प्रशांत किशोर, एका सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा, ज्याला राजकारणात यायचं नव्हतं.
ते आडनाव लावत नाही. जात सांगत नाही.
राजकीय ‘हुजरेगिरी’ करताना दिसत नाही.
सोयीचं बोलण्यापेक्षा ‘स्पष्ट’ बोलतात.
भारतीय राजकारणात लागू न होणार्या सगळ्या गोष्टी ते करतात आणि तरीही भारतीय राजकीय पटलावरचा सगळ्यात प्रभावशाली जादूगार, ‘राजकीय विझार्ड’ म्हणून आज त्यांची गणती होते आहे. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे त्यांना पक्ष सोडावे लागले, पण त्याचं वाईट त्यांना वाटत नाही.
ते म्हणतात, ‘मी स्तुतिपठण करण्यासाठी काम करत नाही, वस्तुस्थिती दाखवण्यासाठी करतो.’ तरीही, सगळ्यांना त्यांच्याबरोबर काम करायचं आहे, त्यांना कुणी काम देऊ शकत नाही. कारण, ते काम निवडतात. असं कुठलं ‘मॅजिक पोशन’ त्यांच्याकडे आहे की, ते ज्या पक्षासाठी आणि राजकीय नेत्यासाठी ‘राजकीय रणनीतीकार’ म्हणून काम बघतात, तो पक्ष आणि तो नेता सत्तेवर येतोच येतो. अपवाद आहेतच. खरंतर, राजकीय रणनीतीकार हा शब्दही त्यांना आवडत नाही. ‘मी फक्त राजकीय पक्षांना मदत करतो,’ असं ते अतिशय नम्रपणे सांगतात. संयुक्त राष्ट्रसंघासाठी आठ वर्षे आंतरराष्ट्रीय राजकारणातील रणनीतीकार म्हणून काम बघितल्यावर 2012 पासून भारतीय राजकारणाच्या पडद्यामागे त्यांनी काम सुरू केले आणि भारतीय राजकीय पटलावर झालेले बदल सगळ्यांनीच बघितले आहेत.
2014 ला भाजपाचा राजकीय रणनीतीकार म्हणून काम बघितलं आणि दिल्लीचं तख्त काबीज करण्याची भाजपाची फार जुनी इच्छा सुफळ झाली. मोदी सरकार आलं. भारतीय राजकारणात आणि समाजात प्रचंड मोठ्या उलथापालथीला सुरुवात झाली. त्यांच्या रणनीतीमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेच, पण त्याचबरोबर नितीश कुमार, अमरिंदरसिंग, अरविंद केजरीवाल, जगनमोहन रेड्डी, एम. के. स्टॅलिन आणि ममता बॅनर्जी मुख्यमंत्री पदावर निवडून आले.
मोदी आणि प्रशांत किशोर यांची पहिली भेट 2011 मध्ये झाली. गुजरातच्या कुपोषणाच्या समस्येविषयी चर्चा करण्यासाठी. काम सुरू झालं. हळूहळू परिचय झाला आणि राजकीय सल्ला देण्यापर्यंतचा विश्वास निर्माण झाला. प्रशांत किशोर त्यांच्या एका मुलाखतीत म्हणतात, ‘राजकीय रणनीतीकार अचानक तयार होत नाहीत. मी आज ठरवलं की, मी सल्लागार होणार आणि उद्या तुम्ही एखाद्या व्यक्तीला/ नेत्याला सल्ला द्यायला लागलात, असं घडत नाही. ही हळूहळू विकसित होत जाणारी प्रक्रिया आहे. तुम्ही एखादा निर्णय घेता, तो बरोबर येतो, मग त्या निर्णयाच्या आधारावर अजून एखादा निर्णय घेता, मत मांडता, तेही योग्य सिद्ध होतं आणि मग हळूहळू सल्लागार, तुमचा प्रवास सुरू होतो.’
हे कितीही खरं असलं, तरीही मोदींना निवडून आणण्यापासून ते मोदींचं ‘लोकहितवादी’ नसणं, हा त्यांचा सगळ्यात मोठा ‘वीकपॉईंट’ आहे, ते कुणाचेही मित्र होऊ शकत नाहीत, असं म्हणण्यापर्यंतचा प्रशांत किशोर यांचा प्रवास अतिशय रंजक आहे. कारण, एकीकडे मोदींना पंतप्रधान पदावर बसवण्यासाठी मदत करणं, तर दुसरीकडे 2014 नंतर अनेकदा त्यांनी मोदींच्या कामकाजावर टीका करणारे ट्विट्सही उद्विग्नपणे पोस्ट केल्याचं दिसून आलं आहे. एका माणसाची जनमानसात एक प्रतिमा तयार करणं, देशाच्या हिताची सूत्रं त्या व्यक्तीने ताब्यात घेण्यासाठी मदत करणं आणि कालांतराने आपण ज्या व्यक्तीला सर्वोच्च पदावर विराजमान होण्यासाठी मदत केली, ती व्यक्ती देशाचा आणि समाजहिताचा विचार करत नाहीये, ही जाणीव होणं, त्यातून निर्माण होणारी उद्विग्नता त्यांच्या ट्विट्समध्ये असायची. पण, अर्थातच मोदींना निवडून आणण्यासाठी मदत करण्याचा ‘गिल्ट’ मात्र प्रशांत किशोर यांना नाहीये. ते म्हणतात, ‘मला गिल्ट नाही, मी शिकलो. आपल्या प्रत्येक निर्णयातून आपण काहीतरी शिकत असतो. तसंच, याही अनुभवातून मी शिकलो.’
खरंतर, प्रशांत किशोर यांनी मोदींना निवडून आणलं, असं म्हणणंही जरा अतिरंजितच ठरेल; कारण 2014 मध्ये केंद्रात भाजपा सरकार येण्यामागे अनेक घटकांचा आणि घटनांचा सहभाग होता. अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनापासून निर्भया केसपर्यंत अनेक गोष्टी साचून आल्या होत्या. मनमोहन सिंग सरकारच्या दोन टर्म्स झाल्या होत्या. दहा वर्ष एकच सरकार होतं, लोकांना बदल हवा होता. मोदींनी मुख्यमंत्री म्हणून गुजरातच्या केलेल्या विकासाच्या आणि अद्भुत बदलाच्या खर्या-खोट्या कहाण्या पसरून माणसं आधीच भुललेली होती. मोदींचा आरएसएस प्रचारक म्हणून जनमानसातला 15 वर्षांचा अनुभव, त्यानंतर बीजेपीच्या राजकीय पटलावरचा 15 वर्षांचा अनुभव आणि त्यानंतर गुजरात सरकारमधला अनुभव, अशी वैविध्यपूर्ण अनुभवांची पोटली, सोशल मीडियाची ताकद मोदींसकट बीजेपीला समजली होती, ती ताकद त्यांना वापरता येत होती आणि या सगळ्या मिश्रणाला प्रशांत किशोर यांनी तडका मारला.
त्यांचा हा ‘तडका’ हीच एक अद्भुत रेसिपी आहे. या रेसिपीचं यश नेमकं कशात आहे? तर, प्रशांत किशोर तीन महत्त्वाचे मुद्दे सांगतात.
एक, मोकळा विचार.
दोन, त्यांच्याकडे असलेला जमिनी तपशील किंवा डेटा आणि
तीन, कॉमन सेन्स.
जो भारतीय राजकीय आणि सामाजिक पटलावरून जवळपास नाहीसा झाला आहे. नव्या शक्यतांचा, नव्या पद्धतींचा विचार करण्याचा मोकळेपणा प्रशांत किशोर यांच्या कामात आहे, हे त्यांनी दिलेल्या रिझल्ट्सवरून सिद्ध झालंच आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन डेटाचा वापर निवडणुकांमध्ये कशा पद्धतीने होतो, हे आपण गेल्या अनेक निवडणुकांमध्ये बघतोच आहोत. पण, कॉमन सेन्स हा एक असा मुद्दा आहे, जो आपल्याकडे असतो, पण वापरत कुणीच नाही. प्रशांत किशोर म्हणतात, ‘आम्ही जे काम करतो, त्यातला बराच भाग कॉमन सेन्सवर आधारित असतो. 10 पैकी 9 गोष्टी ज्या आम्ही करतो, त्या नेत्यांना आणि पक्षांना माहीत नसतात असं नाहीये, पण काहीवेळा त्या गोष्टी करण्याची नेत्यांची, पक्षांची चिकाटी कमी पडते, दृष्टिकोनात गडबड असते किंवा काहीवेळा जशा गोष्टी घडायला हव्यात, तशा त्या घडत नसतात. तिथे आमचं काम सुरू होतं. नेत्यांना/ पक्षाला या सगळ्याची जाणीव करून देणं, त्यांना गोष्टी प्रत्यक्षात घडवण्यासाठी मदत करणं, दृष्टिकोन बदलाची जाणीव करून देणं आणि जमिनी वास्तवाची माहिती देणं.’
भारतात 2014 ला मोदी सरकार निवडून आल्यानंतर तिकडे अमेरिकेत ट्रम्प सरकार आलं आणि केंब्रिज अॅनालिटिका केस झाल्यानंतर एकूण निवडणुकीत सोशल मीडियाचा असलेला हात, हा प्रचंड चर्चेचा आणि खळबळजनक गॉसिपचा विषय बनला. अमेरिकन निवडणुकीतील केंब्रिज अॅनालिटिकाचा हात याचे तपशील आपल्याकडे आहेतच, पण भारतीय निवडणुकीबाबतीत तसे काही तपशील अद्याप उपलब्ध नाहीत. दुसरीकडे, भारतात अजूनही लोकसंख्येच्या जवळपास 50 टक्के जनता ऑनलाईन नाहीये. हे लक्षात घेता, सोशल मीडिया निवडणुकांवर प्रभाव टाकतो का, हा खरंतर विचार करण्यासारखा मुद्दा आहे. याही बाबतीत प्रशांत किशोर यांचं म्हणणं ठाम आहे. ‘सोशल मीडिया म्हणजे जमिनी वास्तव नाही. सोशल मीडिया निवडणूक फिरवतो-घडवतो, या निव्वळ कल्पना आहेत. अत्यंत ओव्हररेटेड विचार आहे. निवडणुकीत कोण जिंकेल आणि कोण हारेल, याचा अंदाज फक्त प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन काम केल्यावरच येऊ शकतो. सामान्य माणसांच्या अनुभवांवर, ज्ञानावर आपला विश्वास हवा.’
हे फार महत्त्वाचं आणि त्यांच्या यशाचंच गुपित आहे बहुधा! भारतीय समाजरचनेत आणि राजकीय सामाजिक वर्तुळात सामान्य माणसांना कमी लेखत, त्यांना काही समजत नाही, असा एका विचार कळत नकळत पोसला गेला आहे. बुद्धिजीवी मंडळींना फक्त समाजाचं अॅनालिसिस करता येतं आणि ते जे सांगतात, बोलतात तेच वास्तव असतं, असं मानण्याकडे कल असणारा मोठा समुदाय विकसित झाला आहे. यावर अनेक बुद्धिजीवी मंडळींची पोटं चालतात, हे निराळंच वास्तव. ते असो! पण, प्रशांत किशोर यांच्या कामाची पद्धत यापेक्षा फारच निराळी आणि थेट आहे. एसी रूम्समध्ये बसून जमिनी वास्तवावर चर्चा करण्यापेक्षा आणि त्या चर्चांवर आधारित निष्कर्ष काढण्यापेक्षा रस्त्यावर उतरून, गावागावात फिरून, माणसांना भेटून, त्यांच्याशी बोलून, त्यांना नक्की काय हवंय, त्यांचे त्रासाचे, आनंदाचे, अपेक्षांचे मुद्दे समजून घेऊन त्या आधारावर डेटा तयार करणं, याला प्रशांत किशोर प्रचंड महत्त्व देतात. सामान्य माणसांच्या विचारक्षमतेवर, ‘विस्डम’वर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे, हा त्यांच्या कामाचा पाया आहे; आणि हाच त्यांच्या यशातला एक अत्यंत महत्त्वाचा घटक! प्रसिद्ध पत्रकारांपासून इंटेलेक्चुअल्सपर्यंत अनेक जाणकारांच्या राजकीय भाकितांच्या गेल्या काही वर्षात चिंधड्या का उडाल्या आणि प्रशांत किशोर यांनी ‘अमुक तमुक’च निवडून येणार असं म्हटल्यावर, ती व्यक्ती/पक्ष का निवडून आला, यामागे हे सामान्य माणसांचं ‘विस्डम’चं कारणीभूत आहे. जे भल्या भल्यांच्या नजरेतून सुटलं.
प्रशांत किशोर आणि त्यांची टीम जमिनीवर उतरून, माणसांना भेटून, त्यांच्यात वेळ घालवून त्यांचं आयुष्य समजून घेत डेटा तयार करते. ‘गृहितकांच्या’ आधारावर त्यांचं काम चालत नाही आणि हे ते आणि त्यांची टीम प्रत्येक निवडणुकीत, प्रत्येक कॅम्पेनमध्ये करत आले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘जोवर आपण माणसांशी ‘कनेक्ट’ होत नाही, तोवर त्यांना नेमकं काय हवंय, हे समजणार नाही. आणि सामान्य जनतेची नस ओळखायची असेल, तर त्यांच्यात जाऊन वेळ घालवणं, त्यांच्याशी बोलणं, त्याच्या जगण्याचा भाग होणं, याला पर्याय नाही. दुसरा कुठलाही मार्ग नसतो आणि भारतातले सगळे राजकीय पक्ष या बाबतीत अत्यंत कुचकामी आहेत,’ असंही ते आवर्जून नोंदवतात.
प्रशांत किशोर यांचा संपूर्ण प्रवास, त्यांच्या मुलाखती वेळोवेळी बघताना जाणवलेली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ते कुठल्याही एका विचारधारेशी जोडलेले नाहीत. कुठल्या एका विचारधारेच्या पक्षांबरोबर काम करतात, असं नाहीये. ते सगळ्यांबरोबर काम करताना दिसतात. अगदी एकमेकांच्या विरोधात असलेल्या पक्षांबरोबरही त्यांनी कामं केलेली आहेत, हे कसं याचा शोध घेताना लक्षात आलं, ते स्वतःला कुठल्याही एका आयडियालॉजीला चिकटवून घ्यायला मुळातच तयार नाहीत. एखाद्या विचारधारेशी स्वतःला बांधून टाकणं, म्हणजे स्वतःला बंदिस्त करणं, एका वर्तुळात अडकवून घेणं, असं ते मानतात. मानवी जगण्यासाठी जे जे गरजेचं आहे, योग्य आहे, ते ते अंगीकारले पाहिजे, यावर त्यांचा विश्वास आहे आणि ते गांधीजींना फॉलो करणारे आहेत. नव्या पिढीला किंवा कुठल्याही पक्षाच्या, विचारधारेच्या झेंड्याखाली स्वतःला बसवून घेण्याची इच्छा नसलेल्या कुणालाही प्रशांत किशोर रिलेट होतात, ते याचमुळे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा ते मांडतात तो म्हणजे, माणसांनी स्वतःची मूल्ये फॉलो करावीत, पण कुठल्याही पक्षाच्या विचारधारेशी स्वतःला बांधून घेऊ नये, कारण भारतातल्या राजकीय पक्षांनाही आपली विचारधारा नेमकी काय आहे, हे पुरेसं स्पष्ट नाहीये. पक्षांची विचारधारा त्यांच्या राजकीय आणि निवडणुकीय गरजांनुसार बदलत असते.
हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा ते वेळोवेळी मांडतात. भारतीय लोकशाही तशी बाल्यावस्थेत आहे. अशावेळी कुठल्याही राजकीय पक्षाच्या किंवा विचारधारेच्या दावणीला बांधून घेणं, घातकीच ठरू शकतं. कारण, आपण इतिहासात आणि वर्तमानातही बघितलं आहे की, राजकीय पक्षही त्यांच्या विचारधारेशी प्रामाणिक नसतात; पण मतदार म्हणून आपण पक्षांच्या विचारधारेशी जोडलेलं असलेलं पाहिजे, अशी अपेक्षा केली जाते. ही समाजकारणातली मोठीच राजकीय गुंतागुंत आहे. त्याकडे आतातरी सामान्य माणसांनी डोळसपणे बघितलं पाहिजे.
बंगालच्या निवडणुकीत बीजेपीचा पराभव झाला आणि ममता बॅनर्जी मुख्यमंत्री म्हणून निवडून आल्या, तेव्हा सार्या देशाचं नाही, तर जगाचं लक्ष बंगालच्या इलेक्शनवर लागलेलं होतं. बीजेपीचं बंगालमध्ये काय होणार, यावरून एकूण बीजेपीचं भवितव्य देशाच्या राजकीय पटलावर कसं असेल, हे ठरणार होतं. बंगालची निवडणूक निरनिराळ्या संदर्भात अतिशय महत्त्वाची होती. त्यावेळी जर बीजेपी निवडून आली असती, तर ‘एक देश एक पक्ष’ या विचारधारेकडे आपला प्रवास सुरू झाला असता आणि लोकशाहीसाठी ते अतिशय धोकादायक ठरलं असतं. याबाबतही प्रशांत किशोर यांचं म्हणणं समजून घेण्यासारखं आहे. ते म्हणतात, ‘मोदी सरकार हे काही पहिलं सरकार नाहीये, ज्यांना बहुमत मिळालेलं आहे. बहुमत मिळवलेली अनेक सरकारं यापूर्वी होऊन गेली आहेत. 10 आणि 15 वर्ष राज्य केलेली सरकारं झाली आहेत. मग मोदी सरकारच्याच बाबतीत आपण वेगळा विचार का करतो आहोत, हे समजून घेणं फार आवश्यक आहे. आजपर्यंतची सरकारं आणि मोदी सरकार यांच्यातला सगळ्यात मोठा फरक म्हणजे, मतदानाच्या पलीकडे हे मतदारांच्या मानसिक अवकाशावर ताबा मिळवू इच्छितात. त्यांना फक्त तुमचं मत नकोय, तुम्ही काय घालता, तुम्ही काय खाता-पिता, काय विचार करता, तुमचे मित्र-मैत्रिणी कोण आहेत, तुमच्या श्रद्धा आणि धारणा काय आहेत, या सगळ्यावर त्यांना वर्चस्व हवंय आणि ते धोकादायक आहे. त्यांना फक्त देशाचे इलेक्शन जिंकायचे नव्हते, त्यांना विरोधी पक्ष संपवायचा आहे. आणि हे माझ्या दृष्टीने अतिशय गंभीर आहे. त्यांचा प्रोपोगंडा ठीके, पण गेल्या 70 वर्षात काहीच घडलेलं नाहीये, असं म्हणणं हे भीतीदायक आहे. लोकांना काळजी वाटतेय, ती या सगळ्या गोष्टींची.’ ज्या व्यक्तीने बीजेपी आणि मोदी सरकारला 2014 मध्ये सरकार स्थापनेसाठी मदत केली, त्या व्यक्तीने हे म्हणणं आणि स्वतःच्या मनातली काळजी, भीती जाहीरपणे व्यक्त करणं, याला फार जास्त महत्त्व आहे.
बंगालच्या निवडणुकीनंतर राजकीय सल्लागार आणि रणनीतीकार म्हणून प्रशांत किशोर यांनी निवृत्तीची घोषणा केली, पण दुसरीकडे शरद पवारांशी चर्चा सुरू आहे, तृणमूलला बंगालच्या बाहेर विस्तारासाठी मदत करणं सुरू आहे, तर दुसरीकडे उत्तरप्रदेशनंतर परत एकदा काँग्रेस पार्टी बरोबर राजकीय सल्लागार म्हणून काम करण्याबाबत राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याशी चर्चाही सुरू आहेत. पण, काँग्रेसमध्ये त्यांना घ्यायचं की नाही, यावरून मतभिन्नता आहे. अर्थात, हा लेख छापून येईल तोवर त्यावरही स्पष्टता झालेली असेल. मोदी सरकारला पाडण्यासाठीची जी विरोधी पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे, त्याचा प्रशांत किशोर महत्त्वाचा भाग आहेत का? 2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय राजकारणात वेगळं आणि नवं काही बघायला मिळणार आहे का? अमित शहा, ज्यांना त्यांचे फॉलोअर्स समकालीन ‘चाणक्य’ म्हणतात आणि प्रशांत किशोर ‘ओव्हररेटेड’ राजकीय रणनीतीकार. 2024 ची निवडणूक ही खर्या अर्थाने प्रशांत किशोर आणि अमित शहा यांच्यात होणार आहे, हेही आपण लक्षात घेतलंच पाहिजे. पुढची तीन-चार वर्ष भारतीय राजकीय पटलावर बुद्धिबळाच्या सोंगट्या कशा पडतात आणि कोण कशी चाल करतं, हे बघणं रंजक तर असेलच, पण त्याहीपेक्षा या देशाचं भवितव्य ठरवणार असेल.