माझा रशियाचा प्रवास : मुंबई ते मॉस्को

(साभार: साप्ताहिक साधना)

– अण्णा भाऊ साठे

मी ‘सोव्हिएत स्काय’ या आलिशान हॉटेलात पोचलो. तेव्हा तिथं मला कॉ.बारनिकोव भेटले. त्यांनी एकदम पुढं येऊन माझा हात धरला नि शुद्ध हिंदी भाषेत बोलायला आरंभ केला, ‘‘-मी बारनिकोव. मी लेनिनग्राडचा आहे. तुम्ही येणार म्हणून मला मुद्दाम तुमच्यासाठी बोलावलं आहे. आता एक महिना मी आपल्याबरोबर असणार- म्हणजे आपल्या दुभाष्याचे काम करणार!’’ कॉ. बारनिकोवचे ते शुद्ध हिंदी, मोकळा नि गोड स्वभाव पाहून मला आनंद झाला. नंतर मी आपल्या खोलीत गेलो आणि पुन्हा कॉ. बारनिकोव यांनी येऊन विचारले, ‘‘उद्या काय काय पाहणार आहात?’’‘‘प्रथम रशियातली माणसं!’’ मी उत्तर दिले आणि कॉ.बारनिकोव गालात हसले.
……………………………………………..

आपण वाटेल ते करून एक वेळ सोव्हिएत संघराज्य पाहावं, असं मला फार-फार वाटत होतं. ती आशा माझ्या मनात दिवसेंदिवस सारखी प्रबळ होत होती. रशियातील ते कामगार-राज्य कसे असेल, तिथं कॉम्रेड लेनिननं केलेली क्रांती व मार्क्सचे महान तत्त्वज्ञान कसे साकार झाले असेल… ती नवी दुनिया, नवी संस्कृती, नवी सभ्यता कशी फुलत असेल- या विचारानं माझं मन भारावलं होतं. मी वेडाच झालो होतो.

मी सन १९३४ च्या दरम्यान अनेक जप्त पुस्तके वाचली होती. रशियन क्रांतीचा इतिहास, कॉम्रेड लेनिनचे चरित्र या पुस्तकांनी माझ्या मनावर खूप परिणाम केला होता आणि म्हणूनच मी रशिया पाहण्यासाठी उत्सुक होतो. कसंही करून एकदा रशियाकडं सरकावं, असा माझा विचार झाला होता. मी खटपट करीत होतो. मी दोन वेळा पासपोर्ट मिळावा म्हणून अर्ज करून पाहिला. पण त्या वेळचे मुंबई राज्याचे मुख्यमंत्री भलतेच कडक होते! त्यांनी मला विश्वासात घेऊन सुनावले, ‘‘बाबा, तू आमचा वैरी आहेस. खरोखरी सांगतो की, आम्ही चांगली माणसं म्हणून तू बाहेर आहेस, नाही तर या वेळी तुझी जागा तुरुंगात…’’ तो काळ 1948 चा होता. त्या वेळी माझे मित्र सिनेनट श्री.बलराज सहानी यांनी माझी पॅरिसपर्यंतची तिकिटेही काढली होती; कारण पॅरिस येथे भरणाऱ्या जागतिक शांतता परिषदेचे मला निमंत्रण आले होते, पण जमले नाही.

पुढे १९६१ मध्ये माझ्या ‘फकिरा’ या कादंबरीला राज्य सरकारचे पहिले पारितोषिक मिळाले आणि याच वेळी इंडो-सोव्हिएत कल्चर सोसायटीनं मी रशियास जावं, असं ठरवलं. त्या संस्थेचे मला पत्र मिळताच मी पुन्हा प्रयत्न करू लागलो; पण जवळ एक पैसाही नव्हता.

जेव्हा मी रशियाला जात आहे, ही गोष्ट महाराष्ट्राला समजली, तेव्हा एक चमत्कार घडला. माझ्यावर पैशांचा पाऊस पडला. एकाच दमात माझा अर्धा खर्च निवारला! त्यामुळे पुढं अनेक भानगडीतनं जाऊन मला रशियाला जाण्याचा पासपोर्ट मिळाला. माझी तयारी झाली. मला गगन ठेंगणं वाटू लागलं. न पाहिलेला रशिया माझ्या डोळ्यांपुढं तरळू लागला.

शाहीर द.ना. गव्हाणकर यांनी मला कित्येक तास बसून रशियात कुठं काय आहे, कसं वागायचं, कसं बोलायचं, याचे धडे दिले. कारण मुंबई ते सातारा हा प्रवासही मी कधी एकटा करीत नाही- तो मी मॉस्कोला जाणार! हा प्रसंग माझ्या दृष्टीनं मोठा कठीण होता. देश, आप्त, घर सोडून मी एकट्यानं इतकं दूर जायचं म्हणजे माझ्याबाबतीत फारच अवघड होतं.

दुसऱ्या महायुद्धात सोव्हिएत जनतेने पराक्रमाची शर्थ केली होती. त्यामुळे मी उत्स्फूर्त होऊन स्टालिनग्राडच्या लढाईवर एक पोवाडा लिहिला होता. माझी प्रतिभा लाल सैन्याबरोबर बर्लिनपर्यंत गेली होती आणि आता मी स्वतः मॉस्कोपर्यंत जाणार होतो.

इंडो-सोव्हिएत कल्चरल सोसायटीच्या शिष्टमंडळात माझा समावेश झाला होता, पण मुंबईहून दिल्लीपर्यंत एकटा जाऊन मग मला इतर सभासद भेटणार होते. त्यांपैकी एकालाही मी ओळखत नव्हतो.

घरापासून विमानतळापर्यंत माझ्या अनेक मित्रांनी-आप्तांनी मला फुलांत बुजवलं. आशीर्वाद दिले. विमानतळावर अनेक दोस्त आले होते. त्यांना आनंद झाला होता. मी मात्र मनात खचलो होतो. मॉस्कोचा प्रवास नि तोही विमानानं- या कल्पनेनं मला धडकी भरली होती. माझे मित्र मला एक-एक सूचना करीत होते. एक म्हणाला, ‘‘तुम्ही रशियात झोपड्या किती आहेत, तेवढ्या पाहून या बरं का!’’

एकानं सांगितलं, ‘‘पुलाखाली किती लोक राहतात, याची काळजीपूर्वक तपासणी करा.’’

एक जण गंभीर चेहरा करून म्हणाला, ‘‘पोलादी पडद्याची जाडी किती आहे, याची नोंद करून लवकर या!’’

एकानं ‘देव निर्वासित झाले आहेत, ते कुठं राहतात, त्यांची परिस्थिती काय आहे, हे न चुकता तुम्हीच’ अशीच सूचना केली. आणखीही कित्येक सूचना आल्या. वर्णभेद, व्यक्तिस्वातंत्र्य, बेकारी- म्हणजे सर्व रशियाचे संशोधन करून मी यावे, असेच त्यांचे मत होते आणि मी ऐकत होतो. माझ्यापुढं ते विमान शांत उभं होतं, पण माझा आत्मा उडाला होता. काळीज धडधडत होतं. त्यामुळे मी बोलत नव्हतो. फक्त ‘हुं’ म्हणून मुंडी डोलवून वेळ काढीत होतो.

सूचना, उपदेश, फुले, हार, आशीर्वाद हे सर्व घेऊन मी दि. 12 रोजी रात्री अकरा वाजता दिल्लीकडे विमानातून भरारी मारली. त्या वेळी महाराष्ट्राची भूमी अंधारात गडप झाली होती. ती दिसावी म्हणून मी धडपडत होतो. मी विमानाकडे जातेवेळी हात उंचावून उभी असलेली माझी आप्तमंडळी, शंकरभाऊ, शांता, शकू, शाहीर द. ना. गव्हाणकर, गणपत सातपुते, श्री.वैराळे, श्रीमती जयवंताबाई या सर्वांच्या मूर्ती माझ्या डोळ्यांपुढून हलता हलत नव्हत्या. गणगोत, देश, घर सोडून दूरदेशी जाताना किती दुःख होतं, याचा मला त्या वेळी अनुभव आला.

सकाळी पाच वाजता पालम विमानतळावर माझ्या विमानानं पाय टेकले नि माझा जीव भांड्यात पडला.
अगदी सूर्योदयापूर्वीच मी खासदार एस.ए. डांगे यांच्या बंगल्यावर दाखल झालो. तेव्हा ‘डी.’ झोपले होते. सौ.उषाताई डांगे यांना मी आल्याचं समजताच त्या हसत पुढं झाल्या. ‘‘आमचा अण्णा मॉस्कोला निघाला!’’ असं म्हणून त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला. तेव्हा मला माझ्या आईची आठवण झाली.

उषाताईनं घाई केली. पैसे घेऊन त्या माझी तयारी करायला तयार झाल्या, पण मी मुंबईहून निघताना सर्व तयारी केली होती.
ताईनं विचारलं- ‘‘अण्णा, कपडे?’’
‘‘घेतले आहेत-’’ मी उतरलो.
‘‘बूट…?’’ ताईनं दुसरा प्रश्न केला.

‘‘आहेत.’’ मी उत्तर दिले. हे ऐकून ताई निर्धास्त होऊन हसल्या आणि माझ्यासाठी काय काय खरेदी करावे, याचा विचार करू लागल्या. दुपारीच ताश्कंदपर्यंतचं जाण्या-येण्याचं तिकीट आणि व्हिसा माझ्या हाती पडल्यानं मी विवंचनामुक्त झालो.

दुसऱ्याच दिवशी पुढं जायची तयारी करू लागलो. कपडे करून आवराआवर केली. तोच कॉम्रेड डांगे शांतपणे माझ्याकडे आले. माझा तो साहेबी पोशाख पाहून गालात हसले. मग त्यांनी माझा गळबंध सरळ बांधला. अंगातील कोटावरून स्वतः ब्रश फिरविला आणि पाठीवर थाप मारली! ज्या हातांनी कामगारांच्या अनेक पिढ्या घडवल्या नि लढवल्या, ते हात पाठीवरून फिरताच माझं काळीज डोंगराएवढं झालं! मुंबईत आचार्य अत्रे आणि दिल्लीत कॉम्रेड डांगे यांचे आशीर्वाद घेऊन ‘चितोडकी रानी’ या भारतीय विमानातून मी आकाशात झेप घेतली. त्या वेळी मातृभूमी सोडण्याचे दुःख आणि सोव्हिएत देश पाहण्याचे सुख यांचा विलक्षण संगम माझ्या अंतःकरणांत निर्माण झाला होता. मी पुनःपुन्हा आपली धरती पाहत होतो आणि तिचे दर्शन घेत होतो. मी लवकरच परत येणार आहे, हे मी विसरलो होतो….

विमान सारखं उंच चढत होतं. ‘चितोडकी रानी’ हे अत्यंत सुंदर नि सुसज्ज विमान पाहून मी चकित झालो होतो. ते विमान हिमालयाला बगल देऊन भरारी मारीत होते. खाली डोंगर टेकडीसारखे दिसत होते. नद्यांना ओघळीचं स्वरूप आलं होतं. एखाद्या शहरातील इमारती काड्याच्या पेट्यांएवढ्या दिसत होत्या.
दिल्लीच्या पालम विमानतळावर शेवटचा प्रवासी म्हणून मी ‘चितोडकी रानी’ या विमानात चढलो, तेव्हा माझे सहप्रवासी मला पाहून गालात हसले. ‘हा एक महामूर्ख आहे, बरं का!’ असा त्यांचा चेहरा बोलला. मी आपला गुमान विमानात बसलो. कुणी माझी दाद घेतली नाही. रंग काळा, पोशाख साधा, गळ्यात टाय नीट नाही- मग मला शहाणा कोण म्हणणार?

परंतु त्याच विमानात सिलोनचे युवक प्रतिनिधी होते. त्यांत एक सिलोनी कम्युनिस्ट पार्टीच्या मुखपत्राचे संपादक आणि सिलोनी लोकसभेचे एक सभासद होते. त्यांना माझा पत्ता लागला. त्याच महिन्यात ‘मनोहर’मध्ये माझा परिचय आला होता. तो सौ.मीनाक्षीबार्इंनी लिहिला होता आणि ‘खापऱ्या चोर’ या माझ्या तमाशातील माझे चित्र छापले होते. विमानात तो अंक कोणी तरी दाखवला आणि हा ‘खापऱ्या चोर या विमानात आहे, ओळखा’ अशी चर्चा सुरू झाली. शेवटी काहींनी मला हेरलं नि मग मी आपल्या सिलोनी मित्रांत दंग झालो. ताश्कंदपर्यंत आमच्या शिष्टमंडळानं माझी दाद घेतली नाही.

परंतु ताश्कंदला पोहोचताच त्यांचे डोळे उघडले आणि मीही एक चांगला माणूस आहे, अशी त्यांची खात्री झाली. मद्रासचे जॉन माझ्या गळ्यात पडले. म्हणाले, ‘‘साठेजी, आमचे सारेच चुकले, माफ करा… आम्ही तुम्हाला वेगळे ठरवले होते, परंतु आता आमची खात्री झाली की तुम्ही फार चांगले आहात.’’

बरोबर पाच वाजता ‘चितोडकी रानी’ हे विमान उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद येथे उतरले. तेव्हा अनेक उझबेकी मित्रांनी फुले देऊन आमचे स्वागत केले. एक उझबेकी मित्र पुढं येऊन म्हणाला, ‘‘आता तुम्ही थोडा आराम करा. न्याहारी करा. कारण तुमच्यासाठी सोव्हिएतचे जेट विमान तयार आहे.’’
‘‘परंतु ‘चितोडकी रानी’मध्ये असलेल्या आमच्या सामानाचं काय?’’
मी विचारलं. तो सद्‌गृहस्थ हसून म्हणाला, ‘‘ते सर्व ठीक होईल. तुम्ही काही काळजी करू नका.’’
ताश्कंद येथे आम्ही प्रथम आपली घड्याळं अडीच तास मागं घेतली आणि बरोबर सात वाजता सोव्हिएत विमानात चढलो. ‘ए’ क्लासमध्ये आमची सोय केली होती.

माझे विमान चाळीस हजार फूट उंचीवरून ताशी आठशेपन्नास किलोमीटर्स वेगाने धावत होते. त्या विमानातील आतील व्यवस्था साधीच वाटत होती. प्रत्येक ठिकाणी वेलवेटचे लाल नि जांभळे पडदे लटकत होते. त्या पडद्यांमुळे आमची मोठी पंचाईत झाली होती. प्रत्येक पडद्यामागे काही तरी असे. निरनिराळ्या जागी निरनिराळे पडदे लोंबत होते. कुठं शौचकूप होते, तर कुठे स्वयंपाकगृह होते. कुठं नोकरांचे विश्रांतिस्थान होते नि त्या प्रत्येकाच्या दारापुढे ते पडदे लटकत होते. प्रत्येक दारापुढे रशियन भाषेत त्या स्थानाचे नाव लिहिले होते आणि ते आम्हाला समजत नव्हते. त्यामुळे आमची परिस्थिती कठीण झाली होती.

आमच्या शिष्टमंडळात बंगालचे चतर्जी या नावाचे एक वृद्ध वकील होते. ते विमानात चढले की झोपत आणि जागे झाले की, प्रथम शौचकूपाची चौकशी करीत. एक तास विमानाचे भ्रमण झाले आणि श्री.चतर्जी एकाएकी जागे झाले. त्यांनी प्रथम सर्वत्र नजर टाकली. निरनिराळ्या पाट्या वाचून पाहण्याची खटपट करून पाहिली, पण शौचकूप कुठे आहे, याचा पत्ता लागेना. मग त्यांनी अनेक पडदे वर करून पाहणी केली, पण काहीच पत्ता लागला नाही. अखेर त्यांना हवाई सुंदरीची मदत घेणे भाग पडले.

विमानाची ती भयंकर दौड पाहून माझा मीच स्तंभित झालो होतो. अनेक विचारांनी माझं डोकं सुन्न झालं होतं. अंतराळातून माझे विमान उडत होते. ते ढगांच्या राशीतून मार्ग काढीत होते. खाली निरनिराळी शहरे दिसत होती. म्हणजे अनंत दिव्यांच्या पुंजक्यांवर खाली एखादे शहर असावे, असं मी समजत होतो. माझं मन स्वदेशात घुटमळत होतं. विमानाने मुंबई ते मॉस्को या दरम्यान मी भरारी मारीत होतो. माझ्या चक्षूंपुढं मुंबई दिसत होती. माझ्या आईच्या प्रतिमेपुढं शांता नि शकुंतला यांनी एक निरांजन लावले होते, ते मी परत येईपर्यंत जळणार होते, त्याचा मी विचार करीत होतो. ते निरांजन जळत असेल, तेवत असेल…

‘आला, आला’ म्हणत मॉस्को विमानतळ आला. आम्हाला सिगारेट ओढू नका, कमरेला पट्टे लावा, मॉस्को आले, अशा सूचना मिळाल्या. मी खिडकीतून खाली पाहिले. ते मॉस्कोचं पहिलं दर्शन घडताच मन विचारमुक्त झाले. ती मॉस्को नगरी मी प्रथम आकाशातून पाहिली आणि तिची कीर्ती आठवली.

विमानानं एक जंगी झेप घेऊन धरणीवर पाय टेकले. मी सावध झालो. निःश्वास टाकून ऊर रिकामं केलं. विमानाच्या दारात तशा रात्री अनेक मित्र फुले घेऊन आले होते. बाहेर थंडी मी म्हणत होती. थंड वारे सर्वत्र धावत होते. अंगाला चावत होते. माणसांच्या नाका-तोंडांतून वाफेचे लोट निघत होते.

मी पार गांगरलो होतो. मला भानच उरले नव्हते. माझा चेहरा पडला होता. मी कुठं तरी पाहत होतो. त्या गडबडीत आपला ओव्हरकोट अंगात घालायचा मला विसर पडला होता. सर्वांच्या शेवटी मी पाय ओढीत चालत होतो. मी आपला ओव्हरकोट काखेत दाबून धरला होता आणि चोरासारखा सर्वत्र पाहत होतो. समाजसत्तावादी माणसं न्याहाळीत होतो. भयंकर थंडी वाजत होती, त्याची मला जाणीव नव्हती. थोडक्यात, मी भांबावूनच गेलो होतो.

‘‘तुम्हाला थंडी वाजत नाही?’’ कझकीना नावाची एक महिला जवळ येऊन म्हणाली. त्यामुळे मी अधिकच गोंधळून गेलो नि उत्तरलो- ‘‘छे, कुठे आहे थंडी-?’’ पण त्या वेळी माझ्या नाकातोंडातून वाफेचे लोट बाहेर पडत होते. ते पाहून मी स्वतःच पुन्हा घोटाळ्यात पडलो नि कझकीना मोठ्यानं हसल्या. ओव्हरकोट अंगात घालायचं विसरून हा माणूस थंडीनं कुडकुडत आहे, हे लक्षात येऊन त्या हसत होत्या. त्यांनी मला थांबावलं. उभं करून मग माझा कोट घेऊन त्यांनीच तो माझ्या अंगात घातला. मग मला बरं वाटलं. मी भानावर येऊन चालू लागलो. कझकीनाबाई अगदी नम्रपणे म्हणल्या- ‘‘ही आमची मॉस्को नगरी. ती तुम्ही उद्या पाहालच…’’

‘‘हं.’’ करून मी चौफेर नजर टाकली आणि पुन्हा कझकीना म्हणाल्या, ‘‘हे मॉस्को आमचं हृदय आहे.’’ ते उद्‌गार ऐकून मी आश्चर्यानं चमकलो. ‘‘खरं आहे तुमचं म्हणणं.’’ असं म्हणून मी ढेंगा टाकू लागलो. कझकीना म्हणाल्या, ‘‘हे वातावरण तुम्हाला कसं वाटतं?’’ …‘‘अगदी आमच्या दिल्लीसारखं-’’ मी उत्तर दिले. आता माझा पडलेला चेहरा बराच उठला होता.

विमानतळाहून आम्ही मोटारीनं शहराकडे जात होतो. आमच्या मोटारी वेगानं दौड मारीत होत्या. आमचे शिष्टमंडळाचे सभासद दबक्या आवाजात आपसात बोलत होते. त्या चार मोटारी वळणं घेत होत्या. माझ्याबरोबरचे मद्रासचे श्री.जॉन बसले होते. हे जॉन पियानोचे दर्दी म्हणून त्यांची या शिष्टमंडळात निवड झाली होती. ते फारच शांत स्वभावाचे नि प्रेमळ होते. मी मोटारीच्या खिडकीच्या काचा खाली करून बाहेरची दिव्यांची झुंबरं पाहत होतो. थंड वारा मोटारीत शिरून अंगाला चावत होता. त्या चावऱ्या वाऱ्यानं जॉनच्या डोळ्यांतून पाण्याच्या धारा वाहत होत्या. त्या पाहून मी विचारले,

‘‘काय मित्रा, रडू का येतंय?-’’
‘‘मुळीच नाही-’’ जॉन चिडक्या सुरात म्हणाला, ‘‘मी कधीच रडत नाही, पण एक विचारू?’’
‘‘अरेच्या, त्याला परवानगीची काय गरज आहे?’’ मी म्हणालो, ‘‘विचारा ना?’’
‘‘एवढ्या कडाक्याच्या थंडीतही तुम्ही खिडकीची काच खाली केली आहे, याचं कारण काय सांगाल का?’’
‘‘त्याचं असं आहे,’’ मी म्हणालो, ‘‘आपण इकडे आलो आहोत ते सर्व काही पाहण्यासाठी. तेव्हा माझं असं मत आहे की, आपण जे काही पाहायचं ते कसलीही काच न लावता पाहू या. आता रडता का?’’
‘‘मिस्टर साठेजी’’ जॉन म्हणाला, ‘‘तुमचं अर्ध म्हणणं मला मान्य आहे. आपण सर्व काही सरळ पाहावं, पण या थंडीत माझ्या डोळ्यांना त्रास होतोय. मी रडतोय, हा समज चुकीचा आहे.’’

मी त्या राजरस्त्यानं मॉस्कोकडे जात होतो. आनंद झाला होता, पण आता भाषेची अडचण पडून आपला हा रशियाचा प्रवास व्यर्थ होणार, याची मला बोचणी लागली होती. आमच्या या शिष्टमंडळात बंगाल, मध्य प्रदेश, गुजरात, मद्रास अशा निरनिराळ्या प्रांतांतील लोक होते. सर्व जण वेगवेगळ्या व्यवसायातील होते. सर्वांना इंग्रजी येत होते; परंतु मी एकटाच असा होतो की, मला कोणतीही परकी भाषा येत नव्हती. थोडीशी हिंदी आडवी-तिडवी बोलता येत होती, एवढंच.

मी ‘सोव्हिएत स्काय’ या आलिशान हॉटेलात पोचलो. तेव्हा तिथ मला कॉ.बारनिकोव भेटले. त्यांनी एकदम पुढं येऊन माझा हात धरला नि शुद्ध हिंदी भाषेत बोलायला आरंभ केला,

‘‘-मी बारनिकोव. मी लेनिनग्राडचा आहे. तुम्ही येणार म्हणून मला मुद्दाम तुमच्यासाठी बोलावलं आहे. आता एक महिना मी आपल्याबरोबर असणार- म्हणजे आपल्या दुभाष्याचे काम करणार!’’ कॉ. बारनिकोवचे ते शुद्ध हिंदी, मोकळा नि गोड स्वभाव पाहून मला आनंद झाला. नंतर मी आपल्या खोलीत गेलो आणि पुन्हा कॉ. बारनिकोव यांनी येऊन विचारले, ‘‘उद्या काय काय पाहणार आहात?’’

‘‘प्रथम रशियातली माणसं!’’ मी उत्तर दिले आणि कॉ.बारनिकोव गालात हसले.
……………………………………………………………

(१९६१ मध्ये अण्णा भाऊ साठे यांनी रशियाचा दौरा केला होता. त्या चाळीस दिवसांच्या दौऱ्यावरील अनुभव-कथन करणारे ‘माझा रशियाचा प्रवास’ हे छोटे पण मार्मिक पुस्तक महत्त्वाचे आहे. सुरेश एजन्सी पुणे यांनी प्रकाशित केलेल्या, त्या पुस्तकातील हे पहिले प्रकरण आहे.)

Previous articleकथा निलंगेकरांच्या पीएच. डी.ची !
Next articleदांडेली अभयारण्य : एक अद्भुत अनुभव
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.