शहनाज पठाण आणि सुनील गोसावी: आम्ही विचारांशी, तत्त्वांशी ठाम राहिलो.

 

(साभार:’कर्तव्य साधना’ –आंतरधर्मीय विवाह केलेल्यांच्या मुलाखती : भाग ११)

(मुलाखत व शब्दांकन – हिनाकौसर खान-पिंजार)

………………………………………

शहनाज पठाण आणि सुनील गोसावी-. शेवगावच्या कॉलेजमध्ये वेगवेगळ्या विद्याशाखांमध्ये असूनही त्यांच्यात मैत्री झाली ती सांस्कृतिक कार्यक्रमांतून. दोघंही कवी मनाचे. वाचन, गप्पा, चर्चा, विविध उपक्रम यांतून संपर्क वाढत गेला आणि त्यातून नकळत दोघांना एकमेकांची ओढही निर्माण झाली. कॉलेजमधला ओढा कॉलेज संपल्यावरही कायम राहिला. वेगवेगळ्या क्षेत्रांत स्वतःला चाचपडत असतानाही सोबत कमी झाली नाही. सहवासातून एकेमकांना नीट ओळखून, पारखून ते एकमेकांच्या प्रेमात पडले. विवाहनोंदणीसाठी दिलेली एक महिन्याची नोटीस कुठल्यातरी अघटित वार्ताची सूचना तर घेऊन येणार नाही ना असं वाटावं इतका तो महिना त्यांच्यासाठी तणावाचा राहिला. पण ते त्यातूनही मार्ग काढत राहिले, विरोध सहन करत राहिले आणि स्वतःमध्ये बदल न घडवता २५ नोव्हेंबर १९९७ रोजी विवाहबद्ध झाले.

………………………………

शर्मिला गोसावी या मूळच्या शहनाज पठाण. नगर जिल्ह्यातल्या शेवगाव तालुक्यातच लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांचं कुटुंब मोठं होतं. त्या घरात सर्वांत लहान. वडील कोर्टात बेलीफ होते. कुटुंबीय सुशिक्षित होते आणि मुलींनी शिकावं या विचारपरंपरेतले होते. आईवडील दोघांनाही वाचनाची आवड असल्यानं त्याही लहान वयापासूनच वाचायला लागल्या. शैक्षणिक फीचा भार वडलांवर टाकू नये म्हणून त्यांनी नोकरी करून शिक्षण पूर्ण केलं. त्या एमए बीपीएड आहेत. त्या उत्तम कविता करतात. बांगड्यांची खैरात, मनमीत हे त्यांचे काव्यसंग्रह तर नजराणा हा लेखसंग्रह अशी पुस्तकं प्रकाशित आहेत. इतकंच नव्हे तर, प्रगतिशील लेखक संघटना, महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या कार्यकारणीत राज्य सहसचिव म्हणून त्यांची निवड झाली आहे. सध्या त्या श्री. साई इंग्लीश मिडिअम स्कुल, अहमदनगर इथं कार्यरत आहेत. त्यांना कवितेसाठी विविध पुरस्कार लाभले आहेत.

सुनील गोसावी यांचे वडील बीड जिल्ह्यात शिक्षक असले तरी सहावीनंतर ते नगर जिल्ह्यातच शिक्षणासाठी होते. वाचनातून आकाराला येत असलेल्या मेंदूला विद्यार्थी संघटनेत काम करण्याची संधी मिळाली. अकरावीत असतानाच ते ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे (एआयएसएफ) सदस्य झाले. विविध प्रश्‍नांसाठी मोर्चे, आंदोलनं केली. त्यांच्यातल्या नेतृत्वगुणामुळं त्यांनी विद्यार्थी संघटनेत विविध पदं भूषवली. तसंच कॉलेजमध्ये विद्यार्थी निवडणुकीतही यश मिळवलं. सुनील यांनाही कवितांची आवड आहे. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी सप्तरंग थिएटर्स सुरू केलं. त्यातून कलामहोत्सव भरवले. त्यांनी बीकॉम करून एमएसडब्ल्यूजेसी पीआर ही पदवी प्राप्त केली. काही काळ त्यांनी हिरवे बाजारच्या यशवंत ग्रामीण व पाणलोट संस्थेत सरपंच पोपटराव पवार यांच्यासोबत काम केलं. सामाजिक कामांचा व्याप त्यांनी कायमच आनंदानं स्वीकारला. सध्या ते दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानमध्ये सहायक प्रकल्प अधिकारी म्हणून नोकरी करत आहेत. साहित्यिक कार्य करण्याच्या उद्देशानं त्यांनी शब्दगंध प्रकाशन सुरू केलं आहे. ग्रामीण भागातील नवोदितांना व्यासपीठ मिळवून देण्यात शब्दगंध यशस्वी झालं आहे. आजवर 250 पुस्तकं त्यांनी प्रकाशित केली आहेत. प्रकाशक म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

आज दोघांना दिशा नावाची मुलगी आहे. दिशा सध्या बीएस्सीच्या शेवटच्या वर्षाला आहे. सोबतीची, सहजीवनाची 24 वर्षं एकत्र जगणार्‍या शहनाज उर्फ शर्मिला आणि सुनील यांच्यासोबत केलेल्या या गप्पा.

प्रश्‍न – तुमचं बालपण तालुक्याच्या ठिकाणी किंवा  गावाच्या ठिकाणी गेलंय.  पुढं तुम्ही स्वतःला चांगल्या तर्‍हेनं प्रस्थापित केलं. अशा स्थितीत तुमची जडणघडण कशी होत गेली हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे…

शहनाज – माझं कुटुंब मोठं होतं. आम्ही पाच बहिणी आणि दोन भाऊ. घरात मी सर्वांत लहान. माझे वडील शेवगावच्या कोर्टात बेलीफ होते. आई पुण्याची होती. ती अँग्लो-उर्दू स्कुलमधून सातवीपर्यंत शिकली होती. शिक्षणाच्या बाबतीत ती खूप काटोकोर होती. तिचं राहणीमान आधुनिक होतं आणि तोच टापटीपपणा आमच्यातही पुढं आला. आमच्या घरात बुरखापद्धती नव्हती. अर्थात आम्हाला धार्मिक शिक्षण दिलं गेलं. नमाज, कुरआन पठणाची तालीम आम्हाला मिळाली होती. तेवढ्याचसाठी चौथीपर्यंत उर्दू माध्यमातून शिक्षण झालं. उर्दूही तहजीब शिकवणारी भाषा. ती आपल्या मुलींना यावी हा त्यामागचा उद्देश होता. मात्र आपल्या मुलांना जर स्वतःच्या पायावर उभं करायचं असेल तर त्यासाठी मराठी भाषा येणं आवश्यक आहे हा विचार करून त्यांनी आम्हाला मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं. शिक्षण घेण्याची भाषा बदलली तरी माझी अभ्यासातली प्रगती उत्तमच होती. अभ्यासात मला खरोखरच गती आहे ही गोष्ट अम्मीअब्बांच्या ध्यानात आली होती. माझ्या अम्मीचंही विशेष असं होतं की, तिला स्वतःला वाचनाची आवड होती. आमच्या लहानपणी उत्तरप्रदेशहून ‘नशेमन’ नावाचं एक मासिक महिन्याच्या महिन्याला यायचं. अब्बा बाकी कशावर नाही मात्र पुस्तकांवर सढळ हातानं खर्च करायचे त्यामुळं बालवयातच इंग्लीश-मराठीतलं चांगलं वाचन सुरू झालं होतं.

अब्बांच्या गावी त्यांचं शिकलेलं एकमेव घर होतं. त्यात अब्बा कोर्टात नोकरीला असल्यामुळं त्यांना गावात मान होता. लग्नाचा विधी असेल किंवा कुठली समस्या घेऊन लोक अब्बांकडेच यायचे त्यामुळं घरात सतत लोकांचा राबता असायचा. त्यातून नकळत काही संस्कार मनावर उमटत होते. आम्ही सगळ्याच बहिणी याच वातावरणात शिकलो. आमच्या अब्बांचं एक होतं की, मुलींची लग्नं करण्यापेक्षा शिकून त्यांना त्यांच्या पायावर उभं करायचं. मी पहिल्यापासूनच धाडसी वृत्तीची होते. मोठी बहीण मुंबईत नोकरीला आहे. एक बहीण पुण्यात ससूनमध्ये आहे. मुलीनं नोकरी मिळाल्यावरच लग्न करायचं असं ठरवून  त्यांनी कायमच आम्हाला स्वतंत्र व्यक्ती म्हणून वाढण्यासाठी प्रोत्साहन दिलं. पुढं शेवगावच्या न्यू आर्ट्स-कॉमर्स कॉलेजमध्ये बीए करताना मी सांस्कृतिक कार्यक्रमांत भाग घ्यायला लागले. कविता करायला लागले. कवितावाचनात सहभागाबरोबरच सूत्रसंचालनासारख्या नेतृत्व करणार्‍या गोष्टींतही सहभाग वाढला. अब्बा आवडीनं पाहायला यायचे… तेव्हा कॉलेजमध्ये माझं इंग्लीश सर्वांत चांगलं होतं. याचाही मला अशा कामी फायदा व्हायचा.

सुनील – माझे वडील बीड जिल्ह्यातल्या एका शाळेत शिक्षक होते. मी घरात मोठा. मला एक भाऊ, एक बहीण. वडलांना नेहमी वाटायचं की, मुलांना चांगलं शिक्षण मिळायला हवं. याच उद्देशानं त्यांनी मला सहावीला असताना माझ्या मामाकडे नगरला पाठवलं. माझे मामा बँकेत क्लार्क होते. कालांतरानं मामाची बदली राहुरीला झाली. त्यानंतर पुढच्या शिक्षणाला मग शेवगावला ठेवायचं, असा विचार वडील करत होते. शेवगावला माझी आजी म्हणजे वडलांची आई होती आणि शेत होतं मात्र त्यांना त्यांचे स्वतःचे एक शिक्षक भेटले. त्यांनी चिंचोलीच्या शाळेची आणि तिथल्या होस्टेलची माहिती दिली. त्यांच्याविषयी वडलांना प्रचंड आदर होता. त्यामुळं आठवी ते दहावीचं शिक्षण चिंचोलीला झालं. भाऊही शिकायला आला. याच शाळेत लायब्ररी होती. कविता आणि धडे लिहिणार्‍यांची वेगळी पुस्तकं असतात, हे तोपर्यंत माहीतच नव्हतं. लायब्ररीमुळं ते दालन उघडलं. वाचायची आवड लागली. अभ्यासाव्यतिरिक्त वाचन सुरू केलं. वडीलसुद्धा भेटायला यायचे तेव्हा पुस्तकं घेऊन. पुढं दहावीनंतर आपण डीएड करून लगेच नोकरी करावी असं वाटत होतं. माझी चित्रकला चांगली होती त्यामुळं चित्रकलेचं शिक्षक व्हावं असंही वाटत होतं. चटकन नोकरी लागेल असं शिक्षण घ्यावं एवढंच कळत होतं पण वडील म्हणाले, ‘आम्हाला आर्थिक परिस्थतीमुळं शिकता आलं नाही पण तू नोकरीचा विचार करून शिकू नकोस. अकरावी-बारावी कर आणि मग पुढचं ठरव.’ मीही ठीक म्हणालो. मग आता शिक्षण कुठं घ्यायचं तर शेवगावला हे ठरलं. तोवर खरंतर मनाची विशेष अशी काही मशागत झाली नव्हती. पुढं मी बीकॉम करत असताना विद्यार्थी संघटनेच्या संपर्कात आलो आणि वैचारिक दृष्टी विकसित व्हायला लागली. नगरमधल्या कॉम्रेड का. वा. शिरसाठ यांच्याशी भेट झाली. त्यांनी मार्क्सचं पुस्तक दिलं. ते वाचून मी पुरता भारावून गेलो. आपण आयुष्यात गोरगरिबांसाठी कामं केलं पाहिजे याचं बीज त्यांच्या भेटीतून रुजलं.

प्रश्‍न – तुमची भेट कॉलेजमध्ये झाली पण आर्ट्स आणि कॉमर्स अशा वेगवेगळ्या स्ट्रीम्स असतानाही ती भेट झाली कशी?

शहनाज – कॉलेजमधल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमुळं आमची ओळख झाली. वर्गात एक लेडीज रिप्रेझेंटेटिव्ह होती मात्र ती नावालाच होती. मी तिची कामं करायची. सुनील सांस्कृतिक सचिव होता. कार्यक्रमांत नियमित भेटी व्हायला लागल्या. बोलणं व्हायला लागलं आणि मैत्री वाढत गेली.

सुनील – सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मुलींचा सहभाग कमी होता. दोनतीन मुलीच यायच्या. मुलींशी बोलणार कोण असा प्रश्‍न असायचा. मी धाडस करून कविता करणार्‍या एकदोघींशी बोलायचो. त्यातच शहनाजही होती. ती बोलकी असल्यानं तिच्या माध्यमातून इतर मुलींपर्यंत कार्यक्रमांचे निरोप पाठवायला  लागलो. मुलींचा सहभाग वाढायला लागला. कार्यक्रम करण्याचं हे धाडस मला विद्यार्थी संघटनेतून आलं होतं. मी अकरावी-बारावीतच ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या संपर्कात आलो होतो. होस्टेलवर राहणार्‍या मुलांना त्यांच्या गावाकडून डबे यायचे. मात्र काही गावांत एसटी थांबायच्या नाहीत म्हणून मग डबा यायचा नाही आणि मुलं उपाशी राहायची. त्याविरुद्ध ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशननं मोर्चा काढला होता. मी त्यातून या विद्यार्थी संघटनेकडे आकर्षित झालो. त्या संघटनेच्या कार्यक्रमात सहभागी व्हायला लागलो. बारावीत मी संघटनेचा सांस्कृतिक सचिव झालो. समवयस्क मुलांपेक्षा मी गंभीर, वैचारिक मित्रांमध्ये रमायला लागलो. प्राध्यापक, समाजकार्य करणारी मंडळी हे माझे मित्र होते. त्याच वेळी कॉलेजच्या निवडणुकीत सहभागी झालो आणि निवडूनही आलो. त्याच सुमारास विद्यार्थी संघटनेचा तालुकाचा सहसचिवही झालो. कॉलेजमध्ये विजयी झाल्यानं आपण अधिक कार्यक्रम हाती घेतले पाहिजेत असं वाटायला लागलं. मात्र त्या काळात जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या विद्यार्थी संघटना होत्या. एका पक्षाच्या विद्यार्थी संघटनेनं कार्यक्रम घेतला की तो राजकीय कार्यक्रम समजून इतर विद्यार्थी यायचे नाहीत. हे टाळण्यासाठी सांस्कृतिक संघटना असायला हवी हा विचार मनात आला आणि त्यातून सप्तरंग थिएटर्स सुरू केलं. कॉलेजमध्येही या संस्थेतून कार्यक्रम करायचो. हिच्यामुळं मुलींचा सहभाग वाढायला लागला. कार्यक्रम यशस्वी व्हायला लागले. मग तिला सप्तरंग थिएटर्समध्येही सहभागी करून घेतलं. आमचा चांगला ग्रुप झाला आणि या सगळ्यातून आमची मैत्री टिकून राहिली.

प्रश्‍न – कार्यक्रमांमुळं भेटी होत राहिल्या तरी मैत्री टिकण्याच्या अनुषंगानं एकमेकांमधल्या कोणत्या गोष्टी आवडत होत्या?

शहनाज – कार्यक्रमामुळं आमच्यात घनिष्ठ मैत्री झाली. त्या वेळी प्राचार्य शिवाजीराव देवढे तिथं प्राचार्य म्हणून कार्यरत होते. ते कथा, कविता लिहिणाऱ्यांना सातत्यानं प्रोत्साहन द्यायचे. संवेदनशील मनाचा सुनील कविता लिहायचा त्यामुळं इतरांपेक्षा सुनीलशी असलेली मैत्री जास्त पक्की होत गेली. त्या वेळी मी कॉलेजबरोबरच शेवगावच्या महात्मा सार्वजनिक वाचनालयात पार्टटाईम काम करायचे. सुनील नियमित वाचनालयात यायचा. वाचलेल्या पुस्तकांवर आमच्या चर्चा व्हायच्या. एकदा आमच्या (एसवायबीए इंग्लीश) वर्गातल्या सर्वच विद्यार्थ्यांना समान गुण पडले त्यामुळं सर्वांनी विद्यापीठाकडे तक्रार केली. विद्यापीठावर मोर्चा काढायचं ठरलं. त्या वेळी तो एआयएसएफ या विद्यार्थी संघटनेचा तालुका सचिव होता. कॉ. सुभाष लांडे यांनी सुनीलला या मोर्चाचं नेतृत्व करायला सागितलं. त्यानुसार आम्ही मोर्चा काढला. त्याच्या बातम्या झाल्या. अशा घटनांतून त्याच्याविषयीचा आदर वाढत होता शिवाय त्याचं वागणं पारदर्शी होतं. माझ्या मुस्लीम ओळखीवरून जर कुणी काही उणादुणा शब्द बोललं तर त्याला ते आवडायचं नाही. तो मला त्या व्यक्तींविषयी सावध करायचा. त्यांची संवेदनशीलता आणि वैचारिक समज आवडत होती.

सुनील – कविता हा आमच्यातला कॉमन घटक होताच, शिवाय ती तेव्हाही सर्व उपक्रमांत अ‍ॅक्टिव्हली सहभागी असायची. तिची हुशार, बोलकी, धाडसी वृत्ती आवडत होती. तिचे विचारही शार्प होते. केवळ सांस्कृतिकच नव्हे तर सामाजिक कार्यक्रमांतही तिची साथ असायची त्यामुळं साहजिकच ओढा होता. आम्ही खरंतर कधीही दोघंच आहोत किंवा बाहेर कुठं दोघंच गप्पा मारतोय असं झालं नाही. आम्ही ग्रुपमध्येच असायचो मात्र तरीही आमची वेव्हलेंग्थ जुळत होती हे नक्की.

प्रश्‍न – मग प्रेमाची कबुली कुणी, कशी दिली?

शहनाज – पदवीचं शिक्षण संपल्यानंतर मी शेवगावच्या आदर्श कन्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून नोकरी स्वीकारली तर सुनील एमएसडब्लू करायला अहमदनगरला सीएसआरडीमध्ये गेला. नगरमध्येही त्यांची भाषणं, कविता, कथाकथन असे उपक्रम चालूच होते. शाळेतलं कल्चरल डिपार्टमेंट मीच सांभाळत होते. शेवगाव सोडून नगरच्या फंक्शनमध्येही मी यायला लागले. सुनील एमएसडब्लू करत असल्यानं सामाजिक कामाबरोबरच त्याचीही ओळख झाली. सांस्कृतिकबरोबर सामाजिक कार्यक्रमातही सहभाग सुरू केला. तेव्हा बचत गट ही संकल्पना नवीन रुजत होती. महिलांशी या विषयावर बोलण्यासाठी मला बोलावलं जायचं. असं सगळं चालू असलं तरी आमचा संपर्क काही तुटला नाही. मग एकदा अचानकच सुनीलनं मैत्रिणींकरवी लग्नासाठी विचारणा केली. मी गोंधळून गेले. मी काहीच उत्तर न देता निघून गेले. तो विषय तिथंच अर्धवट राहिला. दोन वर्षांनी पुन्हा प्रश्‍न समोर आला तेव्हा मी होकार दिला आणि शहनाजची शर्मिला झाले.

सुनील – माझं तोवर एमएसडब्लू झालं होतं. मी त्याच कॉलेजमध्ये नोकरी सुरू केली होती. नवजीवन प्रतिष्ठान नावानं सामाजिक संस्था सुरू केली होती. शर्मिलादेखील बीपीएड करून नोकरीत पर्मनंट झाली होती. दोघंही बर्‍यापैकी स्थिर झालो म्हटल्यावर घरातले लोक लग्नासाठी मागे लागले होते. आईवडील शेवगावलाच आले होते. माझे आजोबा खूप आजारी असल्यानं त्यांच्यासमोर माझं लग्न व्हावं अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी मामाच्या मुलीचं स्थळही सुचवलं. तोवर विविध कार्यक्रमांमुळं आमची एक ओळख तयार झाली होती. त्यामुळं आईवडलांना माझ्याबाबत परस्पर निर्णय घेता येईना. शेवटी मीच सांगून टाकलं की, लहान भावाची हरकत नसली तर त्याचं लग्न आधी करा. बहिणीचं ही लग्नं झालं. त्यामुळं लग्नाचं अतिरिक्त प्रेशर नव्हतं. दरम्यान आणखी एक घटना घडली. घोडेगाव इथं एक काव्यसंमेलन होतं. त्याला आम्ही दोघं गेलो होतो. परतताना आम्हीच दोघं होतो. सोबत तिची एक विद्यार्थिनी होती. तिचं नगरमार्गे शेवगावला जायचं ठरलं. त्या वेळी माझी एक विद्यार्थिनी सोबत होती. प्रवासात अनेक विषयांवर चर्चा झाली. चर्चेत लग्नाचा विषय आलाच. या वेळेस मी पुन्हा तिला लग्नाबाबत तू काहीच उत्तर दिलं नव्हतंस असं विचारलं. गप्पागप्पांमध्ये तिनं होकार दिला. लग्न करण्याचा निर्णयच आम्ही नगरला उतरून घेतला.

प्रश्‍न – लग्नाचा निर्णय घेतल्यानंतर त्याबाबत घरी सांगितलं का?

शहनाज /सुनील – नाही. आमच्या धर्माचा अडसर कुटुंबीयांना असणार याची जाणीव होती.

सुनील – लग्नाचा निर्णय विचारपूर्वक होता मात्र लग्नाचा दिवस कोणता असणार हे काही ठरवलं नव्हतं. शर्मिलानं घरातून बाहेर पडावं अशी एक संधी चालून आली होती. बचत गटाची संकल्पना मांडणारे बांग्लादेशचे मोहम्मद युनूस भारतात येणार होते आणि ते दिल्ली युवा केंद्रात बचत गटासंबंधी काम करणार्‍या तरुणांसाठी कार्यशाळा घेणार होते. तिथून शिकून येणार्‍यांनी त्यांच्या भागातल्या महिलांना ट्रेनिंग देणं अपेक्षित होतं. या कार्यशाळेसाठी शर्मिलाची निवड झाली होती. त्यासंबंधीची बातमी प्रसिद्ध झाली तेव्हा टिकली असणारा तिचा नाटकातला फोटो प्रसिद्ध झाला. नाव शहनाज पठाण आणि फोटोत कपाळाला टिकली यांवरून मुस्लीम समाजात खूप गदारोळ झाला. या बातमीवरून तिच्या वडलांनीही विचारणा केली. तिनं नाटकातला फोटो असल्याचं उत्तर दिलं आणि त्यांचं समाधान झालं.

ती या कार्यक्रमासाठी दिल्लीला जाण्यासाठी घराबाहेर पडणार होती तेव्हा तिला विवाहनोंदणीसाठी लागणारी कागदपत्रंही घेऊन यायला लावली. ती नगरला आल्यानंतर आम्ही रजिस्ट्रेशन करायला गेलो मात्र तिथले साहेब म्हणाले, ‘तुम्ही हिंदू आणि मुस्लीम असल्यानं तुम्हाला स्पेशल मॅरेज अ‍ॅक्टखाली लग्नाची नोटीस द्यावी लागेल. मग लग्न होईल. या नोंदणीसाठी तुम्हाला ग्रामपंचायतीचा रहिवासी दाखला द्यावा लागेल. आत्ता जर तुमच्याकडे ती कागदपत्रं नसतील तर रजिस्ट्रेशनही होऊ शकत नाही. आमच्यासोबत वीसपंचवीस जण आलेले होते. त्यांपैकी एकानं हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांना हकिकत सांगितली. मी हिवरे बाजारच्या यशवंत ग्रामीण व पाणलोट विकास संस्थेत जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करत होतो. त्यामुळं पवारांशी चांगले संबंध होते. ते समक्षच तिथं आले आणि त्यांच्यासोबत शेजारच्या गावचे ग्रामसेवक होते. पोपटरावांनी लगेच त्यांच्या गावचा रहिवासी दाखला दिला. ते ग्रामसेवक म्हणाले, ‘तुमच्या गावी जर गोसावी राहू शकतात तर आमच्या गावात पठाण राहू शकतात.’ त्यांनीही तिचा रहिवासी दाखला दिला. अशा तर्‍हेनं रजिस्ट्रेशन झालं. तिथल्या साहेबांचं म्हणणं होतं की, समजा… आम्ही आधी कुठल्याही धार्मिक पद्धतीनं लग्न केलं आणि मग नोंदणी करायला आलो तर अडचणी कमी येतील पण त्यासाठी किमान लग्नविधीचा फोटो हवा.

शहनाज – त्याच संध्याकाळी रेल्वेनं मला दिल्लीलाही जायचं होतं. त्याच वेळेस काही मित्रांनी विहारात आमच्यासाठी लग्नपद्धतीची व्यवस्था केली त्यामुळं आमचं लग्न तीन पद्धतींनी झालं. विहारात बौद्ध पद्धतीनं, नोंदणी विवाह आणि सत्यशोधकी पद्धतीनं. 25 नोव्हेंबर 1997 ही आमच्या लग्नाची तारीख. एकाच दिवसात लागोपाठ बर्‍याच गोष्टी घडल्या. त्यात दिल्लीप्रवासही रद्द झाला. तेव्हा इंद्रकुमार गुजराल यांचं सरकार केंद्रात होतं आणि ते सरकार गडगडल्यामुळं त्यांनी आखलेले कार्यक्रमही रद्द झाले होते. विवाह नोंदणी असेल, बौद्ध पद्धतीचं लग्न असेल… हे करून पुन्हा घरी कसं जाणार असा प्रश्‍न होता. आमच्यासोबत तेव्हा सुनीलचे शिक्षक प्रा. डॉ. विजयकुमार पोटे होते. ते म्हणाले, ‘आमच्या शेजारच्यांची एक खोली रिकामी आहे. दिल्ली दौऱ्यासाठी तिचा जो कालावधी होता तितके दिवस तरी तुम्ही त्या खोलीवर राहू शकता. पुढचं पुढं पाहू.’ त्या वेळेस मी नोकरीला होते शिवाय दिल्लीला जाण्यासाठी म्हणून कमीजास्त पैसे आणले होते. त्यातून संसारोपयोगी थोडं सामान खरेदी केलं. नवीन लग्न होऊन आलोय असं भासवणंही आवश्यक होतं आणि ते घर गाठलं. पुढचा काहीच विचार न करता आम्ही संसाराला सुरुवात केली.

प्रश्‍न – एकाच दिवसांत फारच नाट्यमय घडामोडी घडत गेल्या…लग्न झाल्यावर मग घरी कसं समजलं? त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या?

सुनील आम्ही भाड्यानं खोली घेतली तरी माझी आधीची खोली सोडली नव्हती. नेमकं त्या वेळेस आमच्या मेहुण्यांनी माझ्यासाठी एक स्थळ आणलं. ती मुलगीपण एमएसडब्ल्यू होती. सामाजिक कार्याची आवड असणारी मुलगी मी शोधतोय असं मेहुण्यांना आधी सांगितलं होतं. त्यामुळं त्यांनी आता तशीच मुलगी शोधून आणली होती… पण मी तरीही नकार देतोय म्हटल्यावर त्यांना थोडा संशय यायला लागला आणि कसं काय माहीत नाही पण दुसर्‍याच दिवशी त्यांना रजिस्ट्रर ऑफिसमधली नोटीस माहीत झाली. त्यांनी मला थेट जाब विचारला. मी म्हटलं, ‘मग आता घरी कळवण्याचं कामही तुम्हीच करा.’

…आणि तसंच झालं.

मी नियमितपणे ऑफिसात असताना माझे घरचे, नातेवाईक ऑफिसला आले. अर्थात ऑफिसात आधी फक्त मामा आला. बाकीचे खालीच उभे राहिले. मी रूमवर चाललोय हे मी मुद्दाम जोरात सरपंचांना सांगितलं. याचा अर्थ तुम्ही कुणालातरी पाठवा असा होता. जिना उतरताना इतर मामा नातेवाईक मागून-मागून यायला लागले. पुढं मावशापण दिसायला लागल्या. म्हटलं आता काय प्रोब्लेम नाही. यांच्यासमोर किमान मारून टाकणार नाहीत. रूमवर नेऊन चर्चा सुरू केली. ‘लग्न केलंय का? मुलगी दाखव’ म्हणून दबाव टाकायला लागले. मार सोडला तर बाकी हरतर्‍हेनं प्रयत्न करून ते धमकावायला लागले. आईसुद्धा मी डोकं आपटून घेईन वगैरे म्हणून इमोशनल ब्लॅकमेलिंग करायला लागली. मी लग्नच केलं नाहीये असा पवित्रा घेतला. शर्मिला तर दिल्लीत आहे असं सांगितलं. त्यांनी मला कितीही चिडवायचा प्रयत्न केला तरी मी चिडत नव्हतो. तोपर्यंत पोपटराव पवारांनी दोन माणसांना रूमवर पाठवलं होतं. रूममध्ये तीनचार जण आधीच होते. दोनतीन तास चर्चा अशीच लांबत गेली. शेवटी मोठा मामा वैतागून म्हणाला, ‘याच्या नादी लागून उपयोग नाही. आजपासून याच्याशी आपला संबंध संपला.’ वडील काही आले नव्हते. तो स्वतःहून येईल तेव्हा पाहू असा त्यांनी पवित्रा घेतला होता पण ते दिवस खूप तणावात राहिले.

शहनाज – मी तशी ओझरती कल्पना वडलांना दिलेली होती. माझ्यासाठी आत्याच्या मुलाचं स्थळ आलं होतं. आत्या वडलांना वारंवार विचारत होती. तेव्हा वडील तिला म्हणाले, ‘ती स्वतंत्र विचारांची आहे. मी तिच्याबाबत तिला न विचारता निर्णय घेऊ शकत नाही.’ त्यांनी मला विचारलं. मी नकार दिला. मी त्याच वेळेस त्यांना सुनीलविषयी कल्पना दिली. तेव्हा ते म्हणाले, ‘तू जर असा काही निर्णय घेणार असशील तर तू घरात परत येऊ नकोस. पुढं तू आणि तुझं नशीब.’ त्यांनाही कल्पना होती की, मी एकदा निर्णय घेतला तर तो पक्काच असतो. त्यांनी मला सपोर्ट केला नाही. विरोधही केला नाही. पुढं जेव्हा नातेवाइकांना लग्नाचं माहीत झालं तेव्हा आकांडतांडव करणार्‍यांनाही वडलांनी तुम्ही तिच्या वाट्याला जाऊ नका म्हणून सुनावलं. सुनील घरी येत होता. त्याच्याशी अब्बांच्या बर्‍याच गप्पा व्हायच्या. तो खूप चांगला आहे हे त्यांनाही माहीत होतं त्यामुळं ते म्हणाले, ‘आत्ताची कंडिशन अशा लग्नाबाबत सगळं समजून घेण्याची नाही. त्यामुळं तू परत आमच्याकडे येऊ नकोस.’ शाळेतूनही मला सपोर्ट होता.

प्रश्‍न – पण अजून नोंदणी पद्धतीनं विवाह होणं बाकी होतं. अशा परिस्थितीत इतका ताण पेलणं शक्य झालं?

सुनील – पर्याय तर नव्हता… शिवाय घरच्यांना शिकवणारे लोक बरेच होते. यांचं लग्न अजून झालं नाही, नुसती नोटीस दिलेली आहे हे कुणीतरी त्यांना सांगितलं तसे ते अ‍ॅग्रेसिव्ह झाले. त्यामुळं महिनाभरासाठी शर्मिलाला सुरक्षित जागी ठेवणं गरजेचं होतं. नाशीकच्या अभिव्यक्ती संस्थेत विलास शिंदे म्हणून कोऑर्डिनेटर होता. ते म्हणाले, ‘तिला आमच्याकडे पाठव. महिनाभर राहील आमच्याकडे.’ शाळेत रजेचा अर्ज दिला. महिन्याभरानं शेवटी एकदाचं रजिस्ट्रेशन झालं. त्यानंतर मित्र म्हणायला लागले, रिसेप्शन द्या म्हणजे लोकांना कळेल की, लग्न झालंय. त्यामुळं आम्ही कवीसंमेलन आणि रिसेप्शन असा कार्यक्रम करायचा ठरवलं. दोन ठिकाणी कार्यक्रम ठेवले. जेवण आणि कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले. उद्देश हा की, कुणाला काही उपद्रव करायचा असेल तरी त्यांना कुठं कोणता कार्यक्रम आहे याचा पत्ता लागू नये. त्या वेळेस नगर कॉलेजचे प्राचार्य, चांगली माणसं कार्यक्रमाला आली. दोनशे लोक आले. मग समारंभच झाला. पत्रकारांनी बातम्या केल्या. सामाजिक कार्यकर्ते असणार्‍या हिंदू-मुस्लीम तरुणांनी लग्न केलं वगैरे. त्यानंतर जिल्हाभर बातमी झाली. शेवगावात मोजक्या लोकांना माहीत होतं ते यानंतर सगळ्यांना माहीत झालं. शर्मिलाची नोकरी शेवगावात होती. शेवटी तिला जाणं भाग होतं पण कालांतरानं जिवाची भीती वाटून तिथल्या नोकरीचा राजीनामा दिला.

प्रश्‍न – जिवाची भीती… असं काही होऊ शकेल अशी शक्यता वाटत होती का?

सुनील – हो. शेवगावात दंगलींचे प्रकार घडलेले होते. आमचे कुटुंबीय नसले तरी स्थानिक समाजबांधवांपैकी कुणी जर काही त्रास दिला तर… मारून टाकलं तर… अशा तर्‍हेची भीती वाटत होतीच त्यामुळं नोकरी होती तोवर पोलिसांना लग्नाबाबत कल्पना देऊन संरक्षणाची हमी घेतली. शाळेत येऊन कुणी त्रास देतंय का अशी विचारणा पोलिसांनीपण केली त्यामुळं गावात ही बातमी वार्‍यासारखी पसरली. मुख्याध्यापिका बाईंनीपण बसस्टँडपर्यंत तिच्यासोबत कायम एक शिपाई पाठवला. टर्म संपल्यानंतर शाळेवर दबाव आणून बदलीचे प्रयत्न सुरू झाले होते. शेवटी आम्हीच राजीनामा दिला. अर्थात तेव्हा आम्ही थोडं धीरानं घ्यायला हवं होतं असं आता वाटतं. पण तेव्हाची परिस्थितीच तशी भीतीची होती.

प्रश्‍न – मग कुटुंबीयांसोबत कधी बोलाचाली सुरू झाल्या?

शहनाज – लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळीला सासरे आम्हाला बोलवायला आले. खरंतर मी त्यांच्या घरी जायचे तर त्यांच्याशी चर्चा व्हायच्याच. मी शिक्षक असल्यानं त्यांना माझ्या पेशामुळं जिव्हाळा वाटायचा. शिक्षण आहे याचं कौतुक होतं. तेही आमच्या कार्यक्रमांना उपस्थित असायचे त्यामुळं कार्यक्रमातला माझा वावर त्यांना ठाऊक होता. त्यांनीही कधी विरोध केला नाही आणि बाजूही घेतली नाही. ते स्वतःच दिवाळीला बोलवायला आले. वेगळ्या धर्माची गोष्ट आईला खटकत होती. पण त्याचा उपयोग काय होता. सासरे कायमच चांगले वागले. त्यांनी माझ्याशी बोलताना कधीच कुठलेही चुकीचे शब्द वापरले नाहीत.

उलट माझ्या घरच्यांसोबत नातं पूर्ववत व्हायला जास्त वेळ लागला. लग्नाच्या दोन वर्षांनी दिशा झाली. त्यानंतरच भेट झाली. तेही बहिणीच्या मैत्रिणीमुळं. बहिणीची मैत्रीण मला एका कार्यक्रमात भेटली. तिथं मला कवी मंगेश पाडगावकरांच्या हस्ते पुरस्कार मिळाला होता. तिनं कार्यक्रमात माझं होत असलेलं कौतुक पाहिलं. ती स्वतः सुनीलशी बोलली. त्यामुळं तिला तो एक चांगला माणूस असल्याची खातरी वाटली आणि मग तिनं हीच हकिकत माझ्या बहिणीला सांगितली. मी माझ्या घरात, संसारात सुखी आहे. सारं काही नीट आहे. मोठे मेहुणे मुलीसारखेच ट्रीट करायचे. मग ते आम्हाला शोधत-शोधत घरी आले. दोन दिवस राहून त्यांनी स्वतः खात्री करून घेतली. मग ते कायम येत राहिले. नंतर मीही जात राहिले. त्यानंतर मग सगळ्या बहिणींशी संवाद सुरू झाला.

प्रश्‍न – यानंतर तुमची नाती पूर्ववत झाली का?

शहनाज – आमचं जाणंयेणं सुरू झालं. कटुता पूर्णतः संपली असं नाही. संघर्ष आयुष्यभर राहिला. तुम्ही मात्र किती फर्म आहात तुमच्या प्रेमसंसारात हे महत्त्वाचं असतं. आता आम्ही कुठलाच धर्म पाळत नाही. रुढीपरंपरा पाळाव्यात अशा अपेक्षा होत्या. धर्माप्रमाणे राहावं, पूजा-उपासतपास करावं अशी अपेक्षा होती किंवा दिशाला त्याप्रमाणे घडवावं अशी त्यांची इच्छा होती. ज्या संकल्पना आम्ही मानतच नाही त्यांत कधीच समझोता आम्ही करू शकत नाही. भारावून जाऊन स्वतःमध्ये बदल करून टाकावेत असं काही अल्लड वयातलं लग्न नव्हतं. चळवळीतून, वैचारिक घुसळणीतून घडत होतो, त्यामुळं आमची मतं पक्की झाली होती. कुटुंबीयांच्या मनासारखं वागायचं म्हणजे आपले मूळ विचार सोडून देण्यासारखं होतं. उदाहरणार्थ, आता पाया पडणं हे मला पटत नाही. माझ्या दृष्टीनं म्हटलं तर आपण सर्व समान आहोत त्यामुळं मला व्यक्तींच्या पाया पडणं ही संकल्पना पटत नाही. समोरच्या व्यक्तीचा आदर आहे मात्र झुकणं अमान्य. मी सासूसासर्‍यांच्याही पाया पडले नाही. आता पाया नाही पडलं तर नातेवाइकांना, लोकांना वाटतं की, किती उद्धट आहे. स्वतःला शहाणी/ग्रेट समजते असा अर्थ काढतात. अर्थात त्यांचा विरोधही अपेक्षितच आहे, अध्याहृत आहे. जग काय लगेच बदलणार नाही. पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर आपण वागत राहिलो तर आपल्या वेगळ्या पद्धतीनं जगण्याला काही अर्थच राहत नाही. लग्न फक्त एकत्र रहाण्यासाठी नाही केलेलं. आपलं वागणं जर आपण त्यांच्यासाठी बदलून टाकलं तर मग आपल्याच तत्त्वाला काही अर्थ उरणार नाही. आपण ठाम राहायचं आणि त्यांचा विरोध सहन करत-करत जगायचं हे आमचं तत्त्व.

प्रश्‍न – मुलीला वाढवताना आंतरधर्मीय विवाहामुळं काही वेगळा विचार केला होता का?

शहनाज दिशाला लहानपणी वाटायचं, आईकडं गेल्यावर हिंदीत, वडलांकडं गेल्यावर मराठीत बोलायचं. कॉलेजात गेल्यावर मात्र काहीजण तिला विचारू लागले, तू मंदिरात जात नाहीस, उपास करत नाहीस.  मुली परीक्षेआधी मंदिरात जातात. पण हिचं तसं काहीच नाही. शाळेतही ती मानवतावादी शिकवण देणारीच होती. तिच्या दृष्टीनं आपण जे जगतोय ते नॉर्मल आहे असंच तिला वाटायचं. इतर कुणी सांगण्याआधी आम्ही तिला आधीच सांगितलं. आमचे जे मित्रमैत्रिणी आहेत ते घरी यायचे तेव्हा आम्ही कसे, काय काय काम करायचो ते आमच्याविषयी तिला सांगायचो त्यामुळं तिला वेगळं काही वाटलंच नाही. दिशानं निधर्मी राहायला हवं, भारतीय पद्धतीनं जगावं असं आम्हाला वाटतं. आम्ही तिला एक गोष्ट सांगतो. आपली वैचारिक पातळी घसरू द्यायची नाही. दिशा स्वतःच समजूतदार मुलगी आहे. शेवगावच्या शास्त्रीनगरमधल्या घरी गेल्यावर कसं वागायचं आणि ‘बरात मंजिल’मध्ये गेल्यावर कसं वागायचं हे आपसूकच तिला कळतं.

प्रश्‍न – लहान गावांमध्ये आंतरधर्मीय विवाह कसे स्वीकारले जातात? तुमचा काय अनुभव…

शहनाज – लहानलहान गावांत सहजता यायला वेळ लागेल. अजूनतरी तितक्या सहजपणे स्वीकारले जात नाही. बर्‍याच जणांनी आम्हालाही तोडण्याचा प्रयत्न केला. आमचं लग्न वर्ष-दोन वर्षांपेक्षा जास्त टिकणार नाहीत अशा अफवा पसरवल्या. तसं पाहता आमच्या राहणीमानात जमीनअस्मानचा फरक आहे. पठाण लोक स्वतःला मोठे समजतात. त्यात आमचं सुशिक्षित कुटुंब स्वतःला पठाण म्हणजे जरा मोठं समजाणारी मंडळी. खूप लोक सांगायचे, आमचे परिचित लोक सांगायचे की, एकदोन वर्षांपेक्षा जास्त आमचं लग्न टिकणार नाही. आमच्या बॅकग्रॉउंड्सही भिन्न होत्या. आम्ही काय कपड्यांच्या दोन बॅगा घेऊन संसाराला सुरुवात केली होती. माझ्याकडे नोकरी होती. पण त्याला त्याच्या सोशल वर्कमध्ये पुरेसा पैसाही नव्हता. आजही नाहीये. आम्ही आमच्या विचारांशी, तत्त्वांशी ठाम राहिलो, निर्णयाशी प्रामाणिक राहिलो त्यामुळं आम्हाला फार काही त्रास झाला नाही.

प्रश्‍न – अजूनही आपल्याकडे अर्थार्जन हे पुरुषांचं काम म्हणून पाहिलं जातं. स्त्रीनं कमावती असली तरी तिच्या कमाईकडे सपोर्टिव्ह पैसे म्हणूनच पाहिलं जातं… तर तुम्हाला कधी नवर्‍याच्या कमाईच्या अनुषंगानं असुरक्षित वाटलं?
शहनाज – कमाई ही काही समाधानाची मोजपट्टी नाही. तसं पाहता आम्ही बहिणींनी स्वतःचं शिक्षण स्वतः पूर्ण केलं आहे. मी तर लायब्ररीत नोकरी करतच होते की. घरकाम आणि बाहेरचं काम करण्याची पहिल्यापासूनच सवय होती शिवाय सुनीलची कमाई तर सुरुवातीपासूनच मला माहीत होती. पण त्यापेक्षा वैचारिक बैठक जास्त महत्त्वाची वाटते. माझ्यात कमवण्याची क्षमता असेल तर नवर्‍यानंच कमवून आणावं अशी अपेक्षा का करायची? मला त्याच्यातले इतर गुण महत्त्वाचे वाटत होते. मी आजही त्याच्यापेक्षा जास्तीचे पैसे कमवते याचं मला अप्रुप वाटत नाही आणि त्यालाही हे वेगळं वाटत नाही. शेवटी आम्ही जे करतोय ते एकमेकांसाठी, एकमेकांच्या आनंदासाठीच करतो. बरीच मुलं आईवडलांच्या पैशांवर जगतात. दिखावा करणार्‍या मुलांपेक्षा सुनील खूप चांगला, विचारशील मित्र आहे. पैसा गौण मुद्दा आहे.

प्रश्‍न – एवढ्या चढउतारानंतरही तुमचं सहजीवन फुलत गेलं ते कशाच्या आधारावर… असं वाटतं?
शहनाज – आमच्या दोघांचीही विचारसरणी एकच आहे. कुठलंही बंधन आम्ही एकमेकांवर लादत नाही. त्यामुळंचं तर आमचं पटतं. शिवाय सुनील अतिशय शांत,  संयमी स्वभावाचा आणि मी स्पष्टवक्ती. सुनीलचा स्वभाव मुळातच शांत असल्यानं अनेकदा भांडणाचा प्रसंग ओढवला तरी तो गप्पच असल्यानं भांडणं वाढत नाहीत. मुळात कोणत्याही दोन व्यक्तींचं पटण्यासाठी त्यांच्यात मैत्री असणं आवश्यक असतं. एकमेकांवर विश्‍वास असला पाहिजे. एकमेकांना समजून घेण्याची कुवत असली पाहिजे. एकमेकांचे विचार तंतोतंत नाही जुळले तरी काही गोष्टी तरी सामाईक असायला हव्यात. या सगळ्या गोष्टी आम्हा दोघांत आहेत म्हणूनच तर एक यशस्वी दाम्पत्य म्हणून आम्ही समाजात, मित्रपरिवारामध्ये परिचित आहोत. आम्ही आमच्या लग्नाचे वाढदिवसही मित्र परिवारासोबत साजरा करतो.

मला एक नेहमी वाटतं, स्त्रियांनीही आपल्या निर्णयावर ठाम राहणं, सर्व तर्‍हेच्या संकटांसाठी तयार राहणं गरजेचं आहे. अनेकदा प्रेमात आवश्यक असणारी हिम्मत त्या दाखवत नाहीत. लगेच घाबरून जातात. आपण जे धाडस करत आहोत त्याच्या वाटेत काटे आहेत हे कोणतंही पाउल उचलण्याआधी लक्षात ठेवायला हवं. आपले दिवस बदलण्याची ताकद स्त्रियांमध्ये जास्त असते. आपण जे निर्णय घेतो त्याबाबत आपल्याला समाधानाची भावना वाटत असेल तर तो निर्णय आपण बिनधास्त घ्यावा. हीच भावना आमच्या लग्नात आहे. तुम्ही यश कशात पाहता… पैशांत की तुमच्या अंडरस्टँडिंगमध्ये? यावर तुमचं नातं बहरणार कि कोमेजणार हे ठरतं. आम्ही आमच्यातला विचार महत्त्वाचा मानला. बाकी गोष्टी गौण होत गेल्या. एकमेकांना समजून, सांभाळून घेत पुढं जात असल्यानंच कदाचित आमचं सहजीवन यशस्वी झालंय.

[email protected]

(ही मुलाखत ‘कर्तव्य साधना’ च्या https://kartavyasadhana.in/ या वेब पोर्टलवरून घेतला आहे .अनेक विषयांवरील उत्तमोत्तम लेख/मुलाखती वाचण्यासाठी या पोर्टलला नियमित भेट द्यायला विसरू नका.)

…………………………………

१. समीना-प्रशांत: विवेकी जोडीदाराची निवड म्हणजे सुंदर सहजीवनाकडं वाटचाल-https://bit.ly/3sACons

२. धर्मारेषा ओलांडताना-श्रुती पानसे आणि इब्राहीम खा-https://bit.ly/30HHulP

३. प्रज्ञा केळकर – बलविंदर सिंग: सहजीवनात कुटुंबाची सोबत अधिक अर्थपूर्ण! https://bit.ly/2PdAUkU

४. अरुणा तिवारी-अन्वर राजन: सहजीवनाची भिस्त प्रेम, विश्‍वास आणि कमिटमेंटवर!https://bit.ly/3mBVFmF

५.  दिलशाद मुजावर आणि संजय मुंगळे:माणूस म्हणून वाढण्यासाठी धार्मिक भिंती तोडल्या पाहिजेतhttps://bit.ly/2RZ1izX

६.हसीना मुल्ला – राजीव गोरडे: धर्मजातीच्या आंधळ्या संकल्पनांतून बाहेर यायला हवं https://bit.ly/2QJrePQ

७.महावीर जोंधळे आणि इंदुमती जोंधळे: एकमेकांच्या पायांत गुंता न करताही छान जगता येतं.https://bit.ly/3x8cVnp 

८. मुमताज शेख – राहुल गवारे…तक्रार करण्यासाठी जागा मिळाली की निम्मी भांडणं कमी होतातhttps://bit.ly/2U7YEJh

९.जुलेखा तुर्की-विकास शुक्ल: आम्हाला एकमेकांच्या सोबतीचा कधीही कंटाळा येत नाही!-https://bit.ly/3xQB56Q

१०.वर्षा ढोके आणि आमीन सय्यद: जात-धर्म-लिंगनिरपेक्ष राहणं हाच आमच्या सहजीवनाचा आधार-https://bit.ly/2TYwMYw

 

Previous articleअफगाणी महिलांच्या अगणित धाडसी प्रयत्नांचं आता काय होणार?
Next articleकान्होबा
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here