कोरोना… साथ कमी होण्याच्या मार्गावर!

– डॉ प्रकाश कोयाडे,  पुणे

   गेल्या सहा महिन्यांत ही पहिलीच वेळ आहे जेंव्हा कोरोना आकडेवारीबाबत थोडी समाधानकारक गोष्ट जाणवत आहे. दरदिवशी वरच्या दिशेने झेप घेत असलेले भारताचे आलेख कुठेतरी झुकताना दिसत आहेत. कोरोना रुग्णांची साखळी तुटताना दिसत आहे, निश्चितच ही आपल्या प्रत्येकासाठी आनंदाची बातमी आहे.

         गेला महिना कोरोनाच्या दृष्टीकोनातून खूप भयंकर गेला. गेल्या सहा महिन्यांपासून ही महामारी भारत देशात थैमान घालत असताना अतिशय वाईट अनुभव या गेल्या महिनाभरात आले. वयस्क लोक तर गेलेच पण अगदी पंचवीस तीस वर्ष वयोगटातील असंख्य लोकांचे मृत्यू झाले. नजरेसमोर कितीतरी कुटुंब उध्वस्त झाले, खूप मनुष्यहानी झाली. रुग्णांच्या नातेवाइकांना रुग्णांना भेटता येत नाही, म्हणून जमेल तसं रुग्णाची माहिती नातेवाईकांना सांगितली जाते. कितीतरी वेळेस असं झालं की, आम्ही सांगतो ‘तुमचा रुग्ण बरा होत आहे, काळजी करू नका’ आणि काही वेळातच सडनली अॉक्सिजन लेवल कमी होऊन किंवा आरेस्ट येऊन पेशंटचे मृत्यू झाले.

        एक सप्टेंबर पासून ते आजपर्यंत, दरदिवशी किमान एक हजार लोकांचा भारतात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अठ्ठावीस दिवसांत तीस हजार आठशे चाळीस रुग्ण मृत पावले आहेत. जवळपास प्रत्येकाच्याच जवळचे, ओळखीचे कोणीतरी मृत्यू पावले. एवढ्या कमी कालावधीत कोरोनामुळे एवढे मृत्यू झालेला भारताव्यतिरीक्त इतर कोणताही देश नाही! सप्टेंबरमध्ये कोरोनामुळे मृत्यूची एक सुनामी लाट येऊन गेली पण भारतीय लोकांच्या ‘जोपर्यंत आपल्या घरातील व्यक्ती मृत पावत नाही तोपर्यंत आपले त्याच्याशी घेणेदेणे नाही’ या मानसिकतेमुळे या लाटेची जाणीव तीव्रतेने झाली नाही. ज्यांचे स्वकीय, नातेवाईक गेले त्यांनाच काय तो फरक पडला.

          सप्टेंबरचा शेवटचा आठवडा ही लाट ओसरताना दाखवत आहे. दरदिवशी एक लाखाच्या आसपास वाढणारे नवीन रुग्ण, अॅक्टिव रुग्णसंखेचा दहा लाखांहून अधिक असलेला भीतीदायक आकडा आणि दरदिवशी हजाराहून अधिक होणारे मृत्यू या तीनही गोष्टी एकाचवेळी कमी होत आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या सहा महिन्यांपासूनचे हे आलेख पाहिल्यावर एक गोष्ट जाणवेल की, आजवर या आकडेवारीमध्ये काही समान पॅटर्न होते. उदाहरणार्थ, साधारणपणे चार ते पाच दिवस नवीन रुग्णसंख्या किंवा मृत्यूसंख्या वाढत रहायची आणि पुढचे चार पाच दिवस कमी होत रहायची. हा एक एपिसोड संपला की पुन्हा उसळी घेऊन आकडेवारी आधीपेक्षाही अधिक वाढायची, दुसरा एपिसोड सुरू व्हायचा… आलेख वाढत रहायचा! गेल्या आठवड्यात हा पॅटर्न पहिल्यांदा बदलला आहे, कोरोनाची साखळी भारतात तुटली आहे हे चित्र स्पष्ट दिसत आहे. उच्चपदस्थ असलेल्या अधिकाऱ्यांनी, नेत्यांनी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे न्यूज चॅनलनी ही गोष्ट सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवणे आवश्यक आहे कारण आज त्याची गरज आहे, जेणेकरून लोकांच्या मनातील संभ्रम दूर होतील.

        आकडेवारीतील, आलेखातील हे बदल खरंतर खूप काही मोठे नाहीत, एका रात्रीतून सर्व काही बदलले असंही काही नाही… येणाऱ्या काळातील कोरोनाबाबतच्या परिस्थितीचे जे समाधानकारक निकाल येणार आहेत त्यासाठी ही जमीन तयार होत असल्याचे चित्र आहे. कुठेतरी हे थांबू शकते यासाठीचा हा आशावाद आहे! कोविड आयसीयुला काम करत असलेला एक डॉक्टर म्हणून माझ्यासाठी तरी ही खूप समाधानकारक बाब आहे!

         बरं आशादायी चित्र आहे म्हणून गाफील राहणं हासुद्धा वेडेपणा ठरेल कारण ही मार्चमध्ये सुरू झालेली लाट आत्ताकुठे ओसरायला सुरूवात झाली आहे… याक्षणी हे विसरून चालणार नाही की, दुसरी लाट येण्याची शक्यता कुठेच नाकारता येत नाही.

 जगभरात कितीतरी देशाचं कोरोनामुळं कंबरडं मोडलं, भयंकर नुकसान झालं, ते आता पुन्हा उभं राहात आहेत. इथे एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे की, जगात कोणत्याही देशात कोरोनाची दुसरी लाट आलेली नाही. एकदा हा आलेख जिथे कमी होऊ लागला तो कमीच होत गेला, त्याला पुन्हा उसळी मिळाली नाही. भारतात सुद्धा हेच व्हावे हीच अपेक्षा… दुसरी लाट येऊ नये यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. मुंबईच्या काही भागात गेल्या पंधरा वीस दिवसांत कमी झालेले रूग्ण पुन्हा वाढू लागले आहेत हे काही चांगले लक्षण नाही. भारत असो, महाराष्ट्र असो किंवा मुंबई किंवा कोणतेही शहर असो..‌.आपल्या देशात कोरोनाची दुसरी लाट कोणत्याही परिस्थितीत परवडणार नाही.

         कोरोनाचा आलेख कमी होतोय याचा अर्थ हा नाही की, एखाद्या आठवड्यात हे चित्र संपूर्णपणे पालटून जाईल. दुसरी लाट न येता ज्या वेगाने आलेख खाली येतोय तो तसाच खाली येत राहिला तर नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत कोरोनाच्या दृष्टीकोनातून जनजीवन सुरळीत होईल. दरदिवशी वाढणारे नवीन रुग्ण कमी होत असले तरी अजूनही आकडेवारी नियंत्रणात नाही. दरदिवशी होणारे मृत्यू कमी होत असले तरी अजूनही आकडा दरदिवशी एक हजाराहून अधिकच आहे हे विसरून चालणार नाही. कोरोनामुळे होणारे मृत्यू नक्कीच कमी कमी होत जातील पण त्याला किमान महिनाभरचा अवधी लागणार आहे. ग्रामीण भागात कोरोना भरपूर पसरला पण शहरी भागापेक्षा इथला मृत्यूदर खूप कमी राहिला ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यामुळेच आकडेवारीला अटकाव बसला असण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवडमध्ये जिथे पंधरा दिवसांपूर्वी दररोज बाराशे, तेराशे नवीन रुग्ण पॉझिटिव्ह येत होते तिथे आज पाचशे, सहाशे नवीन रुग्ण येत आहेत… परिस्थितीत फरक पडत आहे.

        सहा महिन्यांनंतर एका समाधानकारक गोष्टीच्या दृष्टीने पहिले पाऊल पडले आहे, अजून खूप वाटचाल करायची आहे. सध्यातरी ‘लस येईल’ ही एक अंधश्रद्धाच आहे त्यामुळे त्यावर विसंबून राहू नका. स्वत:ची आणि स्वकीयांची काळजी कशी घ्यायची हे प्रत्येकालाच ठाऊक आहे फक्त त्याची अंमलबजावणी होत राहाणं गरजेचं आहे. उंबरठा ओलांडताना ही गोष्ट पक्की लक्षात ठेवणं आवश्यक आहे की, सॅनिटायझर आपले कवच आहे. प्रत्येक स्पर्श अजूनही वैऱ्याचा आहे, एका व्यक्तीचा मृत्यू घर कायमचं उद्धवस्त करुन जातो. ती वेळच येऊ नये म्हणून जागरूक राहणं आवश्यक आहे.

          मी दोन महिन्यांपूर्वी लिहीलेल्या एका लेखात असं मत मांडलं होतं की, दिवाळीपर्यंत परिस्थिती पुर्वपदावर येईल… त्याची सुरुवात नक्कीच झालेली आहे! ‘तुम्हाला आज डिस्चार्ज दिला जाणार आहे’ आणि ‘तुमच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला आहे’ या दोन्ही गोष्टी एकाच निर्विकार भावनेनं सांगणं आता नकोसं झालं आहे, हे थांबणं आवश्यक आहे! गाफील न राहता, अर्ध्या हळकुंडाने पिवळं नक्कीच न होता एकेक पाऊल टाकत पुढे जायचं आहे.

         कोरोनाची साथ कमी होण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने म्हणता येईल…

We Will Win!!

Previous articleकामाठीपुऱ्यातील जोहराबाई आणि सोनागाचीतील ‘अमर प्रेम’!
Next articleआजच्या हिंदुस्थानची घडण
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here