रामदास महाराज कैकाडी यांच्या जाण्याने पोरके झाले पंढरपूर
…………………………….
-संतोष अरसोड
पंढरपूर येथील कैकाडी महाराज पुण्यधाम मठाचे विश्वस्त आणि महाराष्ट्राच्या प्रबोधनाच्या चळवळीला आपल्या क्रांती ध्वनीने एक नवी गती देणारे प्रबोधनकार रामदास महाराज कैकाडी यांचे दिनांक २५ सप्टेंबरला निधन झाले. अनेक वारकऱ्यांसाठी ही बातमीच धक्कादायक आहे. रामदास महाराजांच्या अशा अनपेक्षित जाण्याने वारकरी चळवळीला प्रचंड हानी झाली असून परिवर्तनवादी चळवळ सुद्धा पोरकी झाली आहे. खरं म्हणजे महाराज म्हटलं की आपल्या नजरेसमोर अध्यात्माच्या पुंग्या वाजविनारे महाराज समोर येतात. रामदास महाराज कैकाडी हे त्याला अपवाद होते. त्यांनी संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम , संत गाडगेबाबा यांचा विचार जसा होता तसा मूळ स्वरुपात सामान्य माणसांपर्यंत पोहोचवला. त्यांचे कीर्तन म्हणजे जणू काही विचारांचा ज्वालामुखी होते. या वैचारिक ज्वालामुखी मध्ये समाजातील दुष्ट रूढी परंपरा जळून खाक होत होती. म्हणूनच अध्यात्माच्या भरवशावर ज्यांचा पोटोबा शाबूत आहे अशा कीर्तनकारांना रामदास महाराज अडचणीचे वाटत होते. पंढरपूरच्या तीर्थ कुंडामध्ये एका बडव्याच्या लघुशंकेच्या प्रकरणात जी कठोर भूमिका रामदास महाराज कैकाडी यांनी घेतली अशा पद्धतीची भूमिका इतर पोटभरू कीर्तनकारांना घेता आली नाही. यामध्येच रामदास महाराज कैकाडी यांच्या वैचारिक बैठकीचे दिशादिग्दर्शन होते. त्यांच्या जाण्याने कैकाडी महाराज पुण्यधाम मठ आणि पंढरपूरचा सामाजिक परिसर पोरका झाला आहे.
ती पांढरीशुभ्र दाढी, तो धिप्पाड देह, तो पहाडी आवाज आता कायमचा निघून गेलेला आहे. त्यांच्या जाण्याने केवळ एक प्रबोधनकार आपण गमावून बसलो नाही तर संतांच्या विचारांचा मॅनेजमेंट गुरु आपण हरवून बसलो आहोत. रामदास महाराज कैकाडी यांच्यावर संत नामदेव, संत ज्ञानेश्वर ,संत तुकाराम, संत चोखोबा, संत गाडगेबाबा , कैकाडी बाबा यांच्या विचारांचा प्रचंड प्रभाव होता. ते कैकाडी बाबांचे पुतणे म्हणून संपूर्ण राज्याला परिचित होते. गाडगे महाराजांचे वैचारिक वारसदार यवतमाळ येथील चिंधे महाराज आणि रामदास महाराज कैकाडी यांनी संत गाडगे महाराजांचा विचार अत्यंत ताकदीने समाजामध्ये पेरण्याचे काम केले . चिंधे महाराजानंतर आता रामदास महाराज यांच्या जाण्याने हा विचार कोण पुढे नेईल, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
पंढरपूर येथील कैकाडी महाराजांच्या मठाचे व्यवस्थापन रामदास महाराज अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सांभाळत असत. या मठाचे सामाजिक क्षेत्रात प्रचंड मोठे योगदान आहे. वास्तुशास्त्राचा उच्च कोटीचा नमुना असलेला हा मठ बघितल्याशिवाय कुठल्याही वारकऱ्यांची पावले माघारी ओळखत नाही. या मठात एकदा प्रवेश केला की माणूस देहभान विसरून जातो. जात, पात, धर्म ,पंथ ,भाषा आणि प्रदेशाची कातडी आपोआप सोलल्या जाते. कारण या मठामध्ये ज्या मूर्त्यांची स्थापना करण्यात आली आहे, त्यातून एक अनोखा संदेश देण्यात आलेला आहे. त्यामुळेच हा मठ प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना आपलाच मठ वाटतो. संत गाडगे महाराजांनी भुकेलेल्यांना अन्न द्या, हे दशसूत्रात सांगितले होते. कैकाडी बाबांच्या मठामध्ये भुकेलेल्यांना अन्नदानाचा उपक्रम नित्यनेमाने सुरू असतो. एकीकडे बडव्यांच्या लुटीत सापडलेला भाविक आणि दुसरीकडे भुकेलेल्याच्या चोचीत चारा घालणारा कैकाडी बाबांचा मठ ही दोन टोकं पंढरपुरात पाहायला मिळतात. आपल्या काकांपासून घेतलेला सामाजिक वारसा रामदास महाराज कैकाडी यांनी अखेरपर्यंत पुढे नेला.
रामदास महाराज कैकाडी हे कीर्तनामधून अत्यंत स्फोटकपणे आपले विचार मांडत असत. मराठा सेवा संघाने उभ्या केलेल्या सामाजिक चळवळीला एक वैचारिक आधार रामदास महाराज कैकाडी यांनी दिला आहे. संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे ते संस्थापक होते. या परिषदेच्या माध्यमातून रामदास महाराज कैकाडी यांनी अत्यंत ताकतीचा विचार बहुजन समाजापर्यंत पोहोचवला. कीर्तनातून अत्यंत वादळी विचार त्यांनी मांडल्यामुळे तरुण पिढी त्यांच्या प्रेमात पडली होती. संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचे वैज्ञानिक दृष्टिकोनातून अत्यंत समर्पक विश्लेषण करण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यामुळेच महाराष्ट्राच्या वैचारिक चळवळीमध्ये रामदास महाराज कैकाडी यांचे योगदान महत्त्वाचे होते. संत तुकाराम महाराजांचा प्रचंड प्रभाव त्यांच्यावर होता. तुकाराम बिजेला गाथा पारायण आयोजित करून त्यांनी हा विचार अत्यंत ताकदीने पुढे नेला. पंढरपूर ते देहू ही जी दिंडी निघायची, त्यामागची कल्पना रामदास महाराज कैकाडी यांचीच होती.
अलीकडच्या काही वर्षात त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजावर एक प्रचंड मोठा प्रोजेक्ट हाती घेतला होता. त्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले. त्यांचे भाऊ प्राध्यापक तुळशीदास जाधव यांनी ज्ञानेश्वरी हिंदी भाषेमध्ये ओवीबद्ध केली होती. त्याची हस्तलिखित रामदास महाराज यांनी सांभाळून ठेवली होती. ही हस्तलिखिते ओवीबद्ध स्वरूपामध्ये भारतभर जावी हे रामदास महाराज कैकाडी यांचे स्वप्न होते. याबाबत संगणकीय काम सुद्धा पूर्ण झाले होते. वारकरी धर्म हिंदी भाषेमध्ये भारतभर जावा ही भावना यामागे होती. मात्र अशातच त्यांच्या जाण्याने हे स्वप्न धूसर झाले आहे. एक ताकतीचा प्रबोधनकार महाराष्ट्र गमावून बसलेला आहे. कोरोनाच्या संकटाने अनेक प्रतिभा काळाच्या उदरात गडप होतांना दिसत आहे. रामदास महाराज कैकाडी सुद्धा याचे बळी ठरलेत. आज त्यांच्या अस्थींचे दर्शन घेतांना पंढरपूर येथील रस्ते आणि कैकाडी बाबांच्या मठाच्या भिंतीना शोक अनावर झाला आहे. त्यांच्या जाण्याने पंढरपूरच्या वाट्यास आलेले विखुरलेपण मन सुन्न करणारे आहे.
(फोटोत चिंधे महाराजांसोबत तरुण वयातील रामदास महाराज)
संतोष भाऊ,महाराजांचं व्यक्तिमत्व अत्यंत ताकदीने शब्दबद्ध केलं.तुमच्यामुळे 2003मध्ये महाराजांचे आशीर्वाद प्राप्त झाले होते.तो प्रसंग आज ह्यानिमित्याने आठवला. आदरणीय शिवदास महाराजांना विनम्र शिवांजली🌹🙏🌹
मी वर्षभर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. त्यांच्याच विश्वपुण्यधाममध्ये मुक्कामी होतो. त्यांचं जाणं फारच धक्कादायक आहे.
संतोष भाऊ,महाराजांचं व्यक्तिमत्व अत्यंत ताकदीने शब्दबद्ध केलं.तुमच्यामुळे 2003मध्ये महाराजांचे आशीर्वाद प्राप्त झाले होते.तो प्रसंग आज ह्यानिमित्याने आठवला. आदरणीय शिवदास महाराजांना विनम्र शिवांजली🌹🙏🌹