-प्रमोद मुनघाटे
बाबांचा (गो. ना. मुनघाटे) भूगोल आवडता विषय. दरवर्षी ते भूगोल दिनानिमित्त जिल्ह्यातील भूगोल शिक्षकांची सहल काढत. त्या सहलीत मलाही घेऊन जात. त्या काळात त्यांना पक्षीनिरीक्षणाचा छंद जडला होता. बरेचदा मला पहाटे उठवत आणि गावातील जवळच्या तलावावर घेऊन जात. निरनिराळे पक्षी दाखवून त्यांची नावं सांगत. त्यांनी घरी एक मोर पाळला होता आणि मोरासंबंधी एक लेख ‘महाराष्ट्र टाइम्स’ मध्ये लिहिला होता. त्या लेखामुळे त्यांची मारुती चितमपल्ली यांचेशी ओळख झाली. नवनीत डायजेस्ट मधून मी चितमपल्ली यांच्या कथा-लेख वाचत असे.
एकदा बाबांनी भूगोल मंडळाची सहलीत मला नवेगाव बांधला नेले. तिथे पोचल्यावर सोबतची मंडळी डॉरमेट्री मध्ये स्थिरस्थावर झाली. मग बाबा मला मारुती चितमपल्ली यांच्या बंगल्यावर घेऊन गेले. ते १९७३-७४ चे वर्ष असावे. तेंव्हा चितमपल्ली नवेगावला वनाधिकारी होते. ती भेट माझ्यासाठी अविस्मरणीय होती. त्यांच्या जीपमधून आम्ही माधवराव पाटील डोंगरवार यांच्या गावात गेलो. त्यांना सोबत घेऊन मग आम्ही जंगलात पायीच फिरलो. डिसेंबरमधील सकाळ होती ती. झाडाझाडाच्या माथ्यावरून, डोंगरातून पसरलेले सकाळचे कोवळे ऊन आणि गवतावर वितळत असलेले दवबिंदू. झाडीतून मध्येच डोकावणारे ससे. रस्त्यात मध्येच येऊन आमच्याकडे बघणारे हरीण. जोरात चित्कारत झाडांच्या फांद्यांना हिसका देणारी माकडं. ती सकाळ आजही डोळ्यापुढे उभी राहते.
□
नवेगावबांधच्या भेटीत चितमपल्ली यांची मुलगी छाया भेटली. ती आठ-नऊ वर्षांची असेल. पुढे दहा-बारा वर्षांनी आमचा पत्रव्यवहार सुरू झाला. ती तेव्हा अमरावतीला भूगोल विषयात एम. ए. करीत होती. तरुण भारतात तिचे जंगलावर लेख यायचे. आणि मारुती चितमपल्ली तेव्हा मेळघाटात (परतवाडा येथे) वनाधिकारी होते. छायाचे पत्र खूप सविस्तर असायचे. एक पत्र पंधरा-वीस पानांचे. त्यात ती मेळघाटमधील जंगल, पक्षी आणि प्राणी याविषयी भरभरून लिहित असे. त्यामुळे मी कधी एकदा मेळघाट बघतो असे मला झाले होते.
नागपुरात ८७-८८ मध्ये तेंव्हा मी विद्यापीठात रिसर्च स्कॉलर होतो आणि अंबाझरी तलावाच्या जवळच रिसर्च क्वार्टर्समध्ये राहात असे. त्या काळात राजू महाजन (आता ते चोपडा येथील चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत. परवा जळगावचे चित्रकार मित्र Raju Baviskarराजू बाविस्कर यांनीही फोन करून राजूचा संदर्भ दिला) हा माझा मित्र माझ्याकडे यायचा. आम्ही अंबाझरीच्या मागे जंगलात भटकायचो. पुढे काही कामाने छाया अनेकदा नागपूरला आली. कधी भेट व्हायची, कधी होत नसे. कारण तेंव्हा फोन कुणाकडेच नव्हते. ती येऊन गेल्याचे मला दाराला लावलेल्या चिठ्ठीवरून कळत असे. मग एक दिवस छायाने पत्रातून मेळघाटला येण्याचे आमंत्रण दिले. मी आणि राजू महाजन आम्ही आधी परतवाड्याला त्यांच्या क्वार्टरला पोचलो. छायाला कितीतरी वर्षांनी पुन्हा भेटत होतो. चितमपल्ली यांनी आमची सेमाडोह येथे व्यवस्था केली होती. आम्ही सायंकाळपर्यंत तिथे पोचलो. तेथील नग्न अरण्य आणि रानटी स्वच्छ हवा यामुळे एका वेगळ्याच अनुभवात आम्ही जणू तरंगत होतो. रात्री जेवणानंतर आम्ही सिपना नदीच्या खडकाळ पात्रातून दूरवर पायी फिरलो. एका बाजूला नदी आणि दुसऱ्या बाजूला किर्र जंगल. हा सुद्धा अनुभव विसरू शकत नाही.
मारुती चितमपल्ली नंतर अभिरिका अपार्टमेंट, आठ रस्ताचौक, लक्ष्मीनगर येथे राहायला गेले. त्यापूर्वी नागपूरला टिळकनगरात भाड्याने राहायचे. मी खुपदा गेलो या दोन्ही घरी. चितमपल्ली यांचे पुस्तकाचे कपाट आणि त्यांची लेखनाची जुनी भारतीय बैठक मला विशेष वाटत असे. त्यांचेशी बोलताना ते खूप प्राचीन पुस्तकाचे संदर्भ देत. एकदा म्हणाले की, “जंगल वाघाचे रक्षण करतो आणि वाघ जंगलाचे रक्षण करतो.” अशी वेदात नोंद आहे.
छायाच्या आईचे नाव सरस्वती होते. घरी गेलो फराळ, चहा आणि सगळ्यांशी पुस्तके, सिनेमा आणि जंगल भटकंतीवर गप्पा व्हायच्या. दरम्यान माझे लग्न झाले. सुधाशी पण छायाची चांगली मैत्री झाली. आम्ही दोघेही घरी जात असू. ती दिवाळी आणि नवीन वर्षाला स्वहस्ते बनवलेलं शुभेच्छापत्रे आम्हाला पाठवायची. एक दिवस छायाची आई गेल्याची कळले. तेरव्याला या म्हणून चितमपल्लींचा फोन आला. तेंव्हा जाणवले आता त्या लक्ष्मीनगरच्या सदनिकेत फक्त दोघेच उरले होते. चितमपल्ली आणि छाया. तेंव्हा फार वाईट वाटले.
□
मारुती चितमपल्ली यांचा मला एक दिवस फोन आला. मी लगेच म्हणालो, मी येणारच होतो नवेगावला तुमच्या नव्या कुटीत. तर ते म्हणाले, नाही हो. मी इथेच आहे नागपुरात. तुम्ही या भेटायला. मला फार आश्चर्य वाटले. कारण निवृत्तीनंतर चितमपल्ली त्यांच्या पुढच्या अरण्यअध्ययनासाठी कायमचे नवेगावबांध येथे जाणार अशा बातम्या सर्वत्र प्रसृत झाल्या होत्या. एव्हाना ते सेलेब्रिटी लेखक म्हणून प्रसार माध्यमात लोकप्रिय झाले होते. त्यांच्या वान्ग्मयीन आयुष्यात माधवराव पाटील आणि नवेगाव बांध यांचे स्थान अगदी केंद्रस्थानी आहे. त्यांच्या ‘चकवाचांदण’ या पुस्तकात हे सगळे आलेले आहे. म्हणून त्यांचे नवेगावला जाणे हे संपूर्ण मराठी साहित्यविश्वासाठी एक विशेष बातमी होती. एका संस्थेने तर त्यांचा जाहीर निरोप समारंभही ठेवला होता, असे मला आठवते. ते जर कायमचे नवेगावला राहायला जाणार असतील तर तेथे त्यांच्या निवासासाठी योग्य जागी एक कुटी तयार करण्याची जबाबदारी मला वाटते माधवराव पाटलांच्या कुटुंबानेच घेतली होती. वर्तमानपत्रात त्यांच्या या ‘वनवासा’च्या कल्पनेचे कौतुकही झाले होते. आणि त्यांना नागपूरकरांनी निरोपही दिला होता, म्हणून मला वाटले की ते आता नव्या कुटीतून बोलत असतील. पण ते नागपुरातच होते. त्यांची एका पाठोपाठ एक पुस्तके प्रसिद्ध होत होती. पक्षीकोश प्रसिद्ध झाला होता. त्याविषयी त्यांच्या अभिरिका अपार्टमेंटमध्ये मी भरपूर चर्चा केली होती.
घरी गेल्यावर त्यांनी सांगितले की नवेगावच्या कुटीत निसर्गाच्या सान्निध्यात राहणे शक्य नाही. बऱ्याच व्यावहारिक अडचणी आहेत, म्हणून मी परत नागपुरात आलो.
□
मग पुढे बहुदा २००६ मध्ये वर्षांनी मारुती चितमपल्ली मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. तेंव्हा ते अभिरिका अपार्टमेंटमध्येच राहत होते. मी त्यांचे अभिनंदन करायला घरी गेलो. माझ्यासोबत त्यावेळी नागपूर आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी श्री, बबन नाखले होते. तेंव्हा टीव्ही चानेल्सचे कॅमेरे आणि रिपोर्टर्स यांची गर्दी होती. ते सगळे गेल्यावर त्यांनी आम्हाला पेढे दिले. त्यानंतर मी म्हणालो की हे संमेलनवगैरे आटोपले की तुमच्यासह आपल्याला नवेगावबांधला जायचे आहे. त्यांनी तत्काळ होकार दिला. सोलापूरला साहित्य संमेलनाला तर मी गेलो नाही; पण काही महिन्यांनी मला निरोप मिळाला की आपल्याला नवेगावबांधला जायचे आहे. अखेर तो दिवस उजाडला. मी, बबन नाखले आणि चितमपल्ली आम्ही नवेगावबांधच्या दिशेने निघालो. सकाळी अकराच्या सुमारास आम्ही थेट नवेगावबांधच्या अभयारण्यातील लॉग हट मध्ये पोचलो. ( लॉग हट मध्ये मुक्काम करण्याचा अनुभव तर मी विसरूच शकत नाही. उंचावर राहायचे सूट आणि खाली युरोपिअन शैलीचे उपाहारगृह आणि त्याखाली मोठ्या खडकावर सुंदर हिरवळ. सगळेच अप्रतिम.) तिथे सामान टाकून आम्ही थेट धाबे-पवनीला निघालो.
पाटील जसे एकेकाळी शिकारी होते, तसे ते झाडीपट्टीतील नाट्यकलावंत होते. त्यांनी त्यादिवशी पायपेटी काढली आणि काही नाट्यपदे म्हणून दाखवली. माझ्या आग्रहाने त्यांनी त्यांच्या प्रॉपर्टीमधून पौराणिक नाटकातील मूल्यवान शालू वगैरे काढून दाखवले. या सगळ्याचे मी व्हिडीओ रेकॉर्डिंग करून ठेवले आहे. नंतर आम्ही जंगलाच्या दिशेने निघालो. मी त्या क्षणी फार रोमांचित झालो होतो की जवळजवळ तीस वर्षांनी नवेगावच्या जंगलात माधवराव पाटील आणि मारुती चितमपल्ली यांच्यासह पुन्हा त्याच वाटेने निघालो होतो. फक्त माझे बाबा सोबत नव्हते. पाटलांनी जंगलातील वणवे आणि वन्य प्राण्यांकडे होणारे वनखात्याचे दुर्लक्ष अशा अनेक तक्रारी केल्या.
या भेटीनंतर महिनाभराने माधवराव पाटील जग सोडून गेले. त्यामुळे चितमपल्ली आणि माधवराव पाटलांची ती अखेरचीच भेट ठरली. नवेगाव अभयारण्याचा संरक्षक पहाडच कोसळला. चितमपल्ली यांनी नंतर आपल्या एका पुस्तकात या अखेरच्या भेटीचा उल्लेख केला आहे. लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीत माधवराव पाटील आणि चितमपल्ली यांच्या अखेरच्या भेटीवर मग मी एक लेखही लिहिला होता.
□
पुढे एक दिवस एक फारच दुख:द बातमी मला वर्तमानपत्रातच वाचायला मिळाली. छायाचे निधन झाले होते. माझा पुढच्या काळात काहीही संपर्क राहिला नव्हता. कारण घरी गेल्यावरही तिची भेट दुर्मिळ झाली होती. चितमपल्ली सुद्धा त्यानंतर नागपूर बाहेर असत, असे त्यांच्याविषयीच्या बातम्यावरून कळत असे. राजू महाजनचा सुद्धा चार-पाच वर्षातून एकदा असा फोनवर संवाद व्हायचा. तेंव्हा तो या सगळ्या आठवणी काढत असे. अलीकडच्या काही वर्षात चितमपल्ली वर्धा येथील महात्मा गांधी केंद्रीय हिंदी विद्यापीठात राहायला गेले असे ऐकले होते. पण खूप वर्षे झाली त्यांची भेट नाही, आणि काही बोलणेही नाही.
□
जळगावचे मित्र श्री. ज्ञानेश्वर शेंडे यांनी फेसबुकवरील त्यांच्या #ParivartanChallenge करिता काही आठवणी लिहा असा खूप खूप आग्रह केला म्हणून मी लिहायला घेतलं आणि बाबांचा पक्षीनिरीक्षणाचा छंद, त्यातून चितमपल्ली यांची भेट, छायाशी पत्रमैत्री असे सगळे लिहिता लिहिता या आठवणी त्यांच्यावरच केंद्रित झाल्या आहेत. श्री. शेंडे यांचे आभार
सोबतच्या फोटोविषयी : नवेगावबांधला दुसऱ्या दिवशी सकाळी मी आणि चितमपल्ली जंगलात भटकलो. तेंव्हा मला एका वृक्षाचे छान दृश्य दिसले. मी लगेच फोटो काढले. त्यावर चितमपल्ली म्हणाले, “मला या फोटोत केस मोकळे सोडलेली आणि पाय पसरून बसलेली स्त्री दिसते. पुढे हा फोटो मी माझ्या #आदिवासीसाहित्यस्वरूपआणिसमस्या’ (प्रतिमा प्रकाशन, पुणे २००७ ) या पुस्तकाच्या मुखपृष्ठाकरिता वापरला. त्यावरील अक्षरलेखन प्रसिद्ध कलावंत Vivek Ranade विवेक रानडे यांनी केलं होतं.
□
(लेखक नामवंत समीक्षक आहेत)
77090 12078