पैनगंगेच्या काठावरील मराठी -तेलुगू संस्कृती संगम

– संतोष अरसोड

पैनगंगा नदीने महाराष्ट्र तेलंगणा अशी सीमा निश्चिती केली खरी; मात्र तिचे दोन्ही काठ तेलुगू व मराठी संस्कृतीच्या एकत्रित संसाराच्या स्वप्नांचे साक्षीदार ठरले आहेत. पैनगंगेचे दोन्ही काठ मराठी आणि तेलुगू संस्कृतीचे मनोहारी दर्शन सदोदित घडवत असतात. तिच्या पाण्याने राज्याचे सीमांकन केले असले तरी, तिने दोन राज्याच्या भाषा, संस्कृती, परंपरांना एकाच सूत्रात बांधून ठेवले आहे. तिच्या काठावर लाखो मराठी माणसं तेलुगू भाषिक प्रदेश असलेल्या तेलंगणात, तर मराठी भाषिक असलेला तेलुगू समाज महाराष्ट्रात सुखेनैव वास्तव्य करतो आहे . शेकडो वर्षापासून भिन्न भाषा, संस्कृती व परंपरा जोपासत मराठी आणि तेलुगू माणसं पैनगंगेच्या साक्षीनेच आयुष्य सुंदर, समृद्ध करताहेत.
…………………………………………..

बुलढाणा जिल्ह्यातील अजिंठा डोंगर रांगांमध्ये उगम पावलेली पैनगंगा नदी. अनेक खडकांना भेदत ठिकठिकाणी वळणे घेत ही नदी यवतमाळ जिल्ह्यात प्रवेश करते. उमरखेडजवळ ती विदर्भ आणि मराठवाड्याची सीमा निश्चित करते. उमरखेड तालुक्यात हीच पैनगंगा सहस्रकुंड नावाच्या एका सर्वांग सुंदर धबधब्याला जन्म देते. या धबधब्याच्या बहुतांश धारा या मराठवाड्यात, तर काही विदर्भात. मात्र, हा धबधबा विदर्भ मराठवाड्यासह तेलंगणातील लोकांच्या डोळ्यांचे पावसाळ्यात पारणे फेडतो. पैनगंगेच्या कालव्यांनी विदर्भ-मराठवाड्यासह तेलंगणातील शेती हिरवीगार केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ईसापूर धरणाने शेतीला नवसंजीवनी दिली आहे. तिच्या पाण्याने वनवैभव फुलून आले आहे. पैनगंगा अभयारण्य हे तिचेच अपत्य. तिच्या विस्तीर्ण पात्राने ऐलतीर विदर्भाला, तर पैलतीर मराठवाड्याला दिला आहे. बुलढाणा जिल्ह्याची मुख्य नदी असलेल्या या पैनगंगेने यवतमाळ जिल्ह्यातील पूस, वाघाडी अडाण, अरुणावती, खुनी या उपनद्या आपल्या कवेत घेतल्या आहेत. त्यामुळे तिची कूसही समृद्ध झाली आहे. हीच पैनगंगा जुगाद येथे हळुवारपणे वर्धा नदीत विलीन होते अन्‌ पुढे त्या वैनगंगेच्या विशाल पात्रात आपलं अस्तित्व कायम ठेवते.

ही पैनगंगा केवळ विदर्भ आणि मराठवाड्याचे विभाजन करत नाही, तर ती यवतमाळ जिल्ह्यातल्या झरी जामणी तालुक्यातील अनेक गावाजवळ महाराष्ट्र आणि तेलंगणा अशी विभागणी करते. दोन राज्याच्या सीमारेषेवर असलेल्या या पैनगंगेने अनेकांना रोजगार दिला. जगण्याची नवी उमेद दिली. शेतीला पाणी दिले. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी, पांढरकवडा, झरी जामणी, वणी तालुक्यातील अनेक गावांचे या पैनगंगेने भाषिक मिलन करत संस्कृतीचे सिंचनही केले आहे. या भागात तिने आपल्या कवेत तेलुगू आणि मराठी संस्कृती, परंपरा यांनाही सामावून घेतले आहे. झरी जामणी तालुक्यातील दिग्रस -अनंतपूर या पुलाने पैनगंगेचे पात्र आंतरराज्यीय संस्कृतीला एकत्र जोडताना दिसते. पैनगंगेच्या काठाने महाराष्ट्र तेलंगणा अशी सीमा निश्चिती केली खरी, मात्र तिचे दोन्ही काठ तेलुगू व मराठी संस्कृतीच्या एकत्रित संसाराच्या स्वप्नांचे साक्षीदार ठरले आहेत. तिचे दोन्ही काठ मराठी आणि तेलुगू संस्कृतीचे मनोहारी दर्शन सदोदित घडवत असतात. तिच्या पाण्याने राज्याचे सीमांकन जरी केले असले, तरी ती दोन राज्याच्या भाषा, संस्कृती, परंपरांना मात्र एकाच सूत्रात बांधत आली आहे. तिने लाखो मराठी माणसं तेलुगू भाषिक प्रदेश असलेल्या तेलंगणात, तर मराठी भाषिक असलेल्या तेलुगू समाजाला महाराष्ट्रात स्थायिक केले आहे. मात्र, गेली अनेक वर्ष भिन्न भाषा, संस्कृती व परंपरा जोपासत मराठी आणि तेलुगू माणूस पैनगंगेच्या साक्षीनेच आयुष्य सुंदर करतो आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगेचा हा काठ म्हणजे, दोन भाषिक संस्कृतीचा संगम आहे.

महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात अनेक गावांमध्ये मराठी भाषिक तेलुगू समाज आणि महाराष्ट्रीयन माणूस गेली अनेक वर्ष गुण्यागोविंदाने नांदतो आहे. कर्नाटकातील बिदरच्या काठावर अन्‌ पुढे सोलापूर, नांदेड, चंद्रपूर, सिरोंचा, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्याच्या काही सीमावर्ती भागात मराठी भाषिक तेलुगू समाज बहुसंख्येने आहे. पूर्वी निजाम संस्थानात असलेला तेलुगू भाषिक व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईत स्थायिक झालेला होता. मुंबईच्या कामाठीपुऱ्यात राहून याच तेलुगू बांधवांनी मराठी संस्कृतीसोबत आपली नाळ घट्ट केली होती. महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोती कन्नमवार यांचे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विकासात महत्त्वाचे योगदान राहिलेले आहे. विदर्भातील पहिला जिजाऊ सहकारी कारखाना बुलडाणा जिल्ह्यातील दुसरबीड येथे कन्नमवार यांचे प्रयत्नाने सुरू झाला. दुर्दैवाने तो बंद पडला. कन्नमवार यांनी मराठी भाषेत अनेक पुस्तकं लिहिलीत. त्यात राजमाता जिजाऊ हे त्यांनी लिहिलेले चरित्र ते मुख्यमंत्री असताना सिंदखेडराजा येथे प्रकाशित करण्यात आले होते. महात्मा गांधी यांच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेणारी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिलीत. देशाचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव हे मूळचे तेलुगू भाषिक, पण ते महाराष्ट्रातून लोकसभेवर गेलेत. वि.स. खांडेकर यांच्या ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ‘ययाती’ कादंबरीचे तेलुगू भाषेत भाषांतरही नरसिंहराव यांनी केले. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर महाराष्ट्र विधानसभेचे पहिले अध्यक्ष सयाजी शिलम हे सुद्धा तेलुगू भाषिक होते. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीमध्ये मुंबई येथील कामाठीपुऱ्यात झालेल्या तेलुगू भाषिकांचे योगदान लक्षणीय आहे. सत्यशोधक समाजाची मुंबईत स्थापना व्हावी, म्हणून महात्मा जोतिराव फुले यांनी स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावारू यांना पत्र पाठवले. जोतिरावांच्या या आवाहनास प्रतिसाद म्हणून अय्यावारू यांनी कामाठीपुऱ्यात शाखा स्थापन करून १८ जणांना सभासद केले. स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावारू, नरसिंगराव सायबू वडनाला, जाया यल्लाप्पा लिंगू, व्यंकू बाळूजी कालेवार आदींनी जोतिराव फुले यांचा प्रबोधनाचा विचार त्या काळात मुंबईत पुढे नेला. शंकरराव परश्या यांच्या संपादनाखाली १९१७ ला सुरू झालेल्या ‘तेलगू समाचार’ या मासिकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा लिखाण करायचे. याच परश्या यांच्याशी १९२१ ला सी.के. बोले यांनी कामाठीपुऱ्यात बाबासाहेबांची भेट घालून दिली. पुढील काळात स्वतःच्या मालकीची जागा शंकरराव परश्या यांनी बाबासाहेबांना देऊन ‘भारत भूषण प्रिंटिंग प्रेस’साठी हातभार लावला. मराठी संस्कृतीसोबत या पद्धतीने त्याही काळात तेलुगू भाषिक आपलं नातं टिकवून होता. भाषावार प्रांतरचनेनंतरही ही वीण कधीच सैल झाली नाही.

यवतमाळ जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात राहणारा मराठी भाषिक तेलुगू बांधव मराठी संस्कृतीसोबत आपलं नातं टिकवून आहे. निजामाच्या काळापासून तो येथे आहे. संस्थाने खालसा झाली. आंध्रप्रदेश आणि नंतर तेलंगणा असे राज्य निर्माण झाले. मात्र, राज्याच्या निर्मितीपूर्वीपासूनच सीमेवर तेलुगू भाषिक आणि मराठी माणूस एकमेकांच्या सुख दुःखाचे साक्षीदार आहेत. विस्तीर्ण अशा आदिलाबाद जिल्ह्याचे एकूण चार तुकडे झाले. आदिलाबाद, आसिफाबाद, निर्मल, मंचेरियल असे हे चार जिल्हे. यातील मंचेरियल जर सोडला, तर इतर तीन जिल्ह्याच्या सीमा भागात मराठी भाषिक तेलुगू समूह मोठ्या प्रमाणामध्ये आहे. निर्मल जिल्ह्याच्या सीमाभागात नांदेड, भोकर, धर्माबाद, बिलोली, देगलूर, तर आदिलाबाद जिल्ह्याच्या सीमा भागातील पांढरकवडा, घाटंजी, चंद्रपूर, यवतमाळ, किनवट, मुकुटबन, वणी, झरीजामनी, इस्लापूर आणि आसिफाबाद जिल्ह्यालगत जिवती, राजुरा या भागात मराठी भाषिक तेलुगू समूह मोठ्या प्रमाणात आढळतो. त्यांचे शिक्षण मात्र मराठी भाषेतूनच होते. याउलट, आदिलाबाद, निर्मल, आसिफाबाद या जिल्ह्यात महाराष्ट्रीयन माणसांचे प्रमाण जास्त आहे. तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात अशी काही गाव आहेत की, त्या गावांच्या नावावरूनच तेलुगू संस्कृतीचे संदर्भ मिळतात. अहेरअल्ली, सतपल्ली, कमळवेल्ली अशा नावांची गावे त्याची निदर्शक आहेत. तेलगू संस्कृतीशी नाळ जुळलेली मराठी भाषिक तेलुगू माणसं मराठी मन घेऊनच आयुष्य जगत आहेत. यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरील वठोली, सतपल्ली, दिग्रस, कमळवेल्ली, पाटण, सुरदापूर, तुरभा, धानोरा, लिंगटी, गाडेघाट, मांगली ,हिरापूर, बहिरमपूर, गवारा टाकळी, जामनी, अर्धवन, मुकुटबन, पिंपरड, रुईकोट, मार्की, अहेरअल्ली आदी गावात मराठी भाषिक तेलुगू बहुसंख्येने आहेत. मानसिकदृष्ट्या ते मराठी संस्कृतीशी एकरूप झाले आहे. कुठलाही भाषिक माज त्यांच्यामध्ये दिसून येत नाही. त्यांचे दैनंदिन व्यवहार दोन संस्कृतीचे मनोमिलन घडून आणते. मराठी मातीने त्यांना आपले करून घेतले आहे. पैनगंगेचा काठ दोन संस्कृतीचे मनोमिलन आपल्या डोळ्यात साठवून घेत असतो.

तेलुगू माणूस निडर आहे, तितकाच भाबडा सुद्धा. श्रमावर त्याची प्रचंड निष्ठा. तो प्रचंड धार्मिक आहे. परंपरेवर त्याचे तितकेच प्रेम. पोचम्मा आई हे त्यांचे खास दैवत. पोचम्मा आईच्या पूजेशिवाय त्यांचे पान हलत नाही. वास्तू, नवस, तेरवी, लग्नकार्य आदी प्रसंगी पोचम्मा आईला बोकड कापावे, ही त्यांची खास प्रथा विज्ञान युगातही कायम आहे. घर बांधकामाच्या अनुषंगाने शिक्षक रमेश पडलवार मजेशीर माहिती देत होते. ते म्हणाले की, ‘‘घर बांधत असताना त्या जागेस बोकडाचे रक्त द्यावेच लागते. पूर्वापार चालत आलेली आमची ही परंपरा आम्ही महाराष्ट्रात असूनही कायम आहे. घरावर स्लॅब पडला की आम्ही ‘शिकट दयाव्हारा’ हा विधी करतो. ‘शिकट’ म्हणजे अंधार अन्‌ ‘दयाव्हारा’ म्हणजे देवकार्य. त्यामुळे हा कार्यक्रम अंधारात अर्थात रात्रीचे वेळीच केला जातो. घराच्या मध्यवर्ती जागेत एक खड्डा खोदून त्यात बोकडाचे रक्त टाकले जाते. पोचम्मा आईसाठी हे सारे करावे लागते. त्याशिवाय घरात पाय ठेवता येत नाही. लोकांची पंगत बसवायची अन्‌ हात मात्र त्याच खड्ड्यात धुवायचे. (जसे महाराष्ट्रात गौरी पूजनाचे वेळी हात एका खड्ड्यात धुतले जातात तसे!) त्यानंतर हा खड्डा बुजून प्लास्टर किंवा टाइल्स बसवली जाते. तेलुगू समाजाच्या या परंपरेचा प्रभाव आता मराठी माणसांवरही पडत आहे. मात्र, जे लोक बोकडाचा बळी देत नाही, ते लोक पोचम्मा आईस बोकड सोडून देतात आणि प्रतीक म्हणून बोकडाऐवजी नारळ किंवा कांदे त्या खड्ड्यात पुरतात.’’

 

तेरवीसारख्या महाराष्ट्रीयन परंपरांचा मराठी भाषिक तेलुगू समाजावर विशेष परिणाम झालेला दिसत नाही. मराठी भाषिक तेलुगू समाजामध्ये ९० टक्के तेरव्या बोकडाच्या जेवणाशिवाय पार पडत नाही. विशेष म्हणजे, तेरवीऐवजी तिसरा किंवा पाचवा दिवस पाळला जातो आणि हा दिवस शनिवार किंवा सोमवारच असावा, याचे बंधन असते. तीन दिवसाचे सुतक पाळल्या जाते. या तीन दिवसात घरातील एकाही व्यक्तीस घरात प्रवेश नसतो. व्हरांड्यातच त्यांना आपलं दुःख पचवावे लागते. फक्त घरातील मुलीस मात्र घरात प्रवेश करण्याची मुभा असते. कारण, मुलगी ही परक्याचे धन आहे, ही भावना यामागे आहे. मुलीला घरात प्रवेश जरी असला, तरी तिला मात्र घरात जाऊन स्वयंपाक करता येत नाही. अशा दिवसात शेजारी मात्र त्यांच्या जेवणाची व्यवस्था करतात. बोकडाचे जेवण देऊन मग हे सुतक संपते. प्रबोधनाच्या अभावामुळे बोकड बळीची ही परंपरा अजूनही कायम आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करणारे काही कार्यकर्ते या विषयात प्रबोधन करताना दिसतात.’’

भाषा ही माणसं जोडण्याचे प्रभावी माध्यम आहे. सीमेवरील या भागात मूळ मराठी माणूसही तेलुगू भाषा अस्खलित बोलतो, तर तेलुगू भाषिक मराठी माणूसही सुंदर मराठी बोलतो. फक्त तेलुगू भाषिक मराठी माणसाचे मराठीचे उच्चार थोडे वेगळे येतात. ‘खाऊ’चा उच्चार ‘काऊ’, ‘भारत’चा उच्चार ‘बारत’ असा करतात. पण, त्यातही एक वेगळाच गोडवा असतो. आपल्याकडे तेलुगू समाजातील मुलांना शाळेत मराठीतूनच शिक्षण घ्यावे लागते. चंद्रपुरात मात्र तेलुगू भाषिकांसाठी जिल्हा परिषदेच्या शाळेचे निर्माण करण्यात आले. शाळेतील सर्वच सांस्कृतिक कार्यक्रम हे मराठी संस्कृतीला धरूनच होतात. कुणालाही शाळेत तेलुगू भाषेत संवाद साधण्याची मनाई आहे. मराठी भाषिक तेलुगू विद्यार्थी आईवडील व मित्रांसोबत तेलुगू भाषेत संवाद साधतो, तर त्याच मित्रांसोबत त्याला शाळेत मात्र मराठीत संवाद साधावा लागतो. मराठीमधून संशोधन करण्याच्या क्षेत्रात यामुळे भविष्यात या विद्यार्थ्यांना भाषेचे काही प्रमाणात अडचण येतेच. या संदर्भात सुप्रसिद्ध साहित्यिक हेमंत कांबळे महत्त्वाची माहिती देत होते. ते म्हणाले की, ‘‘निजामाच्या राज्यात मूळ भाषा ही उर्दू होती. त्यामुळे सीमा भागातील मुस्लिम विद्यार्थी मात्र प्राथमिक शिक्षण उर्दूतून घेत होता. सीमा भागातील मुस्लिम तेलंगणाशी कनेक्ट आहेत. अनेकांची आई ही तेलंगणातीलच, तर बाप महाराष्ट्रीयन अन्‌ मुलाचे शिक्षण उर्दूत अशी स्थिती. तीस वर्षांपूर्वी अनेक मुस्लिम मुलांना चौथीपर्यंत उर्दूत शिक्षण घेतल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी जाण्याची सोय नसल्यामुळे मराठी पहिल्या वर्गात प्रवेश घ्यावा लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. यामुळे अनेक मुस्लिम तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त झाले. अलीकडे मात्र मुस्लिम वर्ग मराठीतून शिक्षण घेण्याकडे वळताना दिसत असल्याचे आशादायी चित्र आहे. सीमा भागातील काही गावात तर तेलुगू, बंजारी, गोंडी, मराठी, हिंदी आदी भाषा हातात हात घालून चालत असताना दिसते. ही माणसं तेलुगू भाषा बोलतात तर खरे, मात्र त्यांना तेलुगू अक्षरं ना लिहिता येत न वाचता येत.

सण उत्सवात एकतेचे प्रतिबिंब

सीमा भागात मराठी भाषिक आणि मराठी भाषिक तेलुगू यांच्यातील काही परंपरांमध्ये बऱ्यापैकी साम्य आढळून येते. या संदर्भात पत्रकार कपिल अगलवार माहिती देताना म्हणाले, ‘‘पोळा, दसरा, दिवाळी आदी सण आम्ही एकोप्यानेच साजरे करतो. गुढीपाडवा हा महाराष्ट्राचा प्रमुख सण. मराठी नववर्षाचा प्रारंभ. मराठी भाषिक तेलुगू समाज या सणाला ‘उगादी’ असे म्हणतो. गुढीपाडव्याला मराठी माणूस घरावर गुढ्या उभारतो. मराठी भाषिक तेलुगू शेतकरी याच सणापासून शेतीच्या कामाला प्रारंभ करतो. या दिवशी तो शेतामध्ये नांगर धरतो. कुऱ्हाडीस नवीन दांडा बसवला जातो. शेतात जाऊन पाच पांडवांचे प्रतीक म्हणून पाच दगड ठेवले जातात. शमीच्या झाडाचे पूजन केले जाते. त्या दगडावर दहीभात ठेवला जातो. मराठी माणूससुद्धा या परंपरेचे काही भागांमध्ये पालन करताना दिसतो.’’

तेलंगणामध्ये ‘बदकम्मा’ हा सण मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. महिलांचे भावविश्व उजागर करणारा हा महत्त्वाचा सण. तेलंगणा सरकारने या सणाला राज्यस्तरीय सणाचा दर्जा दिला आहे. राज्यात सरकारतर्फे महिलांना साड्यांचे वाटपही केल्या जाते. सीमा भागातील मराठी भाषिक तेलुगू तरुणांच्या बहुतांश सोयरीक तेलंगणातील मुलीशीच होतात. त्यामुळे सीमा भागात वास्तव्य करणाऱ्या मूळच्या तेलंगणाच्या या स्त्रिया आपल्या परंपरा सोडत नाहीत. सीमा भागातील मराठी भाषिक तेलुगू महिलांचा हा महत्त्वाचा सण नवचैतन्याने साजरा होतो. ‘बदकम्मा’ या शब्दाचा अपभ्रंश होऊन त्याला ‘बोडेम्मा’ सुद्धा म्हणतात. दहा दिवस हा उत्सव महिलांना एका वेगळ्या सांस्कृतिक वातावरणात घेऊन जातो. निसर्ग आणि लोकपरंपरेशी जवळीक असलेला हा सण. दसऱ्याचे एक दिवस आधी हा सण सुरू होतो. गावात एका मोकळ्या जागेत एक खड्डा केला जातो. त्या खड्ड्याला सारवले जाते. अवतीभवती रांगोळी आणि फुलांची सजावट केली जाते. या खड्ड्याभोवती सर्व महिला आपापले बदकम्मे आणून ठेवतात. वरून निमुळती होत खाली पसरट होत असलेली एक प्रतिकृती म्हणजे हे बदकम्मे. त्याला गवत, विविध रंगांची फुले लावून सजवले जातात. दररोज रात्री सर्व महिला नटून थटून एकत्र येतात. डफडे, टाळ्या, टिपऱ्या याचे तालावर लोकगीतांसह या महिला फेर धरतात. मुस्लिम महिला सुद्धा प्रत्यक्ष सहभाग घेत नसल्या, तरी त्या पाठिंबा म्हणून या उत्सवात सहभागी होतातच. गुजरातमध्ये नवरात्रात जसा गरबा चालतो, तसा हा बदकम्मा. रात्रीचे बारा वाजेपर्यंत एका नव्या चैतन्याने महिला लोकगीतांवर फेर धरतात. ‘बोड्डेम्मा बोड्डेम्मा कोले, नी बिडड्या दोरसानी कोले,’ अर्थात, तुमची मुलगी मालकीण आहे, असा आशय या लोकगीतातून पुढे येतो. दहा दिवसानंतर या बदकम्माचे नदीच्या पात्रात देखणे विसर्जन होते. बदकम्मावर दिवे लावून ते सर्व बदकम्मे रात्री नदीच्या पात्रात सोडले जातात. नदीचे पात्र दिव्यांनी लखलखीत होते. घरून पुरणपोळीचे डबे आणले जातात. एकत्र स्नेहभोजन होते. सांस्कृतिक विरहाचे दुःख घेऊन महिलांची जड पावले घराकडे वळतात. यासंदर्भात अभ्यासक आणि वक्ता असलेली प्रतीक्षा गुरूनुले म्हणाली, ‘‘संस्कृतीने माणसं जोडण्याचा पायंडा पाडला आहे. कारण, जिथे जाऊ तिथे समरस होऊ, अशी एकूण मानवी स्वभावाची धारणा असते. तसाच प्रत्यय मूळच्या आंध्रप्रदेशातून, आताच्या तेलंगणातून स्थायिक झालेल्या तेलुगू भाषिकांबद्दल येतो. मूळच्या महाराष्ट्रीयन लोकांच्या जगण्याशी पूर्णतः विलीन झालेल्या या समुदायाशी आम्ही पण खूप एकजीव झालोय. तेलंगणाच्या सीमावर्ती भागातील मराठी समुदायसुद्धा त्यांच्या चालीरीती, संस्कृती, सण- उत्सव मोठ्या हर्षोल्हासात साजरा करतो. अगदी मी सुद्धा नवरात्रोत्सवाच्या सुरवातीला सुरू होणाऱ्या बदकम्मा सणाची चाहती आहे आणि हा बदकम्मा उत्सव मराठी समुदायाशी इतका एकरूप आणि एकजीव झाला आहे की, आमच्या गावात तेलुगू भाषिक एकही कुटुंब नाही, म्हणून बदकम्माची पारंपरिक तेलुगूतील लोकगीत आम्ही मराठीत म्हणतो. आमच्या आजीच्या पिढीपासून बहुधा मराठी लोकगीते ही मौखिक परंपरेने चालत आली असावी, असे वाटते. बदकम्मा भोवती फेर धरलेला चाफा, हा खेळ प्रकार मराठी महिलांमध्ये पण खूप लोकप्रिय आहे. विशेषत: तेलुगू भाषिक लोकांच्या आवडीप्रमाणे पट्टू-लेहंगा हा घागरा-चोलीसारखा पेहराव लहान मुली आवडीने परिधान करतात. मला तेलंगणातील लाचाच्या डिझाईन्स आणि घेरदार घागरा खूप आवडतो. तिथल्या साड्या-पातळ या भागातील महिलांना विशेष आवडते. ब्लाऊजवर हाताने केलेल सुंदर नक्षीकाम तर खूप लोकप्रिय आहे. माझ्यासाठी तेलुगू लोकांच्या मंगळसूत्रांच्या डिझाईन्स, कानातले, कानवेल ज्वेलरी, हेअर स्टाईल, गजऱ्याची सजावट हा लहानपणापासूनच कुतूहलाचा विषय आहे. आमच्या सीमावर्ती भागात तेलंगणातील महिला ज्या डिझाईन्सचे पैंजण वापरतात, ते जवळपास आम्ही सर्वच महिला आवडीने वापरतो. कितीतरी मित्र-मैत्रिणी तेलुगू भाषिक आहेत. तेलुगू संस्कृतीशी जुळलेले आहेत. त्यांच्यासोबत जुळताना, सण- उत्सवात, लग्न-समारंभात सहभागी होण्याची खूप हौस वाटते. एक मराठी तरुणी म्हणून या संस्कृतीशी एकजीव, समरस होताना मला अजून अभिमान वाटतो. कारण, इथे होणारा भाषिक संकर, दोन राज्यांच्या संस्कृतीचा संकर, हा नवोन्मेष भारतातील विविधतेत एकतेचा परिचय देतो.’’

मासिक पाळीचा उत्सव
……………………………………
मासिक पाळीबाबत आजही अनेक ठिकाणी फार उघडपणे बोलले जात नाही. शारीरिक बदलाची आरोग्यविषयक माहिती असणे आवश्यक असते. स्त्रीची मासिक पाळी, हे खरंतर सृजनाची सुरुवात असते. परंतु, परंपरेच्या नावाखाली अनेकांना सृजनाचीही भीती वाटते. ग्रामीण भागात तर आजही मासिक पाळीबाबत आईसुद्धा मुलीसोबत आरोग्य विषयक बोलत नाही. तेलुगू भाषिक मराठी समाज मुलींच्या बाबतीत अतिशय दक्ष आहे. इकडे मुलींचे शिक्षणातील प्रमाणही वाढते आहे. तेलुगू भाषिक मराठी समाज मुलीच्या मासिक पाळीचा उत्सव साजरा करतात. मुलगी वयात आली, याचे भान यावे आणि भविष्यात तिचे लग्न करायचे आहे, हा संदेश समाजामध्ये जावा, म्हणून ही प्रथा आजही पाळली जाते. आर्थिक स्थिती पाहून या कार्यक्रमाचे स्वरूप ठरते. श्रीमंत असेल, तर एखादे भव्य असे मंगल कार्यालय बुक केले जाते. यावेळी नातेवाईक व जवळच्या कुटुंबांना निमंत्रण दिले जाते. यात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो. कार्यक्रमाच्या निमित्ताने मुलीसाठी फळे व इतर प्रेझेंट आप्तस्वकीय घेऊन येत असतात. त्यानंतर जेवणाचा कार्यक्रमही पार पडतो. अशा प्रकारचे कार्यक्रम करण्यासाठी प्रचंड मोठे मानसिक धाडस लागते. परंपरेचा पगडा म्हणून जरी ही प्रथा सुरू असली, तरी हे एक क्रांतिकारी पाऊल असल्याची प्रतिक्रिया प्रा.डॉ. विठ्ठल पाईलवार यांनी दिली.

मराठी भाषिक तेलगू समाजात विवाह पद्धतीला महत्त्वाचे स्थान आहे . मातृसत्ताक कुटुंब पद्धतीचा प्रभाव असल्याने मुलीचा संपत्तीत वाटा असावा, ही भावना आजही प्रबळ आहे. मुलाकडील मंडळी आली आणि मुलगी पसंत असल्याचा होकार आला, तरच त्यांना जेवण दिले जाते आणि तेही पुरणपोळीचे. याला ‘पक्का भोजनम’ असे म्हणतात. म्हणजे, सोयरीक पक्की झाल्याचे जेवण. सोयरीक पक्की झाल्यानंतर घराच्या मोठ्या दरवाज्यास पाच ठिकाणी टिळे लावले जातात. मराठी माणूस मात्र सोयरीकप्रसंगी नाश्ता आणि जेवणावर जास्त खर्च करतो. मराठी माणसाच्या अनेक सोयरिका खाऊन-पिऊन झाल्यावरही तुटतात. मात्र तेलुगू समाजामध्ये पहिले होकार, नंतर जेवण अशी प्रथा आहे. अलीकडच्या काळात पुरणपोळीऐवजी तेलुगू समाजात सोयरीकप्रसंगी गुलाबजाम व इतर मिष्टान्नांचाही वापर होताना दिसतो. या विवाह पद्धतीबाबत अंनिसचे कार्यकर्ते आणि मुख्याध्यापक असलेले अरविंद गांगुलवार सांगत होते की, ‘‘आमच्याकडे बहुतांश संबंध हे तेलंगणातच होतात. त्यामुळे, विवाहासंदर्भात तिकडच्या परंपरांचे पालन करावे लागते. ६०- ७० वर्षांपूर्वी ‘पैडूमुडकू’ नावाचा एक विधी लग्नाआधी व्हायचा. या विधीत वरपक्षाकडील मंडळी मुलीला दागिने, कपडेलत्ते घ्यायचे. एक दिवस आधी नवरी मुलीस वराचे गावी आणावे लागे. त्यांची व्यवस्था शेजारी केली जायची. मात्र, अलीकडे मराठी संस्कृतीचा बऱ्यापैकी प्रभाव तेलुगू विवाह पद्धतीवर पडला आहे. हळदीचे कार्यक्रम, डीजेवर नाच करणे, असे संस्कार तेलगू समाज स्वीकारतो आहे. मात्र, लग्न हे ठरलेल्या वेळेवरच लावले जाते. तेलुगू विवाह पद्धतीत ब्राह्मणाऐवजी वडीलधारी मंडळीच्या साक्षीने लग्न करण्यास प्राधान्य आहे. ‘जंगम’ हे त्यांचे गुरु लग्नविधीत पूजापाठ करतात. तो नसला, तर वडीलधारी मंडळी हा विधी पार पाडतात. मात्र, ब्राह्मण भटजी नकोच. वडीलधारी मंडळींना ‘पिद्दाकापू’ असे म्हणतात. त्यांचेच साक्षीने वधू-वरांची ‘ब्रह्ममुडी’ अर्थात गाठ पाडल्या जाते. गाठ पाडल्यानंतर गूळ व जिरे एकत्र कांडून ते विड्याच्या पानावर लावल्या जाते. हे विड्याचे पान वधू-वरांच्या मस्तकावर लावले जाते. पूर्वी चार-पाच देवांचे नाव घेऊन लग्न संस्कार आटोपत असत. मात्र, आता त्यामध्ये खूप बदल होताना दिसतो आहे. मराठी मंगलाष्टक होतात. त्यात एखादे तेलुगू मंगलाष्टक अॅड होते. होमहवन, डीजेचा ताल व हळूच सत्यनारायणाची पूजाही आता तेलुगू समाजाच्या विवाहात सुरू झाली आहे. तेलुगू समाजात काही भागात वराला वधूच्या गावी लग्न लागल्यानंतर मुक्कामी राहावे लागते. ही जुनी प्रथा आजही तुरळकपणे का होईना कायम आहे. हुंडा पद्धतीचे प्रस्थ अजूनही या समाजातून कमी झालेले नाही. नोकरीवाल्या मुलास अधिक प्राधान्य दिले जाते. त्यासाठी मराठी माणूस जसा कर्जबाजारी होतो, तसाच तेलगू माणूससुद्धा. दहा लाखापासून एक करोडपर्यंत हुंड्याची ही रक्कम जाते. यात सुशिक्षित वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी होतो, हे भीषण वास्तव अजूनही संपायला तयार नाही.’’

व्यवसायाच्या निमित्ताने तेलुगू माणूस सर्वत्र संचार करतो. शेती हा त्याचा प्रमुख व्यवसाय आहे. याबाबत शिक्षक असलेले विजय मेंगनवार सांगत होते की, ‘‘पहिला पाऊस आला की, नदीला नैवेद्य दाखविण्याची परंपरा आहे. शेती पिकली पाहिजे, त्यासाठी नदी सदैव तुडुंब भरून राहावी, या भावनेतून नदीवर कणकीचे दिवे लावून तिथे स्वयंपाक केला जातो. तेलुगू माणूस प्रचंड मेहनती आहे. तो अहोरात्र घाम गाळतो. विदर्भ मराठवाड्यातील अनेक भागात जाऊन ही माणसं भाडेतत्त्वावर शेती करतात. प्रामुख्याने या शेतीत ते मिरचीचे प्रचंड उत्पादन घेतात. काटकसर करून दरवर्षी थोडी का होईना, सोन्याच्या रूपात ते आपली पुंजी जमा करतात. तरुण पिढी शेती व्यवसायाव्यतिरिक्त छोट्या-मोठ्या व्यवसायात उतरली आहे. आमच्यातील बेलदार हा समूह अनेक ठिकाणी स्थलांतरित झालेला आहे. त्यांच्याकडे बांधकामाचे कौशल्य आहे. अनेक ठिकाणच्या मंदिर उभारणीत या समूहाचा सिंहाचा वाटा आहे. या व्यवसायाच्या निमित्ताने बेलदार समूहाला भटकंती करावी लागते. त्यामुळे तो ज्या भागात जातो, त्या भागाच्या संस्कृतीशी एकरूप होतो. नेटाने कष्ट करून आयुष्य जगणारा तेलुगू समूह मराठी भाषिक संस्कृतीशी आपली वीण अधिक घट्ट करून आहे.’’

मराठी भाषिक तेलुगू समाजामध्ये खाद्य संस्कृतीत आंबट पदार्थ जास्त वापरतात. चिंच ही त्यांच्या खाद्य संस्कृतीतील महत्त्वाचा घटक आहे. जेवणात चिंच असलीच पाहिजे. चिंचेचे पाणी अर्थात ‘शारू’ आणि भात हा त्यांचा मेनू. कण्या आणि डाळ ज्याला ‘गटकापप्पू’ म्हणतात, तो ते आवडीने खातात. आता मात्र कण्याऐवजी भात आणि डाळ या मेनूची चलती आहे. याला ‘आन्नमपप्पू’ असे म्हणतात. चिंचेचे पाणी तयार करून त्यास फोडणी द्यायची व तिखट-गोड मिश्रण करायचे. याला ‘फुलुस’ असे म्हणतात. कढीसाठी पर्याय म्हणून हा पदार्थ वापरला जातो. आता चिंचेचे प्रमाणही कमी होत असल्याने व गहू संस्कृती वाढत असल्याने वरण, भात, पोळी हे महाराष्ट्रीयन जेवणही मराठी भाषिक तेलगू समाजाने आनंदाने स्वीकारले आहे. निजाम राज्यात पूर्वज असल्याने बिर्याणी हा प्रकार त्यांना अधिक प्रिय आहे. आदिलाबाद, निर्मल पांढरकवडा, नांदेड आदी ठिकाणी हॉटेलची नावे तेलुगू व मराठीत असल्याचे दिसते. दाक्षिणात्य संस्कृतीचा प्रभाव असल्याने उपमा, उत्तप्पा, इडली सांबार, डोसा हे त्यांचे खाद्यपदार्थ आता मराठी माणसाने स्वीकारले आहेत, हे विशेष. खाद्य संस्कृतीने मराठी व तेलंगू माणूस असा जोडला आहे. मराठी भाषिक तेलुगू माणसाचं व्यावहारिक नातं जरी महाराष्ट्राशी असलं, तरी त्याचं भावनिक नातं तेलंगणाशी आहे. असे असले, तरी हा माणूस भाषिक अस्मितेला कधी कुरवाळत बसत नाही. पैनगंगेचा काठ याचा साक्षीदार आहे.

अशी ही आडनावे, असे हे जातसमूह
…………………………………………………
महाराष्ट्राच्या सीमा भागातील मराठी भाषिक तेलुगू समूहामध्ये मुन्नूरकापू, कापेवार, तेलंगा, पेरकी, बुरडकापू, वेलमा, जंगम, कोमटी, मालाजंगम, पद्मशाली, मन्नेरवारलू, धोबी, वरठी, मादगी या बलुतेदार जाती आहेत. या जाती मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झालेल्या आहेत. यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, सोलापूर, सिरोंचा, बिजापूर, बिदर, धर्माबाद, मुंबई अशा अनेक ठिकाणी हा जातसमूह आढळून येतो. त्यांच्यामध्ये आडनावात ‘वार’ हा शब्द येतो. काही भागात ‘वार’ऐवजी ‘वाड’ लावतात. मेंगनवार, कासावार, नरडलवार, आडपावार, गादेवार, बद्दमवार, बोदकुरवार, पाईलवार अशी आडनावे आहेत. ‘वार’ आडनावे एन.टी.(ब)मध्ये, तर ‘वाड’ हे एस.टी.मध्ये गणले जातात. किनवट परिसरात ‘वाड’ शब्द असलेली आडनावे अधिक आहेत. मात्र, अलीकडे नाव लिहिताना ‘वार’ किंवा ‘वाड’ला खो देऊन आडनावातील पहिले इंग्रजी अक्षर घेऊन नाव लिहिले जाते. उदाहरणार्थ, जी. अरविंद, एम. विजय, के चंद्रशेखर. यामुळे त्यांची ओळख अधिक स्पष्ट होते.

सीमा भागातील मराठी भाषिक तेलुगू माणूस परंपरा, संस्कृती, विवाहपद्धती, खाद्यसंस्कृती यातून जरी तेलंगणाशी कनेक्ट असला, तरी मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरांशी तो अधिक जवळ आहे. म्हणूनच, तो विविध मराठी सणांमध्ये भाग घेतो. मराठी भाषेवर त्याचे प्रचंड प्रेम आहे. ‘नेनू जन्मतोनी तेलगू उन्हानी गाणी नाकू, मराठी दी अभिमानम उन्नदीं,’ म्हणजे, तेलुगू असलो, तरी मला मराठीचा अभिमान आहे, असं तो म्हणतो. भूप्रदेशाचे सीमांकन जरी झाले असले, तरी मनाने हा माणूस मराठी संस्कृतीचाच भाग झालेला आहे. शेतात बैल चारताना तो सीमारेषेच्या मर्यादा पार ओलांडून टाकतो. त्याचा एक बैल महाराष्ट्रात चरतो, तर दुसरा तेलंगणात. त्याच्या एका बैलास पैनगंगेच्या महाराष्ट्रातील पाण्याने, तर दुसऱ्याला तेलंगणातील पैनगंगेच्या पाण्याने आंघोळ घालावी लागते. घर महाराष्ट्रात अन्‌ वावर तेलंगणात असणारा शेतकरी पूर्वी रोमिंगच्या धाकाने दोन सिमकार्ड वापरायचा. आता रोमिंग फ्री नेटवर्क सर्वत्र आले आहे. पैनगंगेच्या तीरावर दोन संस्कृतीच्या रोमिंगचे मनोमिलन पाहायला मिळते. पांढरकवडा आगारातून सुटणाऱ्या आदिलाबाद बसमध्ये दोन राज्यातील वेशभूषा, भाषा, संस्कृतीचे दर्शन होते. या बसमध्ये एक प्रवासी भेटतो. त्या प्रवाशाच्या अंगात महाराष्ट्रीयन कुर्ता असतो, तर कमरेखाली गुडघ्यापर्यंत गुंडाळलेली तेलंगणाची लुंगी असते. हा प्रवासी ना तेलंगणाचा असतो ना महाराष्ट्राचा. तो फक्त भारतीय असतो.

साभार : ‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०२२

(लेखक ‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक व वेब पोर्टलचे कार्यकारी संपादक आहेत)

9623191923

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here