पांढरा स्वच्छ झब्बा पायजामा, त्यावर शक्यतो काळ्या किंवा आकाशी रंगाचे जॅकेट, ठरवून तयार केलेली सोनेरी रंगाची चष्मा फ्रेम आणि अकोला जिल्ह्यातील तेल्हारा गावचा प्रसिद्ध असलेला काळा टोकदार जोडा घालून या माणसांची राजकारणात ‘दादागिरी’ सुरू असे. दादांचा दिवस बरेचदा दुपारी तीनच्या पलीकडे सुरू व्हायचा. तो पहाटे दोन- तीनला संपायचा. गरजेनुसार सकाळी सातलाही त्यांच्या दारात गर्दी असायची आणि दादासाहेब लाकडी खुर्चीवर उशांचे ढीग रचून बसले असायचे. ते ज्यांना ओळखत त्यांना ते एकेरी नावाने हाक मारायचे. नुकतीच ओळख झालेल्यांला आडनावावरून आणि विश्वास टाकलेल्यांशी ते त्यांच्या वडिलांच्या नावाने हाक मारून बोलवायचे. ऋणानुबंधाची अशी विलक्षण हातोटी त्यांनी सांधली होती. त्यांच्या खिशात दहा रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंतच्या नोटा असायच्या. त्यांना भेटायला आलेल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना ते अनेकदा भातकं म्हणून पैसे देत आणि पुस्तक घे, असं आवर्जून सांगत. एसटीचा पास, शाळेची थकलेली फी, गावाकडे जायला पैसे नाहीत ही बोंब घेऊन त्यांना कोणाही भेटो खिशातून ते भातकं देत !! ते अमरावतीत असताना रात्र कितीही झाली तरी जेवणाची पंगत बंगल्यात असे. ‘कमलपुष्प’मधील अन्नछत्र खूप चविष्ट व मायाळू असे. दादासाहेबांच्या या बंगल्यात सगळ्यांचा मुक्त वावर होता. सुरक्षेसाठी असलेले पोलीस येणाऱ्या-जाणाऱ्यांकडे निरखून बघायचे. हटकायचे नाहीत. बंगल्यातील हॉल, खोल्या या जनतेच्या असाव्यात का, असा प्रश्न पडावा इतके ‘विहार स्वातंत्र्य’ दादांच्या घरी असे. भगवान गौतमबुद्धांच्या अनेक मूर्ती या बंगल्यात आहेत. विलक्षण भावणाऱ्या. मोहित करणाऱ्या. जगातील अनेक देशांमधील चेहरेपट्टीचे प्रतिबिंब बंगल्यातील या शांतचित्त गौतमाच्या चेहऱ्यावर झळके. मूर्तीकडे बघावे आणि दादांना विचारावे, दादा ही कुठली मूर्ती आहे..तर निमिषार्धात ती कोणी दिली ते दादा सांगायचे.
दादासाहेब ४५ वर्षे सत्तेच्या आवरणात होते, त्यांच्याभोवती वलय होते. पण ते मखरात कधीच बसले नाहीत. सामान्यांचे नेते होते. देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्याविरुद्ध त्यांनी लोकसभेची निवडणूक लढविली. पराभूत झाले. त्यानंतरची ३५ वर्षे त्यांनी अमरावतीचा खासदार होण्याचे स्वप्न पाहिले. समन्वयाचे राजकारण केले. संतापले जरूर पण विखार नव्हता. १९९८ मध्ये ते खासदार झाले. त्यापूर्वी व नंतर त्यांनी निवडणूक लढविली, पण धार्मिक ध्रुवीकरणाच्या झोकात हा समन्वयवादी राजकारणी टिकू शकला नाही. शिवसेनेने हा मतदारसंघ ताब्यात घेतला; पण निवडणुकीनंतर आपण जणू निवडणूक लढलोच नाही, असे मैत्रीचे बंध दादासाहेबांनी विरोधकांसाठीही जोडले. तीन निवडणुकीत त्यांना शिवसेनेने चितपट केले, पण त्यानंतरही त्यांची दोस्ती सार्यांशीच कायम होती. एका लोकसभा निवडणुकीत प्रचार इतका टोकदार होता, की कौटुंबिक पातळ्याही उसावल्या गेल्या. प्रमोद महाजन यांनी जाहीरसभेत दादांबद्दल टीका केली. ती दादांना बोचली. पण, दादा काहीही बोलले नाहीत. निवडणुकीत दादा पराभूत झाले. त्यानंतर पुढच्या काही महिन्यांनी प्रमोद महाजन अमरावतीला आले. ते थेट दादांच्या बंगल्यावर पोचले. दादांनी गळा भेट घेऊन दारातच स्वागत केले. वरच्या माळ्यावर जेवत असताना, दादासाहेब म्हणाले ” आपला जन्म एकाच तारखेचा असताना आपण इतके एकमेकांवर तुटून का पडतो? असे म्हणतात, एकाच महिन्यात जन्मलेले आणि त्यातही एकाच तारखेवर या जगात आलेले खूप ‘साम्यवादी’ असतात..”
बिहारचे राज्यपाल म्हणून दादासाहेबांची नियुक्ती झाली त्यादिवशी कमलपुष्प बंगल्यावर जल्लोष होता. रात्री उशिरापर्यंत फटाके फुटत होते, रात्रीतूनच बंगल्यावर रोषणाईसुद्धा झाली होती. पांढरी, आकाशी व निळ्या रंगाच्या भिंती असलेल्या या टुमदार बंगल्याचे नाव कमलताईंच्या आग्रहाने ठेवले आहे असे दादासाहेब सांगायचे तेव्हा; ताई लाजायच्या.. आणि पुढचा संवाद कमलताई पूर्ण करायच्या. म्हणायच्या, ‘मुलांनी शिकावे, समाजात नाव कमवावे, बंगला असावा. मोटार असावी..हे सार्यांचेच स्वप्न असते. आम्हीही ते पाहिले’. परिस्थितीने खूप शिकविले. मुंबईत दादासाहेब विधानपरिषदेचे सभापती होते, पण कमलताई मुंबईहून येताना नवीन कपडे, पर्स, दागिन्यांचे सेट घेऊन येत आणि ते अमरावतीत आणून विकत. अनेक वर्षे हे असेच चालू होते. पै-पैसा जमा केला. त्याच्या कष्टातून हा बंगला उभा झाला.नाव ठेवले ‘कमलपुष्प’!! हा संवाद पूर्ण झाला की, दादासाहेब पानदानातून एक विडा काढायचे.. विडा चांगला टुमदार व्हायचा..मग त्याचे दोन तुकडे करून एका पाठोपाठ खायचे. तोबारा भरला की, दोघेही प्रसन्न मुद्रेने मग हसायचे. हे हास्य इतके प्रेमळ, निरागस, निरामय असायचे की ते संपूच नये असे वाटायचे…बरेचदा या मोहमयी हास्याचे सोबती रामेश्वरभाऊ अभ्यंकर असायचे..कैकदा भूषणभाऊ असायचे…कधीकधी डॉक्टर राजेंद्रही असायचे. कीर्तीताई क्वचित असे. हा बंगला ३० ऑक्टोबरला सुगंधाने दरवळायचा. निशिगंध दादांना विलक्षण आवडायचा…याचकाळात बहरणारा पारिजातही दादांच्या जॅकेटमध्ये असायचा..