आपल्यापैकी अनेक जण फेसबुकवर तावातावाने चर्चा, वाद, भांडणं करत असतात. अगदी हमारी तुमरीवर येतात. अशा चर्चा, वाद, गॉसिप आपल्या स्क्रोलमध्ये पुन्हा पुन्हा दिसत राहतं. मग आपल्यालाही त्यात काहीतरी मत मांडावंसं वाटायला लागतं. आपणही त्या वादात, चर्चेत उतरतो आणि हिरीरीने वाद घालत रहातो. एक दिवस, दोन दिवस कितीवेळा हे सगळं चालू असतं हेही आपल्या लक्षात येत नाही.
आपला राग हे फेसबुकसाठी पैसे कमावण्याचं एक महत्वाचं माध्यम आहे.आणि हे म्हणणं आहे फेसबुकमधून बाहेर पडलेल्या फ्रांसिस होगन यांचं. फेसबुकमधून बाहेर पडताना त्यांनी काही महत्वाच्या फाईल्स फेसबुकमधून बाहेर आणल्या आणि त्यांनी काही महत्वाचे आणि धक्कादायक दावे केले आहेत. त्यांना फेसबुक व्हिसल ब्लोअरही म्हटलं जातं. होगन यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी काही गोष्टी पुन्हा पुन्हा फेसबुकमध्ये काम करताना नोंदवल्या आहेत. जसं की फेसबुक लोकांसाठी काय उपयुक्त आहे याचा विचार न करता फक्त फेसबुकच्या फायद्याचं काय आहे याचा विचार करतंय. आणि फायद्याचा म्हणजे अधिक पैसे कमावण्याचा. तुम्ही जितका जास्त कन्टेन्ट वापराल फेसबुकला जास्त फायदा होतो. फेसबुक माणसांच्या भावनांवर चालतं. जितका जास्त राग व्यक्त होतो, तितका अधिक कन्टेन्ट आपण वाचतो. त्यात सहभागी होतो. पोस्ट करतो. जितका वेळ आपण आपल्या भावनांच्या भरात फेसबुकवर वावरू, तितका फेसबुकचा फायदा होत जातो. कारण मुळात फेसबुक ही एक व्यावसायिक कंपनी आहे. नफ्यासाठी सुरु केलेली. त्यांनी पुढे असंही म्हटलं आहे की, फेसबुक हेट स्पीच, ट्रोलिंग कमी करण्यासाठी कुठलीही विशेष पावले जाणून बुजून उचलत नाहीये. कारण जितके जास्त वाद, तितकी एंगेजमेंट जास्त, तितका नफा जास्त. युजर्सच्या सेफ्टी पेक्षा फेसबुकला स्वतःचा नफा जास्त महत्वाचा वाटतोय. मिस इन्फर्मेशनच्या संदर्भातही फेसबुक काही ठोस पावलं उचलत नाहीये आणि टीनएजर सेफ्टीबद्दल निष्काळजी असल्याचे आरोप त्यांनी केले आहेत. हे सगळंच खूप गंभीर आहे.
आपल्याला हे सगळं माहित नव्हतं का?
तर अगदी तसंही नाहीये. अमेरिकेतल्या निवडणुकीत फेसबुकने बजावलेली भूमिका आणि त्याचे पुरावे आपल्यासमोरच आहेत. पूर्वी एकदा काही काळासाठी फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सएप बंद पडल्यावर आपल्यापैकी अनेक जण अस्वस्थ झाले होते आणि तिकडे फेसबुकला ४,४७,३४,८३,००,००० एवढ्या रुपयांचं नुकसान झालं. फक्त सहा तासात. आपल्या आनंदावर, सुखदुःखावर, रागावर, इगोवर फेसबुक किंवा मेटा नावाची प्रचंड मोठी कंपनी उभी राहिली आहे. सोशल मीडिया हा युजर्सच्या भावनांवर चालणारा बाजार आहे. अशावेळी आपल्या भावनांचं किती शोषण होऊ द्यायचं हे ठरवावं लागेल.
या सगळ्यावर मार्क झुकरबर्गने एक लांबलचक पोस्ट केलेली आहे. फेसबुकचे अल्गोरिदम आणि त्यांची नफ्याची गणित कशी आहेत, ती मिनिटा मिनिटाला कशा पद्धतीने बदलतात हे सर्वसामान्य युजर म्हणून आपल्याला समजू शकत नाही. ते अपेक्षितही नाहीये. पण आपल्या भावनांचं शोषण होतंय का, सतत फेसबुकवर जाण्याची तीव्र इच्छा आपल्याला व्यसनाकडे घेऊन जातेय का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या भावना ‘फेसबुक डिपेंडंट’ आहेत का हे आपण नक्कीच तपासू शकतो. फेसबुकने त्याची जबाबदारी उचलणं अपेक्षित आहेच पण युजर म्हणून स्वतःचं कुठल्याच स्तरावर शोषण होऊ न देता सोशल मीडियाचा स्मार्ट वापर करणं आपल्याला जमलं पाहिजे.
(लेखिका समाज माध्यमाच्या अभ्यासक आहेत.)
[email protected]