मोदी सरकारवर बेधडक वार करणार्‍या महुआ मोईत्रा

‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक -२०२१

अनुराधा कदम

अमेरिकेतील माउंट हॉलीयोके कॉलेजमधून इकॉनॉमिक्स अँड मॅथेमॅटिक्स या विषयात पदवी घेतल्यानंतर महुआ न्यूयॉर्कमधील जेपी मॉर्गन चेस या प्रतिष्ठित फायनान्शियल कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून रूजू झाल्या तेव्हा त्या अवघ्या 23 वर्षाच्या होत्या. पुढच्या पाच वर्षात महुआ लंडनमध्ये त्या कंपनीच्या उपाध्यक्ष झाल्या. व्यावसायिक कारकीर्द अतिशय उत्तम सुरू असतांना काहीतरी वेगळं करायचं, या निश्चयाने त्या भारतात परतल्या. काही दिवसातच राजकारणात प्रवेश करूनतेजतर्रार नेता अशी ओळख त्यांनी मिळविली. लोकसभेतील त्यांची भाषणं ही धुवांधार असतात. त्यांच्या भाषणांची सर्वत्र चर्चा होते.

 000000000000000000000000

      सतराव्या लोकसभेत निवडून गेलेल्या खासदारांच्या उपस्थितीतील ती पहिलीच सभा होती. तो दिवस होता 25 जून 2019. देशभरातून जनतेची मते मिळवून निवडून आलेले अनेक खासदार या सभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलत होते. या सर्व भाषणांमध्ये एक आवाजाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. तो आवाज होता तृणमूल काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार महुआ मोईत्रा यांचा. चाळीशीच्या उंबरठ्यावरच्या या महिला खासदाराच्या बोलण्यात प्रचंड आत्मविश्‍वास होता. प्रत्येक शब्दाला धार आणि मांडलेल्या प्रत्येक मुद्यातून अभ्यासूपणा डोकावत होता. खासदार महुआ मोईत्रांचे लोकसभेतील तेे पहिलेच भाषण देशभर चर्चेचा विषय ठरले. तडफदार आवेश व मुद्देसूद मांडणीसह केलेल्या भाषणात त्यांनी देशाच्या लोकशाहीपुढे मोदी सरकारने उभी केलेली फॅसिझमची आव्हाने याचा धावता, पण टोकदार आढावा त्यांनी घेतला होता. केवळ 10 मिनीटांच्या त्या भाषणाने महुआ मोईत्रा हे नाव एका दिवसात सर्वोतोमुखी ठरले.

     गेल्या काही वर्षांत संसदेत विरोधी पक्षाकडून तडफदार, आवेशयुक्त, सरकारवर बोचरी टीका करणारी व सत्ताधार्‍यांना अस्वस्थ करणारी भाषणे ऐकायला मिळत नसताना, महुआ मोईत्रा यांनी ती कसर भरून काढली. महुआ मोईत्रा यांचे भाषण इतके स्पष्ट व तडफदार होते की, केवळ विरोधी पक्षच नव्हे, तर सत्ताधारी सदस्यही स्तब्ध झालेले दिसले. आपल्या भाषणाची सुरुवात करताना महुआ मोईत्रा यांनी जनतेने भाजपला दिलेला जनाधार मान्य केला. ‘संसदेत भाजपला बहुमत मिळाल्याने या सदनात सरकारवर अंकुश ठेवणारा प्रबळ विरोधी पक्ष नाही. अशावेळी सरकारने विरोधकांचे म्हणणे ऐकून घ्यायलाच हवे. कारण लोकशाहीत असंतोष हा महत्त्वाचा असतो. सरकार ‘अच्छे दिन’ आणल्याचा दावा करतेय आणि या देशावर यापुढे आपलीच सत्ता राहील, असा दावा करतेय. पण, या सरकारने आपले डोळे उघडून पाहिल्यास त्यांना देशाची खरी परिस्थिती काय आहे, हे लक्षात येईल,’ या भाषेत त्यांनी भाजप सरकारला खडसावले. मोईत्रा यांनी ईशान्येतील एनआरसी मुद्यावरून मोदी व भाजपवर सडकून टीका केली. एनआरसीचा मुद्दा हा फक्त मुस्लिमांना टार्गेट करण्यासाठी उकरून काढल्याचा थेट आरोप त्यांनी भाजपवर केला. गेल्या पाच वर्षांत भाजपने देशाला अंधकारात लोटलं. या पक्षाचा राष्ट्रवाद नकली आहे. लहानपणी माझी आई मला भुताच्या गोष्टी सांगत असे. तसे भाजपने राष्ट्रीय सुरक्षा नावाचे भूत उभे केले आहे,  हे भूत रोज सरकार उभे करते आणि त्याची भीती दाखवत छद्म राष्ट्रवाद पसरवते, असा आरोप त्यांनी केला. खासदार ही बिरुदावली नावामागे लागल्यानंतर महुआ यांच्या पहिल्याच भाषणाने केवळ संसदेतील प्रत्येक सदस्याचे लक्षच वेधले नाही, तर महिला खासदार म्हणजे केवळ माना डोलवणारे सदस्य असतात, हा गैरसमजही पार धुवून निघाला. लोकसभेत निवडून जाण्याची पहिलीच वेळ आणि सत्ताधारी सरकारचा थेट समाचार घेण्याचे धाडस, यामुळे महुआ मोईत्रा हा चेहरा गर्दीतला एक होणार नाही, हे त्यादिवशी स्पष्ट झाले. महुआ यांच्या या रोखठोकपणाच्या चर्चेने वादळ उठवलं आणि मग त्यानंतर लोकसभेच्या प्रत्येक सत्रातील कामकाजादरम्यान महुआ काय बोलणार ? त्या कोणत्या विषयांकडे सरकारचे लक्ष वेधणार ? सरकारला कसे धारेवर धरणार ? याकडे माध्यमांसह सर्वांचे लक्ष लागलेले असते.

     पश्चिम बंगालच्या कृष्णानगरमधून तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर महुआ मोइत्रा यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली. त्यांनी भाजपच्या कल्याण चौबे यांचा सुमारे 63 हजार मतांनी पराभव केला. महुआ यांनी 2008 मध्ये राजकारण प्रवेश केला, तो मात्र काँग्रेस पक्षातून. मात्र, लवकरच त्या काँग्रेसला कंटाळल्या आणि त्यांनी 2010 मध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ममता बॅनर्जींनी त्यांना 2016 मध्ये करीमपूर विधानसभेचं तिकीट दिलं. तिथे त्या विजयी झाल्या. हायप्रोफाइल लाइफस्टाइलमुळे ग्राउंडवर्क करण्याच्या त्या योग्यतेच्या नाहीत, अशी टीका सुरुवातीला त्यांच्यावर झाली. पण, करीमपूरच्या विजयाने लोकांची तोंडं बंदं केली. खांद्यावर रुळणारे मोकळे केस, मोठं कुंकू, हलकीशी लिपस्टीक आणि साधी पण मोहक साडी, अशा वेशभूषेत राजकीय व सामाजिक क्षेत्रात वावरणार्‍या महुआ यांचा राजकारणातील प्रवेश, त्याआधी वयाच्या पंचविशीआधीच न्यूयॉर्कमध्ये बँकर म्हणून मिळालेली संधी, अत्यंत उच्चभ्रू जीवनमान आणि सर्वसुखसोयी असलेल्या दिनक्रमाला पूर्णविराम देऊन अमेरिकेतून थेट भारताच्या राजकारणाकडे वळलेली वाट, यूथ काँग्रेस आणि नंतर तृणमूल काँग्रेसमधील कारकिर्दीचा झंझावात, हा महुआ यांचा एकंदरीत सगळा प्रवासच खूप रंजक आहे.

     ‘एकदा ठरलं म्हणजे ठरलं’, या बाण्याच्या ज्या व्यक्ती असतात, त्यापैकी एक म्हणजे महुआ. त्यांना विचारल्या जाणार्‍या असंख्य प्रश्नांमध्ये एक प्रश्न कायम असतो आणि तो म्हणजे, ‘न्यूयॉर्कसारख्या शहरातील जे.पी.मॉर्गनमधील इन्व्हेस्टमेंट बँकरसारखी खणखणीत नोकरी, व्हाइस प्रेसिडेंटसारखं पद सोडून तुम्ही भारतात आणि तेही राजकारणात का आलात?’ यावर त्यांचं उत्तर असतं, ‘एकतर राजकारण खुणावत होतं आणि नोकरीतील एकसुरीपणाचा कंटाळा आला होता. आपण नागरिक म्हणून राजकारणातील चुकीच्या गोष्टींबद्दल बोलत असतो. मीही त्याला अपवाद नव्हते. पण, व्यवस्था बदलायची असेल, तर त्या रिंगणात येऊन समजून घेण्यासाठी किती जणांची पावले वळतात? राजकारणात यायचे, तर चुकीला चूक म्हणण्याचे धाडस हवे, याची मला कल्पना होती. या सगळ्याची तयारी ठेवूनच 12 वर्षाचा चढता आलेख असलेली बँकरची नोकरी सोडली.”

     महुआ यांनी ठरविल्याप्रमाणे पावलं टाकणं सुरू केलं. अर्थातच, पहिल्याच राजकीय निवडणुकीत खासदार होईन, याची मात्र त्यांना खात्री नव्हती. सुरुवातीला पक्षाचे काम करायचे, याच भावनेने त्या राजकारणात आल्या. सुरुवातीच्या टप्प्यात कार्यकर्ता म्हणून ग्रासरूटवर काम करायचं होतं. त्यासाठी काँग्रेसची निवड केल्याचं सांगायला त्या विसरत नाहीत आणि कचरतही नाहीत. काँग्रेसचे तेव्हाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत यूथ काँग्रेसमध्ये पस्तिशीच्या महुआ दाखल झाल्या. काँग्रेससोबत महुआ यांची नाळ अप्रत्यक्षरित्या लहानपणीच जुळली होती. खरंतर, महुआ यांच्या कुटुंबातील कुणीच राजकारण काय तर समाजकारणाशीही संबंधित नव्हतं. पण, शाळकरी महुआ यांना त्या काळात इंदिरा गांधी यांचं व्यक्तिमत्त्व खूप आवडायचं. महुआ यांच्या शाळेतील निबंधांमध्ये, शाळेतल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये, वक्तृत्वस्पर्धेतील भाषणामध्ये इंदिरा गांधी नेहमीच असायच्या. एकदा लहानपणी महुआ यांना त्यांच्या आईने एकदा गंमतीने विचारले होते की, ‘तू मोठेपणी कोण होणार?’ तेव्हा क्षणाचाही विलंब न करता महुआ यांचं उत्तर अर्थातच ‘इंदिरा गांधी होणार’ असं होतं. शाळेच्या पिनॅकोमधल्या महुआचं ते उत्तर आईने सहजपणे घेतलं, पण महुआवर इंदिरा गांधी यांचा प्रभाव कॉलेज जीवनापर्यंत होताच. एका मुलाखतीत महुआ यांनीच हा किस्सा सांगितला आहे. तर, कुठेतरी मनात असलेल्या इंदिरा गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावाने त्यांना राजकारणाकडे खेचून आणले. साहजिकच राजकारणात जाण्याचा निर्णय जेव्हा पक्का झाला, तेव्हा काँग्रेसमध्ये प्रवेश हे ओघाने आलेच. युवक काँग्रेसपासून महुआ यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली ती 2009 या वर्षात. पण, वर्षभरात काँग्रेसची राजकीय भूमिका न पटल्याने त्यांनी तृणमूल काँग्रेससोबत जाणं पसंत केलं.

आयुष्य कसं असावं, असा प्रश्न जर कुणालाही विचारला, तर त्याचं काय उत्तर असेल? सुखवस्तू बालपण असावं. उत्तम शिक्षण मिळावं. चांगल्या पगाराची, आयुष्याला स्थैर्य देणारी नोकरी असावी आणि त्या नोकरीच्या बळावर कुटुंबाला सर्व सुविधा देण्याचं समाधान असावं. यापेक्षा वेगळ काय हवं असतं ? महुआ यांना त्यांच्या आयुष्यात हे सगळं त्या-त्या टप्प्यावर मिळालं. मूळच्या आसाममधील चाचर जिल्ह्यात 12 ऑक्टोबर 1974 ला महुआ यांचा जन्म झाला. मूळचे कोलकात्याचे असलेले महुआ यांचे वडील आसामात चहाची लागवड करायचे. आई मंजू, वडील द्विपेंद्रलाल आणि महुआसह त्यांची मोठी बहीण, अशा चौकोनी कुटुंबात महुआ त्यांचं बालपण गेलं. नाहक लाड नसले, तरी त्यांच्या कुटुंबात खाण्यापिण्याची सुबत्ता होती. महुआ यांची आई मात्र कडक शिस्तीच्या. दोन्ही मुलींनी शिकून चांगल्या संस्कारात वाढावं, यासाठी प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबातील आई जशी धडपडते, तसाच महुआ यांच्या आईचाही आग्रह असायचा. दरवर्षी नवरात्री आणि नाताळच्या सुटीत महुआ कोलकात्यात यायच्या. वयाच्या 15 व्या वर्षापर्यंत महुआ यांचे आयुष्य हे असेच होते. त्यानंतर महुआ यांच्या वडिलांनी व्यवसायाच्या निमित्ताने अमेरिकेत न्यूयॉॅर्कमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. महुआ यांनी वयाच्या 15 वर्षी कोलकात्याची सीमा ओलांडली आणि त्या अमेरिकावासी झाल्या. नुकतंच सोळावं वर्ष लागलं होते. तारुण्याच्या उंबरठ्यावर महुआ न्यूयॉर्कसारख्या चकचकीत शहरातील कॉलेजमध्ये दाखल झाल्या. सुखवस्तू घरात बालपण गेल्याने त्या ‘रिच किड’ होत्या का, असा सवाल त्यांच्याबाबतीत नेहमीच उपस्थित होतो, पण हा मुद्दा महुआ त्यांच्या शैलीने नम्रपणे खोडून काढतात. ‘मी ‘रिच किड’ नव्हते पण हार्डवर्किंग किड नक्कीच होते’, असं त्या सांगतात.

     महुआ एक हुशार राजकारणी आहेत. आकर्षक आहेत आणि भारतीय राजकारणात अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. त्यांची अशी अनेक भाषणे झाली आहेत, ज्यावर त्यांना जगभरातून दाद मिळाली आहे.  मात्र अनेकदा त्या वादातही सापडल्या आहेत. कधी बंगालच्या स्थानिक माध्यमांनी त्यांच्या वक्तव्यामुळे त्यांना धारेवर धरले. कधी त्या भाजप खासदार बाबुल सुप्रिया यांच्यावर नाराज झाल्या. आसाममधील एका महिला पोलिस अधिकार्‍याने गैरवर्तन केल्याचा आरोपही त्यांच्यावर केला. 5 फूट 6 इंच उंची असलेल्या महुआ मोईत्रा यांना सांसदीय राजकारणात येऊन जेमतेम अडीच वर्षे झाली. मात्र या कालावधीत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली हे नक्की.

     आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील बँकर किंवा लोकप्रिय खासदार या पलीकडे महुआ मोईत्रा व्यक्ती म्हणून कशा आहेत हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. महुआ यांच्या साध्या, पण लक्षवेधी साड्या हादेखील चर्चेचा विषय असतो. महुआ यांना सुंदर चित्रांची आवड आहे. त्यांच्या वैयक्तिक संग्रहात अनेक उत्तम चित्रे आहेत. सहसा त्या साडीमध्ये दिसतात, मात्र जेव्हा त्या कॉर्पोरेट जगात काम करायच्या, तेव्हा त्या स्मार्ट कॉर्पोरेट ड्रेसमध्ये असायच्या.  सोन्यापेक्षा चांदीची खूप आवड असलेल्या महुआ यांच्या संग्रहात अनेक चांदीच्या वस्तू आहेत. चांदीचे डिनर सेट, चांदीचे टीसेट खरेदी करण्यात महुआ याना खूप रस आहे. त्यांना स्वयंपाक मात्र करता येत नाही, हे त्या प्रांजळपणे कबूल करतात. आई आणि मोठी बहीण खूप चांगल्या सुगरण आहेत, मी मात्र यामध्ये कच्ची असल्याचे त्यांनी अनेक मुलाखतीत सांगितले आहे.

     महुआ यांची व्यावसायिक कारकीर्द अतिशय चमकदार होती. अमेरिकेतील माउंट हॉलीयोके कॉलेजमधून इकॉनॉमिक्स अँड मॅथेमॅटिक्स या विषयात पदवी घेतल्यानंतर न्यूयॉर्कमधील जे.पी.मॉर्गन चेस या प्रतिष्ठित फायनान्शियल कंपनीमध्ये त्या इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून रुजू झाल्या, तेव्हा त्या अवघ्या 23 वर्षाच्या होत्या. पुढच्या पाच वर्षात महुआ लंडनमध्ये त्या कंपनीच्या उपाध्यक्ष झाल्या. एकंदरीत विचार करता त्यांच्या व्यावसायिक यशाचा आलेख चढता होता. सगळं उत्तम चाललं असतांना त्यांनी एकाएकी भारतात येण्याचा निर्णय घेतला. काहीतरी वेगळं करायचं, हे त्यांनी ठरवलं होते. पण, वेगळं म्हणजे काय, हे निश्चित होत नव्हते. प्रभावी वक्तृत्व, सामाजिक विकासाची दृष्टी, आर्थिक नियोजनाची क्षमता, एखादा प्रश्न समजून घेण्याची परिपक्वता, उत्कृष्ट संवादकौशल्य, मुद्देसूद मांडणी, या महुआ यांच्या जमेच्या बाजू होत्याच, त्यालाच राजकारणाची किंबहुना समाजकारणाची जोड देण्याचा त्यांचा विचार होता. लवकरच त्यांच्या विचाराची बैठक पक्की झाली. एके दिवशी नोकरी व पर्यायाने अमेरिकेतील स्थिरस्थावर जीवनशैली सोडून भारतीय राजकारणात काम करण्याचा निर्णय जेव्हा त्यांनी कुटुंबीयांना सांगितला, तेव्हा महुआ आपल्या निर्णयावर एवढ्या ठाम होत्या की, त्यांना कुटुंबातून कोणीही विरोध केला नाही. महुआ यांच्या आयुष्यत हाच निर्णय टर्निंग पॉइंट ठरला. अमेरिकेतील सुखासुखी नोकरी सोडून भारतीय राजकारणात उडी घेण्याचा निर्णय हे जसे महुआ यांच्या आयुष्यातील निर्णायक वळण होते, त्याचप्रमाणे महुआ यांच्या व्यक्तिगत आयुष्यातही त्यावेळी एक वळण आले. अमेरिकेत शिक्षण घेतल्यानंतर लंडनमध्ये नोेकरीनिमित्य वास्तव्यास असतांना महुआ यांनी डेन्मार्कच्या लार्स ब्रॉसनशी लग्न केले होते. मात्र, त्यांचे वैवाहिक जीवन फार काळ टिकू शकले नाही. काही वर्षातच त्यांचा पतीशी घटस्फोट झाला. महुआ यांच्या आयुष्यातील सहजीवनाचे पर्व संपले.

     भारतात आल्यावर त्या कॉँग्रेस नेते राहुल गांधींना भेटल्या. त्यांनी महुआ यांना बंगालमध्ये युवक काँग्रेसचे काम करण्यास सांगितले. त्या बंगाल युवक काँग्रेसमधील प्रमुख नेत्यांपैकी एक बनल्या. 2009 मध्ये देशाची सत्ता काँग्रेसकडे होती. तेव्हा पक्षाच्या ‘आम आदमी का सिपाही’ या प्रकल्पात महुआ यांनी काम करणे सुरू केले. तेव्हा खर्‍या अर्थाने पहिल्यांदा तळागाळातील जनतेसोबत त्यांचा संबंध आला. त्यावेळी त्यांच्या आजवरच्या उच्चभ्रू राहणीमानाचे दाखले देत सर्वसामान्य लोकांमध्ये काम करण्याच्या प्रक्रियेत त्या फार काळ काम करू शकणार नाही, अशी टीका झाली होती. या टीकेला महुआ यांनी कृतीतूनच उत्तर दिले. राजकारणात काम करणार्‍यांवर आरोप, टीका होतच असते, पण या टीकेला कधी आणि कसे त्याला उत्तर द्यायचे याची मेख ज्याला सापडते, तोच या क्षेत्रात यशस्वी होतो आणि टिकतोही. महुआ यांनी हे जाणले होते.

     बंगालच्या ग्रामीण भागात काँग्रेसची संपर्कयंत्रणा मजबूत करण्यात पुढाकार घेत महुआ यांचे काम चांगले सुरू असतानाच, तिथल्या निवडणुकीत काँग्रेसने डाव्यांसोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे महुआ चांगल्याच अस्वस्थ झाल्या. काँग्रेसपासून वेगळे होण्याची आणि ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची महुआ यांच्या राजकीय आयुष्यातील हीच ती वेळ ठरली. दिल्लीहून कोलकात्याला येत असताना एका विमान प्रवासात महुआ आणि ममता यांची भेट झाली होती. ममता यांच्या चाणाक्ष नजरेने महुआ यांच्यातील धडाडी टिपली होती. लवकरच ममतादीदींनी त्यांना तृणमूल काँग्रेसमध्ये येण्याचे आमंत्रण दिले. काँग्रेसच्या ढिसाळ व दरबारी राजकारणाला कंटाळलेल्या महुआ यांनी दीदींचे आमंत्रण लगेच स्वीकारत तृणमूलमध्ये प्रवेश केला. महुआ यांचे ‘स्मार्ट’ व्यक्तिमत्व, त्यांची भाषेवरची पकड लक्षात घेऊन त्यांना तृणमूलच्या प्रवक्त्या म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. 2016 च्या बंगालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळाली व त्या निवडूनही आल्या. पुढे लगेचच 2019 लोकसभा निवडणुकीतही पक्षाने त्यांना मैदानात उतरविले. त्या निवडणुकीतही महुआ यांनी बाजी मारली.

महुआ यांना आता खासदार होऊन अडीच वर्षे झाले आहेत. या अडीच वर्षात त्यांनी आपल्या भाषणांनी संसदभवन हलवून सोडले आहे. महुआ संसदेतील आपल्या भाषणात ज्या मुद्देसूद पध्दतीने भाजपवर टीका करतात. अस्खलित इंग्रजीत, अनेक पुराव्यांसह त्या भाजपाचे कपडे उतरवितात, तेव्हा भाजपा नेत्यांना घाम फुटतो. मध्यंतरी त्यांच्या घरावर केंद्रीय गुप्तचर संस्थांनकडून पहारा देण्यात आला होता, तेव्हा ‘तुम्ही कितीही पहारे बसवा, मी चूप बसणार नाही. मी सरकारचे चुकीचे काम व धोरणांचा बुरखा फाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही’, असा इशारा त्यांनी दिला होता. लोकसभेतील आपल्या एका भाषणात त्यांनी देशाच्या न्यायव्यवस्थेतील त्रुटींकडेही लक्ष वेधले होते. ‘आता न्याय व्यवस्थेवर पूर्वीसारखा विश्‍वास ठेवणे शक्य नाही. केंद्र सरकारच्या दबावामुळे न्यायव्यवस्थेचे पावित्र्य भंगले आहे.’, अशी जोरकस टीका त्यांनी केली होती.

     महुआ या आपल्या छोट्या राजकीय कारकिर्दीत आपल्या रोखठोक बोलण्यामुळं अनेकदा वादाच्या भोवर्‍यात सापडल्या आहेत. माजी केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो यांच्यासोबतचा त्यांचा वाद चांगलाच गाजला. सुप्रियो यांनी आपल्याला अतिशय अपमानस्पद वागणूक दिल्याचा आरोप करत महुआ यांनी थेट पोलीसात तक्रार दाखल केली होती. या तक्रार अर्जाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा झाली. काही दिवसांनी सुप्रियो यांनी महुआ यांच्यावर उलटवार केला. महुआ आणि तृणमूल काँग्रेसचे नेते सौगत रॉय व तापस पॉल यांनी रोझ व्हॅली फॉर्म घोटाळ्यात कोट्यवधी रूपयांची हेराफेर केली, असा आरोप त्यांनी केला. महुआ यांनी सिल्चर विमानतळावर एका महिला पोलीस हवालदारावर हल्ला केल्याचा आरोपही माध्यमांमध्ये भरपूर गाजला होता. करीमपूर विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान स्थानिक पोलीस प्रमुखाशी संगनमत करून महुआ यांनी निवडणूक साहित्याची चोरी केली असा आरोपही त्यांच्यावर झाला होता. थोडक्यात महुआ या कोणत्या ना कोणत्या कारणाने कायम प्रसिद‍्धीच्या झोतात असतात. आज लोकसभेत विरोधी पक्षाच्या बाकावर जे मोजके तेजतर्रार नेते आहेत, त्यात महुआ मोईत्रा यांचे नाव अग्रक्रमावर आहे. मात्र त्यांची आगामी कारकीर्द कशी असेल, हे बघणे मोठे औत्सुक्याचे ठरणार आहे.

————————————-

लेखिका नामवंत ब्लॉगर आहेत.

9923262796

Must Watch- Mahua Moitra In Lok Sabha: Times When Her Fiery Speeches Stirred Controversy In Parliament

Previous articleप्रशांत किशोर: भारतीय राजकीय पटलावरचा प्रभावशाली जादूगर
Next articleमहानायक
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.