महानायक

‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक -२०२१

मिथिला सुभाष

अमिताभचं आगमन हा हिंदी सिनेसृष्टीसाठी शुभशकुन होता. हा लेख म्हणजे या महानायकाच्या भूमिकांची यादी, त्याचा बायोडाटा आणि त्याची फिल्मोग्राफी नाहीये. हे त्याच्या कारकिर्दीचं डोळसपणे केलेलं रसग्रहण असेल. कलावंताने कसं असावं, तेअसणं ग्रेसफुली कॅरी करत कसं जगावं, स्वत:ला कसं प्रमोट करावं, कुटुंब कसं सांभाळावं, प्रेयसीशी असलेलं नातं कसं जपावं, आणि या सगळ्याहून महत्त्वाचं, बावजूद इस सबके, आपली प्रतिमा कशी राखून ठेवावी, याचा उत्तम वस्तुपाठ म्हणजे अमिताभ! अमिताभ बुद्धिमान आहे. त्याला स्वत:च्या चुका उमगतात. त्या सुधारून पुन्हा नव्याने डाव मांडण्याची सकारात्मक उर्जा त्याच्यात शिगोशिग भरलेली आहे. काळात होणारे बदल तो खुल्या दिलाने स्वीकारतो. तो उगाचच नाही झालेला या शतकाचामहानायक!’

 0000000000000000000000000

जब तक बैठने को ना कहा जाये, शराफत से खडे रहो. ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नहीं है!

अब ना तो वर्दी है, ना कुर्सी. इलाक़ा तुम्हारा है और मैं अकेला हूं!

अरेच्चा.. हे काहीतरी वेगळं पाणी आहे का?? हिरो असा बोलतो??

त्यानंतर सहाच महिन्यांनी…

किस साले ने सोमू को मारा है? कौन है वो माई का लाल जो अपनी मां का दूध आजमाना चाहता है? कुत्तों, कमीनों, अब हाथ उठा के दिखाओ.. एक एक की खाल खिंचवा दी तो मेरा नाम भी विक्रम नहीं!

   हा तोच ना..?? प्राणच्या बुडाखालची खुर्ची लाथेने ढकलणारा ‘जंजीर’मधला इन्स्पेक्टर?? होय, तोच हा! जंजीरमधला विजय. तोच नमकहराममधला विक्रम. त्याला आपण ‘आनंद’मधेही पाहिला होता. मितभाषी, मनस्वी बाबू मोशाय. त्याच सुरवंटाचं फुलपाखरू झालंय हे. आधीच त्याला उगवायला उशीर झाला होता. पण सूर लागला आणि त्याने थेट ‘वरचा सा’ लावला. साखळीबंद यश मिळवण्यासाठी त्या साखळीची एक कडी – जंजीर – हातात सापडावी लागते, ती अमिताभच्या हाती लागली.‘जंजीर’मधल्या विजयच्या भूमिकेनं त्याला झेप घेण्याची संधी दिली. ‘विजय’रथ चौखूर उधळायला तयार झाला. सहा महिन्यात आलेल्या नमकहरामच्या श्रेय नामावलीत त्याचं नाव झळकलं, ‘…. अँड अमिताभ बच्चन! जो टप्पा पार करायला अनेकांना वर्षानुवर्ष लागतात, तो टप्पा अमिताभने सहा महिन्यात पार केला. हे साल होतं 1973! त्याआधी ‘आनंद’ ‘बॉम्बे टू गोवा’ हे नामांकित सिनेमे येऊन गेले होते. ‘आनंद’चं यश राजेश खन्नाच्या खात्यात गेलं, ‘बॉम्बे टू गोवा’ मेहमूद-आरडीचा झाला. थोडं आणखी मागे जाऊया.

     साल 1971. सुनील दत्त ‘रेश्मा और शेरा’ची जुळवाजुळव करत होता. त्या काळात मेहमूदच्या घरी राहून अमिताभ स्ट्रगल करायचा. 1969 मधे के.ए.अब्बासचा ‘सात हिंदुस्तानी’ येऊन गेला होता. अमिताभने सुनील दत्तच्या अजंठा आर्ट्समधे जाऊन ऑडीशन दिली. कास्टिंग डायरेक्टरने त्याला एका भूमिकेसाठी फायनल केलं. दोन-चार दिवसांनी सुनील दत्तने सगळ्या ऑडीशन्स आणि कास्टिंग पाहिलं. त्या काळात सुनील दत्त दमदार आवाजाचा नायक म्हणून प्रसिद्ध होता. असं म्हणतात की अमिताभची ऑडीशन तो तासभर रिवाइंड करून-करून डोळे मिटून ऐकत होता. हा मुलगा त्याला हातचा घालवायचा नव्हता. पण त्याच्या आवाजाचा त्याने धसका घेतला आणि अमिताभसाठी ठरवलेली भूमिका विनोद खन्नाला दिली. अमिताभच्या वाट्याला आली मुक्या तरुणाची भूमिका! संपूर्ण सिनेमात अमिताभ बोलला नाही. त्या दिवशी त्याची नियती हसली असेल. कारण त्याचा आवाज त्यानंतर अनेक दशके सिनेजगतात दुमदुमणार होता.

     अमिताभचं आगमन हा हिंदी सिनेसृष्टीसाठी शुभशकुन होता. हा लेख म्हणजे या महानायकाच्या भूमिकांची यादी, त्याचा बायोडाटा आणि त्याची फिल्मोग्राफी नाहीये. हे त्याच्या कारकिर्दीचं डोळसपणे केलेलं रसग्रहण असेल. त्यामुळे आठवणींच्या ओघात जे जसं येईल तसं…

     अमिताभ येण्यापूर्वीचा काळ हा सिनेमाच्या संक्रमणावस्थेचा काळ होता. राजेश खन्ना सुपर स्टारपदी विराजमान होता. त्याचे सगळे वेडे चाळे,त्याच्या मरून कलरच्या सफार्‍यांसह लोक आवडून घेत होते. मुली त्याला रक्ताने वगैरे पत्र लिहायच्या. तो सोबत माणसांचा ताफा घेऊन फिरायचा. त्याच्या सिगारेटची राख झाडायला पण त्याने एक बंदा ठेवलेला होता. उमेदीच्या काळात राजेशने भरपूर माज केला. जेव्हा एखाद्याचा माज टिपेला जातो तेव्हा अशा प्रत्येक माजोरड्यासाठी त्याच्या नियतीने एक बाप मुकर्रर केलेला असतो.. राजेश खन्नाचा ‘बाप’ कोलकत्त्यातली नोकरी सोडून मुंबईत डेरेदाखल झालेला होता! खर्जातला घनगर्द आवाज, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि सटवाईने कपाळावर मारलेली यश-कीर्तीची अदृश्य मुद्रा, एवढा ऐवज घेऊन हा बाबा निर्मात्यांच्या ऑफिसात खेटे घालत होता. सुरुवातीची उपेक्षा, काही सिनेमे आणि भरपूर पायपीट करून हा ‘गुरु’ राजेश खन्नाच्या कुंडलीत आला एकदाचा.

आनंद!

राजेशच्या झोळीत अभूतपूर्व यश. अमिताभची दखल नक्कीच घेतली गेली पण यशाचा सेहरा राजेशच्याच मस्तकावर होता.

     मग नमकहराम.. आपण मेलो की पिक्चर हिट होतो असा राजेशचा समज होता. ‘आनंद’ आणि ‘सफर’ने तो करून दिला होता. त्यामुळे हृषीदांनी जेव्हा त्याला ‘नमकहराम’मधली विक्रमची भूमिका देऊ केली तेव्हा त्याने हट्टाने अमिताभला मिळालेली ‘सोमू’ची भूमिका मागून घेतली. कारण तो मरायचा होता सिनेमात. तो काळ ‘राजेश खन्ना बोले आणि दळ हाले,’ असा होता. अमिताभला चॉईस नव्हता. भूमिकांची अदलाबदल झाली. राजेश खन्ना सिनेमात ‘मेला’ आणि याच सिनेमाने त्याच्या अंताची सुरुवात झाली. प्रीमियरनंतर राजेश खन्ना घरी जाऊन खूप दारू पिऊन डिम्पलकडे रडला म्हणे. हा पोरगा मला मागे काढणार असं त्याने कबूल केलं.त्याच्या कुंडलीत राहूची महादशा सुरु झाली होती बहुतेक. आणि आपला ‘गुरु’ पूर्ण तेजाने तळपायला लागला होता. त्याचा ‘विजय’रथ तुफान वेगाने दौडू लागला. आणि….

हिंदी सिनेमात ‘अमिताभ पर्व’ सुरु झालं!

     या झंझावातात विनोद मेहरा, राकेश रोशन, अनिल धवनसारखे तर पालापाचोळ्यागत उडून गेलेच पण राजेश खन्ना आणि जितेंद्रसारखे डेरेदार वृक्षही पानगळीत सापडले. सम्राट समोर आल्यावर मांडलिक राजांची जी अवस्था होते ती अनेकांची झाली. अनेक बडे हिरो नोकरी गेल्यासारखे दिसू लागले. संजीव कुमार, धर्मेंद्र, शशी कपूर, ऋषी कपूर याच्या सावलीत आले आणि टिकले.

     अमिताभच्या आक्रमणाबरोबर हिंदी सिनेमाची संक्रमणावस्था संपली. त्याच्या यशस्वी सिनेमांचा अक्षरश: जुलूस निघाला. ‘यश’ आणि ‘प्रसिद्धी’ ही बहीणभावांची दुर्मिळ जोडी एकत्रितपणे फार कमी लोकांच्या भेटीला जाते. ती स्वखुशीने झांजा वाजवत अमिताभच्या बिर्‍हाडी वास्तव्यालाच गेली. त्याचं भाग्य फळफळलं आणि आपल्याला अमिताभ लाभला.

     वेळा पाळणे, शिस्तीत वागणे आणि स्वत:ला मेंटेन ठेवणे, या गुणांमुळे अमिताभ निर्मात्यांच्या गळ्यातला ताईत बनला. सिनेमाच्या निर्मितीप्रक्रियेत प्रत्येक क्षणाची किंमत अगदी लाखाच्या घरात असू शकते, त्यामुळे वेळा न पाळणारे अभिनेते, त्यांना योग्य पर्याय मिळाल्यावर हळूहळू बाद होतात. राजेश खन्ना, गोविंदा, सनी देओल ही त्याची अमिताभच्या काळातली काही उदाहरणे. एक सोपा उसूल आहे, ‘तुम्ही काळाची कदर करा, तरच काळ तुमची कदर करेल!’अमिताभने काळाचं महत्त्व ओळखलेलं होतं. त्याला आधीच उशीर झाला होता. इतर नायकांना जे पंचविशीत मिळालं, त्या यशाने अमिताभचं दार ठोठावलं तेव्हा तो तिशीपार होता. देशाची राजकीय, सामाजिक परिस्थिती वेगाने बदलत होती. आणीबाणी लादली गेली होती. ‘सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही’ असा जाच सुरु होता. आर्थिक घडी विस्कटून नव्याने आकार घेत होती. सामान्य माणसाला शोषित, उपेक्षित वाटत होतं. आपल्याला कुणी वाली नाही, ही भावना त्या काळातल्या तरुणाच्या मनात जहाल विषासारखी उकळत, खदखदत होती. जे वयाने तरुण राहिले नव्हते, तेही खंतावले होते. जे तारुण्याचा उंबरठयावर होते, त्यांची दिशाभूल झाली होती. चांगला लेखक हा द्रष्टा असतो असं म्हणतात. सलीम-जावेदची जोडगोळी समाजातल्या या बदलांकडे लक्षपूर्वक पाहत होती. त्यांनी लोकांची नस ओळखली आणि उपेक्षित, शोषित लोकांचा आवाज, त्यांचा मसीहा बनू शकेल अशा व्यक्तिरेखांचे निर्माण करण्याचा सपाटा लावला.. अमिताभने त्यात अभिनयाचे रंग भरले. जे मला करावंसं वाटतं पण मी करू शकत नाही ते करणारा हिरो म्हणून प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतलं. शर्टाच्या दोन उघड्या पाखांची पोटावर गाठ बांधून, बिडी चावत अमिताभ पडद्यावर आला ते सामान्य माणसाच्या मनातल्या विद्रोहाचं रूप घेऊन. त्याला या मुशीत ओतलं सलीम-जावेदनं. अमिताभच्या कारकिर्दीचा विचार सलीम-जावेदशिवाय शक्य नाही! यात कुठेही अमिताभच्या अभिनयक्षमतेला कमी लेखण्याचा इरादा नाही. तो उत्तम अभिनेता आहेच. भावप्रदर्शनाचे तंत्र – एक्स्प्रेशन्सचं टेक्निक त्याने दिलीपकुमारकडून घेतलंय. तरीही तो स्वत: उत्कृष्ट दर्ज्याचा अभिनेता आहे, हे निर्विवाद. नक्कल करायला देखील अक्कल लागते. आणि एखाद्या अभिनेत्याची नक्कल करायला तुम्हाला मुळात अभिनय यावा लागतो. नाहीतर दिलीपकुमारची भ्रष्ट नक्कल करणारे राजेंद्र कुमार आणि मनोज कुमार कधीच ‘महानायक’ झाले असते. अमिताभनेही राज कपूर किंवा देवानंदची नक्कल नाही केली. दिलीपकुमारच का निवडला त्याने? कारण अमिताभला ज्या वैविध्याची आस होती, ते दिलीपकुमारकडे होतं. देवानंद चॉकलेट हिरो होता आणि राज कपूर तर सरळसरळ अभिनयाचं ढोंग करायचा. म्हणून अमिताभने दिलीपकुमारला डोळ्यासमोर ठेवलं आणि त्यात त्याला झगझगीत यश मिळालं. अमिताभकडे मुळात अभिनय आहे, दिलीपकुमारकडून त्याने उचललं ते फक्त तंत्र.

अमिताभ बुद्धिमान आहे. त्याला स्वत:च्या चुका उमगतात. त्या सुधारून पुन्हा नव्याने डाव मांडण्याची सकारात्मक उर्जा त्याच्यात शिगोशिग भरलेली आहे. काळात होणारे बदल तो खुल्या दिलाने स्वीकारतो. त्याच्या उमेदीच्या काळात त्याने दुर्जनांना ‘दे माय धरणी ठाय’ करुन  सोडणारे अनगिनत सिनेमे केले. ‘सत्याचा नेहमी विजय होतो’ या तमाम भारतीयांना आवडणार्‍या आचरट पण लोकप्रिय समजावर ते आधारलेले असायचे. त्यात लॉजिक नसलं तरी लोकांना चालायचं. त्यांना फक्त अमिताभ हवा असायचा. अमिताभने हिंदी सिनेमांची अख्खी मिरवणूक एकहाती वेगळ्या दिशेला वळवली.. पण त्याने जो पायंडा घातला त्यामुळे हिंदी सिनेमांचे नुकसानही झालेलं आहे. अर्थात त्याला नुकसान म्हणायचं की ‘काळाची गरज’ म्हणायची, हा एक वेगळा मुद्दा यातून निघतोच. ज्या पद्धतीच्या सिनेमांनी त्याला मोठं केलं, त्याच सिनेमांनी काही चांगल्या गोष्टी देशोधडीला लावल्या. उत्तम संगीत, दर्जेदार विनोद करणारे विनोदी नट, पहिल्या प्रतीचे खलनायक आणि नायिकेचे महत्त्व, हे सारे संपवण्याचे काम अमिताभच्या सिनेमांनी केलं, तो ज्या पठडीतले सिनेमे करून स्वत:ला प्रस्थापित करत होता, (किंवा ज्या पठडीतल्या सिनेमांची मागणी त्या काळात वाढली होती) त्यात प्रेम, गाणी वगैरेंना फारसा वावच नव्हता. ‘त्रिशूल’ किंवा ‘दीवार’मधे आपण ‘खोया-खोया चांद’ किंवा ‘मुझको अपने गले लगा ले’सारख्या गाण्यांची कल्पनाच करू शकत नाही. राह चलती टॅक्सी थांबवून, दरवाजा उघडून ड्रायवरला रस्त्यावर भिरकावून द्यायचं आणि त्या टॅक्सीतून खलनायकाचा पाठलाग करायचा, ‘मैं आज भी फेंके हुये पैसे नहीं उठाता’ ‘डॉन को पकडना मुश्कील ही नहीं नामुमकीन है’ ‘मैं उसी शांती का बेटा हूं और आप…. मेरे नाजायज बाप हैं’ वगैरेचं गारुड एवढं जबराट होतं की गाणी पडद्याआड जातायत हे जाणवलंच नाही. नंतर अमिताभनेच ‘सिलसिला’ या प्रणयरम्य संगीतपटात काम केलं, ही त्याची खासियत.. किंवा आपणच केलेल्या पापातून बाहेर पडण्याची त्याची अदा म्हणू आपण. जो प्रकार संगीताचा तोच विनोदाचा. अमिताभच्या बोलण्यात रसरशीत असा देसी लहजा आहे. विनोद करतांना तो कामी येतो. शिवाय त्याच्या उंची आणि देहबोलीमुळे खलनायकी कामं देखील त्याला ‘हिरो’सारखी शोभून दिसतात. एखाद्या पोरीला पळवून आणून तिचं तिच्या प्रियकराशी लग्न लावून देणं, अ‍ॅम्ब्युलन्स घेऊन जाऊन कोणालातरी अर्धमेला होईपर्यंत मारणं, हे सारे तो इतक्या स्टाईलने करायचा की ही गुन्हेगारी कृत्ये आहेत हे विसरून पब्लिक त्याला डोक्यावर घ्यायची. जे आम्ही करू शकत नाही ते हा करतोय, याचंच कौतुक असायचं ते. नायक, खलनायक, विनोदवीर असं सगळं एका पैकेजमधे मिळत असतांना कोण ते प्रेम चोप्रे आणि मेहमूद पाळणार? झालं, संपले बिचारे. त्याच्या हाताखाली विनोद करायला आणि त्याचा मार खायला दुसर्‍या फळीतले विनोदवीर आणि खलनायक तेवढे राहिले.

     सगळ्या निर्मात्यांना अमिताभ हवा असायचा, कारण प्रेक्षकांना तो हवा असायचा. त्यातून ‘गरीबांचा अमिताभ’ ‘भिकार्‍यांचा अमिताभ’ अशा दयनीय आवृत्त्या निघत राहिल्या. मिथुनसारखा प्रतिभावंतसुद्धा काही वर्षं आपली मूळ प्रतिभा झाकून ठेऊन अमिताभची नक्कल करायला लागला. त्यातल्या त्यात ‘बरा अभिनय’ करणार्‍या नायिका मागे पडल्या. परवीन बाबी, झीनत अमान सारख्या, क्लब डान्सर छापाच्या नायिकांची चलती झाली. संतापाने धगधगणार्‍या अमिताभला, स्वत: सिगारेटचे झुरके घेत, उंची दारवांचे जाम भरून द्यायचे आणि यथावकाश लग्नाशिवाय त्याच्या मुलाची आई होणार असल्याची बातमी द्यायची, एवढंच त्यांचं काम. शिवाय हा बाबा कायद्याच्या कचाट्यात सापडणार असेल तर या हिरोईनीना मुकाट्याने मरावं लागायचं. याला अपवाद एकच – रेखा! ही बाई कायम कशाला तरी ‘अपवाद’ म्हणून राहायलाच जन्माला असावी. ती एवढी नाकापर्यंत अमिताभच्या प्रेमात पडली की स्वत:मधे अभिनयाच्या पुरेपूर शक्यता असूनही त्याच्यासोबत सावलीची किंमत असणार्‍या भूमिका करत राहिली. तिने त्याच्याशिवाय जे सिनेमे केले त्यात तिने स्वत:चा अभिनय सिद्ध केला. ‘उमराव जान’ ‘खूबसूरत’ ‘इजाजत’ ‘घर’ हे सगळे अमिताभशिवायचे तिचे बिनीचे सिनेमे. त्याच्याबरोबर सिनेमा करतांना त्याची सावली असण्याला पर्याय नव्हता, कारण तो ‘वन मॅन शो’ होता. आणि त्यामुळेच हिंदी सिनेमातले हळवे प्रेम, गाणी, विनोद हे सारे घटक, जे पूर्वी अनेक वर्षं हिंदी सिनेमांची ओळख होते, ते नगण्य झाले. अर्थातच हा अमिताभचा दोष नाही. काळाचा महिमा आहे!

     1971 पासून सुरु झालेला अमिताभ 2000 सालापर्यंत अक्षरश: येड्यासारखे सिनेमे करत सुटला होता. त्याच्यात शक्यताच एवढ्या होत्या की तो संपता संपत नव्हता. त्या दहा बारा वर्षाच्या काळात अमिताभ one man industry झाला होता. 1981 मधे त्याचे लावारिस, सिलसिला आणि कालिया हे तीन सिनेमे एकामागून एक आले. सिलसिला पाहून असं वाटलं होतं की हा आता कदाचित soft सिनेमे करेल. याच्यातला angry young man संपला. पण कसचं काय! सत्ते पे सत्ता, खुद्दार, नमकहलाल’सारखे त्याचे सिनेमे येतच राहिले. मधे चारेक वर्षं राजकारणात जाऊन टप्पा खाऊन परत आला. तुफान, जादुगार, मैं आझाद हूं, अजूबा’सारखे सिनेमे केले. त्यातच मधेच ‘अग्निपथ’मधे भाव खाऊन गेला. तसं पाहायला गेलं तर अमिताभ जिथे गेला/जातो तिथे भावच खातो. मला तर तो ‘कोहराम’ आणि ‘लाल बादशहा’मधे पण आवडला होता.

     पण अति तिथे माती व्हायला लागली तेव्हा बहुतेक त्याची नियती त्याच्यावर नाराज झाली. हळूहळू त्याचे सिनेमे दर्जा सोडायला लागले होते. मधेच एखादा चमकदार सिनेमा यायचा पण अमिताभ संपतोय की काय अशी अवस्था आली. राजीव गांधींना मदत व्हावी म्हणून तो राजकारणात गेला होता. नाही म्हंटलं तरी त्यामुळे त्याची पीछेहाट सुरु होतेय की काय असं वाटायला लागलं. त्याच्या सिनेमांना थिएटर्स मिळेनात. त्याच्या पोस्टरवर काळं फासलं जाऊ लागलं. चाहत्यांच्या जीवाची उलघाल होत होती. त्याने ‘एबीसीएल’ नावाची प्रॉडक्शन कंपनी काढली. त्यात तो धुतला गेला. दिवाळखोर झाला.1988 मधे जेव्हा ‘गंगा, जमना, सरस्वती’ सडकून आपटला तेव्हा ‘द इलस्ट्रेटेड वीकली’ने हताश झालेला अमिताभ कव्हरवर छापून त्याच्या फोटोवर “FINISHED!’ अशी अक्षरं छापली. त्याच्या चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला. पण तो देवांचा लाडका मुलगा होता! आणि देव आपल्या लाडक्या लेकरांसाठी ‘देवमाणसं’ पाठवतो!! आणि त्याचा पत्ता गुपचूप आपल्या लेकराच्या कानात सांगतो. देवाने अमिताभच्या कानात ‘यश चोप्रा’ हे नाव सांगितलं. अमिताभने चोप्रांना फोन केला. मला काम द्या, माझ्याकडे काम नाही असं सांगितलं. त्यावेळी चोप्रा ‘मोहब्बते’ची जुळवाजुळव करत होते. त्यातली नारायण शंकर ही भूमिका अमरीश पुरी करणार होते. पण अमिताभ येतोय म्हंटल्यावर कथेची मांडणी बदलली. अमिताभने ती भूमिका केली आणि कमाल केली. चाहत्यांनी पाण्यात घातलेले देव बाहेर काढले. त्यांना पण तर आपल्या ‘लाडक्या लेकराचा’ सन्मानाने झालेला पुनर्प्रवेश बघायला थेटरात जायचं असेल ना?? या भूमिकेनं अमिताभला ‘बेस्ट सपोर्टिंग अभिनेत्या’चा फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला. आणि…

     नियतीने एक वर्तुळ पूर्ण करून पुन्हा त्याला सरळ रेषेत आणलं. लांब पल्ल्याची रेस सुरु करण्यासाठी! नियतीने कसं?? अहो ज्या दिवशी हा पुरस्कार मिळाला त्याच दिवशी 1971 त्याला ‘आनंद’साठी best supporting actor चा पुरस्कार मिळाला होता आणि त्याची घोडदौड सुरु झाली होती. मधेच नियतीच्या मनात काय आले कुणास ठाऊक, तिनं त्याचा सरळ रेषेतला प्रवास वर्तुळात गुंडाळला आणि त्यात आपलं देवाचं लाडकं लेकरू कोंडलं गेलं. तिनेच त्याला त्या वर्तुळातून बाहेर काढलं आणि अमिताभ सुसाट पळायला लागला, ते आजतागायत. याच काळात ‘कौन बनेगा करोडपती’ या गेम शो’ने त्याला तारलं. वर कुठेतरी मी लिहिलंय की अमिताभ बुद्धिमान आहे. त्याने केबीसी’चा बुद्धीने वापर केला. उच्च दर्ज्याची हिंदी, अतिशय सुसंस्कृत वागणं, अभिरुचीसंपन्न देहबोली आणि नशीब, या चार घटकांनी त्याला साथ दिली. त्याच्यापासून दूर गेलेले प्रेक्षक पुन्हा त्याच्याजवळ आले. जे त्याच्याजवळच होते पण उद्विग्न झाले होते ते पुन्हा नव्याने त्याच्या प्रेमात पडले. त्याची दिवाळखोरी संपली. त्याच्या नावातली ‘कधीही न संपणारी आभा’ पुन्हा उजळली.

     हो गोष्ट 2000 सालातली. आणि 2001 मधे ‘अक़्स’ आला. इन्स्पेक्टर मनु वर्मा.. त्यातलं त्याचं अज्ञात शक्तीने ‘झपाटलं जाणं’.. वेगळाच अमिताभ! त्या ‘झपाटलेल्या’ अवस्थेत ‘बंदा ये बिनधास है’ वर त्याने केलेला पदन्यास.. सांवली-सलोनी नंदिताकडे बघावंसं नाही वाटत त्या गाण्यात.. त्याच झपाटलेल्या अवस्थेत त्याने बायको, नंदितावर केलेली बळजबरी.. उफ्फ..!! तिसरा कल्चरल शॉक दिला होता अमिताभने. पहिला जंजीर’मधे, दुसरा केबीसी’मधे आणि तिसरा ‘अक़्स’मधे. त्याची सेकंड इनिंग सुसाट सुरु झाली होती. सिनेमा सिंगल स्क्रीनवरून मल्टीप्लेक्समधे आला होता. जागतिक मार्केट खुणावत होतं. हमाल आणि कुली बनून रस्त्यावर फिरणारा अमिताभ, स्वत:चं चार्टर्ड प्लेन बाळगणारा ‘रायचंद यशवर्धन’ झाला होता.

     वाढत्या वयाबरोबर त्याची मर्दानी खूबसूरती वाढली होती. त्यात खानदानी आब आला होता. हे एका दिवसाचं नव्हतं. प्रयत्नपूर्वक केलेलं होतं. म्हणूनच मी म्हणते, अमिताभ बुद्धिमान आहे. त्याने जुना अमिताभ भरजरी बासनात लपेटून तिजोरीत ठेऊन दिला. त्यांच्या चाहत्यांच्या दिलात त्याची गहिरी राजमुद्रा आजही आहे, अमिताभला ते माहित आहे.. पण तो आज कुठल्याही कार्यक्रमात, ‘मेरे पास मां है’ किंवा ‘मैं आज भी फेंके हुये पैसे नहीं उठाता’सारखे संवाद म्हणत नाही. ते त्याचे चाहते म्हणतात त्याच्यासाठी. त्यामुळे अजूनही कुठल्याही कार्यक्रमात, हनुवटीवर हात ठेऊन ‘खामोऽऽऽश’ म्हणणारा शत्रुघ्न सिन्हा, ‘ताकी रे ताकी’वर धडपडत थिरकणारा जितेंद्र आणि ‘ये ढाई किलो का हाथ’ वगैरे म्हणून दाखवणारा सनी देओल पहिले की त्यांची कीव येते. अमिताभने स्वत:ची पठडीच बदलून टाकली. नवीन विषय, नवीन दिग्दर्शक, नवीन पद्धतीचं राहणीमान.. आपल्याच राखेतून झेपावलेला फिनिक्सच जणू! त्याच्या या काळातल्या सिनेमांची यादी देण्यात मला काही रस नाही. कारण तुम्ही इथपर्यंत अमिताभचा लेख वाचलात म्हणजे त्याचे चाहते आहात तुम्ही आणि तुमच्याकडे ती यादी असेल.. नाहीतर गुगलवर आहेच. एकच सांगते, तो अक्षरश: ब्लॅक, पिंक आणि खाकी या तिन्ही रंगात लीलया विहार करत होता, नव्हे करत आहे!

     एक फार जुना शब्द, एखाद्या कलावंताच्या नावात ट्रान्सफॉर्म होऊन अनेक भाषात बोलला जावा, हा मान फक्त अमिताभ बच्चनला मिळालाय!

‘बोलबचन’ हा ग्रामीण हिन्दीतला फार जुना शब्द आहे.

वचनबचन! जो पोकळ वायदे, वचनं देतो, त्याला ’बोलबचन देनेवाला’ म्हणतात.

     हाच शब्द थोडा बदलून अमिताभच्या डायलॉगबाजीला त्याचे चाहते, आधी मुंबैया हिन्दीत आणि मग सर्रास बहुतेक भारतीय भाषांत ’बोलबच्चन’ म्हणायला लागले.

     हा मान याआधी कुठल्याही हीरोला मिळालेला नाही.म्हणून तो महानायक!

     कलावंताने कसं असावं, ते ‘असणं’ ग्रेसफुली कॅरी करत कसं जगावं, स्वत:ला कसं प्रमोट करावं, कुटुंब कसं सांभाळावं, प्रेयसीशी असलेलं नातं कसं जपावं, आणि या सगळ्याहून महत्त्वाचं, बावजूद इस सबके, आपली प्रतिमा कशी राखून ठेवावी, याचा उत्तम वस्तुपाठ म्हणजे अमिताभ! तो उगाचच नाही झालेला या शतकाचा ‘महानायक!’

————————————-

(मिथिला सुभाष या नामवंत पटकथाकार संवाद लेखिका आहेत)

‘मीडिया वॉच’ दिवाळी अंकातील (२०२१ ) लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info हे वेब पोर्टल ओपन केल्यावर दिवाळी अंक या category वर क्लिक करा. यावर्षीच्या अंकात प्रसिद्ध झालेले, तसेच जुन्या अंकातील लेखही तिथे वाचता येतील .

Previous articleमोदी सरकारवर बेधडक वार करणार्‍या महुआ मोईत्रा
Next articleतब्बू…ज़हर खूबसूरत हैं आप!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.