजपर्यंत केलेल्या महाप्रचंड यड्या गोष्टीत पिक्चरसाठी असलेलं प्रेम कदाचित लिष्टीत बरंच वर असेल. चित्रपट किंवा मुव्ही पेक्षा ‘पिक्चर’ असं म्हटलं की मला फार भारी वाटतं. एकदम नॉस्टॅल्जीक व्हायला होतं. तो काळ होताच तसा जेंव्हा पिक्चर हा पिक्चर होता. सोफिस्टिकेशन वगैरे भानगड नव्हती. औरंगाबादेतील अंबा- अप्सरा वगैरच्या फेऱ्या मारल्यावर सादियाच्या वाऱ्या करण्याचे दिवस सुद्धा होते. अत्यंत मॅड, टुकार पिक्चर मैत्रिणींना ओढत नेत पाहायला लावले आहेत. त्यात औरंगाबादेत कुठेही गेलं तरी कोणी ओळखीचं भेटणार नाही हे शक्य नव्हतं तरीही पिक्चरच्या बाबतीत खूप टूकारगिरी केली आहे. साधारण ९७ – ९८ चा काळ. अंबा – अप्सराला वगैरे गेलेलं चालतं असा जमाना. पण इंग्रजी चित्रपट हिंदीत डब होऊन यायचे ते सादियामध्ये. तिथे जायची कोणत्याच मैत्रिणीला घरून परवानगी नसायची. पिक्चरसाठी परवानगी घ्यायची असते घरी हे मला माहीतच नव्हतं. मला आठवतं मी पहिल्यांदा मैत्रीणींबरोर पिक्चरला गेले होते तेंव्हा माझा बाबा अगदी वार्षिक परीक्षेत पहिला नंबर आल्यावर कसे पालक खुश बिश होतात, डोळ्यात अभूतपूर्व माया दाटून येते, प्रसंगी अश्रू बिश्रू येतात.. अगदी तसाच सेंटी झाला होता. त्यामुळे पिक्चरसाठी विचारून जायचं हे माझ्या कक्षेच्या बाहेर होतं. हं पण पिक्चर पाहिला की घरी त्यावर बोलायचं.. म्हणजे काय वाटलं ते सांगायचं हे मात्र न चुकता होत असे. तर सादियामध्ये अरनॉल्डचा ‘इरेझर’ लागला होता. WWF ची मॅड झिंग होती त्यावेळी. मी सातवीत असेन. जस्ट पोरींच्या शाळेत शिफ्ट झाल्याने तिथल्या शामळू पोरींना “चलता का सादियाला?” असं म्हणायचा मूर्खपणा केला नाही. कॉलनीतल्या मित्रांबरोबर मग ‘इरेझर – मिटा दूंगा नामोनिशान’ बघायला गेले. सात मुलगे आणि मी.. पण तेंव्हा सालं हे डोक्यात यायचं नाही ना माझ्या.. ना त्यांच्या.. बाकी लोकांना काय दिसायचं याचा कधी विचार केलाच नाही. तर आमचा प्लॅन ऐनवेळी ठरल्याने तिथे गेलयावर कळलं.. सादिया फुल्ल पॅक. मग कसं बसं स्टॉलंच तिकीट घेऊन दुसऱ्या रांगेतून अरनॉल्ड नामक मनुष्याला पाहिलं आणि इंटरव्हलमध्ये स्टॉलंच तिकीट घेतल्याने वाचलेल्या पैशात आता काय काय खाता येईल याचा विचार मनात गुदगुल्या करुन गेला. इंटरव्हलमध्ये बाहेर आलो तर च्यायला सगळ्या पब्लिक मध्ये मी एकटीच मुलगी. बरं पिक्चर नॉर्मलच होता पण सादियाचं नावंच एवढं होतं की.. त्याचा इफेक्ट असावा. पुढे सादिया, रॉक्सीमध्ये पिक्चर पाहताना बऱ्याचदा हा अनुभव आला आणि मग हे असं एकटं असणं अंगवळणी पडत गेलं. मला वाटतं माझ्यापेक्षा माझ्या मित्रांनाच जास्त टेन्शन असायचं.. पुढे नाशकात सुद्धा सर्कलला पिक्चर पाहायचे तेंव्हा शर्माजी आणि आमचा अजून एक मित्र.. थोडे टरकून असायचे..
मला मात्र फार रेअरली अशी भीती वाटली. म्हणजे नाहीच वाटली असं नाही.. वाटते कधी कधी .. पण आज जरी बुक माय शो मध्ये एकटीचं तिकीट काढणं अगदी सोपं असलं तरी त्यावेळी तिकिटाच्या लाईनमध्ये थांबून एक तिकीट द्या असं म्हटल्यावर भुवया ताणून माझ्याकडे हमखास बघितलं जायचं. त्यावेळी बाल्कनी आणि स्टॉल असं सीटिंग असल्याने बाल्कनीमध्ये आपण जरा सेफ असू असं येडछाप लॉजिक मी लावून चिक्कार पिक्चर बघत असे आणि हेच लॉजिक ट्रेनच्या प्रवासाला लावून एसी टू टायर सेफ असतं असं म्हणून लांबचे प्रवास करत असे. मला वाटतं की स्वतःतल्या वेडेपणासाठी आपल्याला स्वतःला असं कारण देता येणं गरजेचं असतं.. मग ते दुसऱ्यासाठी कितीही यंटम असलं तरीही आपल्यासाठी ते परफेक्ट असलं की झालं… पिक्चरचे इतके किस्से आहेत माझे.. म्हणजे फक्त पिक्चर पाहिला आणि झालं असं नाहीच. तो पाहण्याआधी झालेले, पाहण्यानंतर झालेले आणि काही तर पाहताना झालेले राडे.. म्हणून कित्येक पिक्चरच्या आठवणी आहेत कसल्या कसल्या. मला त्या तश्याच आठवायला आवडतात. लिहायचं झालं म्हटलं तर भन्नाट काहीतरी दस्तावेज वगैरे होऊ शकतो.
आजही मूड खराब असला, कोणाशी बाचाबाची झाली, खूप खूप रडायचा मूड असला, किंवा उगाच खदाखदा हसावं वाटलं की, काही करण असलं किंवा नसलं तरी पिक्चर हा रामबाण उपाय. थेटरमध्ये शिरलं की जादूच्या दुनियेत गेल्यासारखं होतं मला. लहानपणी नाही का आपल्याला मोठं होऊन काय व्हायचं याबद्दल खतरनाक आशा वगैरे असते. मला थेटरात काम करायचं होतं. म्हणजे तिकीट विकणारा किंवा तो टॉर्च लावून कुठला सीट नंबर आहे हे सांगणारा. मला बरीच वर्ष असं वाटायचं की बसायची जागा दाखवणारा माणूस सगळे जण नीट बसले की मोक्याची जागा बघून मस्तं सगळे शो बघत असणार.. अशा कित्येक मूर्ख गोष्टी मी खऱ्या मानून चालायचे आणि अजूनही चालते. तर मला तो खुर्ची दाखवणारा माणूस व्हायचं होतं.. कालांतराने कळलं की वेडी.. असं नसतं पण तरीही आज ही मला पिक्चर बघायला गेले की दारावर उभे असलेले ते लोक.. तो माणूस.. ते काम करावं असं वाटतंच. माझ्यापुरतं मी स्वतःला समजावून सांगितलं आहे की हा माणूस वाट्टेल तेंव्हा पिक्चर बघू शकतो.. आणि आपल्याला पण एकदा असं करून बघायला हवं.. बस्स..
मनात आलं आणि पिक्चर पाहून आले.. ही माझी स्वर्गीय सुखाची व्याख्या.. याच चालीवर ‘आणि पुस्तक वाचत बसले’.. काळ वेळ ही गणितं न सांभाळता.. असंही आहे.. सोबतीला कोणीच नाही.. ही अडचण पिक्चरसाठी मला कधी आली नाही. “इश्क़ गहरा है अपना”.. हं.. आता कामामुळे वेळ मिळत नाही हे कारण डोकं वर काढतं कधी कधी.. मग कसलं भंकस काम करतो आहोत आपण असं वाटायला लागतं.. टॉर्चने सीट दाखवणारा माणूस डोळ्यापुढे दिसायला लागतो.. आठशे सत्तावीस गोष्टी आहेत.. लिहायला हव्यात.. माझ्यासारख्या वेड्या लोकांपर्यंत पोहोचायला हव्यात. शहाण्यांच्या जगात वेडे लोक तसेही कमी.. वेड्यांची संख्या वाढली पाहिजे.. वेड पसरलं पाहिजे आणि म्हणून यावर अजून लिहिलं पाहिजे..
मागे अनाद्याला एका ऍनिमेटेड मुव्हीला घेऊन गेले होते.. बाहेर पडताना तिने विचारलं ” आई हा दरवाज्याबाहेर उभा राहणारा काका किती लकी आहे ना.. वाट्टेल तेंव्हा तो हा मुव्ही बघू शकतो”.. आणि मला परमानंद का काय म्हणतात ना.. तसा झाला.. ‘आपली पोरगी आहे तर’.. असं वाटून उर भरून वगैरे आला.. आणि उगाच बाबाचा तो चेहरा डोळ्यासमोर येत राहिला नंतर..
(लेखिका संशोधिका असून पाणी प्रदूषण या विषयात त्या काम करतात . त्यांची स्वतःची या विषयात काम करणारी ‘इकोसोल’ नावाची कंपनी आहे . वेगवेगळ्या भाषेतील पुस्तकं वाचणे, चित्रपट बघणे व त्यावर लिहिणे ही त्यांची आवड आहे )
[email protected]
सुंदर लेख.
अजून कुठे लिहिता ?
वाचायला आवडेल.