साभार: साप्ताहिक साधना
-सुरेश द्वादशीवार
एकाकीपण म्हणजे एकांत नव्हे. एकटे असणेही नव्हे. एकाकीपण ही मनाची अवस्था आहे. ती का, केव्हा व कशी येईल याचा नेम नसतो. ती केव्हा जाईल वा दूर होईल हेही सांगता येत नाही. तिचा अनुभव नेहमी दुःखदायकच असतो असे नाही. तो आनंददायी असण्याची शक्यताही बरीच असते. आजचे जग समूहकेंद्री न राहता व्यक्तिकेंद्री झाले आहे. परिणामी माणसांचे परस्परावलंबन कमी झाले आहे. एकाकीपणाच्या शक्यता व व्याप्तीही वाढल्या आहेत. कारण एकाकीपण ही व्यक्तिगत स्थिती आहे. ती समूहगत नाही.
लोकशाही असो वा हुकूमशाही तीत घेतले जाणारे सगळे निर्णय अंतिमतः एकाकी अवस्थेतच तिचे नेते घेत असतात. चर्चा होते, सल्लामसलत होते, मार्गदर्शन घेतले जाते, पण सरतेशेवटी निर्णय सर्वश्रेष्ठ नेताच घेत असतो. अमेरिकेत ती जबाबदारी अध्यक्षांची आहे. संसदीय लोकशाहीतील मंत्रिमंडळात चर्चा होते. मात्र त्यात मतदान घेतले जात नाही. निर्णय घेण्याची जबाबदारी पंतप्रधानांवर सोपविली जाते. त्यामुळे राज्यव्यवस्था कोणतीही असली तरी तीत अखेरचा निर्णय एकच व्यक्ती घेते. तो तिच्या एकाकीपणातला कौल असतो. हे निर्णय बहुधा अचूक असतात कारण त्यामागे अनेकांचा सल्ला असतो. तो सल्ला पारखणे व त्यातील योग्य तो निवडणे हे नेतृत्वाचे काम असते. त्यातली चूक केवळ त्याला भोवत नाही ती समाज व देश यांच्या उत्थानाला वा विनाशालाही कारणीभूत होते. त्याचमुळे नेतृत्वाला काटेरी मुकूट म्हणतात. त्याचा मान मोठा असला तरी त्याचे ओझे आणि टोचही मोठी असते.
एकाकीपण आणि एकटेपण यातला फरक लक्षात घेतला की आणखीही एका निष्कर्षापर्यंत जाता येते. उपरोक्त, राजकीय निर्णय नेते एकटेपणी घेतात. मन शांत, निकोप व गंभीर असतानाचा तो एकट्याचा निर्णय असतो. तो त्याच्या प्रज्ञेचा आवाज असतो. गांधी त्यालाच ’आतला आवाज’ म्हणायचे. तो तर्क, बुद्धी वा श्रद्धा यातून येणारा नव्हता. मन व मेंदूच्या क्षेत्रातून सहजपणे येणारा होता. श्रद्धावानातले काहीजण त्याला ईश्वरी निर्णय असे म्हणतात. प्रज्ञेचा संदेश आणि नेतृत्वाने एकटेपणी घेतलेला निर्णय यातला हा सूक्ष्म पण महत्त्वाचा फरक आहे. नेहरूंना गांधीजींच्या आतल्या आवाजाविषयी नेहमीच शंका यायची. ’तुमचे हे आवाजच मला जास्तीचे बुचकळ्यात टाकणारे व प्रसंगी तर्कविरोधी वाटतात’ असे ते गांधींना एकदा म्हणालेही. मात्र यथावकाश गांधींची प्रज्ञाच आपल्या तर्काहून श्रेष्ठ व योग्य असल्याचे त्यांच्या लक्षात यायचे व ते त्याची कबुलीही द्यायचे.
वेदातली सुक्ते, उपनिषदातले अध्याय, भगवद्गीता किंवा रामायण आणि महाभारतासारखी महाकाव्ये त्यांच्या निर्मात्यांनी मनाच्या ज्या अवस्थेत सिद्ध केली ती अवस्था एकाकीच असणार. ’इलियड’ची निर्मिती व आपले संतवाङ्मयही तसेच असणार. जगभरातील तत्त्वज्ञ माणसांचे ज्ञानग्रंथही त्यांना त्यांच्या एकाकी अवस्थेतच सिद्ध करता आले असणार. मात्र हे एकाकीपण सुटे नसेल. त्या मागे व त्याला जुळलेले त्यांचे प्रदीर्घ व कदाचित आयुष्यभराचे चिंतन असेल. निषादाने क्रौंच पक्षाच्या युगुलाला मारलेला बाण पाहून वाल्मिकी व्यथित झाला असेल पण त्याच एका क्षणाने सारे रामायण जन्माला आले नसेल. ’भारतीय युद्धाच्या अखेरीस मी साडेआठ हजार श्लोकांचा ’जय’ नावाचा इतिहास लिहिला.’ हे व्यासांचे म्हणणे त्यांची इतिहासकाराची दृष्टी व चिंतनकाराची प्रज्ञा सांगणारे आहे. पण ’जय’ ही बाबही त्यांच्या एकाकी अवस्थेनेच जगाला दिलेली देण आहे. इलियड ज्या काळात जन्माला आले त्या काळातल्या ग्रीक देवता सगळ्या मानवी गुणावगुणांनी भरल्या होती. हेलनची प्रेमकथा, त्यातून झालेला ट्रॉयचा विनाश हाही एका प्रदीर्घ चिंतनाचा व महाकवी होमरच्या एकाकी अवस्थेतील अविष्कारच असणार.
सॉक्रेटिसची विद्वत्ता त्याच्या शिष्यांसोबत बोलताना खुलत असे. पण प्लेटो व ऍरिस्टॉटलपासून थेट शॉपेन हॉवर आणि नित्शेपर्यंतचे तत्त्वज्ञही त्यांच्या एकाकी व एकट्या अवस्थेतच आपल्या विचारांची मांडणी करीत. बेकनपासून रसेलपर्यंतचे अनेक जण एकांत जपत. माणसे टाळत. कारण त्यांना चिंतन व लिखाण यासाठी केवळ एकांतच नव्हे तर एकाकीपणही लागत असे. गर्दीत वा कुटुंबाच्या वर्दळीत राहून लिहिणारे लेखक व कवी नाहीत असे नाही. पण ते फारतर ललित लेखन करतात. कविता, कथा, कादंबर्या वा व्यक्तिरेखा लिहितात. त्यांच्यातल्या कितीजणांनी तत्त्वज्ञानपर गंभीर लेखन केले?
येथे आणखीही एका अप्रिय गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे. प्रस्तुत लेखकाच्या संग्रहात जागतिक मान्यता पावलेले तत्त्वज्ञानाचे सहा कोष आहेत. या कोषात एकाही भारतीय तत्त्वज्ञाचा समावेश नाही. बेकन ते चॉम्स्की हे सारे जर्मन, इंग्लिश, फ्रेन्च व अमेरिकन तत्त्वज्ञच त्यात आहेत. कारण भारतीय विचारपरंपरा तर्क वा विचार याहून श्रद्धेवर अधिक आधारलेली आहे. विचार करा परंतु तो वेदानुकूलच करा. वेदविरोधी वा वेदबाह्य विचार हेच पाप ठरविणाऱ्या धर्मात नवा विचार वा तत्त्वज्ञान कसे जन्माला येईल? मग वेदानुकूल परंपरा, तसेच ब्राह्मणग्रंथ, उपनिषदे, गीता, संतसाहित्य हे सारे ’भाष्यकाराते वाट पुसतु’ असे येते आणि भाष्यकारही ’वेदाते वाट पुसतु’ असे येतात. त्यामुळे मूळ वेदात आला असेल तेवढाच तत्त्वविचार खरा. बाकीची त्यावरही नुसती भाष्ये. वेदांचाही विचार जरा काळजीपूर्वक केला तर त्यात पुरुषसुक्ताखेरीज नवे वा वेगळे काही नाही. नुसत्याच प्रार्थना व आरत्या. हे पुरुषसुक्तही एखाद्या कवितेसारखे आहे. ते पुरावाशुद्ध नाही आणि त्याच्या सत्याची साक्ष कोणी देत नाही. या स्थितीत येथे तत्त्वज्ञाने जन्माला येणार कशी आपल्यातील काही जण सारे जग व्यासोच्छिष्ट आहे असे सांगून व्यासाच्या लिखाणात सारे आले आहे असा बडिवार मिरवितात. पण व्यासामध्ये मार्क्स कुठे आहे, फ्राईड कुठे आहे, त्याआधीचे तत्त्वज्ञ तरी त्यात कुठे बसणारे आहेत?
बायबलचा प्रकारही तोच. मुळात आजचे बायबल येशुच्या पश्चात चारशे वर्षांनी कान्स्टंटाईन राजाने त्याचा धर्म स्वीकारल्यानंतर संपादित झाले. त्यावेळी अस्तित्वात असलेली येशुची ८४ चरित्रे रद्द ठरवून फक्त चार चरित्रे बायबलातल्या समावेशासाठी घेतली गेली. त्यातले एक चरित्र प्रत्यक्ष मेरी मॅक्डेलीनीने लिहिले होते. ही चरित्रे रद्द ठरविल्यानंतर ती नष्टही करण्यात आली. त्यातले एखादे शिल्लक राहिले तर ते समाजाला वेगळा विचार करायला लावू शकते अशी त्यावेळची धार्मिक नेत्यांना भीती होती. पुढे बायबलविरोधी विचार हाच धर्मद्रोह ठरविला गेला. बायबलहून वेगळा विचार, तर्क वा संशोधनही धर्मविरोधी मानले गेले. फार कशाला, स्वतंत्र विचार हाच अपराध ठरविला गेला. स्वतंत्र विचार करणारी स्त्री चेटकीण असते आणि प्रत्येक चेटकीण ही वध्य असते हे चौथ्या शतकातच पोपने जाहीर केले. परिणामी युरोपात स्वतंत्र विचार करणार्या शेकडो स्त्रिया जाळल्या गेल्या. गॅलिलीओलाही त्याचे संशोधन नाकारावे लागले. जी गोष्ट बायबलात बसत नाही ती धर्मद्रोही ठरली. परिणामी बायबलानुसार जगाची उत्पत्तीच सात हजार वर्षांपूर्वी झाल्याचे सांगितले गेले. श्रद्धा वाढल्या की तर्क मरतात आणि तर्क व विचार या एकाकी मनाच्या बाबी आहेत. श्रद्धेने परिणामी एकाकीपणही निकालात काढले.
हीच गोष्ट कुराणाची. सारे ज्ञान कुराणात आहे. सबब जगभरची ग्रंथालये जाळून टाका असा फतवाच आरंभीच्या खलिफांनी आणि धर्मगुरूंनी काढला. अलेक्झांड्रिया व भारतातले नालंदा हे विद्यापीठ त्यातील प्रचंड ग्रंथालयासह त्याचमुळे जाळले गेले. प्रत्यक्ष कुराणाची आजची संहिताही पैगंबराच्या पश्चात खलिफांच्या काळात केली गेली. मौलाना आझाद म्हणतात तसे करताना त्या लोकांनी मागच्या आयती पुढे व पुढच्या आयती मागे केल्या. आपल्या राजकारणाच्या सोयीसाठी त्यांना तसे करणे भाग होते. प्रत्यक्ष त्याच्या मूळ रूपातही राजकीय सोयीनुसार बदल केले गेले. पैगंबराची आवडती पत्नी हफशा हिच्याजवळ असलेला कुराणपाठ रद्द ठरविला गेला. आजचे कुराणच मग पैगंबराचा अंतिम व खरा संदेश ठरून त्याविरुद्ध वा त्याहून वेगळा विचार रद्दबातल बनला. या इस्लामने अरबांवर केलेल्या चढायांनंतर त्या परिसरातील तत्त्वज्ञानाच्या परंपराही नष्ट झाल्या. अल् किंदी, अल् फराबिया यासारखे तत्त्वज्ञ व त्यांचे लिखाण लुप्त झाले. मग कुराण हाच धर्मग्रंथ व तोच तत्त्वग्रंथ ठरला. धर्माच्या उठावाने तर्क संपविला, विचार मारले आणि तत्त्वज्ञाने इतिहास जमा केले. हे सर्वत्र व सर्वच धर्मांबाबत खरे आहे. तर्क जाणे वा विचार जाणे ही बाब समूहांच्या श्रद्धांना मान्यता देणारी व व्यक्तीचा विचार व तिचा तर्क तिच्या एकाकी अवस्थेसह नाकारणारी होती. धर्म आणि श्रद्धा यांनी एकाकीपण मारून एवढा आकांत केला असेल तर त्यात ज्ञान, विज्ञान, तत्त्वज्ञान आणि विद्वत्ता यांचा केवढा खच पडला असेल याची कल्पना करता यावी. हे सुद्धा शतकानुशतके चाललेले प्रकरण आहे. अखेर हे श्रद्धा आणि तर्क यांच्यातले भांडण वा मन आणि मेंदू यांच्यातला वाद आहे. त्यासंबंधीचे तारतम्य हाच त्यावरचा खरा उपाय आहे. माणसाचे एकाकीपण त्याला जाचक होते, की त्याला त्याच्या खर्या स्वरूपाकडे वा उंचीकडे नेते एवढाच यातला खरा प्रश्न आहे. दुःख याचे की धर्म व धर्मश्रद्धा माणसाला स्थितीवादी बनवतात व तसे करताना त्याचे एकाकीपण, मूकपणा व अंधश्रद्धेत बदलून टाकतात.
एकाकी मन जागे असते. त्यात विचारांच्या श्रृंखला येत नसतात वा सलग कोणता विचारही येत नसतो. पण हे मन काहीतरी पाहात व तेही आपल्या स्वतःच्या आत शोधत असते. या शोधातून कधी काही चांगले हाती लागते. तर खूपदा हे पाहणे काही एक हाती न लागता थांबते. ज्यांची प्रज्ञा चिंतनाच्या बळावर मोठी झाली वा अनुभवाने संपन्न झाली असते त्यांचा हा अंतरंग शोध मात्र त्यांच्या मनात व बुद्धीत नवी भर घालत असतो. तत्त्वविचार बहुदा असेच जन्माला येतात.
१९३० च्या सुमाराचा गांधीजींचा एक अनुभव असा आहे. सत्याग्रह थांबला होता. १९२१ व २४ च्या निवडणुका जिंकल्या होत्या. पण इंग्रजीविरोधी लोकलढा थांबला होता. परिणामी सशस्त्र लढे वाढले होते. आणि त्यांच्याविषयीचे कुतूहल व आकर्षणही लोकात वाढत होते. सामुदायिक सत्याग्रह, व्यक्तिगत सत्याग्रह असे सारे उपाय झाले होते. नवा मार्ग हवा होता. आणि अचानक समुद्राच्या काठावर एका ब्रिटीश पत्रकाराशी बोलत असताना त्यांना तो स्फुरला. समुद्राची संगत, त्याच्या लाटांची गाज आणि नव्या मार्गाची निकड यातून तो आला होता. त्याचा त्या पत्रकाराशी चाललेल्या संवादाशीही संबंध नव्हता. एकाएकी ते बोलायचे थांबले आणि त्या पत्रकाराला म्हणाले, चला आता मला नवा मार्ग सापडला आहे… मिठाचा सत्याग्रह. त्यासाठी काढलेली दांडीयात्रा, आणि तिने देशाला दिलेली नवी जाग हे सारे त्या क्षणी त्यांच्या मनात उगवलेल्या विचारांची परिणती होते.
मात्र हा एकट्या गांधींचाच अनुभव नाही. वयाच्या आठव्या वर्षापर्यंत शंकराचार्यांचे वेदाध्ययन पूर्ण कसे झाले, ज्ञानेश्वराला वयाच्या आठराव्या वर्षी गीतेवर भाष्य कसे लिहिता आले किंवा मौलाना आझादांनी वयाच्या अठराव्या वर्षीच कुराणशरिफावरील भाष्यग्रंथ कसा सिद्ध केला. जगभरच्या संतांच्या, वैज्ञानिकांच्या व तत्त्वज्ञांच्या अशा कहाण्या व त्यांचे एकाकी अवस्थेतले उगम सांगता व पाहता येतील. मात्र एकाकीपण नेहमी चांगल्या गोष्टीच सुचविते असे नाही. खून, दरोडेखोरी व चोरीसारखे गुन्हेही अशाच अवस्थेत सुचत असतात. एकाकी माणसाचे मन विवेकाधीन असणे हे येथे महत्त्वाचे आहे. त्याला एकटे ठेवू नका, असे काही माणसांबाबत का म्हटले जाते हे यातून कळावे.
एकाकी मनांची आणखी एक लक्षणीय बाब ही की ती बहुदा कमालीची खोल असतात. त्या मनांच्या खोलीत काय दडले असते ते पुष्कळदा आणि अनेकांच्या बाबतीत तसे खोलवर गाडलेलेच राहते. क्वचित कधी एखाद्या अनपेक्षित क्षणी ते बाहेर येते. तेव्हा त्याचे विलक्षण वेगळेपणही जाणवते. पण असे फार थोडा काळ व काहींबाबतच घडते. ही मने कधी खुली झाली आणि त्यात दडलेली वा दडविलेली सत्ये बाहेर आली तर जागतिक वाङ्मयाची व ज्ञानाची दालने त्यामुळे समृद्ध होतील. मात्र तसे व्हायला समाज, कुटुंब व एकूणच सामाजिक पर्यावरण फार खुले व मोकळे व्हावे लागते. दुर्दैवाने त्याच्या शक्यता कमी असतात. त्यामुळे मनात येते की ही गुढे खोलवर दडून राहिल्यानेही आपले कौटुंबिक व सामाजिक जीवन शांत राहात असावे पण हे शांत जीवन एक अपुरेपण अनुभवत असते त्याचे काय..
’सारे इंद्रियगोचर जग ईश्वराला अनुभवाच्या क्षेत्रात आणू शकत नाही ही त्याची मर्यादा. आणि ही मर्यादा ओलांडता न येणे ही ईश्वरी जगताची मर्यादा.’ अशा अतिशय साध्या भाषेत मानवी व ईश्वरी जगताची विभागणी करणारा इमॅन्युएल कांट हा जर्मन होता. ज्ञानाच्या उपासनेसाठी त्याने त्याची ठरत आलेली दोन लग्ने सोडली. तो एकटाच राहायचा. त्याची मदतनीस त्याच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करायची. सारा काळ तो घराच्या आड राहायचा. नेमका दुपारी साडेतीनच्या सुमाराला पूर्ण वेशभूषा करून व हातात छत्री घेऊन तो घराबाहेर पडायचा व ठरलेल्या रस्त्यावरून जाऊन परत यायचा. याही काळात तो कोणाशी काही बोलत नसे. वैमार्ग शहराच्या त्याच्या त्या एकाकी मार्गाला लोक ’फिलॉसॉफर्स वॉक’ म्हणायचे. (प्रस्तुत लेखकाने या मार्गावरून चालत जाऊन आपले ठेंगणेपण अनुभवले आहे.)
डार्विनचा पुत्र व बिस्मार्कचा भाऊ म्हणून जर्मनीत ओळखला जाणारा नित्शे हा थोर तत्त्वज्ञ ज्यात राहायचा त्याचे घर प्रस्तुत लेखकाने पाहिले आहे. हाही त्याच्या घरात सारा दिवस कोंडल्यासारखा राहायचा. ’दस स्पेक झरतृष्ट’ यासारखा अजरामर तत्त्वग्रंथ लिहिणारा आणि सुपरमॅनचे स्वप्न चिंतिणारा हा नित्शे कमालीचा विक्षिप्त व तेवढाच सहृदय होता. एका घोड्याला त्याचा मालक चाबकाने बेदम मारत असलेला पाहून तो कळवळला. आणि त्या घोड्याच्या गळ्यात पडून बेशुद्ध होतपर्यंत रडत राहिला. तेथेच त्याला वेड लागले. अखेरीस तो बहिणीच्या आश्रयाने राहू लागला. एकवार आपल्याकडे पाहून अश्रू गाळणार्या त्या बहिणीला तो म्हणाला, ’का रडतेस, आपली आर्थिक स्थिती चांगली आहे न’?… तशाच अर्धवट अवस्थेत तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातला हा महान एकाकी माणूस मृत्यू पावला.
(लेखक नामवंत संपादक व विचारवंत आहेत)
9822471646
हे सुद्धा नक्की वाचा-
१.एकाकीपणावर मात…– http://bit.ly/2UAwp42
२.जगन्मिथ्या म्हणजे तरी काय?– http://bit.ly/2MDdy3J
३. एकाकीपणाशी मैत्र… http://bit.ly/2EI5eLE
४. एकाकीपणाचे पिशाच!- http://bit.ly/2OPFa7a