
नुसतं बोलणं आणि जे बोलतो आहेत ते जगणं, यात फार अंतर असतं. त्यात बॉलिवूड म्हणजे तर दिखाव्याची दुनिया. आजही नायिकांना एका विशिष्ट चष्म्यातून पाहिलं जातं. त्यात ज्या काळात सुश्मिता नायिका म्हणून आली, ते होतं नव्वदीचं दशक! त्या काळात तिचं हे असं मुलीला दत्तक घेणं बघून, तुझं करिअर संपेलपासून तुझ्याशी आता कोण लग्न करेल इथपर्यंत काय काय ऐकवलं गेलं असणार. तिने दत्तक घेतलेली मुलगी रेने ही खरंतर तिचीच मुलगी आहे, एका प्रेमप्रकरणातून झालेली, असं सुद्धा बोललं जातं होतं. म्हणजे अगदी आजही बोललं जातं. पण तरीही सिंगल मदरहूड त्या काळात इतक्या सुरेख पद्धतीने पेलणारी सुश्मिता या सगळ्या गॉसिपच्या पलीकडे जाऊन एक नितांत सुंदर स्त्री आहे, असं मला वाटतं. स्त्रीची प्रेमकरणं चघळणं, तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणं, गॉसिप करणं यापुढे जाऊन तिच्यातली क्षमता, तिच्यामधलं साहस, तिचं कर्तृत्व हे आपण कधी पाहायला शिकणार? नायिकेबद्दल बोलताना हमखास तिच्या अफेअर्सची तिखट मीठ लावून चर्चा करणं, त्यावर लिहिणं यापेक्षा तिच्या आयुष्यात ती कशी खंबीरपणे उभी राहिली, तिने कोणती संकटं पेलली यावर जर बोललं गेलं, तर निदान काही लोकांना जगण्याचं बळ तरी मिळेल.
2014 मध्ये ‘निरबाक’ या बंगाली चित्रपटाचं शूटिंग संपवून जेव्हा सुश्मिता घरी परतली तेव्हा ती आजारी पडली. खूप चाचण्यांनंतर तिला समजलं की, तिला अॅडसन्स डिसीज हा आजार आहे. तिला जेव्हा हा अॅड्रिनल इंसफीशियन्सीचा अटॅक पहिल्यांदा आला तेव्हा एक-एक करून तिचे अवयव निकामी होत गेले. या आजारामध्ये होतं असं की, आपल्या शरीरातील अॅड्रिनल ग्रंथी, जी एरवी ‘कोर्टिसोल’ हे हॉर्मोन बनवत असते, ती निकामी होते आणि शरीरामध्ये कोर्टिसोल्स बनत नाहीत. खरं बघायला गेलं, तर हा आजार बरा न होणारा आहे. म्हणजे औषधांनी यावर उपाय होऊ शकतो, पण यातून पूर्णतः बाहेर येणं तसं अवघडच. अॅड्रिनल क्रायसिसच्या अटॅकनंतर सुष्मिताला हायड्रोकॉर्टिसोल हॉर्मोनचं इंजेक्शन प्रत्येकी आठ तासानंतर घ्यावं लागायचं. पुढची दोन वर्ष सलग हे इंजेक्शनचे शॉट्स ती घेत होती. आता विचार करा… मिस युनिव्हर्स जिंकलेली तरुणी, एक अत्यंत सुंदर नायिका, सतत सुंदर दिसण्याचं प्रेशर आणि करिअरची गरज सुद्धा. या स्टिरॉइडच्या इंजेक्शन्समुळे, गोळ्यांमुळे शरीरावर इतर वाईट परिणाम होतात. सुश्मिताच्या शरीरावर सुद्धा ते दिसायला लागले. केस गळणं, चेहेरा सुजणं हे सुरू झालं. तसंच हे इंजेक्शनही तिला घेणं गरजेचं होतं; कारण तिचं जगणं त्यावर अवलंबून होतं. तिचं वजनसुद्धा यामुळे वाढत गेलं. ब्लड प्रेशरचा त्रास देखीन सुरू झाला. आता आपल्याला लाख वाटतं की, या लोकांकडे तर खूप पैसा असतो वगैरे वगैरे! पण, शेवटी सुश्मिता होती तर सिंगल पेरेंट. दोन मुलींना बघणं, स्वतःचं घर बघणं हे ती एकटी करत होती. साहजिकच या आजारामुळे ती खचून गेली असणार. ती वेगवेगळ्या देशांमध्ये गेली ट्रीटमेंटसाठी आणि टेस्ट्सनंतर हेच सांगण्यात आलं की, तिला आता आयुष्यभरासाठी ही स्टिरॉईड्सची इंजेक्शन, गोळ्या घेत राहावं लागणार. या आजारामध्ये एनर्जी लेव्हल्स खूप कमी होते आणि सुश्मिताची एखादी इव्हेंट असली की, फक्त ती इव्हेंट अटेंड करता यावी म्हणून तिला जास्त डोस घ्यावा लागायचा, तो काळ नक्कीच तिच्यासाठी वाईट होता. तिला जवळपास सगळ्या डॉक्टरांनी सांगून टाकलं होतं की, तू तुझं प्रोफेशन बदलून टाक. कारण एका विशिष्ट साच्यातलं दिसणं. तो स्ट्रेस कॅरी करणं, हे तुझं शरीर आता करू शकणार नाही. पण, सुश्मिताने ठरवलं की, मी हार मानणार नाही.
सुष्मिता सेन यांच्याबद्दल खुपच सुंदर लिहिले आहे.
लेखक आणि संपादकांचे मनःपूर्वक अभिनंदन