एकच… दादा !!

– रघुनाथ पांडे

दादासाहेब, या शब्दातच जरब आहे. ती सहा दशके अमरावती, विदर्भ, महाराष्ट्र ,देश आणि जगाने अनुभवली. जगण्याच्या सर्वच बाजूंचा कॅलिडिओस्कोप म्हणजे दादासाहेब. त्यांच्याकडे बघावे आणि जिंदगीची बदलती रूपे न्याहाळावी इतका अस्सल माणूस. माणूस आतून बाहेरून एकच असू शकतो, त्याचा मूर्तिमंत दाखला म्हणजे दादासाहेब. 

दादासाहेब कोण होते? 

बिनधास्त..जिगरबाज लढवय्या. दिलेला शब्द पाळणारा व शब्दाची जरब बसविणारा, दिलेर मित्र. राजकारणात राहूनही पारदर्शी. त्यांचे राजकारण समजण्यापलीकडचे होते. खोल आणि थांग लागू नये इतके. एक मात्र पक्के, राजकारणातील सज्जनशक्तीच्या पाठीशी ते नेहमी उभे राहत आले. त्यासाठी मग त्यांनी पक्ष, जात व पंथही पाहिला नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगेबाबांच्या विचारांमुळे समतेची किनार दादांच्या विचारांना होती. दादासाहेब खापर्डे यांच्या अमरावतीच्या राजकमल चौकातील खापर्डेवाड्यात लोकमान्य टिळक येऊन गेले, हा विचारांचा धागा त्यांना हळवा करी. जेव्हा राजकमल चौकातील खापर्डे वाडा विकला गेला नंतर तो पाडला; तेव्हा दादासाहेब कमालीचे अस्वस्थ होते. अरे, इथे लोकमान्य टिळकांचे पाय लागले. ती माती आहे ही. माझ्याकडे पैसे असते तर हा वाडा विकतच घेतला असता.! दादासाहेबांनी निवडणुकीचे फड मतांच्या ध्रुवीकरणात हरलेही असतील, पण लोकांच्या मनात त्यांनी कायम जागा मिळविली. त्यामुळे ते निवडणुकीपुरते कधी जगलेच नाहीत. त्यांच्या नेतृत्वात माधुर्य व मृदुता होती. मराठी, इंग्लिश, पाली, संस्कृत, गुजराती, अवधी आणि मलयालम या भाषा व कायद्यांवरील त्यांची प्रगल्भता विलक्षण तर होतीच, पण मजबूतही होती. ते दलितांचे नेते नव्हतेच, ते सार्‍यांचे ‘दादा’ होते. सामाजिक  विद्ध्वंसावर मात करा, हे त्यांनी अनेक दंगली शमविताना सांगितले. अँट्रॉसिटीचा हत्यार म्हणून वापर करू नका, असे स्पष्टपणे सांगण्याची धमक दादासाहेबांनी दाखवून समाजाच्या विद्रोहाला त्यांनी बांध घातला. म्हणूनच, सध्याच्या राजकारणात दादासाहेब हवे आहेत. ती उणीव कुणीच भरून काढू शकणार नाही.

पांढरा स्वच्छ झब्बा पायजामा, त्यावर शक्यतो काळ्या किंवा आकाशी रंगाचे जॅकेट, ठरवून तयार केलेली सोनेरी रंगाची चष्मा फ्रेम आणि अकोला जिल्ह्यातील तेल्हारा गावचा प्रसिद्ध असलेला काळा टोकदार जोडा घालून या माणसांची राजकारणात ‘दादागिरी’ सुरू असे. दादांचा दिवस बरेचदा दुपारी तीनच्या पलीकडे सुरू व्हायचा. तो पहाटे दोन- तीनला संपायचा. गरजेनुसार सकाळी सातलाही त्यांच्या दारात गर्दी असायची आणि दादासाहेब लाकडी खुर्चीवर उशांचे ढीग रचून बसले असायचे. ते ज्यांना ओळखत त्यांना ते एकेरी नावाने हाक मारायचे. नुकतीच ओळख झालेल्यांला आडनावावरून आणि विश्‍वास टाकलेल्यांशी ते त्यांच्या वडिलांच्या नावाने हाक मारून बोलवायचे. ऋणानुबंधाची अशी विलक्षण हातोटी त्यांनी सांधली होती. त्यांच्या खिशात दहा रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंतच्या नोटा असायच्या. त्यांना भेटायला आलेल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना ते अनेकदा भातकं म्हणून पैसे देत आणि पुस्तक घे, असं आवर्जून सांगत. एसटीचा पास, शाळेची थकलेली फी, गावाकडे जायला पैसे नाहीत ही बोंब घेऊन त्यांना कोणाही भेटो खिशातून ते भातकं देत !! ते अमरावतीत असताना रात्र कितीही झाली तरी जेवणाची पंगत बंगल्यात असे. ‘कमलपुष्प’मधील अन्नछत्र खूप चविष्ट व मायाळू असे. दादासाहेबांच्या या बंगल्यात सगळ्यांचा मुक्त वावर होता. सुरक्षेसाठी असलेले पोलीस येणाऱ्या-जाणाऱ्यांकडे निरखून बघायचे. हटकायचे नाहीत. बंगल्यातील हॉल, खोल्या या जनतेच्या असाव्यात का, असा प्रश्न पडावा इतके ‘विहार स्वातंत्र्य’ दादांच्या घरी असे. भगवान गौतमबुद्धांच्या अनेक मूर्ती या बंगल्यात आहेत. विलक्षण भावणाऱ्या. मोहित करणाऱ्या. जगातील अनेक देशांमधील चेहरेपट्टीचे प्रतिबिंब बंगल्यातील या शांतचित्त गौतमाच्या चेहऱ्यावर झळके. मूर्तीकडे बघावे आणि दादांना विचारावे, दादा ही कुठली मूर्ती आहे..तर निमिषार्धात ती कोणी दिली ते दादा सांगायचे.

मुंबईहून अमरावतीला ते कलकत्ता मेलने यायचे व मध्यरात्रीच्या सेवाग्राम एक्स्प्रेसने परतायचे. कित्येक वर्षे हा क्रम असाच सरू होता. नागपूरहून मुंबईसाठी विदर्भ एक्स्प्रेस सुरू झाली ती सुरुवातीला तीनच दिवस होती. अमरावतीच्या बडनेरा रेल्वेस्थानकावर तिचा थांबा नव्हता. त्यासाठी तेव्हाचे आमदार बी. टी. देशमुख यांनी आंदोलन सुरू केले. खूप दिवस चालले. भाषणे होत होती.. सह्यांची मोहीम चालली. प्रा. मदन भट यांच्या नेतृत्वात प्रवासी मंडळ मोठय़ा घोषणा देत होते. दादांनीही सहभाग घेतला. पण दादा त्यांच्या चतुरस्त्र संवाद शैलीतील भाषणात मिश्कीलपणे म्हणाले,” मी संयुक्त महाराष्ट्रवादी आहे. हा लढा विदर्भ एक्स्प्रेसच्या थांब्यासाठी आहे. मी जाणे-येणे वेगळ्याच गाडीने करतो, पण गाडीच्या नावाने का होईना रेल्वेचा विदर्भातील अनुशेष दूर होत आहे. त्यामुळे थांबा मिळेस्तोवर आंदोलनात मी असेल..” थांबा मिळाला. पुढे ट्रेन सातही दिवस धावायला लागली.

दुष्काळाने अमरावती जिल्हा धगधगत असताना रा. सू. गवई, सुदामकाका देशमुख, बी. टी. देशमुख, देवीसिंह शेखावत, हर्षवर्धन देशमुख,भाई मंगळे यांनी अप्पर वर्धा धरणासाठी लढलेली राजकीय लढाई विलक्षण चिवट आहे. सध्याच्या राजकारणात असा संघर्ष होणे नाही. कारण नंतरच्या काळात पाणी जसे मिळाले तसे राजकारणातील लोकोपयोगी मुद्दयांचे प्रवाहही बदलले. माजी पोलीस महासंचालक सूर्यकांत जोग यांनी जलसंवर्धनाचा ‘वसुंधरा’ प्रयोग मोर्शीतून प्रारंभ केला. त्यावेळी दादा एका म्हणाले होते. “पाणी बिनरंगाचे असते; कुणी त्यात रंग मिसळू नयेत..”

दादासाहेब ४५ वर्षे सत्तेच्या आवरणात होते, त्यांच्याभोवती वलय होते. पण ते मखरात कधीच बसले नाहीत. सामान्यांचे नेते होते. देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्याविरुद्ध त्यांनी लोकसभेची निवडणूक लढविली. पराभूत झाले. त्यानंतरची ३५ वर्षे त्यांनी अमरावतीचा खासदार होण्याचे स्वप्न पाहिले. समन्वयाचे राजकारण केले. संतापले जरूर पण विखार नव्हता. १९९८ मध्ये ते खासदार झाले. त्यापूर्वी व नंतर त्यांनी निवडणूक लढविली, पण धार्मिक ध्रुवीकरणाच्या झोकात हा समन्वयवादी राजकारणी टिकू शकला नाही. शिवसेनेने हा मतदारसंघ ताब्यात घेतला; पण निवडणुकीनंतर आपण जणू निवडणूक लढलोच नाही, असे मैत्रीचे बंध दादासाहेबांनी विरोधकांसाठीही जोडले. तीन निवडणुकीत त्यांना शिवसेनेने चितपट केले, पण त्यानंतरही त्यांची दोस्ती सार्‍यांशीच कायम होती. एका लोकसभा निवडणुकीत प्रचार इतका टोकदार होता, की कौटुंबिक पातळ्याही उसावल्या गेल्या. प्रमोद महाजन यांनी जाहीरसभेत दादांबद्दल टीका केली. ती दादांना बोचली. पण, दादा काहीही बोलले नाहीत. निवडणुकीत दादा पराभूत झाले. त्यानंतर पुढच्या काही महिन्यांनी प्रमोद महाजन अमरावतीला आले. ते थेट दादांच्या बंगल्यावर पोचले. दादांनी गळा भेट घेऊन दारातच स्वागत केले. वरच्या माळ्यावर जेवत असताना, दादासाहेब म्हणाले ” आपला जन्म एकाच तारखेचा असताना आपण इतके एकमेकांवर तुटून का पडतो? असे म्हणतात, एकाच महिन्यात जन्मलेले आणि त्यातही एकाच तारखेवर या जगात आलेले खूप ‘साम्यवादी’ असतात..”

दादासाहेबांच्या या कोपरखळीवर दोघेही दिलखुलास हसले. ही गोष्ट इथेच संपली नाही. एक दिवस अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांना भेटायला बोलविले. तिथल्या गप्पांनी सांगता झाली.

मैफील जमली की, ते बोटाची कांडे मोजायचे आणि पहिले वाक्य असायचे ताईंच्या जिल्ह्यात मी एकमेव दादा आहे!! उषाताई चौधरी, प्रतिभाताई पाटील, वसुधाताई देशमुख, पुष्पाताई बोंडे, चंद्रप्रभाताई बोके, किरणताई महल्ले आणि सुरेखाताई ठाकरे अशी सर्वपक्षीय स्त्री नेत्यांची नावे घेऊन शेवटी म्हणायचे मी एकच..दादासाहेब गवई!! पी. के. देशमुख, राम मेघे, अनिल वर्‍हाडे, बबनराव मेटकर, यशवंत शेरेकर, शरद तसरे ही नावे ते घेत आणि म्हणत, ‘राजकारणात मला गॉडफादर नाही. मीच माझा गॉडफादर!’

कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी दादांनी डॉ. शिवाजीराव पटवर्धन व पत्रमहर्षी बाळासाहेब मराठे, अमरावती विभाग संघचालक बाळासाहेब आळशी यांच्यासोबत सरकारशी दोन हात केले. विद्याधर गोखले, धगकार उद्धव शेळके, चित्तरंजन कोल्हटकर, सुरेश भट, विश्राम बेडेकर, मधुकर केचे, राम शेवाळकर, प्राचार्य प. सी. काणे, प्राचार्य अण्णा वैद्य, प्रभाकरराव वैद्य, जांबुवंतराव धोटे हे त्यांचे मित्र. ए. बी. बर्धन, सुदामकाका देशमुख व सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूच्या घटनाक्रमाचा संघर्ष करणारे प्रा. सुरेश पाद्ये यांच्यासोबत साहित्यापासून ते गजलेपयर्ंतच्या कैक मैफिली त्यांनी सजविल्या. प्रसिद्ध सर्वोदयी नेत्या निर्मलाताई देशपांडे यांचे भगिनीप्रेम अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला मोठे करून गेले. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईकांसोबतची महाविद्यालयीन मैत्रीतील किस्से उतारवयातही तारुण्य चेतविणारे होते. सुरेश भटांनी बौद्ध धर्म स्वीकारला तेव्हाची या दोघांची चर्चा प्रलयंकारी होती. “भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना..”हे गीत भटांनी ज्या मोजक्या मित्रांना प्रथम ऐकवले, त्यात दादा होते. या दोघांचा दोस्ताना किती गहिरा आहे,हे ते सांगायचे. याच ओघात मग गो.नी.दांडेकर, माडखोलकर, माडगूळकर यांच्याबद्दल बोलायचे. राजकारणातील दादासाहेब बेहद्द रंगायचे. राजकारण किती खोल आहे, हे सांगताना दादासाहेब स्वतःचे चिंतन मांडायचे. एक हात छातीवर ठेवून म्हणायचे,” राजकारण माझ्या नावासारखे आहे. राम -कृष्ण….!

रा. सू. गवई हे वेगळे रसायन होते. १० वर्षे ते सत्तेबाहेर होते; पण गर्दी हटता हटेना. १९६४ मध्ये पहिल्यांदा दादासाहेब विधानपरिषदेवर निवडून आले. चार वर्षानंतर विधानपरिषदेचे उपसभापती बनले. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. दादासाहेब गायकवाड त्यांचे गुरू. गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भूमिहीनांच्या सत्याग्रहातून त्यांचा उदय झाला. १९५९ साली त्यांचे लग्न झाले. त्या वेळी ते साधे आमदारही नव्हते. पण लग्नाच्या रिसेप्शनला ५० हजारांहून अधिक लोक आले होते. या लोकांनी येताना स्वत:च, स्वत:च्या शिदोर्‍या आणल्या होत्या..एकदिवस हा प्रसंग सांगताना दादासाहेब आणि कमलताई खूप भावूक झाल्या होत्या. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम ते लग्न हा सगळा प्रसंग “अवचित” आहे असे सांगून कमलताई म्हणाल्या,” भवतु सब्ब मंगलम..”

बिहारचे राज्यपाल म्हणून दादासाहेबांची नियुक्ती झाली त्यादिवशी कमलपुष्प बंगल्यावर जल्लोष होता. रात्री उशिरापर्यंत फटाके फुटत होते, रात्रीतूनच बंगल्यावर रोषणाईसुद्धा झाली होती. पांढरी, आकाशी व निळ्या रंगाच्या भिंती असलेल्या या टुमदार बंगल्याचे नाव कमलताईंच्या आग्रहाने ठेवले आहे असे दादासाहेब सांगायचे तेव्हा; ताई लाजायच्या.. आणि पुढचा संवाद कमलताई पूर्ण करायच्या. म्हणायच्या, ‘मुलांनी शिकावे, समाजात नाव कमवावे, बंगला असावा. मोटार असावी..हे सार्‍यांचेच स्वप्न असते. आम्हीही ते पाहिले’. परिस्थितीने खूप शिकविले. मुंबईत दादासाहेब विधानपरिषदेचे सभापती होते, पण कमलताई मुंबईहून येताना नवीन कपडे, पर्स, दागिन्यांचे सेट घेऊन येत आणि ते अमरावतीत आणून विकत. अनेक वर्षे हे असेच चालू होते. पै-पैसा जमा केला. त्याच्या कष्टातून हा बंगला उभा झाला.नाव ठेवले ‘कमलपुष्प’!! हा संवाद पूर्ण झाला की, दादासाहेब पानदानातून एक विडा काढायचे.. विडा चांगला टुमदार व्हायचा..मग त्याचे दोन तुकडे करून एका पाठोपाठ खायचे. तोबारा भरला की, दोघेही प्रसन्न मुद्रेने मग हसायचे. हे हास्य इतके प्रेमळ, निरागस, निरामय असायचे की ते संपूच नये असे वाटायचे…बरेचदा या मोहमयी हास्याचे सोबती रामेश्वरभाऊ अभ्यंकर असायचे..कैकदा भूषणभाऊ असायचे…कधीकधी डॉक्टर राजेंद्रही असायचे. कीर्तीताई क्वचित असे. हा बंगला ३० ऑक्टोबरला सुगंधाने दरवळायचा. निशिगंध दादांना विलक्षण आवडायचा…याचकाळात बहरणारा पारिजातही दादांच्या जॅकेटमध्ये असायचा..

(लेखक ‘पुण्यनगरी’ च्या विदर्भ आवृत्तीचे संपादक आहेत.)

संपर्क : ९८१८२१३५१५

Previous articleमातृत्व, समृद्धी व मांगल्याची पूजा बांधणारा भुलाबाईचा उत्सव
Next articleबिहारचा राजकीय कल बदलतोय ?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.