दांडेली अभयारण्य : एक अद्भुत अनुभव

-राकेश साळुंखे

  दांडेली व्याघ्र अभयारण्याचे आताचे नाव ‘काली व्याघ्र अभयारण्य असे आहे. दांडेली हे  कर्नाटकातील कारवार अर्थात उत्तर कन्नड जिल्ह्यात आहे. हुबळी पासून ७४ तर  बेळगावपासून १०९ किमी आहे .लोंढा हे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे. दांडेलीला  पहिल्यांदा आकस्मिकच गेलो. मात्र तो अनुभव कायम  स्मरणात राहील असा आहे.  वडिलांना म्हणजे आ. ह. साळुंखे सरांना जरा बरे वाटत नव्हते. त्यामुळे मी  त्यांना विनंती केली की आपण २-४ दिवस जरा हवापालट करून येऊ. त्यामुळे बरे वाटेल.  ते कबूल झाले. त्यांचा होकार येताच लगेच सकाळी सकाळी मी व अमृत त्यांना घेऊन दांडेलीकडे निघालो. दांडेलीबाबत थोडं ऐकून होतो. थोडं वाचलेलंही होतं.

राष्ट्रीय महामार्ग चार वरून आमचा प्रवास सुरु झाला . वाटेत कित्तुर  येथे राणी चन्नम्मा यांचा पुतळा पाहिला.  पुलाखालून पलीकडच्या बाजूला आलो. हलियाल या गावावरून जाणारा रस्ता  पकडला. जसजसे अंतर कापू लागलो तसे उंच सागवानाचे जंगल लागले.  रस्त्याने तुरळक वाहतूक होती.  रस्ता  रुंद आणि चांगल्या दर्जाचा असल्याने ड्राइव्हिंगचा आनंद उपभोगत बाहेरच्या निसर्गसौंदर्याचाही आनंद घेता येत होता. होते.  प्रवास सुरु असतांनाच अचानक  Westcoast या कागद कंपनीचा कारखाना वाटेत दिसला. माझा पुस्तक प्रकाशनाचा  व्यवसाय असल्याने या कंपनीचा कागद चांगल्या दर्जाचा असल्याचे मला माहीत आहे . मात्र कारखान्याला नन्तर भेट देऊ, असे ठरवून तो मोह आवरला.

काही वेळातच आम्ही दांडेली गावात आलो. आमचा मुक्काम दांडेलीतील वन विभागाच्या  कुलगी  येथील Cottages(टेंट्स)  मध्ये होता. रस्ता विचारून तिकडे निघालो.  मोबाईलची रेंज गेली होती. जंगलातला प्रवास उत्साह वाढवत  होता पण  मनात थोडी धाकधूकही निर्माण झाली होती.  ढग दाटून आलेले होते. मोबाईलला चालत नव्हता . रस्ता निर्मनुष्य.  जंगल एकाच वेळी थ्रिल व भीती निर्माण करू लागले. शेवटी एकदाचे नेचर कॅम्पच्या जवळ पोहोचलो . गाडी पार्क करून थोडे वर चढून जायचे होते. आभाळ भरून आलेच होते.  पाऊस कधीही येईल अशी शक्यता वाटत होती. त्यामुळे मी  चौकशी करून येतो, असे सांगून  वर  छोट्या टेकडीवर असलेल्या कॅम्प मध्ये गेलो.

कोणीही दिसत नव्हतं. सगळीकडे शुकशुकाट. तेवढ्यात बोलण्याचा आवाज आला. त्यादिशेने पुढे गेलो तर दोघे जण  तेथील कर्मचारी होते. त्यांच्याशी बोलतोय तेवढयात अचानक जोरदार पावसास सुरुवात झाली.मला परत गाडीकडे जाता येईना. बराच वेळ झाला तरी मी का आलो नाही म्हणून अमृत मला पाहायला आला आणि पावसाने  आणखीच मोठा जोर धरला. आता पंचायत झाली. तात्या खाली जंगलात  रस्त्याकडेला  एकटेच होते.  आमची घालमेल विरु नावाच्या एका कर्मचाऱ्याच्या मुलाच्या लक्षात आली. त्याने आतून मोठी छत्री आणली. आम्ही दोघे आणायला  गेलो.  तात्यांना घेऊन  गाडी लॉक करून आम्ही अर्धे भिजत आलो. पाऊस थांबल्यावर टेंट कम  कॉटेज आम्हाला उघडून देण्यात आले . दरम्यान विरू हा  मूळचा मराठी भाषिक कारवारी असल्याने त्याच्याशी गप्पा सुरु झाल्या . तेव्हापासून त्याच्याशी दोस्ती झाली ती आजतागायत.

     या सगळया गडबडीत  जंगल सफारीची वेळ टळून गेलेली. व बाहेरही तसा चिखल झाला होता. दुसऱ्या दिवशी पहाटे जंगल सफारीला जायचे ठरले . मात्र परत पावसाची  लक्षणे वाटल्याने आम्ही उडुपी, मेंगलोरमार्गे कूर्ग ला गेलो. पावसामुळे त्या दौऱ्यात हा भाग फारसा पाहता आला नाही मात्र पुढच्या अनेक भेटीत  तिथला इतिहास व निसर्ग समजून घेता आला .

            कित्तुरच्या राणी चन्नम्मा यांचा हा भाग.  दक्षिण दिग्विजयाच्या वेळी शिवाजी महाराजांचाही या भागात वावर राहिला आहे . त्यांनी हुलयाल, सुपा ही ठाणी आपल्या ताब्यात घेतली होती. हुलयाल भागातून त्यांना ५०,००० होनाचे उत्पन्न होते. रामनगर येथील  राज्य त्यांनी खालसा केले.   गोव्याच्या दक्षिणेकडील बंदरातून  कारवार अंकोला वरून विजापूरला जो व्यापार चालायचा त्यात बंकापूर हे महत्वाचे ठिकाण होते, ते ही महाराजांनी तेव्हा ताब्यात घेतले होते . महाराजांच्या या पराक्रमाचे आताही कौतुक वाटते.

या भागात अतिशय घनदाट जंगल आहे. एका दंतकथेनुसार दंडकारण्य म्हणजेच दांडेली. दंडुवल्ली म्हणजे बांबूचे बन यावरून हा शब्द आला. दांडेली(काली) व नजीकच अंशी ही व्याघ्र अभयारण्ये आहेत. त्याबरोबरच येथे  सिंथेरी रॉक व गणेशगुडी ही पर्यटन स्थळेही आहेत. दाट जंगल असल्याने पशुंबरोबरच पक्ष्यांचीही  येथे खूप विविधता आहे. हॉर्नबिलसाठी हा भाग प्रसिद्ध आहे. या परिसरातील  काली नदीतील रिव्हर राफ्टिंगचा अनुभव थरारक असतो.

 पर्यटक दांडेलीत जंगल सफारी करून सिंथेरी रॉककडे जातात. तेथे ३०० फूट उंचीचा अखंड दगड आहे. जो  भारतीय उपखंडात दुसऱ्या नंबरचा मानला जातो. हा दगड काली अभयारण्यातील कणेरी नदीच्या कडेला आहे. आपल्याला खाली जाण्यासाठी एकाच बाजूने दोन रस्ते आहेत.  एक पायऱ्यांचा व दुसरा पायवाटेचा.  वर येताना पायवाटेने यावे व खाली जाताना पायऱ्यांनी जावे. पायऱ्यांच्या   कडेने कट्ट्यावर जागोजागी वेगवेगळे दगड ठेवलेले असून त्यांच्या खाली त्यांचा प्रकार लिहिलेला आहे.  जंगलात खाली उतरताना पाण्याचा आवाज यायला सुरुवात होते. पुढे तो उंच पांढरट कडा दिसू लागतो. महाभारत  युद्धातील पराभवानंतर  दुर्योधन पाण्याखाली लपला होता, ते हेच ठिकाण असल्याचे सांगितले जाते .कणेरी नदीच्या पाण्याचा स्त्रोत दगडाखालील गुहेत आहे. पाण्यात कुणीही उतरत नाही. तसे करणे अतिशय धोकादायक असल्याचे पाहताक्षणी लक्षात येते.  परत येताना खडा चढ असल्याने पायवाटेने येताना सुद्धा  कस लागतो.

      तेथून पुढे  सुपा डॅम बघण्याची परवानगी काढली असली तर डॅम बघायला  मिळतो.  परवानगी नसल्यास सुंदर लॅंडस्केपचे फोटो काढून पुढे गणेशगुडीला जावे. तेथे काली नदीत कयाकिंग, वॉटरराफ्टिंग आदी अनेक वॉटरस्पोर्ट्स एन्जॉय करता येतात. तुम्हाला जर पूर्ण वॉटर राफ्टिंग करायचे असेल तर तुम्ही आधीच जेवण करून किंवा सकाळी लवकर जावे.  तेथेच एका हॉटेलमध्ये  झाडाच्या फांद्यांवर ट्री हाऊसही आहे. गणेशगुढीवरून परत आल्यावर जर कुणाला संध्याकाळची ४ वाजताची जंगल सफारी करायची असेल तर ते करू शकतात.  जंगल सफारी करता वनविभागाच्या मर्यादित संख्येत ओपन जीप असून एक बसही आहे. ही सफारी २ तासांची असून सकाळी ६ व संध्याकाळी ४ ला सफरीस सुरुवात होते.  येथे हरणे, कोल्हे,वेगवेगळे पक्षी व आपल्या महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू इत्यादी हमखास दिसतात. मात्र वाघ किंवा बिबट्याच्या दर्शनाची अपेक्षा बाळगली तर पदरी निराशाच येते. त्यामुळे ती अपेक्षा न ठेवता जंगल सफारी करावी.

            कॅम्पमध्ये  रात्री काली नदीवर डॉक्यूमेंटरी दाखवतात. घनदाट जंगलात उगम पावून १८४ किमीचा प्रवास करणाऱ्या  या नदीचे समुद्राजवळचे पात्र एकदम विस्तीर्ण असून तेथे तिच्या मुखात असंख्य बेटे आहेत. नदीचा संपूर्ण प्रदेश जैव विविधतेने नटलेला आहे.  नदी पात्रातील  पाणी स्वच्छ असले तरी ते काळेच दिसते त्यावरूनच तिला ‘काली’ हे नाव पडले. नदीवर दोन मुख्य डॅम आहेत. एक’ सूपा ‘आणि दुसरा ‘कद्रा ‘डॅम. काली व अंशी अशा दोन व्याघ्र अभयारण्यातून ही नदी वाहते . ती पुढे पश्चिमेला कारवारजवळ  अरबी समुद्राला जाऊन मिळते.

            आम्हाला एकदा येथे झालेल्या बिबट्याच्या दर्शनाची स्टोरी सांगतो. जंगल सफारीत वाघ न दिसल्याने थोडे  नाराजच असलेले माझे पुतणे व मित्र असेच बसलो होतो. तेवढ्यात एक वाटाड्या म्हणाला, तुम्ही रात्री ट्रेकला आलात तर सध्या बिबट्याचा वावर असलेल्या भागात नेतो.  तुम्हाला बिबट्याचे दर्शन मिळेल. पण रात्रीचे अशी रिस्क घेऊन जायला मी व मित्र प्रमोद तांबे सरांनी नाखुशी दाखवली. मात्र गाडी घेऊन जाऊ. दिसला तर दिसला, असे ठरले. जेवण झाल्यावर आम्ही सर्वजण गाडीतून निघालो. अचानक आम्हाला बिबट्या क्रॉस झाला.  त्याने रुबाबात आमच्याकडे नजर टाकली व निघून गेला. तेथे गाडीत आमचा नुसता जल्लोष झाला. थोडं पुढे जाऊन परत आलो आणि काय आश्चर्य!  नेमक्या त्याच जागी उलट बाजूने  बिबट्या वेगाने  क्रॉस झाला. दोन्ही वेळेला फोटो काढायची संधी मात्र त्याने दिली नाही.  मात्र बिंबट दर्शनाने  सगळ्यांना सहल सार्थकी लागल्याचा फील आला.

अंशी व्याघ्र प्रकल्पही बघण्याजोगा  आहे. एकदम शांत. येथे वीज नाही आणि मोबाईलही चालत नाही .सौरदिव्यावर रात्र काढावी लागते. काही जण खास मनःशांतीसाठी येथे येऊन काही दिवस राहतात. इथून खाली पश्चिमेला  जवळच कोस्टल कर्नाटक आहे.  कारवार व मुरुडेश्वर जाऊन परत येता  येते  किंवा वर गोव्याकडे निघता येते. येथेच  वनविभागाचा आणखी  एक कॅसलरॉक नावाचा कॅम्प आहे. येथून दूधसागर वॉटरफॉलचा ट्रेक करता येतो. दांडेलीला  अनेक रिसॉर्ट्स व होम स्टे आहेत.

(लेखक लोकायत प्रकाशनचे संचालक आहेत)

84849 77899

(लेखक लोकायत प्रकाशनचे संचालक आहेत)

84849 77899

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Previous articleमाझा रशियाचा प्रवास : मुंबई ते मॉस्को
Next articleगोष्ट मनोविकासच्या जन्माची आणि अरविंद पाटकरांच्या प्रकाशक होण्याची!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here