अहमद पटेल नावाची काँग्रेसी दंतकथा !

-प्रवीण बर्दापूरकर

राजकारणातल्या वाचाळवीरांना तसंच पिंजऱ्यातल्या पोपटांसुद्धा ‘चाणक्य’ म्हणण्याची फॅशन सध्या माध्यमांत आलेली आहे . दाते शब्दकोशात ‘चाणक्य’ या शब्दाचा अर्थ आहे ‘जात्या धूर्त , चतुर आणि उत्तम वक्ता इत्यादी गुणांनी युक्त .’ हे आठवण्याचं कारण म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि हंगामी पक्षाध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांचं नुकतचं झालेलं निधन . अहमद पटेल जात्या धूर्त होते , चतुर होते ; उत्तम वक्तृत्व मात्र त्यांच्याजवळ नव्हतं . अहमद पटेल यांच्या निधनानं समकालीन भारतीय राजकारणातला ‘सर्वार्थानी’ एक चाणक्य काळाच्या पडद्याआड गेला आहे आणि त्यांची जागा घेणारा आज तरी काँग्रेस पक्षात कुणी दिसत नाही .

गव्हाळ वर्ण , काहीसा स्थूल बांधा , डोईवरचे केस मागे वळवलेले , कायम सस्मित आणि मिठ्ठास वाणी , असं अहमद पटेल यांचं एकंदरीत व्यक्तिमत्त्व होतं . पण , त्यांच्या स्मितातून त्यांच्या मनात काय चालू आहे याचा समोरच्याला मात्र अंदाज कधीच येत नसे . दिल्लीच्या दरबारी राजकारणात डोक्यावर बर्फ , जीभेवर खडीसाखर आणि चेहऱ्यावरची सुरकुती हलू न देता राजकारण करणारा यशस्वी होतो , असं म्हटलं जातं . त्यात चेहऱ्यावरीच सुरकुती न हलू देतानाचा अपवाद वगळता कायम सस्मित राहात काँग्रेसच्या राजकारणात यशस्वी झालेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे अहमद पटेल होते . ते पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचे कान आणि डोळे होते . पक्षातले नेते , कार्यकर्ते आणि पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्यात ते कायम ’कुशन’ म्हणून वावरले तरी अहमद पटेल सत्तेपासून कायमच लांब राहिले . काँग्रेसवर आणि गांधी घराण्यावर अव्यभिचारी निष्ठा हे अहमद पटेल याचं एक वैशिष्ट्य . शिवाय वादविवाद , चर्चा , आरोप–प्रत्यारोपासून ते कायम लांब राहिले . याचा अर्थ त्यांना काही वाद चिकटले नाहीत किंवा त्यांच्यावर काही आरोप झाले नाहीत असं नव्हे .

सत्तेच्या राजकारणात आणि देशातल्या एका सर्वांत मोठ्या पक्षाच्या तिजोरीच्या चाव्या प्रदीर्घ काळ हातात असल्यामुळे शिवाय ज्यांना शब्द पक्ष व सत्तेत प्रमाण मानला जातो , अशी शक्ती असलेले अहमद पटेल अनेकदा वादग्रस्तही ठरले . तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांचं सरकार विश्वासमताला सामोरं गेलं तेव्हा लोकसभेत अभूतपूर्व गोंधळ झाला . सभागृहात विरोधी पक्षांकडून नोटांची चळत सादर झाली . नोटांची ती चळत सादर होण्यामागे अहमद पटेल यांचाच हात होता अशी चर्चा तेव्हा झाली . देशातल्या एका बड्या उद्योग समूहात अहमद पटेल यांची आर्थिक गुंतवणूक असल्याच्या चर्चाही चांगल्याच रंगल्या . महाराष्ट्रातल्याही एका उद्योग समूहात काँग्रेसच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांसोबत अहमद पटेल यांचीही आर्थिक गुंतवणूक असल्याची बोलवा मोठ्या प्रमाणात होती . इतकचं कशाला देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अहमद पटेल यांच्यातही आर्थिक संबंध असल्याची चर्चा काँग्रेसच्या वर्तुळात  ( दबक्या आवाजात का असेना ) होतीच की ! या सर्व चर्चा खऱ्या की खोट्या याची खातरजमा करणारी कोणतीही यंत्रणा प्रस्तुत पत्रकाराकडे नाही . मात्र , अशा    चर्चा रंगल्या होत्या हे मात्र कधीच नाकारता येणार नाही . ठिणगी पडल्याशिवाय धूर निघत नाही म्हणून देशातल्या इतर बहुसंख्य सर्वपक्षीय राजकारण्यांप्रमाणे अहमद पटेल हेही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नव्हते , असं म्हणण्यास जागा आहे . ते काहीही असो , अहमद पटेल यांची पक्षावरची घट्ट पकड आणि त्यांच्या शब्दाला प्राप्त झालेलं वजन , ही समकालीन राजकारणातली एक दंतकथा होती आणि ती दंतकथा वास्तवात वावरत होती .

अहमद पटेल हे मूळचे गुजराततले . भडोच जिल्ह्यातले . भडोच लोकसभा मतदार संघातून तीनवेळा ते विजयी झाले. १९७७ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासह काँग्रेस पक्षाचं देशात सर्वत्र पतन झालेलं असतानाही अहमद पटेल मात्र भडोच मतदार संघातून लोकसभेवर विजयी झाले . त्यानंतर सलग तीनवेळा ते लोकसभेवर आणि १९९३ नंतर अखेरचा श्वास घेईपर्यंत ते राज्यसभेचे सदस्य होते . या संपूर्ण कालखंडात त्यांच्याही राजकीय आयुष्यात अनेक चढ-उतार आले पण , डोळ्यात पाणी येऊ न देता पायात रुतलेला कांटा काढावा अशा शांतपणे ते सगळेच चढ-उतार अहमद पटेल यांनी पचवले . वचावाचा बोलणं , फुशारक्या मारणं , प्रसिद्ध मिळवणं अशा कोणत्याच बाबींना अहमद पटेल यांच्या राजकीय जीवनात थारा नव्हता . २४ तास हा माणूस फक्त काँग्रेसचं राजकारण करत होता ; अतिशय धूर्तपणे इकडच्या सोंगट्या तिकडे हलवत आणि त्याचा कोणालाही पत्ता लागू न देता कार्यरत होता . गांधी घराण्याशी असणारी अहमद पटेल यांची निष्ठाही काँग्रेस वर्तुळात कायमच असूया आणि अप्रुपाचा विषय होता .

‘अहमद भाईंनी शब्द दिला म्हणजे ते काम होणारच’ , अशी अहमद पटेल यांची काँग्रेस पक्षात प्रतिमा निर्माण झालेली होती आणि ती खरीही होती . मात्र , यातही एक विरोधाभास आहेच . नारायण राणे यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये जेव्हा प्रवेश केला तेव्हा अहमद पटेल यांनी त्यांना मुख्यमंत्री करण्याचं आश्वासन दिलं होतं , असं दस्तुरखुद्द नारायण राणे यांनी अनेकदा सांगितलं . मात्र , नारायण राणे यांना काँग्रेस पक्षात असेपर्यंत मुख्यमंत्रीपदानं कायमच हुलकावणी दिली . नारायण राणे यांनी अनेकदा उच्चार करुनही याच नाही तर आणि कोणत्याही ‘दिल्या घेतल्या वचनां’चा कधीही कोणताही  खुलासा अहमद पटेल यांनी केला नाही . हे असं सोयीस्कर म्हणा का धूर्त म्हणा मौन बाळगून वावरणं हे अहमद पटेल यांच एक खास वैशिष्ट्य होतं .

१९८९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत अहमद पटेल यांचा पराभव झाला तोवर ते गांधी कुटुंबाच्या फार जवळ गेलेले होते . १९८४ नंतर ते राजीव गांधी यांच्या किचन कॅबिनेटचे महत्त्वाचे सदस्य बनलेले होते . तेव्हापासून गांधी आणि नेहरु कुटुंबाशी असणाऱ्या सर्व संस्थावर ते सदस्य म्हणून कार्यरत आहेत . त्या संस्थांचे एक अर्थाने ते सूत्रधारही आहेत . तरीही १९८९ मधला पराभव ते टाळू शकले नाहीत . मात्र , पुन्हा पक्षातली पाळंमुळं बळकट करण्याची संधी शांतपणे शोधत राहण्यासाठी पुढची     दोन-तीन वर्ष अहमद पटेल यांनी खर्च केली . राजीव गांधी यांच्या हत्येनंतर नरसिंहराव यांच्याकडे आधी पक्षाध्यक्ष आणि पाठोपाठ  पंतप्रधानपदही आलं . तेव्हा नरसिंहराव यांच्या विरोधात  जे पक्षांतंर्गत विराधक होते त्यात एक अहमद पटेल होते .  तेव्हा ज्या पद्धतीनी नरसिंहराव यांचं स्थान बळकट होत गेलेलं होतं त्यामुळे तर अहमद पटेल यांच राजकीय भवितव्य तर आता अंधुक झालेलं आहे असंच समजलं गेलेलं होतं . मात्र , ते सर्व समज अहमद पटेल यांनी खोटे ठरवले . त्या काळात त्यांनी त्यांची पक्षांतंर्गत पाळंमुळं घट्ट केली आणि गांधी घराण्यावरील निष्ठेची वीण मुळीच विसविशीत होऊ दिली नाही . १९९२ मध्ये नरसिंह राव यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत अहमद पटेल यांचा समावेश केला . बाबरी मशीद पाडली गेल्यानंतर जी काही अस्वस्थता देशभर निर्माण झाली त्याचा परिपाक म्हणून अहमद पटेल यांनी काँग्रेसच्या कार्यकारिणी सदस्याचा राजीनामा दिला . मात्र , नरसिंहराव यांनी शिष्टाई करुन तो राजीनामा परत घ्यायला लावला .

१९९३ मध्ये नरसिंहराव यांनीच त्यांना राज्यसभेवर संधी दिली . हे असं घडत असलं तरी गांधी घराण्याचे प्रवक्ते किंवा किचन कॅबिनेटचे प्रमुख या पदापासून अहमद पटेल लांब होते आणि याचं एक सर्वांत महत्त्वाचं कारण व्हिंसेंट जॉर्ज हे होते . त्या काळात व्हिंसेंट जॉर्ज यांचा शब्द म्हणजे गांधी कुटुंबाचा शब्द समजला जात असे . ते स्थान मिळवण्यासाठी कोणताही उतावीळपणा न करता अहमद पटेल संयमानं कार्यरत राहिले . अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाल्याच्यानंतर एका आर्थिक प्रकरणात व्हिंसेंट जॉर्ज यांचं नाव समोर आलं . त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागला आणि हळूहळू व्हिंसेंट जॉर्ज यांची गांधी कुटुंब आणि पक्षातील जागा अहमद पटेल यांनी काबीज केली .  तेव्हापासून म्हणजे , जॉर्ज यांची सद्दी संपल्यापासून अहमद पटेल अधिकाधिक प्रबळ होत गेले . अहमद पटेल यांनी जर कुणाला शब्द दिला तर   पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी तो दिलेला आहे , असं समजण्याची पद्धत अगदी शेवटपर्यंत कायम राहिली .

‘चाणक्य’ ही उपाधी सार्थ ठरवत अहमद पटेल यांनी स्वत:ला सत्तेपासून कटाक्षानं लांब ठेवलं . खरं तर , राजीव गांधी पंतपधान होते तेव्हाच त्यांना मंत्रीपदाची संधी चालून आलेली होती . परंतु , ती नाकारुन त्यांनी पक्षाचा ‘कर्ताकरविता’ हे स्थान मिळवण्यासाठीच प्राधान्य देण्याचं ठरवलं . सोनिया गांधी पक्षाच्या अध्यक्ष झाल्यानंतर पक्षाचे कार्यकर्ते , नेते आणि सोनिया गांधी यांच्यातला दुवा म्हणून अहमद पटेल उदयाला आले . ते चोवीस तास काम करतात असं त्यांच्या लाभार्थीकडून सांगितलं जाऊ लागलं . पक्षात आणि सरकारात इतकं महत्त्वाचं स्थान संपादन केल्यानंतरही ते प्रसिद्धीपासून कायम लांब राहात असतं . दिल्लीच्या वास्तव्यात एक पत्रकार म्हणून भेटण्याचा प्रयत्न मी पाच-सहा वेळा केला परंतु , त्यांनी भेटण्यास कोणतीही अनुकुलता दर्शविली नाही . मात्र , एकदा भेटण्याची उत्सुकता असल्याचं माझं म्हणणं मान्य करुन ते भेटले खरे पण , बोलले फारच कमी . त्या आठ–दहा मिनिटांच्या भेटीत आमच्यात जो काही संवाद झाला त्यात मीच जास्त बोललो आणि सस्मित चेहऱ्यानी अहमद पटेल यांनी ते ऐकून घेतलं , चहा पाजला आणि माझी बोळवण केली . अहमद पटेल यांचं हे जे माध्यमांपासून दूर राहण्याचं वैशिष्ट्य होतं त्यामुळे तर त्यांच्याविषयी कायम कुतूहल असायचं . मात्र , ते कुतूहल शमवण्यासाठी अहमद पटेल यांनी कधीही प्रयत्न केले नाहीत . अहमद पटेल हे किती ‘वर्कोहोलिक’ होते याची अनेक उदाहरणं काँग्रेस नेत्यांच्या बोलण्यात यायची . त्यांनी अनेकांना रात्री अकरा/बारा किंवा मध्यरात्री दोन वाजताही भेटीसाठी वेळ दिल्याच्या कहाण्या कानावर यायच्या . ते असं का करतात आणि ते खरंच इतके कामात व्यस्त असतात का ? असा प्रश्न कधीच कुणाला पडला नाही कारण त्यांच्या पक्ष आणि गांधी घराण्याच्या निष्ठेविषयी कुणाच्याही मनामध्ये शंका नव्हती .

असं म्हणतात आणि ज्यात तथ्य असल्याचं राजकीय वर्तुळात मानलं जातं , मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातलं सरकार दोन वेळा स्थापन होण्यात अहमद पटेल यांचा वाटा मोठा होता . सत्तेसाठी आवश्यक असणारी ‘जुळवाजुळव’ करण्यात अतिशय माहिर असल्याची त्यांची ख्याती होती . ही अशी जुळवाजुळव करण्याचं कसबच पक्षाचं कोषाध्यक्षपद त्यांच्याकडे येण्यासाठी कारणीभूत ठरलं आणि देशातल्या उद्योगपतींशी असणाऱ्या त्यांच्या संबंधाची चर्चा झाली , तरी त्यासंदर्भात माध्यमांचे रकाने मात्र कधीच रंगले नाही , हेही तेवढंच खरं .

सध्या सतत पराभवांच्या मालिकेला काँग्रेस पक्ष सध्या सामोरा जातोय . पक्षातल्या ‘२३ पोपटांनी’ पक्ष नेतृत्वाच्या सक्षमतेविषयी शंका उपस्थित केलेली आहे . काँग्रेस पक्षात  त्यामुळे बरीच अस्वस्थता आहे . अशा परिस्थितीत ‘ते’ २३ आणि गांधी घराणं याच्यात एक असणारा महत्त्वाचा दुवा अहमद पटेल यांच्या निधनाने निखळून पडलेला आहे . काही माणसं सत्तेतल्या पदासाठी नाही तर , पक्षातल्या जबाबदारीसाठीच जन्माला येतात आणि आयुष्यभर त्यासाठीच झिजत जातात . ४०-४५ वर्षांच्या राजकारणात काँग्रेस पक्षासाठी अहमद पटेल एक चाणक्य म्हणून असे झिजले . सध्याच्या अत्यंत कठीण परिस्थितीत अहमद पटेल यांच निधन म्हणूनच काँग्रेस पक्षासाठी एक मोठा धक्का आहे . राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष उभारी घेण्याचा प्रयत्न करत असताना ; नरेंद्र मोदी यांना पर्याय मीच आहे हे ठसवण्यात राहुल गांधी यशस्वी ठरलेले असतांना भारतीय समकालीन राजकारणातला खऱ्या अर्थानं चाणक्य असलेला हा मोहरा आता काळाच्या पडद्याआड गेलेला आहे . आता राहुल गांधी यांचे पक्षांतंर्गत विरोधक आणखी सक्रिय आणि प्रबळ होतात का , हे येत्या काही दिवसांत ठरलेच . पक्षांतर्गत विरोधक प्रबळ झाल्याच्या परिस्थितीत गांधी कुटुंबाला अहमद पटेल यांची उणीव सतत भासेल .

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)
९८२२० ५५७९९

 

Previous articleअहमद पटेल नावाचे गूढ
Next articleमुन्नार: किंग ऑफ हिल स्टेशन
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here