दलित-बहुजनांनी आपल्या विचारविश्वातून ‘ब्राह्मण’ हा शब्द वगळायला हवा!

बीइंग इन्क्विझिटिव्ह -४

-उत्पल व्ही. बी.

‘सावरकर हे गांधीजींच्या खुनाला जबाबदार नाहीत हे एकवार मान्य केले तरी ते हा खून थांबवू शकले असते की नाही हा प्रश्न शिल्लक राहतोच’ असं एका तरूण पत्रकाराने विचारल्याचं सुरेश द्वादशीवार यांनी त्यांच्या ‘गांधीजी आणि त्यांचे टीकाकार’ या पुस्तकातील एका प्रकरणात लिहिलं आहे. जातीव्यवस्थेबाबत विचार करताना याला समांतर असा एक प्रश्न माझ्या मनात बरेचदा येतो. ‘ब्राह्मण जातीव्यवस्था निर्माण करण्याला जबाबदार आहेत की नाहीत हा प्रश्न क्षणभर बाजूला ठेवला तरी ती वाढू द्यायला आणि कायम ठेवायला ते जबाबदार आहेत का’ हा तो प्रश्न. तथाकथित उच्च वर्णात सर्वोच्च स्थानी असलेल्या ब्राह्मणांकडे शेकडो वर्षं समाजाचं बौद्धिक-मानसिक धुरीणत्व होतं. त्यांच्या डोळ्यादेखत जातीव्यवस्थेने भयानक रूप धारण केलं तरी त्यांनी त्यावर फारशी संघटित हालचाल केल्याचं दिसत नाही. ब्राह्मण सुधारक, विचारवंत होऊन गेले; पण जातीअंतासाठी मोठी चळवळ उभारली गेल्याचं दिसत नाही. यावरून जातीव्यवस्थेच्या उच्चाटनाबाबत या धुरीण वर्गाला आस्था नव्हती हे स्पष्ट दिसतं. (ही व्यवस्था त्यांनीच निर्माण केलेली असल्याने त्यांना ती नष्ट करण्यात रस नव्हता हे सरळ आहे असा एक तर्क बांधता येईल). या मुद्द्याशी जोडलेली काही मते व निरीक्षणे पाहू.

बाबासाहेब आंबेडकरांनी ९ मे १९१६ रोजी कोलंबिया विद्यापीठातील मानववंशशास्त्र परिषदेत ‘कास्ट्स इन इंडिया : देअर मेकॅनिझम, जेनेसिस अँड डिव्हेलपमेंट’ हा शोधनिबंध सादर केला होता. या शोधनिबंधात त्यांनी जातीव्यवस्थेच्या उगमाबाबत आणि स्वरूपाबाबत त्यांची मतं मांडली आहेत. सेनार्ट, नेसफील्ड, रिस्ले आणि श्री. व्यं. केतकर या अभ्यासकांनी केलेल्या जातीच्या व्याख्या उद्धृत करून केतकरांची व्याख्या सर्वात अचूक असल्याचं ते लिहितात. केतकरांची व्याख्या अशी – जात म्हणजे दोन प्रमुख गुणधर्म असलेला समूह. १) समूहातील सदस्यांना झालेल्या मुलांनाच फक्त जातीचं सदस्यत्व मिळतं आणि अशा प्रकारे जन्मलेले सर्वजण सदस्य म्हणून सामावून घेतले जातात. २) समूहाबाहेर लग्न न करण्याच्या अनुल्लंघनीय सामाजिक कायद्याने सर्व सदस्य बांधलेले असतात. आंबेडकरांच्या मते एंडोगॅमी (समूहाबाहेर लग्नाला परवानगी नसणे) हे जातीचं मुख्य लक्षण आहे. भारतामध्ये एंडोगॅमी नव्हती, एक्सोगॅमी (समूहाबाहेर लग्नाला परवानगी असणे) होती आणि एंडोगॅमी थोपली जाण्यातूनच जाती निर्माण झाल्या असं आंबेडकर म्हणतात. जातीचा उगम म्हणजे ‘एंडोगॅमीच्या मेकॅनिझम’चा उगम असं त्यांचं मत आहे.

जात हा एक बंदिस्त ‘वर्ग’ आहे आणि स्वतःभोवती असा बंदिस्तपणा घालून घेण्याची लक्षणे सर्वप्रथम ब्राह्मणांमध्ये आढळतात. हिंदू समाजात प्रारंभी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे चार ‘वर्ग’ होते आणि या वर्गांमध्ये स्थलांतरही शक्य होते. पुढे ब्राह्मण वर्ग इतरांपासून वेगळा होत गेला आणि त्यांनी स्वतःला ‘जाती’मध्ये बंदिस्त केलं. हाच मार्ग पुढे ब्राह्मणेतर वर्गांनी अनुसरला आणि त्यामुळे जातीसंस्थेचं जनकत्व ब्राह्मणांकडे जातं असं आंबेडकर लिहितात. इथे त्यांनी दोन प्रश्न विचारले आहेत. पहिला असा की ब्राह्मणेतर वर्गामध्ये जातीव्यवस्था कुण्या एकाच्या कायद्यान्वये प्रस्थापित झाली की भारतीय समाजाशी संबद्ध अशा एखाद्या सामाजिक विकसनाच्या नियमानुसार ती प्रस्थापित झाली? मनूने जातीव्यवस्था कायद्याने प्रस्थापित केली हे आंबडेकर नाकारतात. जात मनूच्याही आधी होती, मनूने तिला तात्त्विक अधिष्ठान दिलं असं आंबेडकर लिहितात. मग हे ब्राह्मणांनी केलं का? याचंही उत्तर आंबेडकरांनी नकारार्थी दिलं आहे. संपूर्ण समाज आपण निर्मिलेल्या एका नमुन्यात बसवणं ब्राह्मणांसारख्या सामर्थ्यवान वर्गालाही शक्य नव्हतं असं त्यांचं मत आहे.

मात्र या निबंधात एक छोटी विसंगती आढळते. खालील परिच्छेद पहा –

If the prevalence of these customs in the non-Brahmin Castes is derivative, as can be shown very easily, then it needs no argument to prove what class is the father of the institution of caste. Why the Brahmin class should have enclosed itself into a caste is a different question, which may be left as an employment for another occasion. But the strict observance of these customs and the social superiority arrogated by the priestly class in all ancient civilizations are sufficient to prove that they were the originators of this “unnatural institution” founded and maintained through these unnatural means.

यानंतरच पुढचा एक परिच्छेद असा आहे –

The spread and growth of the Caste system is too gigantic a task to be achieved by the power or cunning of an individual or of a class. Similar in argument is the theory that the Brahmins created the Caste. After what I have said regarding Manu, I need hardly say anything more, except to point out that it is incorrect in thought and malicious in intent. The Brahmins may have been guilty of many things, and I dare say they were, but the imposing of the caste system on the non Brahmin population was beyond their mettle.

ब्राह्मण हे ‘त्यांच्या’ जातीचे निर्माते आहेत, पण पुढे जातींचा जो मोठ्या प्रमाणात विस्तार झाला त्याला ते जबाबदार नाहीत असं आंबेडकरांना म्हणायचं आहे. परंतु दुसऱ्या परिच्छेदात ‘ब्राह्मणांनी जात क्रिएट केली नाही’ असं म्हटलं गेल्याने पहिल्या परिच्छेदातील विधानाशी ते विसंगत होत आहे. कदाचित इथला ‘क्रिएट’ हा शब्द ‘स्प्रेड’ या अर्थी वापरला असावा. हा शोधनिबंध मला दोन ठिकाणी सापडला. दोन्ही ठिकाणी असेच उल्लेख आहेत.

http://www.columbia.edu/…/00ambedk…/txt_ambedkar_castes.html

http://drambedkarwritings.gov.in/…/uplo…/files/Volume_01.pdf

ब्राह्मणांचं अनुसरण करून इतरांनी एंडोगॅमी स्वीकारून आपआपल्या जाती निर्माण केल्या (काहींनी दारं लावून घेतली तर काहींना आपल्यासाठी दारं बंद झाल्याचं लक्षात आलं) असं आंबेडकरांचं प्रतिपादन आहे. प्रस्तुत शोधनिबंध आंबेडकरांनी वयाच्या २५ व्या वर्षी लिहिला आहे. पुढील काळात त्यांनी जे विपुल लेखन केलं त्यात काही वेगळी मांडणी आढळते का हे पाहावं लागेल. कुणाला याबाबत माहीत असेल तर जरूर सांगावं.

विख्यात समाजशास्त्रज्ञ जी. एस. घुर्ये यांनी आपल्या ‘कास्ट अँड रेस इन इंडिया’ या पुस्तकात जातींच्या निर्मितीविषयी जे लिहिलं आहे ते आंबेडकरांच्या मांडणीशी जुळणारं आहे. भारतातील जातीव्यवस्था इंडो-आर्यन संस्कृतीतील ब्राह्मणांचं देणं आहे असा त्यांचा निष्कर्ष आहे. पण जातींचा प्रसार होण्यामागची कारणं देताना घुर्ये हेही लिहितात –

The lack of rigid unitary control of the state, the unwillingness of the rulers to enforce a uniform standard of law and custom, their readiness to recognize the varying customs of different groups as valid, and their usual practice of allowing things somehow to adjust themselves helped the fissiparous tendency of groups and fostered the spirit of solidarity and community feeling in every group.

जातीविषयीचं हे अगदी प्राथमिक विवेचन आहे. काही हजार जातींची निर्मिती, त्यांच्यातील उतरंड, एकमेकांशी असलेलं नातं आणि दृश्य-अदृश्यपणे जाणवणारं ब्राह्मणी वर्चस्व हा अर्थातच सविस्तर अभ्यासाचा विषय आहे. दुसरा लक्षात घेण्याजोगा मुद्दा असा की आपण जेव्हा ब्राह्मणी वर्चस्व म्हणतो तेव्हा त्यात ब्राह्मण ही जात स्पष्टपणे अधोरेखित होत असते. परंतु क्षत्रिय, वैश्य या वर्गांचंही जातीत रूपांतर झालं आणि त्यांनीही बहुजनांचं दमन केलेलं असलं तरी तशा अर्थाचा शब्द रूढ झालेला नाही. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर मराठा वर्चस्व हा शब्दप्रयोग नक्कीच करता येईल.

ही पूर्वपीठिका मांडण्याचं कारण सध्याचा जातीय तणाव हेच आहे. हिंदू-मुस्लिम धार्मिक तणाव, कट्टर डावे, डावे-उदारमतवादी आणि कट्टर उजवे, उजवे-उदारमतवादी हा एक तणाव व हिंदूंमधील जातीय तणाव (ज्यात प्रामुख्याने ब्राह्मण-ब्राह्मणेतर तणाव दिसतो) हे तीन प्रकारचे तणाव प्रखर झालेले असताना प्रत्येक तणावाकडे त्यातील बारकावे समजून घेत पाहणं आणि त्यावर चिंतन करणं गरजेचं झालं आहे. भारताची सामाजिक वीण समंजस आणि सहिष्णू आहेही आणि नाहीही, आज ती ‘नाही’कडे झुकल्याचं दिसतं. आपल्याला ‘आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन्स’ हवे आहेत, ‘कोअर्सिव्ह इंडियन्स’ नको आहेत. त्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकानं उपायांचा शोध घेणं आवश्यक आहे.

ब्राह्मणीकरण, ब्राह्मणांचं सांस्कृतिक वर्चस्व हा विषय नव्याने चर्चेत आला असला तरी तो आहे जुनाच. मला याबाबत असं प्रामाणिकपणे वाटतं की जोवर ब्राह्मण मोठ्या संख्येने आपणहून पुढे येऊन गतकाळातील दलित-बहुजनांवरील अन्यायाबाबत आणि आजच्या विस्कटलेल्या परिस्थितीबाबत बोलणार नाहीत, क्षमा मागणार नाहीत, जोवर ते स्वतःहून चार पावलं पुढे येऊन संवाद सुरू करणार नाहीत आणि हे करत असताना स्वतःला दलितांवर न थोपवता त्यांच्या मनातील राग, खळबळ समजून घेणार नाहीत तोवर हा तणाव संपणारा नाही. (हाच मुद्दा इतर उच्चवर्णीयांनाही लागू आहे.) दुसऱ्या बाजूने दलित-बहुजन आपल्या विचारविश्वातून ‘ब्राह्मण’ हा शब्द, ही संकल्पना वगळून ‘स्वतःतील सामर्थ्याची स्वतंत्र, स्वयंभू ओळख, स्वतःकरताचा स्वतंत्र रोड-मॅप आणि त्याकरता लागणाऱ्या संसाधनांची जुळवाजुळव’ या गोष्टींना अधिक स्पेस देत नाहीत तोवर त्यांचं मानस मुक्त होऊ शकणार नाही.

हा विषय अर्थातच नाजूक आहे. दलित-बहुजनांसाठी व्यवस्थात्मक आव्हान मोठं आहे. त्यामुळे या एकूण परिस्थितीवर गंभीरपणे विचार करणाऱ्यासाठी समजून घ्यावेत असे अनेक बारकावे आहेत. कुठलाही तणाव आहे त्याच स्थितीतही राहू शकतो, तो डिस्ट्रक्टिव्ह होऊ शकतो किंवा तो कमी होऊन त्यातून काही कंस्ट्रक्टिव्हही घडू शकतं. निवड (हालचाल) अर्थातच आपल्यालाच करावी लागते. पुढील भागात अधिक चर्चा करूया.

हेही वाचा- हिंदुत्ववादी व पुरोगामी : एकमेकांना ‘सुधारण्याची स्पेस’ नाकारत आहेत का? https://bit.ly/33KlOWR-

हेही वाचा- उदारमतवाद्यांनी समंजस हिंदुत्ववाद्यांशी संवाद सुरू ठेवायला हवा! https://bit.ly/2WQLTlw

‘हिंदू असणं’ म्हणजे नक्की काय? https://bit.ly/39moSK3

(लेखक ‘मिळून साऱ्याजणी’ मासिकाचे संपादक आहेत)

9850677875

Previous articleरात्र महाभयंकर वैऱ्याची आहे ,  आपण गंभीर कधी होणार ?
Next articleकोई मिल गया…!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here