स्वप्नातलं जग पडद्यावर उतरविणारा जादूगर

प्रसिद्ध चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांची अवचित ‘एक्झिट’ चटका लावून गेली आहे. आपल्या चित्रपटाच्या शेवटी कधीही ‘द एन्ड’ असे शब्द न दाखविणारे चोप्राजी आपल्या आयुष्याचा प्रवास असा चटकन संपवतील, असं कोणालाही वाटलं नव्हतं. खरं तर चोप्राजींचं वय काही कमी नव्हतं. मात्र शेवटपर्यंत मनाने चिरतरूण राहिलेल्या या माणसाने आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून तीन पिढय़ांवर जे गारूड केलं आहे, त्यामुळे त्यांचं अनपेक्षित जाणं हे हुरहूर लावणारं तर आहेच, पण आपल्या सर्वाना आयुष्यातील मौल्यवान असं काहीतरी गमाविल्याचं दु:ख देणारं आहे. चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक हा महत्वाचा मानला जात असला तरी ‘ग्लॅमर’ आणि ‘भाव’ मात्र कायम नायक-नायिकांनाच राहिला आहे. यश चोप्रा मात्र कायम याला अपवाद राहिले आहेत. 

 
त्यांच्या हयातीत तर ते स्टार दिग्दर्शक होतेच. पण ते गेल्यानंतरही त्यांचं मोल काय होतं, हे त्यांनी दाखवून दिलं. चित्रपटसृष्टीत फारच कमी दिग्दर्शक असे आहेत की, ज्यांच्या नावावर चित्रपट विकला जातो. यश चोप्रा त्यामध्ये नंबर एकवर होते. यश चोप्रांचा सिनेमा म्हटला की, वितरक डोळे झाकून हवी ती किंमत देत. वितरकच कशाला कुठलाही नायक, नायिकाही त्यांच्या चित्रपटात काम करायला एका पायावर तयार असे. यश चोप्रांच्या चित्रपटात काम करणं म्हणजे ‘स्टार’ होणं असंच गणित असे. त्यामुळेच अमिताभ बच्चनपासून शाहरूख खानपर्यंत आणि शर्मिला टागोरपासून ऐश्वर्या रॉयपर्यंत सारेच त्यांच्यासमोर आपला सारा नखरा बाजूला ठेवत असे. ऋषिकेष मुखर्जीनंतर अमिताभला विविधांगी भूमिका कोणी दिल्या असेल, तर त्या यश चोप्रांनीच दिल्या. शाहरूखखानचं तर करियरच त्यांनी उभं केलं. या दोन सुपरस्टारच्या कारकीर्दीवर त्यांचा अमीट ठसा असल्याचं ते दोघेही कबूल करतात.

यश चोप्रा दिग्दर्शक म्हणून खरंच मोठे होते का, हा वादाचा मुद्दा असू शकेल मात्र त्यांचे चित्रपट देशातील सर्व स्तरातील लोकांना मनापासून आवडतात, हे वास्तव आहे. प्रारंभीचे ‘धूल का फुल’, ‘धर्मपुत्र’, ‘वक्त’, ‘आदमी और इन्सान’ असे काही चित्रपट सोडले तर नंतर सामाजिक बांधिलकी वा कुठला संदेश वगैरे द्यायच्या भानगडीत ते कधी पडले नाही. सर्वसामन्य माणूस सिनेमा आपल्या आजूबाजूचं वास्तव विसरण्यासाठी, चार घटका मनोरंजन व्हावं यासाठी पाहतो. विद्या बालनच्या तोंडात ‘डर्टी पिक्चर’मध्ये एक वाक्य आहे. बॉलिवुडमे सिर्फ तीनही बाते चलती है ‘एंटरटेनमेंट..एंटरटेनमेंट..और एंटरटेनमेंट..’ चोप्रांनी हा ‘एंटरटेनमेंट’ फॅक्टर कायम लक्षात ठेवला. त्यामुळे ‘दाग’ पासून त्यांनी निखळ मनोरंजनात्मक आणि मानवी भावभावनांना हात घालणारे चित्रपट बनविले. ‘दाग’, ‘दीवार’, ‘कभी कभी’, ‘त्रिशूल’, ‘काला पत्थर’, ‘सिलसिला’ हे त्यांचे चित्रपट ओळीने गाजले. ‘दाग’ सोडला, तर सर्व चित्रपटात अमिताभ होता. अमिताभचा अँक्शन चित्रपटात जेवढय़ा प्रभावीपणे त्यांनी उपयोग केला. तेवढय़ाच तरलतेने त्यांनी त्याला प्रेमकथेतही फुलविलं. ही किमया तेच करु शकत होते. (‘सिलसिला’ नंतर मात्र अमिताभ त्यांच्यापासून दूर गेला. ‘सिलसिला’मध्ये माझं खासगी जीवन खूपच वास्तव स्वरूपात दाखविलं, असा त्याचा आक्षेप होता. खरं तर तेव्हा अमिताभ, जया बच्चन, रेखाला घेऊन सिनेमा करणं हेच एक धाडस होतं. यश चोप्रा होते म्हणूनच तो चित्रपट पूर्ण होऊ शकला. जवळपास 19 वर्ष अमिताभ आणि त्यांच्यात अबोला होता. पुढे 1990 मध्ये अमिताभची कंपनी ‘एबीपी कॉर्प’ डुबल्यानंतर तो प्रचंड आर्थिक तंगीत सापडला असताना यश चोप्रांकडे गेला. त्यांनी सारं विसरून ‘मोहब्बते’ मध्ये त्याला भूमिका दिली. तेथून त्याने पुन्हा भरारी घेतली.)

यश चोप्रांना ‘रोमान्सचा बादशहा’ असं जे बिरूद चिपकविण्यात आलं आहे, ते अगदी सार्थ आहे. प्रेमकथा पडद्यावर उतरवावी ती त्यांनीच. ‘सिलसिला’नंतर त्यांचे बहुतांश चित्रपट ‘प्रेम’ याच थिमभोवती गुंफले गेले आहेत. मात्र प्रत्येक सिनेमा आणि त्यातील प्रत्येक फ्रेम अगदी प्रसन्न, ताजी वाटते. 1973 च्या ‘दाग’ पासून आता 2012 च्या ‘जब तक है जान’पर्यंतच्या 40 वर्षाच्या प्रवासात या माणसाने प्रेमाचे असंख्य शेडस् टिपलेत. प्रेमातला त्रिकोण (दाग, चांदणी, सिलसिला) चौकोनोपासून, प्रेमातलं बेभानपन, (दिलवाले..दिल तो पागल है) त्याग(वीर झारा), संयम (कभी कभी), दोन पिढय़ातील प्रेम (लम्हे) असं सारं काही त्यांनी टिपलं. भारतीय तरूणाईला प्रेम करणे यश चोप्रांनी शिकविलं असं जे म्हटलं जातं, ते काही खोटं नाही. अगदी आताआतापर्यंत वयात आलेले तरूण-तरूणी यश चोप्रांच्या सिनेमातील नायक-नायिकेमध्ये स्वत:ला पाहत आणि हरवून जात.

यश चोप्रांच्या सिनेमात काही गोष्टी ठळकपणे जाणवितात आणि आवडतातही. त्यांच्या सिनेमात नायिका जेवढय़ा सुंदर दिसत तेवढय़ा दुसर्‍या कुठेचं दिसत नसे. उदाहरणच पाहायचं असेल, तर ‘कभी कभी’ची राखी आठवा. ‘सिलसिला’ची रेखा, ‘चांदणी’तील श्रीदेवी, ‘दिल तो पागल है’ मधील माधुरी दीक्षित, ‘वीर झारा’तील प्रीती झिंटा, ‘दिलवाले दुल्हनिया..’ तील काजोल. या सार्‍या टॉपच्या नायिका आपल्या कारकीर्दीत यश चोप्रांच्या सिनेमातच सर्वाधिक सुंदर दिसल्यात. (अलीकडेच शाहरूखने यश चोप्रांची मुलाखत घेतली होती. त्यात तो गमतीने म्हणाला, ‘यश अंकल जगातील एकापेक्षा एक सुंदर मुली निवडून आणतात. मी स्वित्झर्लडच्या खोर्‍यामध्ये उभा राहतो. त्या हवेच्या झोक्यासोबत माझ्या बाहुपाशात झेपावतात. धिस इज ग्रेट!’) नायिकेचंच कशाला..अमिताभ ‘दीवार’, ‘कभी कभी’, ‘सिलसिला’त जेवढा सुंदर दिसतो, तेवढा क्वचितच नंतर दिसला असेल. तिच गोष्ट शाहरूखची. ‘दिल तो पागल है’, ‘वीर झारा’तील शाहरूख केवळ अप्रतिम. ही सौंदर्यदृष्टी यश चोप्रांची मोठी ताकद होती. नायिकेप्रमाणेच चित्रपटाचं लोकेशनही ते अफलातून निवडत. काश्मीर आणि स्वित्झर्लड ही त्यांची आवडती ठिकाणं होती. तेथील पर्वत, दर्‍या खोरे, नद्या, धबधबे, फुलांच्या ताटव्यांमध्ये शिफॉनच्या साडय़ा घातलेल्या त्यांच्या नायिका झळाळून उठायच्या. ‘शिफॉनची साडी’ हा त्यांचा आणखी एक प्रेमाचा विषय होता. रेखापासून श्रीदेवी, माधुरी, ऐश्वर्या, काजोल सर्व नायिकांना त्यांनी ही शिफॉनची साडी आवर्जून लपेटली आहे. नायिका अधिकाअधिक सुंदर कशी दिसेल याची ते विशेष काळजी घेत. त्यांच्या सिनेमात नायकापेक्षा नायिकेवर जास्त फोकस राहत असे. एका मुलाखतीत त्यांनी याविषयातील आपली भूमिकाही स्पष्ट केली होती. ‘देवाने स्त्रियांना सुंदर बनविलं आहे. मी जगातील सर्व महिलांचा आदर करतो. मला त्यांच्यात काहीही वाईट दिसत नाही. मी माझ्या चित्रपटात वेगळं काही करत नाही. देवाने बनविलेल्या सुंदर स्त्रीला आणखी सुंदर दाखविण्याचा तेवढा प्रयत्न करतो.’

सौंदर्य आणि निसर्ग या दोन गोष्टीचे ते भोक्तेच होते. जे जे उत्तम असेल त्याच्या ते प्रेमातच पडायचे. ‘चांदणी’, ‘लम्हे’, ‘दिलवाले..’ आदी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान स्वित्झर्लडमधील काही जागा त्यांच्या मनात एवढय़ा ठसल्या की त्या त्यांनी विकतच घेऊन टाकल्या. एल्पॉनरॉश या भागात एक धबधबा तर जंगफ्रॉऊ भागात एक मिनी ट्रेन आणि हॉटेल त्यांनी विकत घेतलं. भारतीयांमध्ये स्वित्झर्लड लोकप्रिय केल्याबद्दल तेथील सरकारने त्यांना सन्मानितही केलं होतं. ‘माझ्यासहीत अनेक चित्रपट कलावतांच्या पासपोर्टवर स्वित्झर्लडचा ठप्पा लागला तो केवळ यशजीमुळे’, असं परवा शाहरूख म्हणाला, ते अगदी खरं आहे. चित्रपटसृष्टीतील अनेक लहानमोठया कलावंतांना त्यांनी स्विसमध्ये नेलं. जे तिथे जाऊ शकत नाही, त्यांना स्वपAातलं जग पडद्यावर दाखविलं. यश चोप्रांच्या संगीत प्रेमाबद्दल सांगितलं नाही, तर त्यांची कहाणी अधुरीच राहिल. त्यांचा कुठलाही सिनेमा घ्या, त्याची गाणी आजही लोकप्रिय आहेत. त्यांना स्वत:ला गाणं उत्तम समजायचं. तरूण असताना ते स्वत: कविताही करायचे. मोठे भाऊ बी. आर. चोप्रांकडे ‘चांदनी चौक’ या सिनेमासाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम करत असतांना मीनाकुमारीनी त्यांच्या कवितांची तारीफ केली होती. मीनाकुमारी आणि मी ‘पोएटिक फ्रेंड’ होतो, असे ते सांगतं. त्यामुळेच शब्दांचं आणि सूरांचं महत्व ते चांगलं जाणून होते. त्यांच्या सिनेमातील गाणी आधी गाजतं नंतर सिनेमा हिट होत असे. साहिर लुधियानवीपासून खय्यामपर्यंत आणि हरिप्रसाद चौरसियापासून शिवकुमार शर्मापर्यंत या सार्‍यांमधील उत्तम त्यांनी वेचलं. ‘सिलसिला’साठी चौरसिया, शर्मा या शास्त्रीय संगीतकारांना त्यांनी घेतलं तेव्हा अनेकांना शंका होती. मात्र पुढे ‘सिलसिला’, ‘चांदणी’, ‘लम्हे’च्या संगीताने इतिहास घडविल्यानंतर त्यांना लोक द्रष्टे म्हणायला लागले. माणसांमधील प्रतिभा ओळखण्यात त्यांचा हात कोणीच पकडत नसे. या जोरावर 41 यशस्वी चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शन त्यांनी केले. ‘सुंदर नायिका, कर्णमधुर संगीत आणि उत्कृष्ट लोकशन’ ही त्यांच्या चित्रपटांच्या यशामागील त्रिसूत्री होती. आयुष्यभर जगातील सुंदरता उत्कटपणे पडद्यावर साकारणारा हा माणूस स्वत: अतिशय साधा होता. दारू आणि सिगारेटला स्पर्शही न करणार्‍या या माणसाला फक्त एकच शौक होता. तो होता सिनेमाचा. तो त्याने आयुष्यभर जपला.

(लेखक दैनिक पुण्य नगरीचे वृत्त संपादक आहेत)

भ्रमनध्वनी-8888744796

Previous articleप्रकाशाचं झाड
Next articleरावसाहेबांनी आपली रेष मोठी केली पाहिजे!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here