शेतीप्रधान व ग्रामीण जीवनक्रमामुळे भारतातील खेडी ही आधीच स्वतःहून सामाजिकदृष्ट्या विलग राहणारी असतात आणि झपाट्याने शहरीकरण होत चाललेल्या जगात ही तरी निदान सुंदर गोष्ट आहे. भारत आणि जग या साथीच्या आजारातून कसं पार होईल, याची काहीच शाश्वती नाही. कारण वैद्यकशास्त्र शर्थीने प्रयत्न करत असूनही, त्याने अद्याप या आजारावर कोणतीही लस सुचवलेली नाही किंवा या आजारावरील उपचारांची नेमकी पद्धतही अजून सापडलेली नाही. जागतिक पातळीवर पसरलेली घबराट आणि ‘लॉकडाऊन’सारख्या सर्वच देशांनी अवलंबलेल्या नेहमीपेक्षा वेगळ्या उपाययोजना मागे वळून पाहायला लावत आहेत. गाठीच्या प्लेगच्या 1897 मध्ये आलेल्या साथीत भारतातील 1 कोटी आणि चीन व इतर देशांमधील 20 लाख लोक मृत्युमुखी पडले. त्या प्लेगमधून भारताने कसं निभावलं होतं?
आजपासून १२३ वर्षांपूर्वी हैदराबादमधील निजामाच्या राज्यात भरपूर वनजमिनी, निम-वनजमिनी प्राण्यांना चरण्यासाठी उपलब्ध होत्या. नद्या व इतर जलप्रवाहांबरोबरच मासेमारीसाठीही जलाशय उपलब्ध होते. याच प्लेगच्या साथीमध्ये शेकडो मेंढपाळ कुटुंबांसह माझे आजोबा करीमाबाद येथील ‘उरसू’ मधून (या गावांना एकत्रितपणे ‘फोर्ट वारंगळ गाव’ असं म्हटलं जातं. ही गावं १३ व्या शतकानंतरच्या काकतीय साम्राज्याच्या काळात वसवली गेली) पाकलपट्टी येथे स्थलांतरित झाले. नरसमपेटजवळ असणारं, काकतीय साम्राज्याच्या काळात बांधलं गेलेलं पाकल तळं हा त्याच्याशेजारी मोठ्या संख्येने नव्याने राहायला आलेल्या समूहाचा मुख्य जलस्रोत होता. महबुबाबाद आणि नरसमपेट यांच्यामध्ये असणाऱ्या त्या जंगली वा निमजंगली पट्ट्यात स्थलांतरित झालेल्या मेंढपाळांना ‘कुरुमा गोला’, मासेमारांना ‘मोतिराज’ व गुराख्यांना ‘लंबाडा’ असं म्हटलं गेलं.
माझ्या वयाचे लोक हे त्या स्थलांतरितांच्या खेड्यांमधील तिसऱ्या पिढीचे आहेत. त्या दुष्ट प्लेगमुळे स्थलांतरित झालेल्या पहिल्या पिढीच्या काळातील आठवणी माझ्या लहानपणी आणि शाळेतील दिवसांमध्ये सांगितल्या जात होत्या. काही विधवा या प्लेगमधून वाचल्या होत्या. मी जेव्हा लहानाचा मोठा होत होतो; तेव्हा प्लेगची भयानकता, त्यांचं विस्थापन आणि नव्या जागी झालेलं स्थलांतर, प्लेगच्या तावडीतून त्यांचं वाचणं या सगळ्याविषयी त्या सांगत असत. माझ्या तीन आज्या- कांचा लिंगम्मा (माझ्या वडिलांची आई), तिची मोठी बहीण इरम्मा या दोघी आणि माझ्या आईची आई चित्ते बालकोमुरम्मा हीदेखील विधवाच होती. ही दोन्ही कुटुंबं पाकल झऱ्याजवळ एकाच ठिकाणी स्थायिक झाली. हादेखील शेळ्या आणि मेंढ्यांना चरण्यासाठी उपयुक्त असा पपैहपेट नावाचा जंगली पट्टा होता. माझ्या शेजारी राहणारं कुटुंब कापू-रेड्डींचं होतं, त्याही घरात दोन विधवा होत्या. अनेकदा कठीण काळात स्त्रियाच टिकून राहतात, कारण नवरा-बायकोमधील वयाचं अंतर अधिक असतं आणि स्त्रियांची टिकून राहण्याची क्षमताही अधिक असते. त्या भागांतील अनेक खेड्यांमध्ये अशा विधवा होत्या आणि अतिशय खडतर परिस्थितीतही मेहनतीने त्या आपलं कुटुंब चालवत होत्या.
बराच काळपर्यंत हे स्थलांतरित गवताने शाकारलेल्या लहानशा घरांमध्ये राहत होते. त्यांचं गोधनाचं अर्थकारण हळूहळू वाढू लागलं आणि त्यांच्यातील काही कुटुंबांनी जमिनीची स्वहस्ते मशागतदेखील सुरू केली. सुरुवातीच्या काळात त्यांची मुख्य अडचण ‘धान्याची टंचाई’ ही होती. त्या वेळी मांस, मासे, जंगलातील कंदमुळे अशा गोष्टींवर त्यांनी कशीबशी निकड भागवली. साथीच्या आजारात तिथे स्थलांतरित झालेल्या पहिल्या पिढीने काळाच्या ओघात तिथे गो-पालनावर आणि शेतीवर आधारलेली अर्थव्यवस्था उभी केली. ही नवजात व्यवस्था जसजशी वाढू लागली तसतशी अधिक वेगाने त्यांनी अर्थव्यवस्था उभारायला सुरुवात केली. सध्याच्या महबुबाबाद जिल्ह्यात तेव्हा भटक्या जमातींची अनेक लहान खेडी असल्यामुळे, तो भाग अशा जमातींसाठीच्या राखीव लोकसभा मतदारसंघाचा होता; त्याचबरोबर तो पुष्कळ लोकसंख्या असणारा आणि शेतीच्या चांगल्या उत्पादनामुळे हिरवागार असणारा पट्टा होता.